वाड्यात येऊन जा.. भाग ४३

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४३


"मालक..."चहा घेऊन आलेल्या म्हादबाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. वाड्याच्या ऐकलेल्या कथेने सर्वांना धक्का बसला होताच. चहाची गरज सगळ्यांनाच होती. मनोमन त्यांनी म्हादबाचे आभार मानले. चहा पिता पिता आर्यनने इतरांच्या चेहर्‍यावरून नजर फिरवली. नीताताई थोड्या बावरलेल्या असल्या कितीतरी दिवसांनी आपल्या माहेरच्या लोकांमध्ये असल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. पालवी आणि राज.. पालवीचा ओढलेला चेहरा काहीतरी सांगू पहात होता. कसलं तरी विचित्र दुःख तिच्या डोळ्यांमध्ये होतं. तिच्याशेजारी बसलेला राज तिच्या हातावर हात ठेवून बसला होता. तिला आधार देत होता. बहिणभावांचे प्रेम असे असते? त्याची नजर आपसूकच स्पृहा आणि विराजवर गेली. ते दोघे एकमेकांपासून लांब बसले होते. ते कुठेच एकमेकांशी जास्त बोलताना दिसत नव्हते. विनायकराव आपल्याच धुंदीत होते. चहासोबत बिस्किटे का नाही आणली म्हणून म्हादबाला ओरडत होते. आणि माधवराव.. त्याची नजर त्यांच्याकडे गेली. ते त्याच्याकडेच रोखून बघत होते. काही होतं का त्यांच्या नजरेत? त्याने नजर फिरवली. ती समोरच असलेल्या जुईकडे गेली. ती प्रत्येकाला काय हवं नको ते बघत होती. अगदी स्वतः त्या घरची यजमानीण असल्यासारखी. ते वाक्य मनात येताच आर्यन बावरला. त्याने जोरजोरात नकारार्थी मान हलवली. मयुरीने दिलेली जखम अजूनही भरली नव्हती. विचारातून सुटका मिळावी म्हणून तो विराजपाशी जाऊन बसला.

"म्हादबा, तुम्हाला भिती नाही का वाटत?" चहाचे कप बाहेर घेऊन जाणाऱ्या म्हादबाला जुईने विचारले.

"कसली भिती?"

"ते बाहेर जे आहे त्याची?" स्पृहाला सुद्धा आश्चर्य वाटत होते.

"त्याला काय घाबरायचं? मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही." म्हादबा म्हणाला.

"म्हणजे?" काहीच न समजून स्पृहाने विचारले.

"वाघाचे पंजे.. अरे इतकी वर्षे आम्ही इथे राहतो आहोत. किती घाबरणार त्याला. आता सवयीचे झालो आहोत एकमेकांना. मग नाही वाटत भिती." माधवरावांनी उत्तर दिले.

"पण मग आजोबा, इतके वर्ष एकटे का राहिलात? मला का नाही येऊ दिलेत इथे? तसाही मी तिथे एकटाच होतो ना?" बोलता बोलता आर्यनच्या घश्यात आवंढा दाटून आला. मामा मामीने कितीही प्रेमाने वागवले तरी परकेपणाची एक भावना त्याला सतत जाणवायची. अश्यावेळेस आपलं घर असताना असं रहावं लागलं याचं दुःख त्याला होत होते.

"कारण, ती शक्ती तुला तिच्याकडे आकर्षून घेत होती." माधवरावांनी कारण सांगून टाकले.

"म्हणजे??"

"म्हणजे.. इथे जेवढेजण आहेत.. अर्थात विनायकदादा आणि जुई सोडून, बाकी सगळ्यांना या वाड्यात त्यांचा अनुभव आला असेलच. ती शक्ती प्रत्येकाला काही ना काही शोधायला सांगते. बरोबर ना?" हे वाक्य ऐकताच नीताताईंना आठवले ते नकली राकेशचे बोलावणे. राज, पालवी, विराज, स्पृहाला आठवले, कसे आपण फसले होतो ते. आर्यनला आठवली त्याची आई.

