वाड्यात येऊन जा.. भाग ५०
"आई गं.. आई.." आतमध्ये सई प्रसववेणा सहन करत होती आणि बाहेर चंद्रसेन बेचैन होऊन फेऱ्या मारत होता. सईचा आवाज त्याला ऐकवत नव्हता. तो महादेवला हाक मारणार तोच त्याला आठवले की महादेव तर भानूला घेऊन बाहेर गेला होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. समोर राजवर्धन कसलीतरी आकडेमोड करत बसला होता. त्याला काही बोलून त्रास द्यावा असे चंद्रसेनला वाटले नाही. वेळ मंद गतीने पुढे जात होता. शेवटी वैतागून चंद्रसेन राजवर्धनला काही सांगणार तोच दालनाचा दरवाजा उघडला गेला आणि पदराने घाम पुसत यमुना बाहेर आली.
"मुलगा झाला हो.. परत." ते शब्द ऐकताच राजवर्धनचा चेहरा आनंदाने फुलला.
"टळलं.. या घराण्यावरचं संकट टळलं." त्याच्या ओरडण्याने चंद्रसेन आणि यमुना त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
"शास्त्रीबुवा, याचा अर्थ?" चंद्रसेनने विचारले.
"आपण एकांतकक्षात जाऊयात का?" राजवर्धनने विचारले.
"पण सई?" चंद्रसेनने काळजीने विचारले.
"तिला अजून काही काळतरी शुद्ध येणार नाही. ती शुद्धीवर आली की मी बोलावणं धाडते." यमुना पदर सारखा करत म्हणाली.
"त्यांना शुद्ध आली की लगेच मला सांगा. आणि बाळ कसं आहे?"
"गोरागोमटा आहे हो, अगदी सईसारखा. त्याचे न्हाण झाले की सांगतो तुम्हाला." चंद्रसेन कक्षात जायला निघाला. दोन पावलं चालून तो परत पाठी आला. गळ्यातली मोत्यांची माळ काढून त्याने यमुनेच्या हातात ठेवली.
"सरकार.."
"ताई, आठवण म्हणून देतो आहे. ठेवा जपून."
चंद्रसेन आणि राजवर्धन कक्षात आले. राजवर्धनने दरवाजा लावून घेतला.
"शास्त्रीबुवा, याचा अर्थ काय होतो?"
"तुम्हाला आठवतं, मी भानूच्या पत्रिकेवरून तुम्हाला काही सांगितलं होतं?"
"ती वेगळी आहे म्हणून ना?"
"वेगळी.. त्याच्या पत्रिकेनुसार तो या घराण्याचा विनाश करणार आहे."
"शास्त्रीबुवा.." राजवर्धन रागाने ओरडला.
"मला जाणीव आहे मी काय बोलतो आहे याची. पण खरं तेच सांगतो आहे. तुमचा विश्वास नाही तर सांगून काय फायदा? आज मात्र माझी चिंता मिटली. या चिरंजीवांचा जन्म अत्यंत चांगल्या मुहूर्तावर झाला आहे. तोच या घराण्याचे रक्षण करेल." राजवर्धन बोलत होता.
"शास्त्रीबुवा, तुम्ही आमच्या चिरंजीवांबद्दल आमचं मत कलुषित करत आहात." चंद्रसेन अस्वस्थपणे म्हणाला.
"यात माझे हित काय? मला जर तुम्हाला काही सांगायचे असते तर मी आपणहून सांगायला आलो असतो. तुम्ही विचारल्यावरच मी तुम्हाला सांगितलं ही बाब सरकारांनी ध्यानात घ्यावी."
"आमचा विश्वास नाही.." चंद्रसेन द्विधा मनस्थितीत सापडला होता.
"नका ठेवू. आम्हाला जे करता येण्यासारखं आहे ते मी करतो आहेच. पण तुम्ही थोरल्या चिरंजीवांवर लक्ष तर ठेवू शकता ना? त्यांना धाक असलाच तर तो फक्त तुमचाच असणार. आणि धाकट्या चिरंजीवांची सगळी जबाबदारी आजपासून माझी." राजवर्धन म्हणाला.
"तुम्ही जे सांगत आहात त्यावर आम्ही विचार करू. पण त्याआधी आमची एक छोटीशी इच्छा आहे." चंद्रसेन हातातल्या अंगठीशी खेळत म्हणाला.
"सांगा ना.."
"आमची अशी इच्छा आहे की या वाड्याचे एक दप्तर असावे. आपण झालेला पत्रव्यवहार तर जपून ठेवतोच पण त्यासोबत याचा इतिहासही लिहून ठेवला जावा. आणि तो तुम्हीच लिहावा अशी आमची इच्छा आहे."
"मी?"
"हो.. तुम्हीच.. कारण काही गोष्टी अजूनतरी बाहेर ठाऊक नाहीत. आणि त्या माहिती पडाव्यात अशी आमची इच्छा देखील नाही. तसेही या जागेच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत आहात. तुमच्यापेक्षा इकडची जास्त माहिती इतर कोणालाही नाही. त्यामुळे या गोष्टींसाठी तुम्हीच आम्हाला योग्य वाटत आहात."
"ही फार मोठी जबाबदारी टाकत आहात तुम्ही माझ्यावर."
"कारण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची सोबत सोडणार नाही, असा विश्वास आहे आमचा. आणि जबाबदारी ही नेहमी विश्वासू व्यक्तीलाच द्यायची असते ना?" राजवर्धनच्या खांद्यावर हात ठेवत चंद्रसेन म्हणाला. त्याच्या या कृतीने राजवर्धनचे डोळे पाणावले.
"मी माझी जबाबदारी निष्ठेने पार पाडीन सरकार." राजवर्धन म्हणाला.
आणि त्या दिवसापासून लेखनाची तसेच दुसर्या बाळाची जबाबदारी राजवर्धनने स्विकारली. लगोलग बाराव्या दिवशी बाळाला पाळण्यात घालून त्याचे नाव राघव ठेवण्यात आले. भानूच्या वेळेस सईला जेवढा त्रास झाला तेवढा यावेळेस झाला नव्हता. तिच्याकडे बघून तर असं वाटत होतं.. जणू आधीच्या वेळेस राहिलेल्या सगळ्या गोष्टी ती आता पूर्ण करून घेते आहे. मुलं मोठी होत होती. दोघांच्याही अभ्यासाची जबाबदारी राजवर्धनने घेतली होती. त्याचा राघवकडे असणारा ओढा सगळ्यांना दिसत होता. त्यामुळे भानूचा आधीच रागीट स्वभाव आता मत्सरीसुद्धा होऊ लागला होता. ते बघताच चंद्रसेनला योग्य वाटत नव्हते तरीही त्याने महादेवला भानूवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली. भानू कधीकधी त्या दालनासमोर फिरताना आढळायचा. जणू कोणाला तरी तो साद देतो आहे. हे असं झालं की महादेव लगेचच ती गोष्ट येऊन चंद्रसेनला सांगायचा. ते ऐकलं की त्याला गोविंदभटांची आठवण यायची. त्यांना जाऊन जवळपास बारा वर्षे झाली होती. तरीही ते परतले नव्हते. ते कुठे होते ते ही माहित नव्हते. आधी दूताकरवी निरोपाची देवाणघेवाण तरी होत होती. पण गेले काही वर्ष ती ही थांबली होती. ते लवकरात लवकर उपाय घेऊन यावेत हिच प्रार्थना तो करत असायचा.
कर्मधर्म संयोगाने राघवनंतर सईला मूल झाले नाही. ती या दोघांमध्ये आणि वाड्याच्या कामकाजातच गुंतून राहिली. त्याच दरम्यान पुण्याला बेबनाव झाला म्हणून चंद्रसेनला तिथे जावे लागले. महादेवसुद्धा यावेळेस त्याच्यासोबत गेला होता. तो गेला आणि परत एकदा त्या वाड्याचे नशीब पालटले. सई आपल्या रोजच्या कामकाजात व्यस्त होती. राघव राजवर्धनसोबत व्यायाम करत होता. भानू मात्र काहीतरी कारण काढून तिथून निघाला होता. तो वाड्याभोवती फिरत असताना दोन डोळे वाड्याचे निरिक्षण करताना त्याला दिसले.
"कोण आहे तिकडे?" भानू जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून ती व्यक्ती पळून जाण्याऐवजी अजून पुढे आली.
"अलख निरंजन.." त्या व्यक्तीचा आवाज आला. भानूने त्याला निरखून बघितले. तो एक बैरागी होता. त्याला बघून भानूने नाक मुरडले.
"इथे दान वगैरे मिळणार नाही." भानू तुसडेपणाने म्हणाला.
"दान मी द्यायला आलो आहे तुला, ते ही तुला जे हवं आहे त्याचे." नजर न झुकवता तो बैरागी म्हणाला.
"काय हवं आहे मला? आणि ते तुला काय माहित?" बारा वर्षांचा भानू मोठ्या माणसांसारखा बोलत होता.
"दिसतंय.. तुझ्या डोळ्यात दिसतंय ते मला."
"काय दिसतंय?"
"तुला सत्ता हवी आहे आणि भरपूर पैसा."
"ते तर कोणालाही हवे असते. त्यात विशेष ते काय?"
"हो.. पण त्यासाठी कोणी बाहेरची मदत शोधत नाही." हे ऐकून इतका वेळ मग्रुरीने बोलणारा भानू एकदम गप्प झाला.
"तुम्हाला काय माहित?" भानूच्या तोंडून तुम्हाला ऐकून बैरागी हसला.
"तुझ्या मनात जे चालू आहे ते सगळं मला समजतं. तुमच्या घरात तुला सतत कोणीतरी बोलावत असते. पण तू त्याला बघू शकत नाहीस. ते सतत तुला काय काय सांगत असतं ,तुला ते जमत नाही म्हणून तू सतत चिडलेला असतोस. बरोबर ना?"
"हे सगळं तुम्हाला कसं समजलं?"
"त्यासाठी साधना करावी लागते."
"साधना तर मी ही करतो." भानू हट्टाने म्हणाला.
"ती साधना वेगळी आणि ही वेगळी."
"मला शिकायची आहे ती."
"मग ये शिकायला."
"कुठे?"
"नदीच्या त्या टोकावर.." बैराग्याने समोर बोट दाखवले. भानूने त्या दिशेने बघितले. दूरवर कुठेतरी एक खोपट दिसत होतं. त्यातून धूर निघत होता.
"तिथे??"
"हो.."
"पण.. तिथे तर कोणीच दिसत नाही."
"ही साधना कोणी बघावी अश्या ठिकाणी केली जात नाही. तुला हवं तर ये तिथे." बोलता बोलता तो बैरागी तिथून दिसेनासा झाला.
"दादा, कोणी होते का रे इथे?" राघवने विचारले.
"नाही.. का रे? आणि तू का आलास इथे?" अचानक राघव तिथे आलेला बघून भानू घाबरला होता.
"ते मातोश्रींनी तुला बोलावले होते म्हणून.." भानूकडे बघत राघवने सांगितले.
"चल.. आलोच.." भानू त्याला वाड्याकडे ढकलत म्हणाला.
दोघे जाताच परत तो बैरागी तिथे प्रकट झाला.
"इथेच मला हवे ते मिळेल.."
कोण असेल तो बैरागी? आणि कसली साधना भानू शिकणार असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा