वाड्यात येऊन जा.. भाग ४५

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४५


"आत येऊ का आजोबा?" जेवण झाल्यावर आर्यन, राज, विराज, स्पृहा, जुई सगळेच माधवरावांच्या खोलीत गेले.

"अरे बापरे.. एवढे सगळे? काय मोर्चा वगैरे आणलात की काय?" माधवराव हसायचा प्रयत्न करत म्हणाले.

"आजोबा, तुमच्यावर कोण मोर्चा आणणार? पण आम्हाला तुम्हाला काही विचारायचे आहे." आर्यन सगळ्यांच्या वतीने बोलला.

"विचारा की मग.. त्यासाठी एवढे गंभीर चेहरे कशाला? मी तर म्हणतो इथे बसण्याऐवजी बाहेरच बसलो तर उरलेल्या तिघांच्याही कानावर पडेल. अर्थात त्यांना हवं तरच हं."

"गप्पा मारायचा विचार दिसतो आहे.." विनायकराव आत येत म्हणाले.

"हो.. तसंच काहीतरी. झोपच येत नाहीये. म्हणून म्हटलं इथे बसावं. तुम्ही पण येताय का आजोबा?" विराजने विचारले.

"येतो की.. तसंही म्हतारपणामुळे मला झोप कमीच येते. तुमच्यासोबत तेवढाच वेळ जाईल माझा." विनायकराव म्हणाले.

"मग पालवी आणि आत्याच राहिल्या आहेत. त्यांना बोलावून आणू का?" राज म्हणाला.

"त्यात काय विचारतोस? झोपल्या नसतील तर बोलव." आर्यन म्हणाला.

"एवढं महत्त्वाचं आहे का?" विनायकराव म्हणाले.

"हो.. थोडंसं. मी आणतो बोलावून." आर्यन उठला. "तू येतोस माझ्यासोबत?" त्याने विराजला विचारले. विराज उठणार तोच त्याच्या पाय लचकला. उठता उठता तो परत बसला.

"आई गं.."

"काय रे काय झालं?" राजने काळजीने विचारले.

"पाय लचकला बहुतेक." विराज आपला हात राजच्या खांद्यावर ठेवत म्हणाला. त्याने आपले ओठ वेदनेने दाताखाली धरले होते.

"आजोबा, तेल आहे का इथे?" स्पृहाने पुढे होत विचारले.

"ते काय तिथे बाटली आहे." माधवरावांनी खुणेने दाखवले. स्पृहा तेलाची बाटली घेऊन खाली बसली. तिने विराजच्या पायाला मसाज करायला सुरुवात केली. थोड्या वेळात त्याला बरं वाटू लागलं.

"अरे, तू अजून इथेच? आत्याला बोलावून आणत होतास ना?" विराजने आर्यनला विचारले.

"हो. पण ते राजदादा.."

"अरे, मग तू जुईला घेऊन जा ना." राजने सुचवले.

"मी?" जुईचे डोळे आर्यनसोबत बाहेर जायचे या विचारानेच मोठे झाले.

"नको.. त्यापेक्षा मी एकटाच/ एकटीच त्यांना बोलावून आणतो." आर्यन आणि जुई एकत्र बोलले. ते बघून सगळे हसू लागले. माधवराव एकटेच फक्त गंभीर होते.

"आर्यन, एकटं जाण्याची गरज नाहीये. सोबत कोणीतरी असलेलं बरं. आणि कुठे दूर जायचे आहे? जाऊन याल ही लगेचच." माधवराव म्हणाले. त्यांचा शब्द आर्यन मोडू शकला नाही. नाईलाजाने जुईसुद्धा त्याच्यासोबत जायला निघाली. दोघेही खोलीबाहेर आले. आणि नीताताईंच्या खोलीच्या दिशेने चालू लागले. आर्यन पुढे चालत होता. जुई मागे राहिली होती. तिने रामरक्षा पुटपुटायला सुरुवात केली होती. दोघे मधोमध आले असतील तोच पाठून कसलातरी आवाज आला. तो आवाज ऐकून जुई घाबरली. सगळी लाज, रागलोभ सोडून ती त्याला जाऊन बिलगली.

"हे बघा.. तुम्हाला मी आवडत नाही, हे मला माहीत आहे. पण हा आवाज? आणि मला या सगळ्याची खूप भिती वाटते. तुम्हाला जे काही चिडायचे असेल ते खोलीत जाऊन चिडा. पण आता मला एकटीला सोडू नका." आर्यनचा हात हातात घट्ट धरून जुई म्हणाली. तिच्या अश्या हात धरण्याने आर्यनला सुद्धा आधी राग आला होता. पण तिची बडबड ऐकून तो राग त्याने आवरला.

"मी चिडत नाहीये.. पण थोडी तर लांब हो. मला एवढं चिकटलेलं आवडत नाही." आर्यन कसाबसा म्हणाला.

"हे बघा, चिकटायला मला पण आवडत नाही. पण हे जे पाठीमागून येणारे आवाज आहेत, ते मला भाग पाडत आहेत." बोलताना ही तिचा आवाज थरथरत होता. आर्यनला तिची भिती समजली. तो देखील अडकला होताच की त्या जाळ्यात. काही न बोलता त्याने तिच्या हातावर थोपटले. तिचा हात आपल्या हातात पकडून तो चालू लागला. दोघेही नीताताईंच्या खोलीपाशी आले. आर्यनने बाहेरून आवाज दिला.

"आत्या, आम्ही सगळे गप्पा मारणार आहोत. येतेस ना?"

नुकत्याच आवरून झोपायची तयारी करत असलेल्या नीताताई दचकल्या. "येतेस ना?" या शब्दांनी त्यांना त्या दालनाची आठवण आली. येतेस ना? दरवेळेस कानावर पडणारे शब्द.. आणि त्यानंतर होणारी फसवणूक. नकोच ते. त्यांनी कानावर हात ठेवला. तोपर्यंत बाथरूममधून पालवी बाहेर आली.

"हे काय आत्या, कधीचं कोणीतरी दरवाजा वाजवत आहे. उघडत का नाही?" पालवीला दरवाजा उघडू नकोस असं सांगेपर्यंत तिने दरवाजा उघडला देखील. आर्यन आणि जुईला एकमेकांना लगटून उभं बघून तिचे डोळे विस्फारले. ते पाहून आर्यनने जुईचा हात सोडला.

"ते आम्ही तुम्हाला बोलवायला आलो होतो. सगळे आजोबांसोबत गप्पा मारत बसणार आहेत. तुम्ही येताय का? विचारायला आलो." आर्यनने स्पष्टीकरण दिले.

"आत्याला विचारते.." पालवी गालातल्या गालात हसत म्हणाली.

"तूच आहेस का आर्यन? जुई पण आली आहे का? मग चल.." नीताताई बाहेर येत म्हणाल्या. "पण हे अचानक गप्पांचं काय काढलं?"

"ते असंच.."

"आत्या, प्रश्न नको विचारूस जास्त. चल जाऊयात. मलाही बरं वाटेल थोडं." पालवीने नीताताईंचा हात धरून त्यांना ओढलं. त्या दोघी चालू लागल्या. ते बघून जुई जोरात ओरडली.

"मॅम, थांबा ना.. मी पण येते."

"ये मग लवकर." मागे वळून न पाहता पालवी म्हणाली.

"चला.." हात पुढे करत आर्यन म्हणाला. जुईने त्याचा हात हातात घेतला.

"थॅंक यू.."

"नॉट वेलकम.."

"लक्षात ठेवेन.." नाक उडवायची होत असलेली इच्छा दाबून जुई म्हणाली. पटापट पावले उचलत ती दोघे दिवाणखान्यात पोहोचले. विराजला राज आणि स्पृहा घेऊन आले होते. ते तिघेही एका सोफ्यावर बसले होते. मधोमध माधवराव आणि त्यांच्या शेजारी विनायकराव. पालवी आणि नीताताई खुर्चीवर बसल्या होत्या. उरले हे दोघेच होते. आर्यन बसायला जागा शोधत असताना त्याला पुटपुटण्याचा आवाज ऐकू आला.

"प्लीज, मला एकटीला नका बसवू.." त्याने जुईकडे बघितले. ती त्याला ओठातल्या ओठात विनवत होती. येणारं हसू त्याने दाबलं. तो खाली सतरंजीवर बसायला गेला. त्याचे बघून जुईसुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसली.

"आले सगळे? आता विचारा, काय विचारायचे आहे ते." माधवराव म्हणाले.

"आजोबा, विचारायचं म्हणण्यापेक्षा आम्हाला, या वाड्याचा पूर्ण इतिहास ऐकायचा आहे." राजने सांगितले.

"हो.. म्हणजे मलाही आवडेल ऐकायला."

"पण तो तर मी दुपारीच सांगितला ना?" माधवरावांच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते.

"तो त्रोटक सांगितलात. आम्हाला व्यवस्थित ऐकायचे आहे. म्हणजे चंद्रसेन महाराजांचे पुढे काय झाले? राजवर्धन आणि गोविंद भटांनी काय काय केलं? हे सगळं जाणून घ्यायचं आहे " विराज म्हणाला. माधवरावांनी सगळ्यांकडे बघितले. सगळ्यांच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसत होती.

"तुम्हाला पूर्ण कथा ऐकायची आहे?"

"हो.." विनायकरावांसह सगळ्यांनी होकार दिला.

"मग ऐका.. कदाचित हा वाडादेखील आपली कहाणी परत नव्याने ऐकेल. आणि कुठे कोणतं रहस्य दडलं आहे ते सांगेन." माधवराव पायाची घडी घालत म्हणाले. "गोविंद भट इकडच्या जागेत असलेली शक्ती पकडण्यात यश मिळवतात, हे तर मी तुम्हाला सांगितले. आता पुढे काय झालं, ते ऐका."

"सरकार, सगळी व्यवस्था झाली आहे. पेशवेसरकारांचा वेशीबाहेर मुक्काम आहे. तुम्ही जर तयार असाल तर तसा निरोप द्यायला." महादेव अदबीने सांगत होता.

"महादेव, आम्ही तयार आहोत. पण सरकारांच्या पायावर पाणी घालण्यासाठी सुवासिनींना सांगितलेस का?" खंजीर आपल्या कंबरपट्ट्यात लावत चंद्रसेनने विचारले. त्याने विचारताच महादेवाने मान खाली घातली. चंद्रसेनाला त्याचे उत्तर मिळाले.

"अजून किती दिवस या जागेला हे गावकरी पछाडलेली म्हणणार आहेत. बघता बघता आपला वाडा बांधून झाला. उद्यापासून वास्तूशांतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी खुद्द पेशवेसरकार इथे आले आहेत. तरीही यांचा विश्वास नाही? आता ऐनवेळेस औक्षण करायला कोणी नसेल तर आपली किती मानहानी होईल." चंद्रसेन दुःखी झाला होता.

"सरकार, मी गोविंद भट आणि राजवर्धनच्या कुटुंबाला विचारतो. त्या जर तयार झाल्या तर.."

"असं असेल तर आम्हीच जातो वहिनींना विचारायला. त्या आमचा शब्द अव्हेरणार नाहीत." चंद्रसेन उत्साहाने म्हणाला.

"वहिनी ऽ ऽ वहिनी ऽ ऽ आहात का घरात?" चंद्रसेनने राजवर्धनच्या घरी जाऊन आवाज दिला.

"ताई, बाहेर गेली आहे. काही निरोप असेल तर सांगते मी." एक मंजुळ आवाज चंद्रसेनच्या कानावर पडला.

"ते वहिनींना.." एका अनोळख्या व्यक्तीशी बोलताना चंद्रसेनचे ततपप होत होते.

"ते काय?" अजूनही आवाजाची मालकीण आपला चेहरा दाखवायला तयार नव्हती. भिंतीच्या आडून तिचे बोलणे सुरूच होते.

"ते पेशवेसरकार.. ते सुवासिनींच्या पायावर पाणी." चंद्रसेनचे बोलणे ऐकून तिला हसू आवरेना.

"पेशवे सरकार कशाला कोणाच्या पायावर पाणी घालतील?" बोलतच ती बाहेर आली. आणि तिला बघताच चंद्रसेन मंत्रमुग्ध झाला.


कोण असेल ही? बघू पुढील भागात. तोपर्यंत कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all