वाड्यात येऊन जा.. भाग ४१

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४१


"सरकार, ऐका माझं.. हा जीवावरचा खेळ नका खेळू. जर जागा वंगाळ असेल तर तो जीवावरचा खेळ असेल." महादेव चंद्रसेनला समजावत म्हणाला.

"महादेव, आता तर मी तिच जागा जमिनीसाठी मागणार. " चंद्रसेन स्वतःच्याच धुंदीत होता.

"पण कशाला विषाची परिक्षा घ्यायची म्हणतो मी."

"त्यातच तर खरी मौज आहे. आणि अजून एक ती जागा झपाटलेली वगैरे नसावी." आजूबाजूला कोणी ऐकत नाही हे बघून चंद्रसेन म्हणाला.

"म्हणजे?"

"त्याने काय सांगितलं ऐकलेस का? इथे आधी राजघराणे रहात होते. राजघराणे म्हणजे त्यांचा खजिना असणार. तोच खजिना त्यांनी दडवलेला असणार. तो इतर कोणाच्या हाती लागू नये म्हणून ही जागा झपाटलेली आहे, अशी अफवा पसरवली असेल त्यांनी." चंद्रसेन स्पष्टीकरण देत म्हणाला.

"सरकार, देव न करो.. काही वंगाळ होवो. पण वाडा बांधणार म्हणजे आपल्यासोबत काही कुटुंबकबिले रहायला येणार. मग आपण आपल्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालणार का?" महादेव चंद्रसेनला समजावत होता. चंद्रसेनला महादेवचे म्हणणे पटले.

"तू जे म्हणतो आहेस ते पटले मला. आपल्यासाठी इतरांचा जीव धोक्यात घालायचा नाही." हे ऐकून महादेवने आणि त्यांचं बोलणं ऐकणार्‍या राजवर्धनने सुटकेचा श्वास सोडला. तोच चंद्रसेन पुढे बोलू लागला. "महादेवा, आपल्याला ते काशीचे गुरूजी भेटलेले तुला आठवते का?"

"हो.. त्यांचे काय?"

"आपला एखादा दूत त्यांच्याकडे पाठव. आणि त्यांना बोलावून घे." चंद्रसेन आपला घोडा वळवत म्हणाला. ते ऐकून राजवर्धन आणि महादेवने एकमेकांकडे बघत डोक्यावर हात मारून घेतला. नकारार्थी मान हलवत महादेव चंद्रसेनच्या पाठी जाऊ लागला. दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरी आले. महादेव प्रयत्न करत होता, चंद्रसेनाचे मन त्या जागेवरून हटवण्याचे. पण तो जेवढे प्रयत्न करत होता तेवढेच त्याचे वेड जास्त वाढत होते. गुरूजी यायच्या आधीच त्याने बांधकामाची रूपरेखा आखायला सुरूवात केली होती.

********

"पण हा काय मूर्खपणा आहे? सगळे नाही म्हणत असताना देखील त्यांनी याच जागेवर वाडा बांधला." न राहवून राजने विचारले.

"आणि मग ते गुरुजी आले होते का?" कथेत गुंतलेल्या सईने विचारले.

"अरे.. हो.. हो.. एकावेळेस एकाने प्रश्न विचारा." माधवराव हातातले बाड बाजूला ठेवत म्हणाले.

"हे नक्की काय आहे?" विनायकरावांनी त्या बाडाकडे बघत विचारले.

"हा आहे आपल्या घराण्याचा इतिहास. चंद्रसेन महाराजांना आपलं घराणं इथेच वसवावे असे वाटत होते. मग त्यांनी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. आणि त्या दप्तरात जपून ठेवल्या. तसं बघायला गेलं तर हे सगळं मला मुखोद्गत आहेच पण तरीही चूक होऊ नये म्हणून ही काळजी." माधवराव म्हणाले.

"कसलं विचित्र आहे ना सगळं? असं वाटतंय आपण कुठलं तरी जुनं पुस्तक वाचतो आहे." स्पृहा म्हणाली.

"आजोबा, हे चंद्रसेन महाराज माझे कोण लागत होते?" विराजने विचारले.

"त्यासाठी मला आपल्या कुटुंबाचा वंशवृक्ष तुला दाखवावा लागेल." माधवराव म्हणाले.

"त्यांच्याशी आपलं काय नातं आहे, हे ऐकायला आम्हा सर्वांनाच आवडेल. पण मला उत्सुकता ही आहे की ही जागा झपाटलेली असताना देखील इथे वाडा कसा बांधला? म्हणजे वाडा बांधताना काही त्रास नाही का झाला?" आर्यनने विचारले.

"तुमचे प्रश्न संपले असतील तर मग पुढे सांगायला सुरुवात करतो." मिश्कीलपणे माधवराव म्हणाले.

"हो.. आता कोणीही मध्ये बोललं तर ओरडा त्यांना." मगाशी भुताची गोष्ट ऐकायची नाही असं म्हणणारी ईशा हे बोलते आहे हे बघून सगळ्यांनाच हसू आले. माधवरावांनी पुढे सांगायला सुरुवात केली.

********

"चंद्रसेन, ही जागा चांगली नव्हे. मला इथे नकारात्मकता जाणवते आहे." गोविंद भट गंभीरपणे सांगत होते. चंद्रसेन त्यांच्यासमोर नम्रतेने उभा होता.

"गुरूजी, प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतोच ना. यावर ही काहीतरी उपाय असणारच. फक्त एकदा प्रयत्न करा ना. तो प्रयत्न जर अयशस्वी ठरला तर मी माझा हट्ट सोडून देईन." चंद्रसेन आर्जव करत म्हणाला.

"चंद्रसेना, तू आम्हाला द्विधा मनस्थितीत टाकलेस. आम्ही पूजाअर्चा करणारे सामान्य. आणि ही गोष्ट आमच्या आवाक्याबाहेरची आहे. पण असो. आम्हाला तू यवनांच्या हातून सोडवलेस. आमच्या कुटुंबाचे शीलरक्षण केलेस याचे उपकार आहेत आमच्या मस्तकावर. त्याची उतराई आम्ही नक्की करू. आमच्या वाडवडिलांनी काहीतरी नक्कीच लिहून ठेवलेलं असेल. आम्हाला जरा त्याचा शोध घेऊ देत. आम्ही तुला नक्कीच यातून सोडवू."

"गुरूजी, तिथे मी जे केले ते माझे कर्तव्यच होते. त्याची उतराई वगैरे काही मनात आणू नका. तुम्ही माझे हितचिंतक वाटलात. म्हणून तुम्हाला विचारायचे मी धाडस केले." चंद्रसेनच्या बोलण्यात वेदना जाणवत होती. "तुम्ही म्हणाल तर मी आत्ता या जागेचा विचार सोडून देतो."

"त्याची गरज नाही. आमच्या तोंडून गेलेला शब्द हा फुकाचा नसतो. आता हे आमचे वचन समज. जोवर तुला या दुष्ट छायेतून आम्ही सोडवत नाही आम्ही या वचनाशी बांधले गेले आहोत." गोविंद भट निश्चलपणे म्हणाले. गोविंद भट तिथून निघाले. पण चंद्रसेन मात्र त्या जागेकडे बघत राहिला. जणू कसलीतरी भुरळ त्याच्यावर पडली होती.

"सरकार.." महादेव शेजारी येऊन उभा राहिला. "गुरूजी गेले पुढे." नाईलाजाने चंद्रसेन महादेवासोबत निघाला. गोविंद भट त्यांच्या घरी गेले. आपलं गाव सोडून ते महाराष्ट्रात आले होते. येताना बाकी काही आणायला त्यांना जमलं नव्हतं. पण न विसरता त्यांनी घरातल्या जुन्या पोथ्या सोबत घेतल्या होत्या. चंद्रसेनने शोधलेल्या जागेवरून आल्यापासून त्यांनी स्वतःला त्या पोथ्यांमध्ये बुडवून घेतले होते. सर्व पोथ्या धुंडाळूनही त्यांना हवी ती गोष्ट सापडत नव्हती. शेवटी नाईलाजाने त्यांनी देवघरात ठेवलेली संदूक काढली. देवांना नमस्कार करून त्यांनी ती उघडली. एकेक करून त्यातले कागदपत्र बाहेर काढले. शेवटी त्यांची नजर एका पत्रावर स्थिरावली. "अथर्ववेद.."

"चंद्रसेन, मला थोडं बोलायचं आहे." गोविंद भट चंद्रसेनाला भेटायला आले होते.

"बोला ना गुरूजी."

"आम्ही काल आमच्याजवळील पोथ्या धुंडाळल्या. त्यापैकी एकामध्ये यावरील उपाय सुचवला आहे."

"ही तर आनंदाची गोष्ट आहे गुरूजी." चंद्रसेनाला मनापासून आनंद झाला होता.

"हो.. पण या गोष्टींचा आम्हाला अनुभव नाही. आम्ही प्रयत्न करून बघतो. तो यशस्वी झाला तर ती जागा निर्वेध होईल."

"हे होणारच.. माझी मनोदेवता सांगते आहे." चंद्रसेन म्हणाला.

"मग मला तयारीला लागले पाहिजे." गोविंद भट म्हणाले.

"त्याआधी मी सरकारात अर्ज करतो ती जागा मला देण्यात यावी म्हणून." चंद्रसेनाने ती जागा मागितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटले. कारण कितीतरी वर्षे ती जागा ओसाड पडली होती. आता तो समोरून मागतो आहे म्हटल्यावर लगेचच इनामपत्रे तयार झाली. एकाबाजूला सरकारातून या गोष्टीला मान्यता मिळाली तर दुसरीकडे गोविंद भटांची तयारी झाली होती. निर्जळी उपवास आणि साधना करून ते सामर्थ्य वाढवत होते. शेवटी तो दिवस उगवला. सकाळपासून त्या जागेवर घुबडांनी घूत्कार करायला सुरुवात केली. कुत्री आजूबाजूला येऊन रडू लागली. अनेक कावळे तिथे येऊन घिरट्या घालू लागले. घरातून बाहेर पडताना अनेक अशुभ इशारे गोविंद भटांना मिळत होते. पण कशालाही न घाबरता ते त्या जागेच्या दिशेने चालले होते. त्यांच्या पाठोपाठ चंद्रसेन आणि महादेवही होता. मदतीला म्हणून त्यांनी राजवर्धनला बोलावले होते.
त्या परिसरात प्रवेश करण्याआधी गोविंद भटांनी तिघांनाही एक मंतरलेला रूद्राक्ष दिला.

"हा गळ्यात घाला. आपण आत जाताच काहीही होऊ शकते. आतली ती शक्ती नक्की काय आहे, हे कोणालाही माहीत नाही. ती किती शक्तीशाली आहे, हे ही मला माहित नाही. पण हा रुद्राक्ष तुमची काळजी नक्कीच घेईल. आपण आत प्रवेश केल्यावर आधी मी तुमच्या भोवती भस्माचे रिंगण करेन. मी स्वतः येऊन तुमच्या रुद्राक्षाला हात लावून बाहेर या सांगत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर यायचा धोका पत्करू नका." गोविंद भटांचे बोलणे होताच आतून सोसाट्याचा वारा सुटल्यासारखा आवाज आला. पण आत काहीच दिसत नव्हते. अश्या या वातावरणात गोविंद भटांनी आत पाऊल टाकले.

गोविंद भट यशस्वी झाले असतील का त्या शक्तीला बंदिस्त करायला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all