वाड्यात येऊन जा.. भाग ४४

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४४

"तुला काय वाटतं? या किल्ल्या खरंच असतील?" विराजने आर्यनला विचारले.

"आजोबा म्हणत आहेत म्हणजे असतीलच ना.." आर्यन उत्तरला.

"मला ना हे एखाद्या पिक्चरसारखं वाटतं आहे. की आपण इथे येतो काय? सॉरी.. आपल्याला कोणीतरी निवडतं काय.. आणि आपण कुठून कुठून इथे येतो काय? हे सगळं अविश्वसनीय आणि अद्भुत वाटतंय रे." राज म्हणाला. तो देखील आता यांच्या खोलीत येऊन बसला होता.

"मग या किल्ल्या खरंच शोधायच्या आहेत? पण कुठे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट.. त्या शक्तीला आपण मारणार तरी कसे?" स्पृहा आत येत म्हणाली. तिच्यामागे जुईसुद्धा होती. तिला बघताच आर्यन सावरून बसला. पण स्पृहाला बघून विराज मात्र अवघडला होता.

"हो.. ना.. मला ना वाटतं त्या राजवर्धननेच लपवल्या असतील." विराज म्हणाला.

"राजवर्धन? नाही.. मला तो तेवढा लायक वाटला नाही." राज म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून विराजचा चेहरा पडला.

"त्या गोविंद भटांनी त्याला मदतीला बोलावले होते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना?" विराज त्याची बाजू मांडू लागला.

"काहीही.. त्या चंद्रसेनला भूत समजून तो भीमरूपी म्हणत रडू लागला होता." आर्यन आणि राज दोघे हसू लागले होते.

"मी काय म्हणते.." स्पृहा विराजच्या उतरलेल्या चेहर्‍याकडे बघून बोलू लागली. "कोणी लपवलं आहे, हे महत्त्वाचे आहे की कुठे लपवलं ते."

"हे फक्त तेव्हाच समजेल जेव्हा आपल्याला त्या काळातील पूर्ण माहिती मिळेल. म्हणजे बघा हं.. ज्याने हा इतिहास लिहून ठेवला आहे, त्याने जर ते चंद्रसेन महाराज इथे कसे आले, का आले? ते ही सांगितलं असेल तर नक्कीच बाकीच्या गोष्टींचीही माहिती लिहिली असेलच ना?" इतका वेळ शांतपणे सगळं ऐकणारी जुई म्हणाली.

"आजोबा म्हणाले नाही का सगळं लिहून ठेवलं आहे." आर्यन उगाचच तुसडेपणाने बोलला. ते ऐकून जुईच्या डोळ्यात पाणी आलं.

"मी जाते इथून मॅम.." जुई उठत म्हणाली. तिच्या डोळ्यातलं पाणी आणि मी जाते हे ऐकून आर्यन अजूनच चिडला.

"मला ना म्हणून मुलींचा राग येतो.. जरा काही बोललं की आलंच डोळ्यात पाणी. आणि मग सुरूवात."

"अरे पण ती बिचारी तुला काही बोलली का? तू का चिडचिड करतो आहेस उगाच?" वडिलकीच्या नात्याने विराज म्हणाला.

"ते.. ते.." आर्यनला शब्द सुचेना.

"आपण आपला फोकस किल्ल्यांवर ठेवायचा का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर? नाहीतर मी पण जाते इथून." स्पृहा आलेला राग लपवायचा मुळीच प्रयत्न करत नव्हती.

"ए ताई.. यार.. नको ना चिडूस. माझ्या मनातही काही नव्हतं. ते चुकून." आर्यन जुईकडे बघत म्हणाला. "माझ्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी."

"इट्स ओके.." मान वळवत जुई म्हणाली.

"आपलं विषयांतर होतंय. मला असं वाटतं आपण आजोबांना पूर्ण इतिहास सांगायला सांगू. म्हणजे बघा हं. आजोबांच्या कथेनुसार तो चंद्रसेन.."

"तो नाही.. ते.. आपले मूळपुरूष आहेत ते." विराज राजला दटावत म्हणाला.

"ओके बाबा.. तर.. ते चंद्रसेन महाराज.. झालं समाधान?" राजने विराजकडे बघितले. "तर ते चंद्रसेनमहाराज इथे आले तेव्हाच ही जागा झपाटलेली होती. पण मग त्यांनी हिच जागा का घेतली असावी? किंवा याच जागेची त्यांना भुरळ का पडली असावी? आणि त्या गोविंद भटांनी जर जागा शुद्ध केली तर ती शक्ती काय होती, याची माहिती त्यांच्याकडे होती का?" राज विचार करून बोलत होता.

"परफेक्ट.. म्हणजे ती शक्ती इथे कुठून आली, हे हवं आहे तुला?" आर्यनने विचारले.

"हो.. त्याच्याशिवाय दुसरं मला काही सुचतच नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे, आपल्याच हातून ती शक्ती नष्ट होणार आहे, तर मग ती शक्ती आपल्याला का बोलावते आहे?"

"हाच प्रश्न मलाही पडला होता." विराज म्हणाला. "म्हणजे ती शक्ती निर्बुद्ध तरी आहे किंवा तिला इतर काही जास्तीचे ज्ञान आहे."

"जे काही असेल ते. पण हा शोध पटापट लागला पाहिजे. माझी बायकापोरं तिथे माझी वाट बघत असतील. त्यात पालवी पण इथे आहे म्हटल्यावर टेन्शन जास्तच वाढले आहे." राज गंभीरपणे म्हणाला.

