Login

वाड्यात येऊन जा.. भाग ४६

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४६


"सई, कोण आलं आहे गं?" माजघरातून अजून एक आवाज आला.

"हे कोणीतरी पेशवेसरकार, सुवासिनी म्हणून बडबडत आहेत." आतल्या बाजूला तोंड करून सई म्हणाली. तिचे बोलणे ऐकून आतून राजवर्धनची बायको यमुना बाहेर आली.

"अग्गो बाई.. सरकार तुम्ही? माफ करा हं. हिला ना बोलायचा तेवढा पोच नाही. मी पण नेमकी शेजारी गेले होते." यमुना घाईघाईत बोलू लागली.

"वहिनी.. शांत व्हा आधी. आणि हे असं सरकार नका म्हणू मला. खरंतर मी तुम्हाला विनंती करायला आलो होतो, की सुवासिनी म्हणून तुम्ही सरकारांचे औक्षण करायला येऊ शकाल का?" चंद्रसेनने पटकन बोलून घेतले. त्याचे बोलणे ऐकून यमुनेने तोंडावर हात ठेवला.

"मी?? आणि त्या वाड्यात?"

"वहिनी, आता तुम्हीच असं म्हटल्यावर मी काय बोलायचे?" निराशेने चंद्रसेन म्हणाला.

"तुमच्या सरकारांना फक्त सुवासिनीच हव्या की कुमारिका चालतील?" धीटपणे सईने विचारले.

"कोणीही चालेल.. पण सरकार जेव्हा वाड्यात येतील तेव्हा स्त्री हवी. सरकार वेशीपर्यंत आले आहेत. त्यांनाच सामोरे जातो आहे." चंद्रसेन म्हणाला.

"जा, मग तुम्ही. तुम्ही येईपर्यंत सगळं व्यवस्थित झालं असेल." विश्वासाने सई म्हणाली.

"अगं पण.." यमुनाने बोलायचा प्रयत्न केला.

"ताई.. नको ना. मी आहे ना? मी करते सगळं नीट. तुम्ही या सरकारांना घेऊन." शेवटचं वाक्य सई चंद्रसेनकडे बघत म्हणाली. तिच्या या वाक्याने दिलासा मिळालेला चंद्रसेन लगेचच बाहेर पडला. तो गेला हे बघून यमुनेने सईला चापट मारली.

"तुला कोणी हा अगोचरपणा करायला सांगितला होता? आता कोणत्या बाईला आणून उभं करणार आहेस?" यमुना वैतागली होती.

"ताई, मी बाई नाही का? आणि भाऊजी स्वतःच गेले होते ना ती वास्तू शुचिर्भूत करायला? तरीही तुझा विश्वास नाही का? दुसरी गोष्ट.. एवढे पेशवे तुमच्या गावात येत आहेत आणि एकही स्त्री जात नाही, ही तुमच्या दृष्टीने नामुष्की नाही का?" सईचे बोलणे ऐकून यमुना विचारात पडली. ते बघून सई पुढे बोलू लागली.

"मी तर म्हणते, आता आपण दोघींनी जाऊन गावाला दाखवलेच पाहिजे की त्या ठिकाणी आता काही नाही." सईचे बोलणे यमुनेच्या एका मनाला पटत होते पण दुसरे मन कच खात होते. हो नाही करता करता ती सईसोबत वाड्यावर गेली. तिला तिथे बघून राजवर्धनला आश्चर्य वाटले.

"तुम्ही आणि इथे?? सकाळी म्हटले तर तुम्ही नकार दिलात."

"हो.. पण आता आले आहे ना?" जरा बिचकतच यमुना म्हणाली.

"भाऊजी, हा वाद आपण नंतर घालू. आता सध्या आपण स्वागताची तयारी कशी करायची, ते पाहू. मला सांगा फुले वगैरे काही आणली आहेत का?"

"ते सगळं महादेव बघतो आहे." राजवर्धन उत्तरला.

"काय हे भाऊजी? तुम्ही कधीपासून इथली व्यवस्था बघत आहात. आणि तुम्हाला हे देखील माहिती नसावे."