"पण शोधायचे असते तरी काय नक्की?" विराज म्हणाला.

"कारण तुम्हालाच शोधायच्या आहेत आठ किल्ल्या.."

"किल्ल्या??" सगळे एकदमच ओरडले.

"हो.. किल्ल्या. गोविंद भटांनी ती शक्ती बांधून ठेवली. ती बांधताना तिला आठ प्रकारची बंधने घातली. ती बंधने फक्त तुम्हीच उघडू शकता. म्हणून तर ती शक्ती तुम्हाला त्या बंधनाची किल्ली उघडायला बोलावते आहे." बोलता बोलता माधवरावांना दम लागला.

"बंधनाची किल्ली? आणि आम्ही?" पालवीच्या तोंडातून शब्द फुटेना.

"हो.. जी बंधने तोडून ती शक्ती इथून मुक्त होईल. आणि मुक्त होताच तिचं आधीसारखं.. नव्हे त्यापेक्षा जास्तच वर्चस्व इथे गाजवू शकेल."

"म्हणून तुम्ही आम्हाला इथे यायचं नाही असं सांगितलं?" विराजने विचारले.

"पण मग तसं असेल तर आतातरी इथे का बोलावलं आहे? त्या शक्तीला मुक्त करायला?" बोलता बोलता स्पृहा शहारली.

"मुक्त नाही नष्ट करायला. हे एका चक्रासारखं आहे. ती शक्ती तेव्हाच नष्ट होऊ शकते जेव्हा ती समोर येईल. आणि ती समोर येण्यासाठी तिच्यावरची बंधने मुक्त होणे गरजेचे आहे. आणि ती फक्त तुम्हीच करु शकता." माधवराव शांतपणे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते.

"पण का? आम्हीच का?" राजने विचारले.

"कारण तुम्ही निवडले गेले आहात."

"आम्ही.. निवडले गेलो आहोत? कोणी , कधी निवडले आम्हाला?" स्पृहाचा या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता.

"नीता, तुला आठवतं.. पहिल्यांदाच तुला एक आवाज ऐकू आला होता." माधवरावांनी नीताताईंना विचारले.

"हो.." राकेशची आठवण मनाच्या सांदीकोपर्यात कुठेतरी परत एकदा दरवळली.

"आर्यन, तुला काय दिसलं होतं त्या भिंतीवर?"

"एक भयानक चेहरा.. आणि येणारा दुर्गंध."

"समजलं.. तुमची निवड कोणी केली ते? त्या शक्तीनेच तुम्हाला निवडलं आहे ते कुलुप उघडायला. कारण तुमच्याशिवाय जे कोणी तिथे गेले आहेत ते मृत्यु पावले आहेत."

"तुम्ही आणि म्हादबा जात होता ते?" नीताताईंनी विचारले. जुई या सगळ्याकडे फक्त बघत होती.

"म्हादबा, इकडे ये.." माधवरावांनी बोलवताच म्हादबा तिकडे आला. त्यांनी त्याच्या दंडाला बांधलेला ताईत दाखवला. "हे असे ताईत बांधूनच आम्ही दोघे फिरतो. त्यासोबतच इथे गंगाजल आणि भस्म दोन्ही असतं. म्हणूनच त्या शक्तीची एका विशिष्ट सीमेबाहेर यायची हिंमत झाली नाही."

"खोटं आहे हे.." पालवी ओरडली. "कितीतरी वेळा येऊन ती शक्ती माझं बाळ घेऊन गेली आहे. त्याच्यामुळे..." पालवी हातात तोंड लपवून रडू लागली. ते बघून स्पृहा कुजबुजली,

"ही खरंच वेडी आहे का? सतत बाळ, बाळ म्हणून रडत असते."

"तिचं तीन ते चार वेळा मिसकॅरेज झालं आहे." राज गंभीरपणे म्हणताच स्पृहा गप्प झाली.

"आय ॲम सॉरी.." स्पृहा मान खाली घालून म्हणाली.

"ते फक्त त्याचे प्रक्षेप होते. तुमचं मानसिक खच्चीकरण करण्याचे. त्याच्याकडे अजूनही बाहेर येऊन तुम्हाला हानी पोहोचवण्याची शक्ती नाही. " माधवराव सांगत होते.

"बाहेर येऊन हानी पोहोचवण्याची त्याची शक्ती नाही. मग माझे आईबाबा? ते कसे काय अचानक गेले?" न राहवून आर्यनने विचारलेच.

"तो खरंच एक अपघात होता. तसंही त्यांना मारून त्यांना काय मिळणार होते?"

"पण आजोबा, तुम्ही म्हणताय की त्या शक्तीलाला मुक्त करायचे आहे ते नष्ट करण्यासाठी. मग यांना ती शक्ती प्रत्येक वेळेस ती किल्ली शोधायला का सांगत होता?" इतका वेळ शांत असलेल्या जुईने विचारले.

"ते प्रत्येकाला एकेकट्याने किल्ली शोधायला सांगत होते. म्हणजे ते आपसूकच एकेक बंधने तोडून बाहेर येऊ शकले असते. नष्ट न होता. आणि जेव्हा शेवटची व्यक्ती ते बंधन नष्ट करेल तेव्हा त्याची शक्ती एवढी वाढली असेल की ते नष्ट होणे अवघड होऊन जाईल." माधवराव सगळ्यांच्या शंकांचे निरसन करत होते.

"पण मग हे आधी का नाही केलं? माझं बाळ तरी.." पालवी बोलता बोलता थांबली. यावेळेस मात्र स्पृहा तिच्यावर वैतागली नाही. स्पृहाने पालवीच्या खांद्यावर थोपटले.

"नको काळजी करूस. पुढच्या वेळेस तुझे बाळ तुझ्याकडे नक्कीच असेल." पालवीने कृतज्ञतेने स्पृहाकडे बघितले. स्पृहाने परत तिचा हात हातात धरून तिला आश्वस्त केलं.

"याआधी का नाही?" स्पृहाचे बोलणे झाल्यावर माधवरावांनी परत बोलायला सुरुवात केली. "तुम्हाला ती काठीची गोष्ट माहिती आहे का?"

"ती लहानपणी ऐकलेली? एक काठी सहज मोडता येते.. काठीचा जुडगा मोडायला शक्ती लागते ती?" विराज म्हणाला.

"हो.. तीच.. तुमचं तसं आहे. ती शक्ती तुम्ही लहान असताना तुम्हाला बोलावत होती. जेव्हा तुम्ही शक्तीहीन होता. तेव्हा जर ती किल्ली तुम्ही शोधली असती तर तिचे बंधन मुक्त होताच तिचे पहिले भक्ष्य तुम्ही झाला असता. म्हणजे ती कधीच नष्ट होऊ शकली नसती. आणि तुम्हाला आधी का नाही बोलावलं? तर, आधी तुम्ही सगळे लहान होतात, त्या शक्तीशी सामना करण्यासाठी सक्षम नव्हता. तुमच्या आयुष्यात सुखी होता. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वेळ आली नव्हती. आता मात्र ती वेळ आली आहे. त्यामुळेच कदाचित तुम्ही सगळे इथे आला आहात. तुमच्या शंका संपल्या असतील तर तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. जे काही चालले आहे त्याचा विचार करा. आता उरलेल्या विषयावर आपण उद्या बोलू." माधवराव विषय संपवत म्हणाले.

"आजोबा, पण या किल्ल्या आहेत तरी कुठे?" राजने विचारले.

"तेच तर शोधायचे आहे. जा.. आराम करा." सगळी कागदपत्रे उचलून माधवराव स्वतःच्या खोलीत जायला वळले. पाठीमागे सर्वांना विचार करायला भाग पाडून.


लागते आहे का आता कथेची आणि इतर गोष्टींची लिंक? नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all