वाड्यात येऊन जा.. भाग ५४

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ५४


"हे काय?? तुम्ही परत चाललात सुद्धा? अहो अजून सूनबाईंचे देखील पाचपरतावण झाले नाही. तिच्या माहेरची मंडळी येतंच असतील." मोहिमेवर जायची तयारी करत असलेल्या चंद्रसेनला सई विनवत होती.

"सई, काय हा वेडेपणा चालला आहे? आम्ही आज का मोहिमेवर चाललो आहोत?" चंद्रसेन सईला समजावत होता.

"मी कुठे नाही म्हणते आहे. पण काही दिवस अजून थांबा ना.."

"सई, आम्ही आधीच मोहिम अर्धी टाकून आलो आहोत. सैन्य पुढे गेले सुद्धा. भानूचे लग्न म्हणून आम्ही वाकडी वाट करुन आलो. आता गेलेच पाहिजे."

"मला भिती वाटते आहे." सई चंद्रसेनाला बिलगली.

"भिती? आणि ती ही आमच्या पत्नीला? ही तर नामुष्कीची गोष्ट आहे."

"तुम्हाला चेष्टा वाटते आहे तर करा बापडीची. पण असं वाटतंय.. जणू मला तुमच्यापासून कोणीतरी दूर घेऊन जाणार आहे."

"कोणाची हिम्मत आहे, तुला आमच्यापासून दूर घेऊन जाण्याची? अगदी मृत्युनेदेखील तुला आमच्यापासून दूर केले ना.. तर तिथेही तुला परत मिळवू." चंद्रसेन सईचा चेहरा वर करत म्हणाला.

"हे असं शब्दात गुंतवणं स्वारींना छान जमतं." डोळे पुसत सई म्हणाली.

"आम्ही तरी शब्दात गुंतवतो. तुम्ही तर आमचा जीव गुंतवून धरला आहे. त्याचे काय?"

"काहीही असते तुमचे. आणि अजून एक.. इथून निघाल्यावर मला आठवड्याला किमान एकतरी खलिता पाठवायचा."

"आठवड्याला? आम्ही एक पलटण तयार ठेवतो फक्त यासाठी." चंद्रसेन हसत म्हणाला.

चंद्रसेन महादेवला घेऊन परत मोहिमेवर गेला. भानूची पत्नी गोदाही लगेचच माहेरी गेली. भरलेलं लग्नघर अचानक रिकामे झाले. लग्नाच्या दगदगीने आणि मानसिक त्रासाने सई आजारी पडली. राजवर्धन, राघव आणि यमुना तिच्या सेवेत गुंतले. त्याचा फायदा घेऊन भानूने परत त्याची साधना सुरू केली.

"गुरूदेव, एक शंका होती." भानूने विचारले.

"विचार.."

"मला त्यादिवशी परत आवाज ऐकू आला."

"मग.."

"यावेळेस पहिल्यांदाच मला स्पष्ट शब्द ऐकू आले." इतका वेळ भानू उगाचच बडबडतो आहे, हे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कालकेयाने त्याच्याकडे बघितले.

"काय होते ते शब्द?"

"त्याला एकतरी बळी हवा आहे."

"काय?" कालकेय उठून उभा राहिला. ते बघून लाखन आणि भानूदेखील सटपटत उभे राहिले.

"हो.. तो बळी मागतो आहे. माझा गृहप्रवेश झाला आणि मला तो आवाज स्पष्ट ऐकू आला. आता तर तो आवाज सतत बळीची मागणी करतो आहे."

"याचा अर्थ ती शक्ती जागृत आहे." कालकेयाला आनंद झाला होता.

"म्हणजे?" भानूने विचारले.

"याचा अर्थ तुझी साधना लवकर पूर्ण झाली पाहिजे. ती होताच त्या शक्तीच्या जोरावर तुला तुझं राज्य मिळेल. सत्ता आणि संपत्ती तुझ्या हातात येतील." कालकेय म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून भानू तिथून निघाला. तो गेला याची खात्री पटताच लाखनने आपल्या मनातल्या गोष्टी विचारायला सुरुवात केली.

"गुरूदेव, जर ती शक्ती जागृत आहे तर मग या भानूची साधना पूर्ण होईपर्यंत का थांबायचे? त्याचाच बळी देऊ आणि त्या शक्तीवर ताबा मिळवू." लाखन उत्साहित झाला होता.

"बळी तर मला हवा आहे.. पण त्याचा नाही. त्याच्या बापाचा. तो वास्तुप्रमुख आहे. त्याचा बळी दिल्यावर ती शक्ती लवकरच आपल्या अंकित होईल. आणि जर कोणी काही बोट उचललं तर ते त्या मूर्ख भानूवर ढकलता येईल. सध्यातरी त्याच्या जगण्याचा आपल्याला तोच उपयोग आहे." कालकेय क्रूर हसत म्हणाला. इकडे भानूही वाड्याच्या दिशेने परत निघाला होता. त्याच्याही डोक्यात अनेक विचार होते. त्यातला सगळ्यात प्रबळ होता तो कालकेयाचा. त्याने त्याला गुरू जरी मानले होते तरी भानूचा त्याच्यावर विश्वास नव्हता. त्याला आता फक्त ती साधना शिकून घ्यायची होती. एकदा ती शिकून झाली की त्यानंतर तो सगळ्यांना आपल्या अंकित करून घेणार होता. दिवस जात होते. सई आजारपणातून बरी झाली होती. तिने परत कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली होती. तेवढ्यात गोदाच्या माहेराहून तिला न्हाण आल्याची बातमी आली.

"ताई, ऐकलीस का गं ही बातमी?" सई यमुनेकडे गेली होती.

"बरं आहे बाई.. तुला मुका नातू वेळेत झाला म्हणून. नाहीतर आमच्याकडे.. पंधरावं उलटून गेलं तरी न्हाण आलं नाही सूनबाईंना." यमुना तणतणली.

"या गोष्टी का आपल्या हातात असतात?येईल हो तिलाही न्हाण. मी विचारणार होते की फलशोभनाचा कार्यक्रम लगेच करायला हवा ना?"

"हो.. बोलावून घे तिला. फलशोभन झाले की मग गर्धाधानाचा मुहुर्त पण बघितला पाहिजे." आपलं दुःख विसरून यमुना उत्साहाने बोलू लागली. दोघीही मग आहेराच्या याद्या करण्यात गुंतल्या. भानू मात्र अस्वस्थ होऊन स्वतःच्या दालनात फेऱ्या मारत होता. त्याच्या कानावरही गोदाची बातमी आली होती. ती लवकरच इथे येणार हे तर नक्की झाले होते. ती आल्यावर आपली साधना चालू कशी ठेवणार याच गोष्टीची त्याला चिंता वाटू लागली होती. ती आल्यावर आपण बाहेर पडलेले तिने जर घरी सांगितले तर गहजब होणार हे नक्की. साधना तर थांबवता येणार नाही. मग? पुढे काय? विचारांनी भणभणलेल्या डोक्याला त्याला शांत करायचे होते. त्याने दालनाचा दरवाजा लावून घेतला. तिकडचा चोरकप्पा उघडला. लाखनने दिलेली मद्याची सुरई त्यात त्याने लपवून ठेवली होती. त्याने ती उघडली आणि त्याचा घोट घेऊन परत आत ठेवून दिली. मद्याचा एक घोट घेताच त्याची बुद्धी वेगाने काम करायला लागली. आता त्याला गोदा येण्याची अजिबात भिती वाटत नव्हती.

पुन्हा एकदा वाडा नव्याने सजला. सूनबाईंच्या स्वागतासाठी. सईने आणि यमुनाने गावातल्या स्त्रियांना आवर्जून बोलावले. दिवाणखान्यात बायकांचा गोंधळ सुरू होता. हे सगळं ऐकत भानू खिडकीत उभा होता. सजलेली गोदा मधोमध बसली होती. एका बाजूला आलेल्या आहेराचा ढिग लागला होता. दुसरीकडे सई आणि यमुना कोणाला काय हवे नको ते जातीने बघत होत्या. भानूची नजर गोदावर पडली. तिचे रूप उजळले होते. भानू क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला.

"मला इथून मुक्त केलेस तर अश्या कितीतरी गोदा आणून तुझ्यासमोर उभ्या करेन." तो आवाज परत भानूच्या कानात गुणगुणला. भानूने चमकून मागे वळून बघितले. आजूबाजूला कोणीच नव्हते. तो तसाच बाहेर आला. समोरच चंद्रसेनाची हसरी तस्वीर दिसत होती. भानूने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. त्याला खरेतर आता कालकेयाकडे जावेसे वाटत होते. पण आता दिवसाउजेडी जाण्यात थोडा धोका पण होता. तो परत आपल्या दालनात गेला. आणि हळूहळू त्याच्या डोळ्यासमोर एक चित्र दिसू लागले. जिथे तिथे आग लागली होती. सगळेजण ती भयानक आग विझवायचा प्रयत्न करत होते. मात्र ती आग विझण्याऐवजी जोमाने पेट घेत होती. त्या गढीत कोणीतरी होते बहुतेक. ते जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोणीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेले. इतकावेळ जीवाला घाबरून ओरडणाऱ्या त्यांना आपले भवितव्य समजून चुकले होते. ते कोणामुळे झाले, हे ही समजले होते. आता मात्र त्यांनी शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. तोच जळत्या लाकडाचा एक भाग त्या व्यक्तीच्या अंगावर पडला. तो काहीतरी बोलू पहात होता.. पण तोवर त्याचा प्राण निघून गेला होता.

"दादा.." अचानक आलेल्या हाकेने भानू दचकला. त्याने बघितले तर राघव त्याला हलवत होता.

"काय रे.. काय झाले?"

"मातोश्रींने बोलावले आहे तुला. कधीचा बोलावत होतो तुला. तू काहीतरी बडबडत होतास. तू ध्यान करत होतास का? काकांनी तुला शिकवले का?" राघवचे प्रश्न संपत नव्हते.

"मातोश्रींने कशासाठी बोलावले आहे.. ते बघू." भानू राघवचे प्रश्न बंद करण्यासाठी म्हणाला. दोघेही सईकडे जायला निघाले. भानूच्या डोक्यात आता एकच विचार होता.. आज जे दिसले ते नक्की काय होते? तो शिव्या देणारा व्यक्ती कोण होता? आणि कोणाला बघून तो शिव्या देत होता? हेच आहे का, या वाड्यातले भूत?


भानू आणि कालकेय.. दोघेही एकाच बाजूला असूनही विरूद्ध टोकाला आहेत. नक्की कोण जिंकेल त्यांच्या या लढाईत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all