"राज.. पण तू असा कसा भरकटला होतास रे? म्हणजे तू म्हणतोस तसा तू जर अमेरिकेतून आला होतास तर आम्हाला मध्येच कसा भेटलास?" न राहवून विराजने विचारून टाकलंच.

"मलासुद्धा तोच प्रश्न पडला आहे. म्हणजे बघ हं.. पालवीचे काहीतरी बिनसले आहे, हे मला समजले. मग मी लगेचच इथे यायला निघालो. नशीबाने मला तिकीट मिळाले. तिथून मुंबईला यायचं म्हणजे एक दिवस तरी लागतो. तिथून पुढे हे गाव. पण मग मी इतक्या लवकर तिथे कसा आलो? मिरॅकलच होतं हे." राज म्हणाला.

"त्याही पेक्षा महत्वाचे राज, तू तिथे विचित्र अवस्थेत होतास. म्हणजे तुला कसलंही भान नव्हतं, तुला काहीच समजत नव्हतं. कपडे सगळे धुळीने माखलेले. तुझ्याजवळ तुझे काहीच पेपर्सही नव्हते."

"तेच तर.. जोपर्यंत मला आठवत होतं तोपर्यंत मी विमानात होतो. मी सँडविच खाल्लं.. बस्स. मला पुढचं काहीच माहित नाही."

"मला ना असं वाटतं, सरांचं कोणीतरी अपहरण केलं असावं. म्हणजे जेवणात गुंगीचे पदार्थ घालून देतात ना तसं. मग त्यांच्याजवळचे पैसे काढून घेऊन त्यांना तसंच सोडून दिलं असेल." जुईने आपल्या मनातलं बोलून दाखवलं आणि तिची नजर आर्यनकडे जाताच ती गप्प झाली.

"जुई, या कल्पना फक्त टिव्ही सिनेमामध्येच शोभतात. खऱ्या आयुष्यात नाही. कारण राज एका इंटरनॅशनल फ्लाईटने आला असणार. तिथून कोणालाही संशय येऊ न देता बाहेर येणं सोपं आहे का? त्यातूनही त्या व्यक्तीने त्याला लुटून याच गावाच्या रस्त्यावर का ठेवले?" विराज विचार करत म्हणाला.

"ज्या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत आणि ज्यांची आता गरज नाही त्यांच्यामागे लागण्यापेक्षा जी उत्तरे गरजेची आहेत ती शोधूयात का आता?" स्पृहा मुद्द्यावर आली.

"ओके.. आपण आजोबांकडून पूर्ण इतिहास जाणून घेऊ. मला तर हे ऐकायला आवडेल की त्या गोविंद भटाने बांधून ठेवलेली ही शक्ती अशी फिरते तरी कशी?" राज म्हणाला. सगळ्यांनी त्यावर होकार दर्शविला आणि सगळे माधवरावांशी काय बोलायचे याची चर्चा करू लागले.

*******

"मालक, एक आनंदाची गोष्ट आहे." सेवक धावतच आला.

"सांग.." त्याचा मालक त्याच्या कामातून डोकं वर न करता म्हणाला.

"मालक, वाड्यावर ती सगळी माणसे आली आहेत. आपली योजना यशस्वी झाली." सेवक आनंदाने म्हणाला.

"ते होणारच होतं." मालक अजूनही वर बघत नव्हता.

"पण त्याच्यासोबत एक वाईट बातमी सुद्धा आहे." मालकाच्या हातातल्या कामाचा वेग कमी झाला.

"सांग.."

"मी असं ऐकलं की जे त्या शक्तीला मुक्त करतील त्यांच्याच हातून ती शक्ती नष्ट होणार." सेवकाचे शब्द ऐकून मालकाचे हात थांबले. त्याने नजर वर केली. त्याच्या नजरेत ज्वालामुखी होता.

"काहीही झालं तरी ती शक्ती नष्ट होणार नाही. मी होऊ देणार नाही. आधीसुद्धा अश्याच घटना घडल्या होत्या. त्याच परत घडत आहेत. तेव्हा जशी आपल्याला मदत झाली होती तशीच आत्ताही होईल."

"मदत ? कसली मदत मालक?"

"वाड्यात फेऱ्या घालत जा.. तिथे एकजण नक्कीच आपल्या बाजूचा असेल. फक्त तो कोण हे ओळखता आलं पाहिजे." मालकाने परत आपलं काम करायला सुरुवात केली होती. सेवकाने मान हलवली. पण त्याला काहीच समजले नव्हते. कमीत कमी जाताना मालक काय करतो आहे, हे बघावं म्हणून त्याने मान उंचावली. त्याची ही हालचाल त्याच्या मालकाने टिपली.

"तुला बघायचं आहे का, मी काय करतो आहे?" समोरून प्रश्न आला. नकळतच सेवकाची मान हलली. ती हलताच त्याला कावळ्याची मरणप्राय कावकाव ऐकू आली. त्या पाठोपाठ समोर एक मान मुरगळलेला कावळा येऊन पडला. ते बघून सेवक शहारला.

"पुढच्या वेळेस अशीच उत्सुकता दाखवलीस तर कावळ्याऐवजी तुझी मान असेल. समजलं?" कालकेयाचे शब्द ऐकून भयभीत झालेला तो सेवक तिथून पळाला.

"लवकरच हा कालकेय सगळ्या शक्ती हातात घेणार." समोरच्या भिंतीवर हाताने मारत कालकेय म्हणाला.


आजोबा सांगतील का वाड्याचा इतिहास? कोण असेल आधीच्या इतिहासातला दगाबाज? बघू पुढील भागात. तोपर्यंत नेहमीचा आपुलकीचा प्रश्न? भाग कसा वाटला? नक्की कळवा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all