वाड्यात येऊन जा.. भाग ५१

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ५१


"भानू ऽ ऽ कुठे चालला आहेस तू अश्या सांजवेळेस? वाड्याच्या बाहेर दिवेलागणीच्या वेळेस जायचे नाही हे ठाऊक नाही का तुला?" बाहेर पडणाऱ्या भानूला सईने अडवले.

"ते.. ते.. जरा अपचन झाले होते म्हणून जरा फेरफटका मारायचा विचार होता." भानू अडखळत बोलला.

"ज्या काही फेऱ्या घालायच्या आहेत, त्या वाड्यात घाल. पण बाहेर पाऊल ठेवायचे नाही." सई कडकपणे म्हणाली. तिचा चढलेला आवाज ऐकून भानू गप्पपणे आत गेला. त्याने बाहेर जायचा विचार मात्र सोडला नाही. सगळीकडे निजानिज झाल्यावर तो खोलीबाहेर पडला. बाहेर कोणीच नाही हे बघून तो घराच्या पाठच्या बाजूला वळला. पहारेकर्याची गस्त घालून होताच कुंपणावरून उडी मारून तो बाहेर पडला. समोर मिट्ट काळोख पसरला होता. काहीही दिसत नव्हते. तरीही तो पुढे पुढे चालत होता. अचानक त्याला सकाळी दिसलेली धुराची रेख दिसू लागली. उत्साहाने तो त्या दिशेने चालू लागला. जसजसे ते झोपडे जवळ येत होते, तिकडचं वातावरण बदलत होतं. इतका वेळ जाणवणारा रातकिड्यांचा आवाज आता ऐकू येईनासा झाला होता. त्याउलट झोपडीतून कसल्यातरी मंत्राचे उच्चारण ऐकू येत होते. भानूच्या चालण्याचा वेग वाढला. तो जणू त्या दिशेने ओढला जात होता. त्याने झोपडीच्या दरवाजात पाऊल ठेवले आणि समोर बसलेल्या व्यक्तीने भेदक नजरेने त्याच्याकडे बघितले. ती नजर जणू त्याच्या अंतरंगाचा ठाव घेत होती. भानू तिथेच थबकला.

"तुला कोणी बोलावले इथे?" समोरून आवाज आला.

"मी... ते.." भानू थरथरू लागला. तसाही वयाने होता तो लहानच.

"गुरूदेव, मी तुम्हाला म्हटलं होतं ना सकाळी." सकाळचा बैरागी पुढे येऊन सांगू लागला.

"लाखन, याची उम्र.." बोलता बोलता ते थांबले. त्या लाखनने भानूला खुणावले. त्याचा अर्थ समजून भानू पुढे झाला. त्याने त्या व्यक्तीचे पाय धरले.

"मला ही विद्या शिकायची आहे."

"कोणती विद्या?"

"तिच.. ज्याने मला लोकांच्या मनातले ओळखता येईल."

"त्याने काय होईल?"

"तो जो आवाज मला लहानपणापासून ऐकू येतो आहे, त्याची मी मदत करेन."

"तुला आवाज ऐकू येतो?"

"हो.. कोणीतरी क्षीण आवाजात मला बोलावत असते. पण मला कोणीच दिसत नाही." त्या व्यक्तीने लाखनकडे बघितले.

"ती जागा आपल्यासाठी खूप चांगली आहे गुरुदेव. मला त्यांचे अस्तित्व जाणवले. बहुतेक तेच याला बोलावत असावेत." लाखन म्हणाला.

"मग हा?"

"गुरूदेव, हासुद्धा आपल्या पंथात येऊ शकतो. त्याचा अभ्यास करून घेतला तर तो एक चांगला चेला होऊ शकेल." लाखन म्हणाला.

"हा म्हणतो आहे म्हणून मी तुला माझा शिष्य करतो आहे. पण.. तू जर धोका द्यायचा प्रयत्न केलास तर या कालकेयासारखं वाईट कोणी नसेल." कालकेय गरजला.

"हो गुरूदेव.." भानू परत पाया पडत म्हणाला.

"घे मग दीक्षा. ये पुढे." कालकेय गरजला. भानू उभा राहिला. समोर पेटलेल्या अग्नीकुंडापाशी तो गेला. कालकेय आपल्या जागेवरून उठला. आपलं थलथलीत शरीर सावरत तो चालू लागला. तो तिथे येताच लाखनने एक घुबड त्याच्या हातात ठेवले.

"तयार आहेस ना दीक्षा घेण्यास?" कालकेयाने परत विचारले.

"हो.." मनाचा हिय्या करत भानू म्हणाला. त्याचे शब्द ऐकताच कालकेयाने त्या घुबडाची मान पिरगळली. ते बघून भानूने डोळे गच्च मिटले. लाखनने ते रक्त कवटीमध्ये जमा केले. त्याचा टिळा भानूच्या कपाळी लावला. भानूच्या अंगावर काटा आला. भानूचे बंद डोळे बघून कालकेय हसला.

"आजच्यासाठी एवढेच बस.. नाहीतर पोरगं घाबरायचं. उद्यापासून रोज रात्री इथे यायचं. मी घेतो करून तुझी साधना." भानूच्या खांद्यावर हात ठेवत कालकेय म्हणाला. त्याने घरी जाण्याची दिलेली परवानगी बघून भानू तिथून धूम ठोकून पळू लागला. तो तिथून जो पळत सुटला ते घरी येऊनच थांबला. बिछान्यावर पडल्यानंतरही त्याची छाती धपापत होती. त्याने डोळे बंद केले पण ते घुबड अजूनही त्याच्या डोळ्यासमोर येत होतं.

"भानू.. ए भानू.. उठायचे नाही का तुला?" सई भानूला हलवत म्हणाली. उत्तर म्हणून तो फक्त कण्हला.

"अरे देवा.. तुला तर ताप भरला आहे." सई काळजीने म्हणाली.

"मैना, वैद्यबुवांना बोलावतेस का?" सईने मैनेला आवाज दिला.

"हो बाईसाहेब.." मैना वैद्यबुवांना बोलवायला गेली.

"या वैद्यबुवा.." मैनेचा आवाज ऐकताच सई उठली.

"बघा ना.. काल रात्री अपचन झालं आहे असं म्हणाला. आणि आज ताप भरला आहे." सई म्हणाली. वैद्यबुवांनी नाडीपरिक्षा केली.

"अपचन होण्यासारखे त्याने काही खाल्ले होते का?"

"नाही.."

"वाटलेच.. कारण लक्षणे तर काही तशी दिसत नाहीत. तापासाठी काही चाटण देतो. संध्याकाळपर्यंत ताप उतरला पाहिजे. नाही उतरला तर मला कळवा.प मी मात्रा बदलून देतो." वैद्य निघून जाताच सई मैनेकडे वळली.

"मैना, पटकन याच्यासाठी पेज बनवून आणतेस का?"

"आणते की? अजून काही हवं का?"

"नको.. सध्या तरी पेजच आण." सई परत भानूशेजारी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. तो अजूनही थरथरत होता. तिने त्याच्या अंगावरचे पांघरूण नीट केले. मैना पेज घेऊन आली. दोघींनी मिळून त्याला बसवले.

"भानू, थोडी पेज घे. म्हणजे हुशारी येईल." सई भानूला आग्रह करत होती. तो मात्र अजूनही शुद्धीच्या सीमारेषेवर होता. भरवता भरवता भानूचा हात लागून पेज सईच्या अंगावर सांडली.

"मैने, ही उरलेली पेज भरवशील याला? मी पटकन लुगडं बदलून येते." सईने विचारले. मनात असूनही मैना नकार देऊ शकली नाही. सई बाहेर गेली. अचानक भानू बडबडायला लागला. मैना घाबरली. भानूला ती त्याच्या जन्मापासून ओळखत होती. त्याची कसली तरी अनामिक भिती तिला वाटत असायची. आता त्याचं तापातलं बडबडणं बघून ती घाबरलीच. तिला तिथे एकटं थांबायची पण भिती वाटू लागली. तेवढ्यात सई साडी बदलून आली. तिला बघून मैनाने सुटकेचा श्वास सोडला. ती तिथून जायला निघाली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं.

"बाईसाहेब, जरा बाहेर येता का?" मैनेने सईला बाहेर बोलावले.

"जे आहे ते इथेच बोल की.."

"ऐका ना जरा गरिबाचं.." सईला मैनेचा आग्रह मोडता आला नाही. ती बाहेर आली.

"बोल.. काय झालं?"

"बाई.. मला हे काही साधं वाटत नाहीये. गेले काही दिवस तिथे दूर कोणी बैरागी आलेत अशी गावात कुजबुज आहे. आणि त्यात भानूबाळाचं हे असं? मला जरा वंगाळ वाटतंय." मैना म्हणाली.

"नको गं असं काही बोलूस. जीव घाबरा होतो बघ. एकतर आधीच इकडची स्वारी पुण्याला गेलेली. महादेवही मदतीला नाही. भाऊजी एकटे तरी कुठेकुठे बघणार?" सईला हुंदका फुटला.

"बाईसाहेब, मनात आलं म्हणून सांगितलं. काही चुकलं असेल तर क्षमा असावी." मैना हात जोडत म्हणाली.

"मैने, नको गं असा परकेपणा दाखवू. तुमच्याशिवाय इथे मला आहे तरी कोण? मी विचारते थांब भाऊजींना." सई म्हणाली. "तू बोलावतेस त्यांना?" दोघींचे बोलणे चालू असतानाच जोरजोरात आरडाओरड ऐकू येऊ लागला. काय झाले आहे हे बघण्यासाठी दोघी वाड्याच्या पाठच्या बाजूला गेल्या. तिथे आग लागली होती. गडीमाणसे ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. राजवर्धन स्वतः विहीरीतले पाणी शेंदून आगीवर ओतत होता. मैना आणि सई विस्फारलेल्या नजरेने हे बघत होत्या.

"अचानक कशी आग लागली?" यमुनेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. थोड्याच वेळात आग विझली. लगेचच समजल्यामुळे जास्त नुकसानही झाले नव्हते. थकलेले सगळे वाड्यात आले. सईला भानू आजारी असल्याची आठवण झाली. ती त्याच्याकडे धावली. वैद्यांच्या औषधाने गुण दाखवला होता. भानू उठून बसला होता.

"उठलास? कशाने बरं भरला एवढा ताप? आता काही दगदग करू नकोस. शांत पडून रहा." सई बोलत होती पण भानूवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. तो कुठेतरी शून्यात बघत होता.

"थांब.. मी अंगारा लावते." सईचे शब्द ऐकताच त्याच्या अंतर्मनातून अजून एक आवाज येऊ लागला, "आता यापुढे या देवांची सेवा बंद.."


भानू खरंच करेल का अघोरी विद्यांचा अभ्यास? चंद्रसेन थांबवू शकेल का हे सगळं? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all