Login

वाड्यात येऊन जा.. भाग ४७

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४७


"गुरूजी.. नमस्कार करतो." ध्यानात बसलेल्या गोविंद भटांना चंद्रसेनने नमस्कार केला.

"आचार्य, प्रणाम.." राजवर्धन म्हणाला.

"पत्रिका आणलीस का?" डोळे न उघडता गोविंद भटांनी विचारले.

"गुरूजी.." आश्चर्याने चंद्रसेन म्हणाला.

"आमचा खरा अभ्यास हाच.. मागे दाखवलेला नाही." डोळे उघडत गोविंद भट म्हणाले. त्यांच्या चेहर्‍यावर कधीतरीच दिसणारे स्मितहास्य होते.

"ही पत्रिका.." सईची पत्रिका समोर ठेवत राजवर्धन म्हणाला.

"ही त्या धुनीत टाक." गोविंद भट म्हणाले.

"आचार्य.." राजवर्धनचा विश्वास बसत नव्हता.

"म्हणजे आम्ही चुकतो आहोत का?" चंद्रसेनचा चेहरा उतरला होता.

"नाही.. जे भाग्यात लिहिलेले आहे. तेच होते आहे. तुझ्या नशीबात सई लिहिली होती. म्हणूनच चुकीची पत्रिका तयार होऊन ती इतका काळ अविवाहित राहिली." राजवर्धन आणि चंद्रसेनाचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता.

"म्हणजे?"

"हिच तुझ्या वाड्याची भाग्यलक्ष्मी आहे. तिला जप आणि बघ तुझी कशी भरभराट होते ते." गोविंद भट म्हणाले.

"आता तरी झाले का तुमचे समाधान? करू शकतो का मी तिच्याशी लग्न?" आनंदाने चंद्रसेनने राजवर्धनला विचारले.

"यावर मी बापडा काय बोलणार? पण आम्ही तुमच्या इतमामाला साजेसा असा मानपान करू शकत नाही." राजवर्धन म्हणाला.

"फक्त नारळ आणि सुपारी द्या. बाकी कसलीही गरज नाही. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला विचारायचे राहिले." चंद्रसेन म्हणाला. लग्नाला सईची मान्यता आहे का? हे त्याला जाणून घ्यायचे होते.

"आमचं कुटुंब काही आमच्या शब्दाबाहेर नाही. पण तरीही तुम्ही म्हणत असाल तर विचारतो. पण नकार आला तर?" राजवर्धन म्हणाला.

"मग नको.." चंद्रसेन पटकन म्हणाला आणि मग त्याची घाई त्याला समजली. ते ऐकून राजवर्धन परत हसला.

"राजवर्धन, घरी जाऊन ही बातमी दे. आणि तयारीला लाग." गोविंद भट म्हणाले. ही अप्रत्यक्षपणे त्याला जाण्याची सूचना होती हे समजून राजवर्धन तिथून निघाला. आता दालनात गोविंद भट आणि चंद्रसेन राहिले होते.

"चंद्रसेना, दरवाजा लावून घे." गोविंद भटांनी सांगितले. चंद्रसेनाने लगेच दरवाजा बंद केला.

"आता मी जे काही सांगणार आहे ते नीट ऐक. आणि सध्यातरी हे फक्त आपल्यातच राहू देत." गोविंद भट गंभीरपणे बोलू लागले.

"काय झालं गुरूजी?"

"तुझ्या म्हणण्यानुसार मी तिकडची जागा मोकळी करण्याचा प्रयत्न केला. पण.."

"पण काय गुरूजी? तुम्ही केलेला पराक्रम मी बघितला आहे. तरीही.." चंद्रसेन चिंतेत पडला.

"मी आधीच सांगितलं होतं की माझा हा प्रांत नाही. पण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी हे केले. पण आता मला वाटते आहे की मी यात यशस्वी झालो नाही."

"गुरूजी.." चंद्रसेनचा चेहरा भयभीत झाला होता.

"हो.. त्यादिवशी आम्ही याला या बाटलीत बंद केले खरे. पण आमचे मंत्र या शक्तीला किती काळ बांधून ठेवतील हे आम्हाला माहीत नाही." गोविंद भट बोलत होते.

"गुरुजी, तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताही जागा सोडतो. माणसांचा जीव माझ्या महत्वाकांक्षेपेक्षा महत्वाचा आहे." बोलताना चंद्रसेनच्या डोळ्यासमोर वाड्यात मालकिणीच्या आविर्भावात वावरणारी सई दिसत होती.

"आता ही जागा सोडून काहीच फायदा नाही. कारण तू कुठेही गेलास तरी तुझ्यात आणि तिच्यात बंध निर्माण झाले आहेत. ते कुठेही तुला शोधून काढणार."

"या अश्या परिस्थितीत तुम्ही मला लग्न करायची परवानगी दिलीत?"

"हो.. कारण या सगळ्याचा पुरेपूर बंदोबस्त कसा करायचा हेच शिकण्यासाठी मी माझ्या गुरुजींकडे चाललो आहे."

"काय? पण गुरूजी? तोपर्यंत ती शक्ती?" चंद्रसेनला काही समजत नव्हते.

"मी त्या शक्तीवर काही बंधने टाकून ती वाड्यात दडवून ठेवणार आहे. मी परत येईपर्यंत कोणालाच काही होणार नाही याची खात्री पटल्यावरच मी जाणार आहे." गोविंद भट म्हणाले.

"पण ती दडवलेली शक्ती कोणाला सापडली तर?"

"ती शक्ती अशी कोणालाही मिळणार नाही. ती बहुतेक तिच्याशी ज्याचा संबंध आहे त्यालाच जाणवते आहे. आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत त्यामागे काहीतरी सबळ कारण असावे असे मला वाटते आहे. या सगळ्याचा मला शोध घ्यायचा आहे." गोविंद भट म्हणत होते.

"मला काहीच समजत नाहीये."

"थोडक्यात सांगतो. कारण इकडचा प्रमुख म्हणून तुला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुला आठवतं, आपण इथे आलो तेव्हा मी एक बाहुली बनवून ती हवेत सोडली होती."

"हो.. आणि त्या बाहुलीचा नाश झाला होता." त्या आठवणीनेही चंद्रसेन शहारला.

"मी त्याचेच कारण शोधतो आहे. माझा असा अंदाज आहे की ही शक्ती कुठेतरी तुझ्याशी निगडित आहे. म्हणूनच तुझी चाहूल लागताच ती जास्त पिसाळली होती. तो सगळा राग त्या बाहुलीवर निघाला. आणि आता तर तू त्या जागेचा स्वामी झाला आहेस. ती काहीतरी करणार हे नक्की. त्या शक्तीचा नायनाट करायचा असेल तर त्याचे मूळ माहीत असणं गरजेचं आहे."

"ते कसं समजणार?"

"त्यासाठीच तर मी हिमालयात चाललो आहे. गुरूजींशी बोलल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही."

"पण मग वाड्यात ती कुठे ठेवणार आहात?" चंद्रसेनने विचारले.

"आपल्याला त्यासाठी योग्य जागा शोधायला हवी. तुझ्या लग्नाआधी हे सर्व झाले पाहिजे."

"पण गुरूजी, त्यांना काही धोका?"

"धोका असता तर मी हे पाऊल उचलले असते का? विश्वास ठेव. मी योग्य ती काळजी घेईनच. त्याला मी येईपर्यंत जपायची जबाबदारी मात्र तुझी." गोविंद भट म्हणाले.

"जीवाची ढाल करून जपेन मी." चंद्रसेन म्हणाला.

"तेवढा नक्कीच विश्वास आहे." गोविंद भट आशीर्वाद देत म्हणाले.


राजवर्धनच्या घरी लग्नाची बातमी ऐकून यमुना चिडली.

"माझी बहिण काही मला जड झाली नाही. तिला तिथे वाड्यात पाठवायला. त्यापेक्षा मी तिला विहीरीत ढकलून देईन." ती तावातावाने बोलत होती.

"आणि मग सरकार तुला सोडतील का? ते आपल्या सर्वांना त्याच विहीरीत बुडवतील."

"पण तो वाडा झपाटलेल्या जागेवर बांधला आहे. मला तर भितीच वाटते सतत." यमुनेच्या आवाजात भिती जाणवत होती.

"ताई, मध्ये बोलते आहे म्हणून क्षमा कर मला. पण त्या वाड्याला घाबरायची काही गरज नाही. आपलं लग्न कधीच होणार नाही असं वाटत होतं मला. किंवा झाले तरी एखादा बिजवर किंवा तिजवर मिळेल असे वाटत होते. माझे अहोभाग्य म्हणून मला तिकडून मागणी आली. मला आवडेल तिथे जायला." मनाचा हिय्या करून आपले मत सईने मांडले.

"आता हिचीच इच्छा असेल तर खोडा घालणारी मी कोण? पण आईबाबांना सांगितले पाहिजे." यमुना म्हणाली.

"ते मी सांगतो. काळजी नसावी. आणि आता तयारीला लागा. सरकारांना लग्नाची घाई झाली आहे." सईकडे बघत राजवर्धन म्हणाला. त्या बोलण्याने लाजून सई आत पळाली.

लग्नाचा मुहूर्त निघताच तिन्ही ठिकाणी जोरदार तयारीला सुरुवात झाली. दोन्ही लग्नघरी आणि गोविंद भटांकडे सुद्धा. लग्न झाल्यावर लगेचच ते हिमालयाकडे प्रस्थान करणार होते. तोपर्यंत त्यांच्या पूर्ण घराची जबाबदारी चंद्रसेनाने घेतली होती. त्याआधी खूप महत्वाचे काम त्यांना हातावेगळे करायचे होते. ती शक्ती त्यांना अश्याप्रकारे लपवायची होती की सामान्य कोणीही तिला शोधू शकणार नाही. त्यासाठी त्यांनी एका खास दालनाची निवड केली. गोविंद भटांनी त्या दालनावर वेगवेगळी बंधने टाकून ते दालन इतरांसाठी अदृश्य केले. म्हणजे इतरांना दिसताना तिथे भिंत दिसायची. पण त्यामागे एक क्रूर शक्ती सुप्तावस्थेत होती. त्या जागेची खूण समजावी म्हणून एक भलेमोठे तैलचित्र तिथे लावण्यात आले आणि ती शक्ती हा विषय वाड्यात बंद झाला.

"राणीसाहेब, सरकार आता दालनात यायला निघाले आहेत." मंचकावर सजून बसलेल्या सईला मैना दासीने सांगितले.

"तरी उशीरच झाला. आमच्या राणीसाहेब कधीची वाट बघत आहेत त्यांची. आता आल्यावर चांगलं खडसवा, बरे.." सईची सखी अनु म्हणाली.

"तुझं आपलं काहीही असतं. मी काय खडसवणार कोणाला?" लाजेने चूर होत सई म्हणाली.

"हो का? आम्ही अजून विसरलो नाही बरं." दालनात प्रवेश करत चंद्रसेन म्हणाला. त्याचा आवाज ऐकताच मुजरा करून मैना आणि अनु जायला निघाल्या.

"ऐकणार नाही का, आम्ही यांना किती घाबरतो ते."

"ऐकायला नक्की आवडेल. पण विवाहाच्या पहिल्याच रात्री आम्ही इथे थांबून तुमची कथा ऐकली तर आमची सखी आमच्यावर रुसेल. त्यापेक्षा आम्ही इथून गेलेलं बरं." खोडकरपणे अनु म्हणाली. तिचे बोलणे ऐकून चंद्रसेन खळखळून हसला.

"तुमच्या सखीला तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखणार?" त्या दोघी जाताच त्याने दरवाजा लावून घेतला. तो पाठी वळला तर सई खिडकीजवळ उभी राहिली होती.


कशी असेल दोघांची पहिली रात्र? गोविंद भटांना त्यांचे गुरूजी काय शिकवतील? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all