वाड्यात येऊन जा.. भाग ३९

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ३९


"आर्यन.." माधवरावांनी हाक मारली.

"आजोबा.. हे काय आहे? ही एवढी माणसे घरात का आली आहेत?" आर्यन घाबरून आजोबांना बिलगला होता. "आईबाबा कुठे आहेत?"

"आईबाबा?" कधी नव्हे ते माधवरावांच्या डोळ्यात पाणी आले. "आर्यन, तू शूर आहेस ना?" त्यांनी विचारले.

"मी आहे शूर.. पण आत्ता मला आईबाबा हवेत." आर्यन रडवेला होत म्हणाला.

"आर्यन.. तुझे आईबाबा देवाघरी गेले." माधवरावांनी मन घट्ट करून सांगितले.

"ते मला न घेता कुठेच जात नाही. मी पण जाणार बाप्पाकडे." आर्यन रडत म्हणाला.

"असं नाही म्हणायचं बाळा. आता तूच माझा आधार आहेस." माधवरावांनी आर्यनला मिठी मारली.

"मालक, तयारी झाली." म्हादबाने हळूच येऊन सांगितले.

"सूनबाईंचे भाऊ भावजय आले का?"

"पोहोचतील थोड्या वेळात."

"मग ते आल्यावरच निघू." रडणार्‍या आर्यनला हाताशी धरून माधवराव बाहेर आले. कोणीतरी सांत्वन करायला आले म्हणून माधवरावांनी आर्यनचा हात सोडला. डोळे पुसता पुसता आर्यनने सहज मागे वळून बघितले. वाड्याने जणू त्याचे भव्य तोंड उघडले होते. जे मिळेल ते गिळंकृत करायला. क्षणभर आर्यन रडायचेही विसरला.

"आर्यन.." मामीची हाक ऐकून आर्यनने समोर बघितले. मामा मामी दोघंही आले होते. रडून रडून मामीचे डोळे लाल झाले होते. मामाचेसुद्धा डोळे पाणावले होते.

"काय झालं नक्की? असं अचानक? काल तर बोललो होतो दोघांशी." मामाने विचारले.

"माझ्या मुलीला तार करायला म्हणून निघाले होते. बाईकचा अपघात झाला."
आर्यन आजोबा काय बोलत होते ते ऐकत होता. "माझं एक ऐकाल?" माधवरावांनी मामाला विचारले.

"सांगा ना काका.."

"तुम्ही अंत्यदर्शन घ्या. आणि आर्यनला घेऊन लगेचच निघा. इथे नका थांबू. आणि परत वाड्याशी संबंधही नका ठेवू. आर्यनचा जो काही खर्च होईल तो मी देईन. एवढे उपकार करा." माधवरावांनी हात जोडले.

"असं काय बोलताय काका? आर्यन माझा कोणी नाही का? पैशाची गरज नाही मला. तुम्ही म्हणाला नसता तरी त्याची जबाबदारी घेणारच होतो आम्ही. पण लगेच निघा म्हणताय.. मग अंत्यसंस्कार? आणि विधी?"

"ते मी सगळं करून घेतो. पण हा वाडा आर्यनसाठी चांगला नाही. म्हणून घाई करतो आहे." माधवराव म्हणाले.

"तुम्ही म्हणाल तसं." मामा खांदे उडवत म्हणाला. सगळे परत आत गेले. मामीने आर्यनला धरले होते. माधवरावांनी थरथरत्या हाताने दोन्ही पांढरे कापड बाजूला केले. आर्यन बघतच राहिला. माझ्यासोबत येतोस का, असा हट्ट करणारी आई समोर शांत झोपली होती. त्याच्या कानाशी ती बोलत होती, मी दिलेलं लॉकेट कधीही काढून ठेवू नकोस. आर्यनने गळ्यातले लॉकेट घट्ट धरलं.