"मेव्हणीबाई, आम्ही इथे धार्मिक कृत्यासाठी आलो आहोत. गोविंद भटांनी टाकलेली मोठी जबाबदारी आम्ही पार पाडतो आहोत. या असल्या गोष्टीत आम्ही लक्ष घालायचे?" राजवर्धन म्हणाला.

"बरं.. मी विचारते तसं मग त्या महादेवाला. आणि स्वयंपाकाचे काय?"

"आचारी असावेत." राजवर्धन उत्तरला.

"बाई बाई.. ही मात्र हद्द झाली. पण मीसुद्धा हे कोणाला सांगते आहे. जाऊ देत. मीच करते सगळी चौकशी. नाहीतर ताई तूच बघून येतेस का? म्हणजे तसेही मुदपाकखाना म्हणजे तुझी आवडती जागा. तू तिकडचा गोंधळ निस्तर. मी इकडचा गोंधळ निस्तरते."

"अगं पण सई.. हे बरे दिसते का? कोणाच्या तरी घरी आपण लुडबुड केलेली?" यमुनाला अजूनही धाकधूक होत होते.

"ताई, ते तसेही एकटेच आहेत ना? त्यांचे कुटुंब असते तर ही वेळ आली असती का? तू वेळ दवडू नकोस. पटकन आतली व्यवस्था बघ. मी इथली बघते. जा गं.." यमुनेला मुदपाकखान्यात जवळजवळ ढकलूनच सई बाहेर आली. महादेव तिथे दोघांना घेऊन काम करत होता. तिने त्याला इतरांच्या मदतीने फुलांच्या माळा करायला लावल्या. त्याने तो वाडा सजवायला घेतला.

इकडे पेशव्यांना घेऊन चंद्रसेन निघाला खरा. पण वाड्यात काय व्यवस्था असेल यासाठी त्याच्या मनात धाकधूक होती. वाड्याजवळ येताच त्याचे बदललेले रूपडे त्याच्या नजरेत आले आणि त्याची मनस्थिती क्षणात बदलली. इतका वेळ चिंतित असलेला त्याचा चेहरा खुलला. प्रवेशद्वाराशी येताच पाच सवाष्णी समोर आल्या. त्यांनी पेशव्यांच्या पायावर पाणी घातले. त्यांना औक्षण केले. त्यांच्यासोबतच चंद्रसेनचे देखील औक्षण झाले. वाड्यात येताच चंद्रसेनचे डोळे विस्फारले. थोड्याच कालावधीत आतली रचना बदलली होती. लोड, तक्तपोशी सगळे व्यवस्थित लावून ठेवले होते. धुपाचा सुवास दरवळत होता. पाण्यात ठेवलेली सुगंधी फुले वातावरण अजूनच सुगंधी करत होती. पेशवे आसनस्थ होताच सेवक गूळपाणी, दूध आणि वेगवेगळे पदार्थ घेऊन सामोरे आला. पेशव्यांनी आणि त्यांच्यासोबत आलेला लवाजमा यांचे खाणे होत असतानाच चंद्रसेनने महादेवाला शोधले. तो दिसताच त्याला घेऊन तो एका बाजूला गेला.

"महादेव, इतका बदल वाड्यात? तो ही एवढ्या कमी कालावधीत? आणि त्या पाच सुवासिनी कश्या आल्या?"

"ती त्या वाघिणीची कमाल. आल्यापासून सगळ्यांना कामाला लावले आहे. एकाला म्हणून बसू दिले नाही. आम्ही काम करेस्तोवर ती गावात जाऊन बायकांना घेऊनही आली. जे काम मला जमलं नाही. ते काम तिने करून दाखवले." समोर काम करत असलेल्या सईकडे बघत महादेव कौतुकाने म्हणाला. चंद्रसेनने तिच्याकडे बघितले. अगदी आपलेच घर असल्यासारखी ती वावरत होती. 'आपलेच घर' हा विचार मनाशी येताच चंद्रसेन स्वतःशीच हसला. वेळ मिळताच राजवर्धनशी बोलायचे असे त्याने ठरवले आणि तो निर्धास्तपणे पाहुण्यांकडे वळला.

चार दिवस वास्तुशांतीच्या निमित्ताने म्हणून आलेले पेशवे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुसर्‍याच दिवशी तिथून निघाले. पेशव्यांच्या बदललेल्या बेतामुळे वास्तुशांतीचा मुहूर्तदेखील चंद्रसेनाला बदलावा लागला. पेशवेसरकार येऊन वाड्यात राहून गेले ही बातमी पंचक्रोशीत पसरायला वेळ लागला नाही. दोनेक दिवसांतच वाड्यातला राबता वाढू लागला. हे बघून आनंदी झालेला राजवर्धन चंद्रसेनाशी बोलायला गेला.

"सरकार, वास्तुशांत पुढे गेली. पण त्याचे परिणाम मात्र आधीपासूनच दिसून येत आहेत."

"हो.. ना.. एवढे दिवस जीव तोडून जे सांगत होतो, ते लोकांना पटत नव्हते. असो.. आता पटले हे काही कमी नाही." चंद्रसेन म्हणाला.

"मी तर म्हणतो सगळे सुरळीत चालले आहे तर लग्नाचा बार ही घ्या उडवून." राजवर्धनच्या बोलण्याने चंद्रसेनाने त्याच्याकडे रोखून बघितले. त्याची ती नजर बघून राजवर्धन घाबरला.

"ते.. मी तर... असंच.."

"स्थळ आहे का नजरेत?" चंद्रसेनाने हा प्रश्न विचारताच राजवर्धनने आ वासला.

"स्थळ म्हणजे?"

"लग्न करायचे म्हटल्यावर मुलगीही हवीच ना? तशी कोणी आहे का नजरेत?"

"घरी गेल्यावर यादी काढून सांगतो. बघतो कोणा मातबदाराची लेक आहे का? तसेही तुम्हाला कोण नाही म्हणणार?" राजवर्धन म्हणाला.

"असं काही नाही. आमच्याकडे तर किती त्रुटी आहेत. नकार येण्याची शक्यताच जास्त आहे." चंद्रसेन म्हणत होता.

"सरकार, हे निराशावादी शब्द तुम्हाला शोभत नाहीत. आधी मी स्थळं शोधतो. मग यावर चर्चा करू."

"एक स्थळ आमच्या नजरेत आहे." चंद्रसेन बाहेर बघत म्हणाला.

"अरे व्वा.. मग चिंताच मिटली. पटकन सांगा. लगेचच टिपण काढायला घेतो." खुश होत राजवर्धन म्हणाला.

"टिपण तुमच्याकडे असेलच."

"म्हणजे?" न समजून राजवर्धनने विचारले.

"आम्ही सईला मागणी घालत आहोत. जर तुम्हाला चालणार असेल तर." चंद्रसेनच्या या बोलण्याने राजवर्धन एकदम गप्प झाला. ते बघून नाही म्हटलं तरी चंद्रसेन दुखावला गेला.

"बघितलंत.. आत्ता तुम्हीच म्हणत होता की आम्हाला कोण नकार देणार? पण तुम्हाला विचारल्यावर तुमचा चेहरा किती पडला आहे."

"गैरसमज होतो आहे सरकार. खरंतर दोष तुमच्यात नाही. तिच्यामध्ये आहे. म्हणूनच तर सोळावं सरलं तरी तिचा विवाह अद्याप झाला नाही." राजवर्धन खालमानेने म्हणाला.

"समजले नाही."

"तिच्या कुंडलीत कडक मंगळ आहे. पत्रिका न जुळल्यानेच.."

"आम्ही पत्रिका मानत नाही." चंद्रसेन म्हणाला.

"पण आम्ही मानतो ना." राजवर्धन म्हणाला.
चंद्रसेन विचारात पडला. पहिल्यांदाच त्याने कोणालातरी मागणी घातली होती आणि हे असं झालं होतं.

"ठिक आहे. आपण गोविंद भटांना विचारू. त्यांनी जर होकार दिला तरच पुढे जाऊ. अन्यथा.." बोलतानाही चंद्रसेनाला त्रास होत होता.

"तेच योग्य राहील.."


गोविंद भट काय म्हणतील यावर? सई चंद्रसेनचे होईल का लग्न? सई वाड्यात आल्यानंतर बदलेल का वाड्याचे भविष्य? बघू पुढील भागात. तोपर्यंत मी तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all