वाड्यात येऊन जा.. भाग ४२
"तू कोण समजतोस स्वतःला? तुला काय वाटलं, तू इथून जाऊ शकशील?" अनेक आवाज गोविंद भटांच्या कानावर आदळू लागले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्या परिसरात पाऊल टाकले. एक वावटळ उठली. चंद्रसेन, महादेव आणि राजवर्धनने आपले चेहरे झाकून घेतले. त्या वावटळीकडे दुर्लक्ष करत गोविंद भटांनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. त्यांना काही करता येत नाही हे बघून ती शक्ती या तिघांकडे वळली. त्या शक्तीने त्यांना अंकित करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षामुळे ती शक्ती त्यांचेही काही बिघडवू शकली नाही. आलेल्या अपयशाने ती अजून बिथरली. त्या जागेवरची होती नव्हती तेवढी झाडे तिथून उपटली गेली आणि या चौघांच्या दिशेने येऊ लागली. वर न बघताच गोविंद भटांनी आपल्या मंत्रोच्चारांनी ती झाडे हवेतच तरंगत ठेवली. ते बघून हे तिघेही थक्क झाले. गोविंद भट मोठे व्यासंगी आहेत हे त्यांना समजले होते. पण एवढे अधिकारी? चंद्रसेनच्या डोळ्यातून पाणी आले. कधी न रडणार्या आपल्या मालकाला बघून महादेवही हेलावला. जागा मिळाली नाही तरी चालेल पण गोविंद भटांच्या प्रयत्नाला यश येऊ देत अशी प्रार्थना ते तिघेही करू लागले. हळू हळू ती वावटळ कमी झाली. आणि गोविंद भटांचा आवाज वाढला.
त्यांनी मधोमध एक होमवेदी मांडली होती. यज्ञाची सर्व तयारी होत आली होती. हे तिघे अजूनही त्या परिसराच्या सीमेच्या बाहेर होते. गोविंद भटांनी भस्माचे तीन अर्धे रिंगण काढले. त्यांनी आधी राजवर्धनला येण्याची खूण केली. गोविंद भटांनी सांगितलेल्या मंत्राचा उच्चार करत तो आत आला. आत येताच त्याला ती विलक्षण जाणीव झाली. इतके दिवस ती जागा वाईट आहे हे तो ऐकून होता. पण आता त्या जागेच्या विखारीपणाची त्याला जाणीव झाली. मंत्रोच्चार आणि रुद्राक्ष या दोनच गोष्टींमुळे आपण टिकून आहोत हे त्याला समजले. त्याने गोविंद भटांच्या शेजारी काढलेल्या रिंगणात आपली जागा घेतली. तो तिथे बसताच भटांनी ते रिंगण भस्माने बंदिस्त करून टाकले. तीच प्रक्रिया त्यांनी महादेवसाठी पण केली. चंद्रसेनाकडे नजर जाताच त्यांचे भाव बदलले. त्यांनी सोबत आणलेली एक बाहुली काढली. यायच्या आधी चंद्रसेनाचे काढलेले केस आणि रक्त त्या बाहुलीला लावले. त्यांनी राजवर्धनला खुणावताच त्याने ती बाहुली हातात घेतली. भटांनी चंद्रसेनाचा हात धरून आत घेताच राजवर्धनने ती बाहुली बाजूच्या अवकाशात फेकली. बाहुली अभिमंत्रित भागातून बाहेर जाताच ती शक्ती त्या बाहुलीवर तुटून पडली. क्षणार्धात त्या बाहुलीचा चुराडा झाला. ते बघून चंद्रसेनच्या अंगावर शहारा आला. जर त्याने त्या परिसरात थेट पाऊल ठेवले असते तर त्याचेही तेच झाले असते का? गोविंद भटांनी त्याला यजमानाच्या ठिकाणी बसायला सांगितले. त्यांनी आता हवनाला सुरूवात केली. इतका वेळ जणू विसावा घेण्यासाठी