Login

वाड्यात येऊन जा.. भाग ४८

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४८

"रागावलीस?" पाठमोर्‍या सईला चंद्रसेनने विचारले. तरीही ती काहीच न बोलल्याने तो थोडा नाराज झाला. तिच्या बोलकेपणाचा त्याने अनुभव घेतला होता. त्याला तोच आवाज पुन्हा ऐकायचा होता. पण ती तर तोंड मिटून बसली होती. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिला आपल्याकडे वळवले.. आणि त्याची भितीने गाळण उडाली. ही त्याची सई नव्हतीच. लालभडक डोळे, पिंजारलेले केस, हाताच्या वाढलेल्या नख्या. सगळ्यावर वरताण ते विकट हास्य. भयातिरेकाने त्याने डोळे मिटून घेतले.

"काय झालं? माझं काही चुकलं का?" हवाहवासा वाटणारा आवाज कानी पडताच चंद्रसेनने डोळे उघडले. समोर त्याची सई घाबरलेल्या अवस्थेत होती. त्याने इथेतिथे बघितले. मगाच्या त्या भयाण दृश्याचा काहीच मागमूस नव्हता.

"सांगा ना.. माझे काही चुकले का?" पाणावलेल्या डोळ्यांनी सईने परत विचारले.

"नाही.. मलाच जरा गरगरल्यासारखे झाले. म्हणून डोळे मिटून घेतले होते. माफ कर मला." चंद्रसेन म्हणाला.

"इश्श्य.. माफी कसली मागताहात?" लाजतच सई म्हणाली.

"ते म्हणजे.." चंद्रसेनने सईकडे बघितले. आता झाले ते विसरून त्याला तिच्यामध्ये हरवून जायचे होते. "काही नाही. तुमची परवानगी असेल तर.."

"तर.. काय?" अजाणतेपणी सईने विचारले.

"तर.. या अधरोष्ठातलं मी अमृतपान केलं तर चालेल का?" चंद्रसेनचा प्रश्न ऐकताच सईच्या चेहर्‍यावर लाली चढली. तिने आपला चेहरा हातात लपवला. चंद्रसेनने तिचे हात दूर केले.

"याचा अर्थ नकार समजायचा का?" त्याने हे विचारताच तिने त्याच्या बाहुपाशात स्वतःला झोकून दिले. चंद्रसेन हसला आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात झाली.

"सई, तुम्ही खुश आहात का या विवाहाने?" आपल्या छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या सईला चंद्रसेनने विचारले.

"ह्म्म.." डोळे न उघडता सईने हुंकार दिला.

"असं नाही.. शब्दात सांगा." चंद्रसेन परत म्हणाला.

"असं काय करायचं ते. झोपू दे बरं आम्हाला." वळत सई म्हणाली.

"आधी आमचे उत्तर." चंद्रसेनने सईला घट्ट धरून ठेवले होते.

"हो.. मी खूप आनंदी आहे. वाटलंही नव्हतं माझं तुमच्याशी लग्न होईल. या सुखाला कोणाची नजर न लागो." मान खाली घालून सईने बोलून घेतलं.

"एवढं प्रेम आहे तुमचं आमच्यावर?"

"एखाद्या भक्ताचे देवावर असेल तसे आहे."

"मग आमची साथ द्याल जन्मोजन्मी?" चंद्रसेनने कातर आवाजात विचारले.

"हे काय विचारणं झालं? जन्मोजन्मी मी फक्त तुमचीच आहे." चंद्रसेनचा हात हातात घेत सई म्हणाली. "इथून रागावणं होणार नसेल तर एक विचारू का?"

"आम्ही का रागावू? विचारा ना.."

"गुरूजी कुठे गेले आहेत का? म्हणजे सप्तपदी झाल्याझाल्याच ते तिथून निघून गेले." सईचे बोलणे ऐकून चंद्रसेन गंभीर झाला. गोविंद भटांचे बोलणे त्याला आठवले. सईला किती आणि काय सांगायचे हा विचार तो करू लागला. शेवटी त्याने मनाशी काहीतरी ठरवले.

"सई, आता तुम्ही आमची अर्धांगिनी आहात. या वाड्याची मालकीण आहात. त्यामुळे तुम्हाला सर्व माहित असणं गरजेचं आहे."

"काही गंभीर आहे का?" सई उठून बसली होती. साडी नीट करत तिने विचारले.

"सई, या स्थानी असलेली दुष्ट शक्ती अजून इथून नाहीशी झाली नाही." चंद्रसेन सांगू लागला. सई ते ऐकू लागली.

"तर... गुरूजी परत येईपर्यंत ती शक्ती बाहेर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे." चंद्रसेनने आपलं कथन संपवलं.

"माझ्याकडून होईल तेवढं मी नक्की करेन." सईने त्याला विश्वास दिला.

दिवसामागून दिवस जात होते. सई आणि चंद्रसेन एकमेकांच्या प्रेमसागरात डुंबत होते. सईने वाड्याचा कारभार हाती घेतला होता. राजवर्धन आणि त्याच्या कुटुंबाला चंद्रसेनाने मानाने वाड्यात बोलावून घेतले होते. गोविंद भटांचे कुटुंब मात्र अजूनही त्यांच्या जुन्या घरीच रहात होते. चंद्रसेन मैदानात एकेक मोहिमा जिंकत होता. वैभवाच्या शिखरावर पोहोचला होता तो. तेव्हाच सईने त्याला एक गोड बातमी दिली.

"सई, लवकरच आम्हाला कर्नाटकात जावे लागणार आहे." सदरेवर जायची तयारी करत चंद्रसेन म्हणाला.

"लवकर म्हणजे साधारण कधी?" पहिल्यांदाच चंद्रसेन मोहिमेवर जाणार हे ऐकून सईचा चेहरा उतरला होता.

"आम्ही मोहिमेवर जात आहोत आणि तुमचा चेहरा इतका उदास?" चंद्रसेनाला आश्चर्य वाटले.

"मग काय.. आत्ता तर तुम्ही पुण्यास जाऊन आला होता." सईने नाक मुरडले.

"सरकारांची तब्येत तर तुम्हाला माहित आहे. त्यांना कधीही मोहिमेवरून पाठी फिरावे लागते. अश्यावेळेस आधीच मोहिमेचे आराखडे ठरवलेले बरे असते. आता हे आम्ही तुम्हास सांगायचे का?" चंद्रसेन सईला मिठीत घेत म्हणाला.

"इतर वेळेस आम्ही काही म्हणतो का? पण आता?" सई मान खाली घालत म्हणाली.

"आता? यावेळेस काय वेगळे आहे?" तिचा चेहरा वर करत चंद्रसेनने विचारले.

"तुम्ही मोहिमेवर जाणार. सहा महिने, एक वर्ष किती दिवस लागतील, काहीच सांगता येणार नाही. मग.." बोलता बोलता सई थांबली.

"मग काय? पटकन सांगा. आमची उत्सुकता अशी ताणू नका." चंद्रसेन अधीरतेने म्हणाला.

"मग आपलं बाळ ओळखेल तरी का इकडच्या स्वारीला?" सई लाजत म्हणाली.

"काय?? आपलं बाळ? सई ऽ सई ऽ सई.. तुम्हाला माहित नाही किती आनंदाची गोष्ट तुम्ही आज आम्हाला सांगितली आहे. आमच्या मातापित्यांना तर आम्ही कधीच गमावले. कसेतरी आश्रित म्हणून जगता जगता सैन्यात भरती झालो. तिथे पराक्रम गाजवून सरकारांची मर्जी संपादन केली. पण आपलं कुटुंब नसल्याची खंत सतत असायची. महादेवाने आमची फार साथ दिली. तुम्हाला बघितलं आणि एक हक्काचं माणूस मिळालं. आता आपलंही कुटुंब होणार सई.." चंद्रसेन खूप आनंदात होता. "असं वाटतंय.. की आत्ता हत्तीवरून साखर वाटूयात."

"नाही हं.. लगेच नाही. हे सगळं बाळ जन्मल्यानंतर. आत्ता नाही. म्हणूनच तर म्हणत होते, की आत्ता मला तुमची खूप जास्त गरज आहे आणि तुम्हाला मोहिमेवर जावं लागतंय."

"जायची इच्छा खरंच नाही. पण कर्तव्य आधी. पण आम्ही वचन देतो, मोहिम संपताक्षणी आम्ही इथे असू." चंद्रसेन मिठी घट्ट करत म्हणाला.

चंद्रसेन मोहिमेला गेला खरा.. पण त्याचा सगळा जीव मात्र वाड्यातच गुंतला होता. कितीही झालं तरी गोविंद भट कशासाठी हिमालयात गेले आहेत हे तो विसरू शकत नव्हता. आणि आत्ता या क्षणी त्याला आपले अनुभव आठवत होते. जर ती घातक शक्ती बाहेर आली तर सई त्याला कसे तोंड देणार, हा विचार त्याचा पिछा सोडत नव्हता. रोजच्या रोज दूत खलिता घेऊन वाड्यावर जात होता तरीही चंद्रसेनचे बेचैन मन मात्र शांत होत नव्हतं.

"सरकार, एक खुशखबर आहे." नुकतेच आपल्या तंबूत आलेल्या चंद्रसेनाला महादेव म्हणाला.

"काय झाले महादेवा?" डोक्यावरचा मंदिल उतरवत चंद्रसेनाने विचारले.

"बाईसाहेबांना पुत्ररत्न झाले." महादेवाला झालेला आनंद त्याच्या शब्दात दिसून येत होता.

"काय?" चंद्रसेनाने गळ्यातला मोत्यांचा हार काढून महादेवाला दिला. "अख्ख्या छावणीला साखर वाट आज आमच्याकडून. आम्ही खूपच खुश आहोत आज."

मोहिम संपताच चंद्रसेन घराच्या ओढीने परत निघाला. बाळाला आणि सईला कधी बघू, असं त्याला झाले होते. वाड्यावर येताच नेहमीप्रमाणे इतर सवाष्णी त्याला औक्षण करायला आल्या पण त्यात सई दिसत नव्हती. त्याचे मन काळजीने कातर झाले. तसाच तो तिच्या दालनात गेला. त्याला वाटलं होतं तसेच ती अशक्त झाली होती.

"आम्ही फक्त वर्षभर बाहेर होतो, तर ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची?" चंद्रसेन काळजीने म्हणाला.

"काही नाही. वातावरण बदलले आहे म्हणून जरा." सई उठून बसत म्हणाली.

"तुम्हाला त्रास होत असेल तर नका उठू." चंद्रसेन पुढे होत म्हणाला.

"तुम्ही इतक्या दिवसांनी इथे आलात आणि मी उठणार नाही?" हसायचा प्रयत्न करत सई म्हणाली. सईशी बोलताना चंद्रसेनची नजर बाळाला शोधत होती.

"बाळाला शोधताय ना?"

"हो.. त्याला बघायची उत्सुकता होती."

"मैना ऽ ए मैना ऽ." सईने आवाज देताच मैना बाळाला घेऊन आली. बाळाला बघताच चंद्रसेन थबकला. सईच्या अशक्तपणाचे कारण त्याला समजले.


काय असेल कारण सईच्या अशक्तपणाचे? सई उठेल का आजारातून? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all