वाड्यात येऊन जा... भाग ५५

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ५५


"मला बोलावले का मातोश्री?" सईला नमस्कार करत भानूने विचारले.

"हो.. थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं." राघवला बाहेर जायची खूण करत सई म्हणाली.

"बोला ना." भानूचे बोलणे ऐकून सई अडखळली. खरंतर हा तिचा मोठा लेक. पण पहिल्यापासून त्याचे आणि तिचे धागे कधी जुळलेच नाहीत. दिसायला तो थोराड होताच, वागणेही रूक्षच होते. त्याला बघितले की एक अनामिक भिती तिच्या मनात दाटून यायची. आज मात्र तिला त्याच्याशी बोलणे भागच होते.

"मातोश्री.." भानूने घसा खाकरला.

"अं हो.." सईने बोलायला शब्द जुळवले. "खरंतर वडिलांनीच हा विषय मुलाशी बोलायचा असतो. हे मोहिमेवर आहेत म्हणून मला बोलावे लागत आहे."

"मी ऐकतो आहे.."

"भाऊजींनी गर्भाधानाचा मुहुर्त काढला आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे.. गोदा लहान आहे. त्यामुळे जरा जपून. ती घाबरणार नाही याची काळजी घ्या."
सई असं काही बोलेल याची अपेक्षा नसलेला भानू थोडा लाजला.

"मी लक्षात ठेवेन.. येऊ का मी?" भानूने विचारले. सईने परवानगी देताच भानू आपल्या दालनात आला. त्याचे मन अजूनही गोदाभोवतीच रेंगाळत होते. तारुण्यसुलभ भावनांची गर्दी त्याच्या मनात होत होती. ती गर्दी होत असतानाच तिला ताब्यात कसे ठेवायचे हा विचार प्रबळ होऊ लागला होता.

"काय झाले? एवढे का अस्वस्थ आहात?" यमुनेने राजवर्धनला विचारले.

"दादांचा निरोप आला आहे."

"मग? घरी सगळे कुशल ना? म्हणजे मामंजी, सासूबाई?"

"नाही.. आबांना बरे नाही. म्हणूनच सांगावा धाडला आहे." राजवर्धन चिंतेत होता.

"अरे देवा.. मग इथून जाणे होणार आहे का?"

"नाही.. मला इथून हलता येणार नाही. आचार्य येईपर्यंत मला इथे थांबणे भाग आहे."

"अहो पण मामंजी?"

"तू मुलांना घेऊन जा हवे तर."

"आचार्य येत नाहीत तोपर्यंत तुम्ही इथून जाणारच नाही असे आहे का?"

"तसे समज हवं तर.."

"अहो.."

"तू निघायची तयारी कर. आणि परत यायच्या आधी सांगावा नक्की धाड." राजवर्धन बोलून ध्यानाला बसला.

"सई, मी येऊ ना जाऊन?" मुदपाकखान्यात यमुना सईशी बोलत होती.

"ताई, काय बोलू? तुझाच तर आधार आहे मला इथे. तू ही गेलीस तर मी एकटीने हा गाडा कसा गं खेचणार?" सईच्या डोळ्यात पाणी आले.

"मी तरी काय करू? इतक्या वर्षात पहिल्यांदा सासरहून बोलावणं आलं आहे. मामंजी आजारी आहेत म्हटल्यावर गेलंच पाहिजे. यांना पण चला म्हटलं होतं. पण हे ऐकतील तर ना. असो.. त्यांची तरी तुला सोबत होईल." यमुना म्हणाली.

"भाऊजी आहेत म्हणून तर हे सुद्धा निश्चिंत मोहिमा करू शकतात. नाहीतर कसे शक्य होते."

"ते आमचं कर्तव्यच आहे. आणि मुहुर्तावर विधी करून घे हो. ज्या त्या वेळी गोष्टी झालेल्या बर्‍या."

"हो ताई.."

दोनेक दिवसातच यमुना लेकीसुनेला घेऊन सासरी गेली. चंद्रसेन नसल्यामुळे वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ तशीही कमी झाली होती. आता यमुना गेल्यावर सईला खूपच एकटं वाटू लागलं. गोदा तशी लहान असल्यामुळे तिच्यावर कोणतीच जबाबदारी टाकता येत नव्हती. थोडंफार आलंगेलं, स्वयंपाकपाणी हे बघण्यातच तिचा वेळ जाई. राजवर्धनही सतत राघवला काय काय शिकवत होता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे भानू एकटा पडला होता. इतरांची नजर चुकवून तो कधीही बाहेर पडायचा. कालकेयसुद्धा भानूची साधना पूर्ण करून घेण्याच्या मागे होता.

"भानू, तुझ्या पिताजींचा काही खलिता वगैरे काही येतो की नाही?" एक दिवस अचानक कालकेयाने विचारले.

"पिताजी? हो.. येतो ना.. रोजच खलिता येतो. का? काही काम होतं का?" भानूने विचारले.

"तुझी साधना पूर्ण करून घेतोच आहोत आपण. ती पूर्ण करून घेण्यासाठी काही विधींची गरज असते. ते करण्यासाठी तुला इथे पूर्ण दिवस थांबावे लागेल. तुझ्या वडिलांना संशय येऊ नये म्हणून विचारले ते कधी येणार?" कालकेयाच्या बोलण्याचे भानूला आश्चर्य वाटले. तो इतके दिवस येत असताना त्याने कधीच चंद्रसेनाचा विषय काढला नव्हता.

"कधी थांबावे लागेल?" भानूने विचारले.

"बघतो.. कधीचा मुहुर्त आहे ते."

"मुहुर्त? या गोष्टींना?"

"हो.. जसे तुम्ही पाडवा, दसरा शुभ मुहुर्त म्हणता तसेच इथे देखील मुहुर्त असतात. म्हणूनच तर विचारले, सरदार कधी येणार ते." लाखनने सांगितले.

"आत्ताच तर मोहिम सुरू झाली आहे. थोडा वेळ तर लागेलच."

"ते कधी येणार याची बातमी तुला समजल्या समजल्या मला दे. म्हणजे पुढची व्यवस्था करता येईल." लाखन परत म्हणाला. भानू तिथून निघाला. लाखन आणि कालकेयाने केलेली चंद्रसेनाची चौकशी त्याला कुठेतरी पटली नव्हती. ते खरंच आपल्याला मदत करणार का? हा विचार त्याच्या मनात पिंगा घालू लागला. विचारांच्या धुंदीतच तो घरी आला. घरी गडबड सुरू होती.

"आज एवढी गडबड का?" भानूने राघवला विचारले.

"मला काय माहीत? मला कोणी काही सांगतच नाही. पण वहिनींचे मात्र तिथे लाड चालले आहेत. गावातल्या बायका बोलावून त्यांना न्हाऊमाखू काय घातलं, गाणी काय म्हणतात आणि खूप काही चालू आहे. तू कुठे गेला होतास?"

"मी अशीच घोड्यावरून रपेट मारायला गेलो होतो." भानू पटकन बोलून गेला.

"घोड्यावरून? पण सगळे घोडे तर तबेल्यातच आहेत. मग तू?"

"मी माझ्या घोड्यावरून गेलो होतो." राघव भानूकडे संशयाच्या नजरेने बघू लागला होता. भानूच्या वागण्याची कुजबुज वाड्यात चालली होतीच त्यात हे खोटं. कारण राघव नुकताच तबेल्यातून घोड्यांना चंदी देऊन आला होता. सगळे घोडे तबेल्यातच होते. भानू सरळ सरळ खोटं बोलत होता. पण तो त्याला काहीच बोलू शकत नव्हता. भानूच्या सुदैवाने मैना त्याला तिथे शोधतच आली.

"अरे, कुठे गेला होता? बाईसाहेब कधीच्या बोलावत होत्या."

"आलोच.." भानू मैनाच्या पाठी चालू लागला. जाताना राघवकडे एक कटाक्ष टाकायला तो विसरला नाही. भानू तिथून जाताच राघव राजवर्धनकडे गेला.

"काका.."

"अरे तू? परत? काही विसरलास का?" राजवर्धनने विचारले.

"विसरलो नाही.. पण.." राघव बोलता बोलता थांबला.

"काय केले भानूने?" राजवर्धनचा चेहरा बदलला होता.

"तुम्हाला कसे समजले, मी त्याच्याबद्दल बोलायला आलो ते?"

"त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार? सांग काय झालं ते?"

"दादा, आता बाहेरून आला. मी कुठे गेला होता म्हणून विचारले तर म्हणे घोड्यावरून रपेट मारायला गेला होता. आणि सगळे घोडे तबेल्यातून बाहेर गेलेच नव्हते." राघवने सांगितले.

"राघव, मलाही त्याचे वागणे संशयास्पद वाटते. तो अधूनमधून कुठे जातो ते अजूनही मला समजले नाही. त्याच्या पाठी जास्त कोणाला लावू पण शकत नाही."

"बाहेर जाण्यात काही वाईट आहे का?"

"बाहेर जाणं वाईट नाही पण कोणालाही न सांगता जाणं नक्कीच चुकीचे आहे." राजवर्धन म्हणाला. "आता या क्षणी मला आचार्यांची जास्त उणीव भासते आहे. ते असते तर सगळ्या गोष्टी चुटकीसरशी सोडवल्या असत्या." राजवर्धन म्हणाला.

"भानू.. कुठे गेला होतास? तुला सांगितले होते ना आज सोहळा आहे म्हणून?" सई चिडून विचारत होती.

"ते मी.."

"मी.. मी.. काही बोलू नकोस. जा.. स्नान करून घे आणि कपडे बदलून ये."

भानू स्नान करून परत देवघरात आला. तिथे सुवासिनी गोदाची ओटी भरायला जमल्या होत्या. सर्व विधी झाल्यावर गोदा आणि भानूला त्यांच्या दालनात पाठवले गेले. सईने ते दालन सजवून घेतले होते. लाजलेली गोदा तशीच उभी राहिली. भानूने दरवाजा लावून घेतला. ते बघून तिने मान खाली घातली. भानू सरळ तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.

"आपल्या कुटुंबात लिंगपूजेचा रिवाज आहे. तिथे साहित्य ठेवले आहे. सुरू कर.." ते ऐकून लाजेने गुलाबी झालेल्या गोदाच्या चेहर्‍यावरचे रंग उडाले. ती भितीने भानूकडे बघू लागली. "माहिती आहे ना, पूजा कशी करायची ते?"
गोदाने रडतच नकारार्थी मान हलवली.

"मी शिकवतो." भानू पुढे होत म्हणाला.. तसे गोदाने आपले डोळे घट्ट बंद करून घेतले.


का एवढं वाईट वागला असेल भानू गोदाशी? गोविंद भट येतील का लवकर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all