थांबलेली ती भुतावळ परत पिसाळली. दुप्पट चिडीने तिने थयथयाट करायला सुरुवात केली. गोविंद भटांनी शेजारीच एक काचेची बाटली ठेवली होती. जसं जसे ते मंत्र म्हणत गेले तशी ती बाटली दुधाळ होऊ लागली. एक क्षण आला आणि तिकडचे भारलेले वातावरण हलके झालेले सगळ्यांना जाणवले. इतका वेळ आजूबाजूला असलेली नकारात्मकता कमी झाल्याचे समजले. इतका वेळ येत नसलेले प्राणी, पक्ष्यांचे आवाज आता ऐकू येऊ लागले. अजूनही गोविंद भटांचे मंत्रोच्चारण थांबले नव्हते. ते बहुतेक कोणत्यातरी खुणेची वाट बघत होते. ती खूण त्यांना जाणवली त्याक्षणी त्यांनी मंत्रोच्चार थांबवले. शक्तीपात झाल्यासारखे ते तिथेच बसून राहिले. ते बघून राजवर्धन उठला. मनात धाकधूक असतानाही त्याने आणलेल्या सामानातून पाण्याची पखाल बाहेर काढली. त्यातले थोडे पाणी त्याने गोविंद भटांच्या चेहर्यावर शिंपडले. त्यांनी डोळे किलकिले करताच त्यांना ते पाणी प्यायला त्याने मदत केली. त्यांना थोडी हुशारी येताच त्यांनी सोबतचे थोडे भस्म त्या पाण्यात टाकले. आणि ते पाणी पिऊन टाकले.
"राजवर्धन, आता पुढचे सगळे तू करशील?" गोविंद भटांनी श्वास घेत विचारले. होकार देत राजवर्धनने सगळी सूत्रे हातात घेतली. तोपर्यंत गोविंद भटांनी ती बाटली बंद केली. आणि ती त्यांनी जपून ठेवली. राजवर्धनने होमात समिधा टाकायला सुरुवात केली. होम पूर्ण होताच चंद्रसेनने गोविंद भटांकडे रिंगणातून बाहेर पडण्याची परवानगी मागितली. त्यांनी मानेनेच होकार दिला. चंद्रसेनने गोविंद भटांचे पाय धरले.
"मला खरंच इथे एवढा धोका आहे, हे माहित नव्हतं. मला क्षमा करा."
"क्षमा करणारा मी कोण? हे तर विधिलिखित होतं. तुला या जागेचे आकर्षण विनाकारण नक्कीच वाटले नसणार. या मागेही काहीतरी परमेश्वरी योजना असणार. आता त्याचा शोध घेतला पाहिजे. सध्यातरी ही जागा तुझ्यासाठी निर्वेध झाली आहे. पण.." बोलता बोलता गोविंद भट थांबले.
"पण काय गुरूजी?"
"ते वेळ आल्यावर सांगेन. आजचे विधी संपन्न झाले आहेत. हा राजवर्धन तुला मुहूर्त काढून देईल. मग लगेचच तू पायाभरणीला सुरुवात कर." गोविंद भट बोलत होते.
"आणि तुम्ही?" ते इथून निघून जाणार की काय या भितीने चंद्रसेनाने विचारले.
"मी? मी इथेच राहणार. कारण एकदा तोंडातून शब्द बाहेर पडला की त्याचे वचन होते. आणि वचन मोडणे हे आमच्या संस्कारात बसत नाही." गोविंद भट काय म्हणाले ते चंद्रसेनाला समजले नाही. पण ते इथून जात नाहीत या गोष्टीचा मात्र त्याला आनंद झाला. सर्व विधी पूर्ण झाल्यावर चंद्रसेन आणि महादेव तिथून गेले. गोविंद भट मात्र मागे रेंगाळले होते. त्यांच्यासोबत राजवर्धन देखील थांबला होता.
"गुरूजी, कसल्या गहन विचारात पडला आहात तुम्ही?" न राहवून त्याने विचारले.
"घटना कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्या घडतातच. आता फक्त त्यातून कमीत कमी हानी कशी होईल तेच बघावं लागेल."
*********
"बापरे.. म्हणजे ही जागा झपाटलेली असताना सुद्धा या चंद्रसेन महाराजांनी इथे वाडा बांधला?" पालवीच्या चेहर्यावर आश्चर्य दिसून येत होतं.
"आणि त्या भटांनी तर ती शक्ती बंदिस्त केली होती. मग ती बाहेर कशी आली?" विनायकरावांनाही आता या कथेत रस निर्माण होऊ लागला होता.
"आणि जर ती बाहेर आली असेल, तर या सगळ्याचा आमच्याशी काय संबंध?" आर्यनने विचारले.
"कधी कधी पूर्वजन्माचे संचित असते ते. आणि तुम्ही मला कधीपासून विचारता आहात की तुमचे चंद्रसेन महाराजांशी नाते काय ते.. मग आता आधीपासूनच सुरुवात करू की वंशवृक्ष सांगू?" माधवरावांनी विचारले. सगळे कोड्यात पडले. खरंतर त्यांना आपलं कोणाशी काय नातं आहे, हे सुद्धा हवं होतं. पण त्याचबरोबर चंद्रसेनचे पुढे काय झाले? ही उत्सुकता सुद्धा शांत बसू देत नव्हती.
"आजोबा.. आता फक्त आम्ही एकमेकांचे कोण लागतो, तेवढं सांगा. मग परत तुमच्या गोष्टीला सुरुवात करा." राज उपाय सुचवत म्हणाला.
"हो.. तेच बरं पडेल." कधी नव्हे ते नीताताईंनी आपलं मत मांडलं.
"बरं.. तर सुरूवात करतो विनायकदादापासून. तो लागतो माझा चुलत चुलत भाऊ."
"मला माहित नव्हते हे.." विनायकराव म्हणाले.
"त्याची कारणमिमांसा आपण नंतर जाणून घेऊ." माधवरावांनी तो विषय संपवला. ही राज आणि पालवी आहेत माझ्या चुलत भावाची केशवदादाची नातवंडे. थोडंतरी समजलं का?" माधवरावांनी चष्म्यातून तिरकस बघत विचारले.
"हो.. म्हणजे प्रयत्न तर करतो आहे. आणि माझं काय? मी कोण?" विराजने विचारले.
"तू आहेस माझ्या मोठ्या भावाचा नातू. आणि ही स्पृहा, याची सख्खी बहीण." माधवराव ओळख करून देत म्हणाले.
"आजोबा, म्हणजे तुम्ही आमच्या आजोबांना मदत करत होता?" विराजने विचारले.
"मदत नाही रे.. कर्तव्य करत होतो. इथे अजूनही वंशपरंपरेने मोठ्या मुलाला सगळे अधिकार मिळतात. तेच अधिकार दादाला सुद्धा मिळाले असते. पण या गावात त्याने पन्नास वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. जो माझ्या सनातनी वडिलांना पटला नाही. म्हणून दादावहिनीला घराबाहेर जावे लागले. आणि नाईलाजाने मला या सगळ्याची जबाबदारी घ्यावी लागली." माधवराव खिन्नपणे बोलू लागले.
"आणि हा आर्यन कोण?" विनायकरावांनी विचारले.
"हा आहे माझा नातू. माझ्या मुलाचा मुलगा."
"मग तुझा मुलगा आणि सून?"
"ते एका अपघातात वारले. मला दोन मुले. त्यातला एक विक्रांत.. याचा बाबा आणि दुसरी ही नीता." डोळे पुसत माधवराव म्हणाले. "आता तरी ओळख पटली का एकमेकांची?" माधवरावांचे बोलणे ऐकून सगळ्यांनी एकमेकांकडे बघितले. ते भेटले तर आजच होते पण असं वाटत होतं की त्यांची जन्मोजन्मीची ओळख आहे.
काय ओळख असेल या सगळ्यांची? बघू पुढील भागात. तोपर्यंत कथा कशी वाटते हे नक्की सांगा. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा