वाड्यात येऊन जा.. भाग ५२
"रामा, पहारा करताना झोपू नकोस बरं का?" राजवर्धन झोपायला जायच्या आधी सांगायला आला.
"एवढा बी विश्वास नाय का शास्त्रीबुवा?" रामाने नाराजीने विचारले.
"असं नाही रे.. त्या तिथे कोणी बैरागी आले आहेत म्हणे. तर हिची भुणभुण सुरू झाली. म्हणून तुला सांगितले एवढेच. तसाही बैराग्यांचा काही भरोसा नाही बघ. मी तर म्हणतो तुला कोणी जोडीदार हवं तर बोलावून घे."
"चेष्टा करताय का गरीबाची? मी एकटा दहाजणांना भारी आहे." फुशारकी मारत रामा म्हणाला.
"बरं.. बरं.. मी जातो आता झोपायला. तुझे चालू देत." राजवर्धन हसत म्हणाला. रामा आपली गस्त घालू लागला. लाखन हे सगळं ऐकत होता. भानू येईल की नाही हे बघायची जबाबदारी कालकेयाने त्याच्यावर टाकली होती. काल जे झालं त्याने भानू घाबरला असणार हा अंदाज त्या दोघांनाही होता. हाती आलेला भानूसारखा मोहरा त्यांना वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे सकाळपासूनच लाखन वाड्याच्या पाळतीवर होता. भानू बेशुद्ध आहे हे बघून त्यानेच वाड्याच्या पाठच्या बाजूला आग लावली होती. सगळे आग विझवायला गेले आहेत हे बघून तो भानूच्या खोलीत आला. त्याला कसलेसे चाटण चाटवले आणि बाहेर पडला. भानू शुद्धीवर आला हे बघून तो थोडा निर्धास्त झाला. त्यानंतर सईने भानूला अंगारा लावू नये म्हणून लाखनच भानूच्या कानात पुटपुटला. भानूने अंगारा लावून घेतला नाही हे पाहून लाखनला बरे वाटले. भानू बरा आहे हे बघून तो परत आपल्या झोपडीत परतला होता.
"तो लडका बरा आहे?" लाखन झोपडीत येताच कालकेयाने विचारले.
"हो गुरूदेव. त्याची आई त्याला अंगारा चाटवत होती. मी त्याला नको सांगताच त्याने ते ऐकले." लाखन अभिमानाने म्हणाला.
"मग तो आज परत इथे येईल?"
"मी घेऊन येईन गुरूदेव."
"तू ज्या जागेबाबत एवढा विश्वास दाखवतो आहेस, ती जागा बघण्याची मलाही आता उत्सुकता लागली आहे." कालकेय म्हणाला.
"गुरूदेव, मग आज रात्रीच जायचे का?"
"तो लडका नाही आला तर त्याला आणायला जाऊ. कारण ती जर जागा आपल्यासाठी चांगली असेल तर मग एका कालकेयाची जी इच्छा असते ती पूर्ण होईल."
"गुरूदेव, मला कल्पना आहे. म्हणूनच तर या जागेबद्दल मला जसे समजले तसे मी तुम्हाला इथे येण्यासाठी आग्रह केला. आणि बघा.. इथे येताच मला तो मुलगा दिसला. यावेळेस आपली इच्छा पूर्ण होणारच."
"लाखन, तसे झाले तर मी तुला भैरव केलेच म्हणून समज." आपल्या अघोरी शक्तींवर विश्वास असलेला कालकेय त्याला म्हणाला.
"भैरव??"
"हो.. आपल्या पंथातले एक अत्युच्च स्थान मी तुला दिलेच म्हणून समज. फक्त.. फक्त ती जागा मला हवी तशी हवी."
दोघांचं ठरल्याप्रमाणे कालकेयदेखील लाखनसोबत वाड्यावर जाणार होता. पण तो बाहेर पडणार तोच त्याचा पाय मुरगळला. इच्छा असूनही तो वाडा बघायला जाऊ शकत नव्हता. लाखन एकटाच आता तिथे लक्ष ठेवून होता. त्याला आत जाऊन भानू काय करतो आहे ते बघायचे होते. रामा गस्त घालता घालता जसा पुढे गेला तसा झाडात लपलेला लाखन पुढे झाला. आजूबाजूला कोणी दिसत नाही हे बघून त्याने वाड्यात प्रवेश केला. भानूचे दालन कोणते हे त्याला सकाळीच समजले होते. घाईघाईतच तो दालनात आला. नशीबाने तिथे सई किंवा अजून कोणी नव्हते. पलंगावर झोपलेल्या भानूला त्याने हलवले.
दोघांचं ठरल्याप्रमाणे कालकेयदेखील लाखनसोबत वाड्यावर जाणार होता. पण तो बाहेर पडणार तोच त्याचा पाय मुरगळला. इच्छा असूनही तो वाडा बघायला जाऊ शकत नव्हता. लाखन एकटाच आता तिथे लक्ष ठेवून होता. त्याला आत जाऊन भानू काय करतो आहे ते बघायचे होते. रामा गस्त घालता घालता जसा पुढे गेला तसा झाडात लपलेला लाखन पुढे झाला. आजूबाजूला कोणी दिसत नाही हे बघून त्याने वाड्यात प्रवेश केला. भानूचे दालन कोणते हे त्याला सकाळीच समजले होते. घाईघाईतच तो दालनात आला. नशीबाने तिथे सई किंवा अजून कोणी नव्हते. पलंगावर झोपलेल्या भानूला त्याने हलवले.
"तुम्ही?" दचकलेल्या भानूने त्याला विचारले.
"तुला सांगितलं होतं ना, आज यायला? तू आला नाहीस म्हणून तुला घ्यायला आलो."
"मी.. मी आजारी होतो." भानू म्हणाला.
"ऊनपाऊस, थंडीवारा या कशाचीही पर्वा न करता साधना केली तरच ती फलते. असे जिवाचे चोचले पुरवत राहिलास तर कशी मिळणार सिद्धी?" लाखन बोलत होता.
"मी वाड्याबाहेर पडलेलो माझ्या आईला समजले तर?" काल शूर झालेला भानू आज परत कच खात होता.
"असं असेल तर मग आम्हीच वाड्यात येतो." लाखन म्हणाला.
"नको.. आमच्या तीर्थरूपांना समजलं तर.." चंद्रसेनाचे नाव काढताच भानूला धडकी भरली होती.
"कालचे वचन विसरलास? तू नाही आलास तर गुरूदेव तुझं काय करतील ते समजणारही नाही. यातून मग मृत्यूनंतरही तुझी सुटका होणार नाही." लाखनचे बोल ऐकताच भानू शहारला.
"बाहेर जाताना कोणी बघितलं तर?" भानूने विचारले.
"काल कोणी बघितलं? तुला यायचं नसेल तर तसं सांग.." लाखन चिडून म्हणाला.
"येतो मी.." मान खाली घालून भानू म्हणाला.
"आपण लवकरच तुझ्या दालनापासून बाहेरपर्यंत एक भुयार खणूयात. म्हणजे तुला लपवाछपवी करायची गरज लागणार नाही."
लाखन, भानूला घेऊन निघाला. त्याने बाहेर बघितले. दिसत कोणीच नव्हते. तरीही दक्षता राखण्यासाठी त्याने राख फुंकली. दोघेही पटापट तिथून निघाले. कालकेय अस्वस्थ होऊन तिथे त्याची वाट बघतच होता. लाखन येईपर्यंत त्याने स्वतःच वनस्पतींचा लेप स्वतःच्या पायावर लावून घेतला होता. पायाची सूज उतरताच तो झोपडीत फेऱ्या घालत होता. त्याचे जणू एक स्वप्न पूर्ण होणार होते. गेले कित्येक वर्ष तो एक साधना करत होता. आणि जर ही जागा त्याला हवी तशी असेल तर त्या शक्तींना आपल्या अंकित करून तो सर्व शक्तीशाली होऊ शकणार होता. ञ दुरून येताना बघून कालकेय हवन कुंडापाशी येऊन बसला.
"आलास.. आता वेळ न दवडता समोर बस. जेवढ्या लवकर तुझी साधना पूर्ण होईल तेवढं तुलाच बरं." कालकेय म्हणाला. भानू घाबरतच तिथे बसला. कालकेयाने आपले ध्यान लावले. त्याचा जप पूर्ण होईपर्यंत लाखनने भानूला पेय दिले. ते पिताच भानूने त्या दोघांच्या आज्ञेनुसार वागायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या साधनेला सुरुवात झाली.
"रामा, ए रामा.. निजलास की काय?" राजवर्धनने आवाज दिला.
"नाही शास्त्रीबुवा.. पण कळंना.. हे डोकं नुसतं जडजड झालंय." रामा डोकं धरून म्हणाला.
"म्हणून म्हटलं होतं की सोबतीला कोणाला तरी घे."
"शास्त्रीबुवा, या वाड्यात यायची कोणाचीतरी हिंमत आहे का? आधी या जागेची असलेली भिती आणि त्यावर मालकांबद्दल असलेलं प्रेम."
"तसं नाही रामा.. आज इतक्या वर्षांनंतरही हा भाग अजून म्हणावा तेवढा गजबजला नाही. वाड्यात मुलंबाळं असतात. इकडच्या माणसाला माहित आहे. पण इतर कोणाचा काय भरोसा द्यायचा?"
"ते बी हाय शास्त्रीबुवा. आज रातीपासून ध्यानात ठेवतो." रामा म्हणाला.
"ठेव.. येतो मी.. अजून पूजाअर्चा राहिली आहे." लगबगीने राजवर्धन वाड्यात गेला. आज त्याला काही वेगळ्याच लहरी जाणवत होत्या. त्याला गोविंद भटांची प्रकर्षाने आठवण झाली. या वेगळ्या भावनेसाठी त्याला गोविंद भटांनी शिकवलेल्या काही साधना करून बघाव्याश्या वाटत होत्या. 'ही साधना क्षुल्लक गोष्टींसाठी वापरू नकोस. त्याची शक्ती कमी होते.' हे गोविंद भटांचे शब्द कानात घुमत होते. त्याने मग मनातल्या भावनेला दूर केले आणि पूजेला सुरुवात केली.
"भाऊजी..थोडं बोलायचे होते." पूजा संपताच बोलण्यासाठी म्हणून सई पुढे झाली.
"बोला बाईसाहेब.."
"हे हो काय भाऊजी? मी काहीतरी गंभीर बोलायला आले आणि तुम्हाला चेष्टा सुचते आहे?"
"मी काय चेष्टा केली?"
"हे बाईसाहेब वगैरे?"
"तुम्ही आहातच या वाड्याच्या बाईसाहेब. नाहीतर काय सई म्हणून बोलावू?"
"तुम्ही ना ऐकणारच नाही. जातेच कशी मी.."
"अगं ए चिमणे.. बोल.. काय झालं?" राजवर्धनने हाक मारताच सई हसली.
"आता कसं? बरं.. भाऊजी, इकडच्या स्वारीचे घरात लक्ष नसतेच. पण तुम्ही तरी द्यायचे ना.."
"आता मी कुठे लक्ष दिले नाही?"
"हे काय.. भानूचे आता चौदावे वरीस सरेल तरी त्याच्या विवाहाचा विषय कोणी काढत नाही. सईने बोलून घेतले.
"मी बोलू का सरकारांशी?"
"बोलू नका. सरळ स्थळं शोधा. भानू पाठोपाठ राघवही आहेच की." सई म्हणाली. "पत्रिका जुळल्या की घालू यांच्या कानावर. पण तोपर्यंत तुम्ही मुली शोधायला तर लागा."
अघोरी वाटेवर चालू पाहणारा भानू करेल का लग्न? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा
भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई