Login

वाड्यात येऊन जा.. भाग ४९

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ४९


"हे आपलं बाळ आहे?" स्वतःच्या आवाजावर चंद्रसेनचा विश्वास बसत नव्हता. त्याने समोरच्या बाळाकडे बघितले. तसे तर ते सहा महिन्यांचे होते. पण दिसत दोन वर्षांच्या मुलासारखे होते. ते मैनेच्या कडेवर जरासुद्धा स्थिर रहात नव्हता. मैनेने सईकडे बघितले. तिने मान हलवून त्याला खाली ठेवायला सांगितले. बाळाला खाली ठेवताच तो सईकडे रांगत गेला. तो सईच्या अंगाशी खेळू लागला. अशक्त झालेल्या तिला मात्र त्याचे वजन झेपत नव्हते. ते बघून चंद्रसेन पुढे झाला. अनोळखी त्याला बघून बुजण्याऐवजी बाळ त्याच्याकडे झेपावला. त्याचा फेटा ओढू लागला. आपलं पहिलं बाळ म्हणून जो आनंद बाळाला बघून व्हायला हवा होता. तो त्याला होत नव्हता. एक भितीची लहर त्याच्या मनात उमटून गेली.

"मैना, बाळाला घेऊन जा." चंद्रसेन म्हणाला. मैना नाईलाजाने बाळाला घ्यायला येताच त्याने सईकडे झेप घेतली. आणि मम मम करत तो रडू लागला. त्याचे मम मम ऐकून सईचा घाबरलेला चेहरा चंद्रसेनला विचित्र वाटला.

"काय झालं आहे नक्की?" चंद्रसेनने सईला विचारले. ती मान खाली घालून गप्प होती. बाळ न रडता हट्टाने तिच्या अंगाशी झटत होतं. शेवटी न राहवून मैनाने तोंड उघडलं.

"ते बाळराजे दूध प्यायले की बाईसाहेब चक्कर येऊन पडतात. खूप अशक्त होतात." हे ऐकून चंद्रसेन चक्रावला.

"काय? पण मग यावर तुम्ही काही केले नाही का?" चंद्रसेनने सईला विचारले.

"काय करणार? आपलंच मूल आहे ना?" सई बोलली खरी. पण तिच्या बोलण्यात जोर नव्हता.

"वैद्यांना दाखवले का?"

"हो.. त्यांचं म्हणणं आहे की बाळाची भूक जास्त आहे."

"मग एखादी दूधाई लावायची."

"पण आपलं बाळ.."

"सई तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे माझ्यासाठी कोणी नाही. आणि बाळ आता सहा मासांचे झाले आहे. वैद्यांना विचारून बाहेरचा आहार सुरू केलात तरी चालेल." चंद्रसेन बोलत असताना बाळाचा हट्ट सुरूच होता. सई त्याला पदराखाली घेण्यासाठी वळणार तोच चंद्रसेनने तिला थांबवले.

"याची सुरुवात आत्तापासूनच करा. त्याला गाईचे दूध द्या." चंद्रसेन मैनेला म्हणाला.

"वैद्यांना विचारायचे म्हणालात ना?" सईने आश्चर्याने विचारले.

"ते इतर आहाराबाबत. दूध चालते, एवढं आम्हाला नक्कीच माहित आहे. मैना.."

"जी सरकार.." मैना पटकन बाहेरच्या दिशेने धावली. ती येईपर्यंत काहीतरी बोलायचे म्हणून सईने विचारले, "बाळाचे नाव काय ठेवायचे?"

"तुम्ही बाराव्या दिवशीच का नाही पाळण्यात घातले? म्हणजे इतके दिवस का थांबलात?"

"माझी तब्येत ही अशी तोळामासा झालेली. इकडच्या घरचं जुनंजाणतं कोणीच नाही. ताई आणि भावोजी असले तरी ते थोडे लांबच राहतात. मग काय करणार? त्यानंतर मग मीच म्हटलं, तुम्ही आल्यावर करू समारंभ. आता तरी सांगाल का काय नाव ठेवायचे ते?" एवढं बोलताना देखील सईला दम लागत होता.

"बाळाचे नाव? आम्ही काय सांगणार? आम्हाला त्यातलं काय कळतं?" चंद्रसेन विषय टाळत म्हणाला.

"हो का? लक्षात ठेवतो आम्ही." सई म्हणाली. तेवढ्यात मैना वाटीत दूध घेऊन आली. तिने बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. आधी तो ऐकत नव्हता पण बहुतेक भुकेला असावा म्हणून त्याने सगळे दूध पटापट संपवले. त्याचे पोट भरलेले बघून सईने सोडलेला निश्वास चंद्रसेनने ऐकला. तिला स्तनपानाची वाटत असलेली धास्ती त्याला जाणवली. त्याला अचानक गोविंद भटांची आठवण झाली. ते लवकरात लवकर यावे म्हणून त्याने मनाशीच प्रार्थना केली.
सईच्या आग्रहास्तव घरातल्या घरात का होईना बाळाचा नामकरण समारंभ पार पडला. अजूनही वाड्याबद्दल लोकांच्या मनात असलेली थोडीफार धास्ती आणि सईची नाजूक तब्येत यामुळे समारंभाला जास्त माणसे नव्हतीच. बाळाचे नाव यमुनाने *भानू* ठेवले. नामकरण झाले आणि भानूला बाहेरचा आहार सुरू झाला. त्यामुळे त्याची झपाट्याने वाढ होत गेली. चंद्रसेन आल्यामुळे किंवा भानूचे स्तनपान सुटल्यामुळे सईची तब्येतही सुधारायला लागली. महिन्याभरातच ती पहिल्यासारखी झाली. त्यामुळे चंद्रसेनही खुश झाला. भानूला पहिल्यांदा बघितल्यावर निर्माण झालेली भयाची लहर विरून गेली होती. तो आता त्याला घेऊन वाड्यावर फिरत असायचा. फिरता फिरता त्याला एक दिवस जाणवले.. ते दोघेही त्या अदृश्य दालनापाशी आले की भानू स्तब्ध व्हायचा. जणू कसलीतरी चाहूल घेत असल्यासारखा. एकदोनदा त्याने खाली उतरायचा प्रयत्नही केला होता. पुन्हा जेव्हा भानूने असा प्रयत्न केल्यावर चंद्रसेनने त्याला खाली सोडले. रांगत रांगत तो त्या चित्रापाशी गेला. आणि डोके आपटून परत पाठी आला. मग मात्र चंद्रसेन त्याला उचलून स्वतःच्या दालनात घेऊन आला. तिथे सई देवाजवळ दिवा लावत होती.

"घ्या तुमच्या लेकाला.." चंद्रसेन भानूला सईकडे देत म्हणाला. तरीही सई पुढे झाली नाही म्हटल्यावर त्याला आश्चर्य वाटले.

"घेणार नाही का लेकाला?"

"आता मला नाही जमणार त्याला असं उचलायला." सई लाजत म्हणाली.

"त्याचं वजन वाढलं आहे माहिती आहे.." स्वतःच्याच धुंदीत चंद्रसेन बोलत होता. "पण म्हणून त्याला घ्यायचेच नाही हा कसला अट्टाहास?"

"तुम्ही पण ना.."

"आता काय झालं? हे असं कोड्यात बोलू नका."

"भानूला बहिण किंवा भाऊ येणार आहे." सईने सांगितले.

"खरं?" चंद्रसेनने सईजवळ जात विचारले.

"हो.. लक्षणं तर तीच दिसत आहेत. पण मला भिती वाटते आहे." सई चंद्रसेनला बिलगत म्हणाली.

"कसली भिती?"

"काही नाही.." सई भानूकडे बघत म्हणाली. तो या दोघांकडेच बघत होता.

"काही होत नाही. यावेळेस आम्ही इथेच आहोत. गेलो तरी एका आठवड्याहून जास्त बाहेर कुठे राहणार नाही याची काळजी घेऊ." चंद्रसेन तिला आश्वस्त करत म्हणाला. चंद्रसेनने त्याचे वचन पाळले. तो कुठेही जास्त दिवसांसाठी गेला नाही. वाड्यात राहूनच तो त्याची कामे करत होता. अचानक त्याला काहीतरी आठवले आणि त्याने राजवर्धनला बोलावून घेतले.

"नमस्कार सरकार.." राजवर्धनला महादेव थेट चंद्रसेनच्या दालनात घेऊन गेला.

"महादेवा, आमचे बोलणे होईपर्यंत कोणालाच आत पाठवू नकोस. सई बाईसाहेबांना तर अजिबात नाही." चंद्रसेनचे बोलणे ऐकून नाही म्हटलं तरी राजवर्धनला आश्चर्य वाटले. अशी एकही गोष्ट नव्हती की जी तो सईपासून लपवत होता. तरीही.. पण तो काही बोलला नाही.

"बसा ना शास्त्रीबुवा." चंद्रसेनने राजवर्धनला बसायची खूण केली.

"मी बरा आहे सरकार.." राजवर्धन म्हणाला.

"सरकार, दालनाच्या बाहेर. इथे आत नको. पण आत्ता या विषयावर वाद नको. थेट मुद्द्यावर येतो. मी ही आल्यावर विसरलो आणि तुम्ही ही सांगितलं नाही. आपण भानूचे जन्मटिपण काढले का?" हा प्रश्न ऐकताच राजवर्धनचा चेहरा पडला.

"काय झाले शास्त्रीबुवा? खरेतर आता तुम्ही आमचे नातलगही आहात आणि वाड्याचे पुरोहितही. आम्ही इथे नसताना वाड्यावरचा देवधर्म आणि इतर कार्ये व्यवस्थित होतात की नाही, हे बघणे तुमची जबाबदारी आहे ना." चंद्रसेनचा आवाज थोडा चढला होता.

"ते तुम्ही पत्रिका मानत नाही ना.."

"मी पत्रिका मानतो की नाही हा माझा प्रश्न आहे. पण तुमचे काम तुम्ही केले का? हे मला विचारायचे आहे."

"भानूची पत्रिका तयार आहे सरकार.." राजवर्धन म्हणाला.

"मग ती सईकडे का नाही?"

"कसं आणि काय सांगू?"

"म्हणजे?"

"आचार्यांसोबत मी जो काही दोनतीन वर्षांचा काळ एकत्र काढला, त्यात त्यांनी मला पत्रिका कशी बनवायची हे ही शिकवले. त्यानुसार मी भानूची पत्रिकाही बनवली. पण.."

"पण काय??"

"एवढी वेगळी पत्रिका मी कधी बघितली नव्हती. माझ्याकडून चूक झाली असावी असे वाटून मी ती आचार्यांकडे पाठवली. पण आचार्य अजून खडतर तपश्चर्येसाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांची आणि आपल्या दूताची भेट झाली नाही. आणि म्हणूनच ती पत्रिकाही मी तुम्हाला दिली नाही."

"एवढं काय वेगळं आहे त्यात?"

"पत्रिकेवरून तरी भानू सर्वसामान्य आयुष्य जगेल असं वाटत नाही. काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा अट्टाहास असेल."

"बस्स.. एवढंच ना? मग ते तर मी ही केलेच ना? मी जेव्हा इथे वाडा बांधायचा ठरवला, हा परिसर घेतला, तेव्हा मलाही लोकांनी वेड्यात काढलेच ना? कदाचित ते आमच्या रक्तातच असावं." चंद्रसेन हसत म्हणाला.

"आज्ञा असेल तर निघू मी?" राजवर्धनने विचारले.

"हो.. आणि आमच्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. आम्हाला या भानूची कधी कधी चिंता वाटते. त्यातूनच आम्ही असे बोललो." चंद्रसेन म्हणाला. त्याला नमस्कार करून राजवर्धन आपल्या दालनात आला. संदुकीत लपवून ठेवलेली भानूची पत्रिका त्याने बाहेर काढली. आणि तो परत आकडेमोड करू लागला.

"माझा निष्कर्ष बरोबर होता. ही व्यक्ती घराण्याचा विनाश करणार.."


भानुमुळेच झाला असेल का घराण्याची ही अवस्था? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all