Login

वाड्यात येऊन जा.. भाग ४०

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४०


"सरकार, अजून किती दूर जायचे आहे?" महादेवने चंद्रसेनला विचारले.

"काय रे एवढ्यात थकला?" आपल्या घोड्याची लगाम खेचत चंद्रसेन थांबला.

"तसे नाही सरकार.. पण घोडे दमले आहेत. आपण पहाटेपासून त्यांना दौडवतो आहे. त्यांना पाणी तरी?" समोरच्या नदीकडे बघत महादेव अदबीने म्हणाला.

"खरं आहे. आम्हाला जरी पाण्याची आवश्यकता भासत नसली तरी त्या मुक्या जनावराला तरी भासते ना. आपण थांबूयात इथेच." चंद्रसेन घोड्यावरून खाली उतरत म्हणाला. त्याच्या मागोमाग महादेवही उतरला. तो घोड्यांना घेऊन नदीजवळ गेला. तिथे त्यांचे मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर त्यांना झाडाखाली बांधले. त्यांच्यासमोर थोडी चंदी टाकली. घोड्यांची व्यवस्था लावल्यावर तो आपल्या मालकापाशी गेला. तोवर चंद्रसेन बाजूच्या उंच शिळेवर चढला होता. तिथून समोरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता.

"सरकार, काही खाणार का?" महादेवने विचारले.

"महादेव, तुला इकडची काही माहिती आहे का?" चंद्रसेनने समोरच्या परिसरावरची नजर न काढता त्याला विचारले.

"नाही सरकार.. पण हवं असेल तर मी चौकशी करतो."

"करायलाच हवी. बघ ना.. या वाटेने येताना आपल्याला जेवढी गावे लागली ती सगळी गजबजलेली होती. पण मग हाच परिसर एवढा शांत का?" चंद्रसेनला ती शांतता खलत होती.

"असेल काही कारण सरकार.."

"मला ते कारण हवं आहे महादेव. आपण इतकी गावे पाहिली. पण मला हिच जागा आवडली आहे. ही जागा मला माझे गाव म्हणून विकसित करायची आहे. पेशव्यांनी जशी पुण्यात सदाशिवपेठ केली आहे अगदी तशीच. पेशव्यांनी जसा शनिवारवाडा बांधला. तसाच वाडा मला इथे बांधायचा आहे." चंद्रसेन बोलत होता.

"सरकारांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील." महादेव म्हणाला.

"तू कदाचित हसत असशील मला. पण खरंच एक ना एक दिवस मी नक्की करून दाखवेन."

"सरकार, तुम्हाला हसायची माझी पात्रता नाही. तुमची स्वप्ने मोठी नक्कीच आहेत. आणि ती पूर्ण करण्याची तुमची क्षमता सुद्धा आहे. म्हणूनच तर हा सेवक सतत तुमच्या पाठी असतो." महादेव म्हणाला.

"महादेवा.. कधी कधी मला असं वाटतं की मला सोबत म्हणून देवानेच तुला पाठवलं असेल. तूच माझं कुटुंब आहेस." चंद्रसेन भाऊकपणे म्हणत होता.

"सरकारांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग मानलं हिच माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे." महादेव म्हणाला.

"मी मनापासून म्हणतो आहे महादेव."

"सरकार, जर एवढा आदर देत आहेत तर एक विनंती होती गरिबाची." महादेव म्हणाला.

"सांग ना.."

"आपल्या घोड्यांचे दाणापाणी झाले आहे. आपणही जर.."

"आहेस खरा चतुर.. चल. आपण शिदोरी खाऊन घेऊ. आणि नंतर मात्र त्या जागेची पहाणी करायला जाऊ." दोघेही शिळेवरून खाली उतरले. त्याच वेळेस दूर कुठेतरी एक टिटवी टिवटिवत उडाली. दोघांनी शिदोरी खाल्ली. नदीवर जाऊन हात धुतले. इथेतिथे बघत चंद्रसेन थोडा पुढे आला असेल तोच..

"भभभभूत...भीमरूपी महारूद्रा.." असं म्हणत कोणीतरी ओरडू लागलं.

"वज्रहनुमान मारुती. वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना." चंद्रसेनाने पुढे म्हणायला सुरुवात करताच ती व्यक्ती गप्प झाली.

"भूत मारूती स्तोत्र म्हणते?" त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसून येत होते.

"आपण बरे आहात ना? मारूती स्तोत्र भूतांना पळवून लावण्यासाठी म्हटलं जातं." चंद्रसेन हसत म्हणाला.

"ते तर आहेच. मी पण ना.." त्याने स्वतःलाच टपली मारली. "आपण कोण? विचारु का? आणि इथे काय करताय?" त्या व्यक्तीने थोडं घाबरतच विचारले.

"मी चंद्रसेन. पेशव्यांचा सरदार. इथे जागा बघायला आलो होतो."

"मुजरा सरकार." समोरचा व्यक्ती पटकन खाली वाकला. "माफी असू द्यात. ते चुकून मी तुम्हाला.." ती व्यक्ती अडखळली.

"माफीची गरज नाही. पण तुम्ही कोण ते ऐकायला आवडेल."

"सरकार, मी राजवर्धन. शेजारच्या गावात पौरोहित्य करतो." तो हात जोडून म्हणाला.

"मग आत्ता इथे?" चंद्रसेनाने विचारले.

"ते माझी गाय या बाजूला पळून आली होती. म्हणून तिच्यामागे आलो तर तुम्ही दिसलात. मला वाटलं... भूत." राजवर्धन म्हणाला. त्याची बोलण्याची पद्धत बघून चंद्रसेनाला हसू आले.

"नाही.. आम्ही इथे अर्धी घटका तरी आहोत. पण कोणतीच गाय इथे आमच्या नजरेला पडली नाही."

"अरे देवा. मग कुठे गेली असेल ती? आजच तर दक्षिणा मिळाली होती." राजवर्धन डोक्याला हात लावत म्हणाला.

"काळजी करू नका. सापडेल ती." चंद्रसेन म्हणाला.

"नाही सापडली तर घरी काय सांगू? माझी घरधनीण.." राजवर्धनने कपाळावरचा घाम पुसला.

"ती नाही सापडली तर आम्ही देऊ. काळजी नका करू. पण त्याआधी आम्हाला थोडी माहिती हवी आहे." चंद्रसेन घोड्याच्या आयाळीवरून हात फिरवत म्हणाला.

"विचारा ना सरकार."

"ही जागा अशी ओसाड का पडली आहे? म्हणजे इथल्या पंचक्रोशीत एवढी मोठी रिक्त जागा आमच्या बघण्यात आली नाही."

"सरकार.. ते.." राजवर्धनची चुळबुळ चालली होती.

"बोला पटकन."

"आपण माझ्या घरी जाऊन बोलूयात का? ही चर्चा करण्यास ही जागा अयोग्य आहे." इथेतिथे बघत राजवर्धन म्हणाला.

"ए बामणा.. नक्की माहीत असेल तरच बोलायचं. उगा दगाफटका केलास ना.." महादेव आपली तलवार त्याच्या गळ्याला लावत म्हणाला.

"अहो.. काय बोलताय हे? मी कशाला दगाफटका करेन?" राजवर्धनचा भितीने थरकाप उडाला होता.

"का? दगा करायचा नाय.. मग सतत इथंतिथं का बघतो आहेस?" महादेव चिडला होता.

"ते होय.. म्हणून तर म्हणालो ना.. इथे नको. आपण इथून बाहेर पडू. मग बोलू." राजवर्धन हातघाईवर आल्यासारखा बोलत होता.

"महादेव, तलवार खाली घे." चंद्रसेन म्हणाला.

"पण सरकार.." महादेवचा अजूनही राजवर्धनवर विश्वास नव्हता.

"हे बघ.. दगा व्हायचा असेल तर तो कधीही होईल. आम्हाला याच्यावर विश्वास ठेवावासा वाटत आहे. आपण जाऊयात यांच्याकडे." चंद्रसेन आपल्या घोड्यावर बसत म्हणाला. ते पाहून महादेवचा नाईलाज झाला. तो ही आपल्या घोड्यावर बसला.

"तुम्ही व्हा पुढे. मी येतो पाठून." हिरमुसलेल्या चेहर्‍याने राजवर्धन म्हणाला.

"महादेवा, त्यांना घ्या तुमच्या घोड्यावर."
चंद्रसेन हसत म्हणाला.

"पण सरकार, त्यांचं सोवळंओवळं असेल. त्याचे काय?" महादेव राजवर्धनकडे बघत मुद्दाम म्हणाला.

"महादेवा, पानिपतावर लढलेले आपण. आपल्यासमोर आदर्श शिवाजीमहाराजांचा आणि बाजीराव सरकारांचा. राजकारणात सोवळंओवळं पाळत बसलो तर यवन आपली लंगोटी पळवून नेतील. बरोबर ना शास्त्रीबुवा?"

"हो सरकार." राजवर्धन म्हणाला. त्याला महादेवने आपल्या घोड्यावर घेतले. आणि तिघेही राजवर्धनच्या घराच्या दिशेने निघाले. घराजवळ येताच राजवर्धन घोड्यावरून उतरला. तसाच पळत पळत तो आत गेला. त्याने त्याच्या बायकोला काहीतरी सांगितले. येताना तो गूळपाणी घेऊन आला. चंद्रसेन आणि महादेव ओसरीत बसले.

"आता सांगा शास्त्रीबुवा." चंद्रसेनने परत पृच्छा केली.

"सरकार, त्या जागेचा नाद सोडा." राजवर्धन सगळा धीर एकवटून म्हणाला.

"काय??" चंद्रसेन ओरडला. ते ऐकून राजवर्धनची बायकामुले घाबरून बाहेर आली. त्यांना नजरेनेच सर्व ठीक आहे असं सांगत राजवर्धनने आत पाठवलं.

"हे सांगण्यासाठी तू इथे आणलंस? मला फक्त एवढंच हवं होतं की ती जागा ओसाड का आहे?" चंद्रसेनाचा राग अनावर झाला होता.

"तेच तर सांगतो आहे, सरकार.. ती जागा झपाटलेली आहे." राजवर्धन बोलू लागला.

"झपाटलेली?"

"हो.. कोणे एके काळी हे गाव म्हणजे एक संस्थान होते. इकडच्या राजांचे तिथे निवासस्थान होते."

"पुढे?" चंद्रसेनाने आतुरतेने विचारले.

"अनेक घडामोडी झाल्या. त्यामध्ये तिथे जीवित हानी झाली. गढी जळाली. इतकी वर्ष झाली त्या घटनेला. पण अजूनही कोणाची हिम्मत झाली नाही परत तिकडे जायची." राजवर्धन बोलतानाही थरथरत होता.

"पण कशाने झपाटली आहे ती जागा?"

"सरकार, इथून तिथून कानावर आलेल्या कथा आहेत. कोणी म्हणतं तिकडच्या राजघराण्याचे आत्मे तिथे फिरतात. तर काही म्हणे तिकडे काही यवनांचे आत्मे आहेत. कारण काहीही असो.. एकेकाळची गजबजलेली जागा आता वाळीत पडली आहे. अगदी जनावरेही तिथे जायला घाबरतात." राजवर्धन सांगून मोकळा झाला.

"मग तर तीच जागा योग्य आहे.. माझ्या वाड्यासाठी." चंद्रसेन आपला निर्णय ऐकवत म्हणाला.


झपाटलेल्या जागेवरच का बांधायचा आहे चंद्रसेनला वाडा? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all