"आर्यन... आर्यन.. बरा आहेस ना?" विराजचा आवाज ऐकू येताच आर्यन दचकला. त्याने समोर बघितले. आईबाबा मामामामी, जमलेली माणसे कोणीच नव्हते. विनायकराव, राज, पालवी सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. तो शरमला. त्याचा हात जड झाला होता. त्याने हाताकडे बघितले. गळ्यातले लॉकेट त्याने पकडले होते. घामाने चिंब भिजला होता तो.

"बरा आहेस ना?" विराजने काळजीने परत विचारले.

"हो.. ते.." काय बोलावं ते आर्यनला सुचेना.

"पाणी.." कोणीही न सांगता जुई तोपर्यंत पाणी घेऊन आली होती. आर्यनने ग्लास उचलला आणि घटाघट पाणी पिऊन टाकले.

"आर्यन, इथे बस जरा." माधवरावांनी आवाज दिला. विराजने आर्यनला आधार देत तिथे नेले.

"काही होतंय का?" माधवरावांनी विचारले.

"नाही.. ते.."

"आपण नंतर बोलूयात का?" माधवरावांनी विचारले. आर्यनने इतरांकडे बघितले. माधवराव त्यांना काय सांगणार ही उत्सुकता त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. त्यात परत अडथळा..

"मी आता ठिक आहे. स्वप्न पडलं होतं एक. बाकी काही नाही. तुम्ही जे सांगणार होता ते सांगा ना." आर्यन सारवासारवी करत म्हणाला.

"बरं.. मग मी थोडं बोलायला सुरुवात करतो. खरंतर काय सांगावं, कुठून सांगावं हेच मला समजत नाहीये. पण तुम्हा सगळ्यांनाच याचा काही ना काही कुठे ना कुठे अनुभव आला आहे. त्यामुळे माझे काम थोडेतरी सोपे झाले आहे."

"अनुभव? कसला अनुभव?" विनायकरावांनी विचारले.

"या वाड्याचा अनुभव.. वाड्यातल्या भुताटकीचा अनुभव." माधवरावांचे शब्द ऐकताच सगळ्यांच्याच अंगावर शहारा आला. त्यात भर म्हणून की काय.. खोल्यांचे दरवाजे वाजू लागले. दिवे बंदसुरू होऊ लागले. ते बघून सर्वच घाबरले. माधवरावांनी पुडीतले भस्म काढले. ते सर्वत्र फुंकले. त्यानंतर ते आवाज कमी झाले.

"हे सर्व काय होते?" आवंढा गिळत जुईने विचारले.

"ही होती या वाड्यातली भुतावळ." माधवराव म्हणाले.

"भुतावळ?" आता आपण या भुतांमधून पाणी आणायला गेलो या भितीने जुई चक्कर येऊन पडली. पण ती खाली पडणार तोच आर्यनने तिला धरले.

"काय कटकट आहे? एकतर सकाळपासून हा काहीतरी सांगणार होता. पण एकजण त्याला बोलू देईल तर शपथ. आधी आपण शेतावर काय गेलो, मग तिथून आल्यावर हा मुलगा काय आला.. नंतर हा काय रडला आणि आता ही मुलगी. मला तर मी इथे का आहे, हे ही समजत नाहीये." विनायकराव तणतणले.

"दादा, शांत व्हा. मी आता तुम्हाला सगळं सांगणारच आहे. पण त्याच्यासोबत यांचा जीवदेखील माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. थोडा संयम राखा." माधवराव थोडे कडकपणे विनायकरावांशी बोलले. इकडे आर्यनने जुईच्या तोंडावर पाणी मारायला सुरुवात केली. जुई शुद्धीवर आली. तिने लगेचच आर्यनला मिठी मारली.

"मला इथे भुतांमध्ये नाही रहायचं. प्लीज मला घरी सोडा ना." सर्वांसमोर मारलेल्या मिठीने आर्यन थोडा लाजला. त्याने तिचा हात दूर करायचा प्रयत्न केला.

"जुई, घाबरू नकोस. अजाणतेपणी तू या सगळ्यामध्ये अडकली आहेस. आता लगेचच तुझी यातून सुटका नाही. जे होईल त्याला तोंड द्यायची तयारी ठेव तू." माधवराव म्हणाले. जुई मानेने नाही म्हणत होती.

"मला भुतांची भिती वाटते." ती कशीबशी म्हणाली.

"पोरी, या भुतांपेक्षा माणसातली भुते खूप वाईट असतात. तू काळजी करू नकोस. बाबा आहेत इथे. तुला घाबरायची गरज नाही." नीताताई पुढे होत म्हणाल्या.

"पण.." जुईने बोलायचा प्रयत्न केला.

"सध्या आपण आजोबा जे सांगू पहात आहेत त्यावर लक्ष देऊयात का?" आर्यन जुईला सोडून उभं रहात म्हणाला.

"हो.. मलाही उत्सुकता आहेच." विराजने पुस्ती जोडली. सगळे परत आपापल्या जागेवर बसले. जुईने नीताताईंचा हात घट्ट पकडून ठेवला होता. माधवरावांनी परत बोलायला सुरुवात केली.

"हा वाडा.. या वाड्याचा ज्ञात इतिहास शेकडो वर्ष मागे जातो."

"शेकडो? म्हणजे या वाड्याचे वय काय असेल?" पालवीने प्रश्न विचारला.

"जवळपास तीनशे वर्ष."

"बापरे.. एवढा जुना वाडा?"

"हो.. आणि अजूनही तो जसा बांधला तसाच आहे. त्यात जरादेखील बदल केलेला नाही." माधवरावांनी अभिमानाने सांगितले.

"एवढ्या भक्कम वाड्यात हे असं?" विराजने प्रश्न विचारला.

"तेच तुम्हाला सांगायचे आहे. त्याची सुरुवात होते आपल्या घराण्याच्या मूळ पुरूषापासून. चंद्रसेन महाराजांपासून." माधवराव तिकडच्या एका तैलचित्राजवळ जात म्हणाले.

"हे चंद्रसेन महाराज?" विराजने ते चित्र बारकाईने बघत विचारले.

"हो.. हेच ते. यांचा उदय झाला साधारण पानिपतच्या युद्धानंतर. युद्धात वाचून आलेल्या निवडक सैनिकांपैकी ते एक होते. तिथे गाजवलेल्या पराक्रमाने त्यांनी इथेही नाव कमावले. त्यांच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन पेशव्यांनी त्यांना काही गावे बहाल केली." माधवराव सांगत होते.

"पण वतनदारी नव्हती ना तेव्हा?" राज मध्येच बोलला. हा काय असंबद्ध बोलतो आहे, असं म्हणून सगळ्या माना त्याच्याकडे वळल्या.

"वतनदारी नव्हतीच. पण चंद्रसेनकडे ना स्वतःचे गाव होते ना स्वतःचे घर. मग अश्यावेळेस पेशव्यांना त्याला काहीतरी द्यावेसे वाटले. पण त्याला वसवलेले गाव आयते नको होते. त्याला स्वतःच्या हिमतीवर गाव वसवायचे होते. स्वतःचा मोठा वाडा बांधायचा होता. म्हणून त्याने सरकारातून सवलत मिळवली होती. जिथे त्याला योग्य जागा मिळेल ती जागा जर कायद्यात बसत असेल तर पेशवे त्याला देतील."

"काय तो वेडेपणा? चांगलं वसवलेले गाव घ्यायचे सोडून नवीन गाव वसवायचे?" स्पृहा म्हणाली.

"बरोबर आहे.. वेडाच होता तो.. स्वतःच्या हिमतीवर उभा राहू बघणारा वेडाच होता तो."

कसा वसवला असेल चंद्रसेनने हा वाडा? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all