वाड्यात येऊन जा.. भाग ६८
"स्पृहा, अजूनही विचार कर. तू टॉपला जाशील. तुझ्यात जन्मजात कौशल्य आहे ते." कार्तिक स्पृहाला समजावत होता.
"माझ्या दादाला नाही आवडणार मी सिरियलमध्ये काम केलेले." स्पृहा डोळे पुसत म्हणाली.
"हे चुकीचं आहे ना? त्याला आवडत नाही म्हणून तू तुझ्या आवडीची गोष्ट करायची नाही, याला काय अर्थ आहे?"
"त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे."
"ते तुला आयुष्यभर पुरणार आहे का? उद्या त्याचं लग्न होईल. मग तुझं आणि त्याचं आयुष्य वेगळं होणारच ना? मग थोडं आधी झालं तर काय फरक पडतो?" कार्तिक समजावत होता.
"तरीही नाही."
"हे बघ.. तुला जॉब करून मिळणार नाहीत एवढे पैसे इथून मिळतील. आणि एकदा पैसे मिळू लागले की आई, दादा तुला काहीच बोलणार नाहीत." कार्तिक म्हणाला.
"खरंच असं होऊ शकतं?" स्पृहाने वेड्या आशेने विचारले.
"का नाही? पैसा हा सगळ्यात सामर्थ्यवान असतो. पैसा असला की सगळे गुन्हे माफ असतात. तू बघ.. आधी तुझा दादा चिडेल. पण एकदा तुला यश मिळालं की हे सगळं विसरून परत तुझ्याशी बोलायला येईल."
"दादा, तसा नाहीये." नाक ओढत स्पृहा म्हणाली.
"तो कसा आहे हे बघण्यासाठी आपण तुझ्या करिअरची रिस्क नाही ना घेऊ शकत. हे बघ.. हे माझं ड्रिम प्रोजेक्ट आहे. म्हणूनच मी तुला एवढा आग्रह करतो आहे." बोलता बोलता कार्तिकचा मोबाईल वाजला. त्याने आलेला मेसेज बघितला. "हे बघ.." कार्तिकने मोबाईल स्पृहाकडे दिला. त्याचा एवढा महागडा मोबाईल हातात घेताना सुद्धा तिचा हात थरथरत होता. तिने तो जे बघायला सांगत होता त्यावर क्लिक केलं. मगाशी तिने स्टेजवर केलेल्या पॅचचे रेकॉर्डिंग होतं ते. ती बघतच राहिली. अतिशय सुरेख सादरीकरण होते ते. त्या कपड्यांमध्ये तिचं रूपही खुलून दिसत होतं.
"बघितलंस? उगाच नव्हतो म्हणत, तू टेस्ट दे. आता तूच ठरव भूमिकेला न्याय द्यायचा की तुझ्या दादाला?" कार्तिकने बॉल तिच्याकडे ढकलला. स्पृहाच्या मनाची चलबिचल चालली होती.
"दादाला समजलं तर तो मला घराबाहेर नाही पडू देणार."
"मग नको समजू देऊस. आपण कॉन्ट्रॅक्ट करू. तू शूटिंग सुरू कर. हळूहळू त्यांच्या मनाची तयारी कर. आणि मग सिरियलचे प्रोमो जेव्हा येतील तेव्हा सांग तू त्यांना." कार्तिकने स्पृहाला समजावले.
स्पृहाचे शूटिंग सुरू झाले. सकाळी कॉलेजला म्हणून जी ती निघायची ती थेट संध्याकाळी घरी पोहोचायची. उशीर का होतो याचे कारण तिच्याकडे तयार होते. जास्तीचा अभ्यास. त्यामुळे घरातून कोणी तिला काहीच बोलत नव्हते. विराज तर बिचारा स्पृहाने आपले ऐकून सिरियलचा नाद सोडला या भावनेने सतत तिच्या मनाप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. पायलट भाग शूट होत होते. स्पृहामध्ये एक कसलेली अभिनेत्री होती. तिच्यावर जास्त कष्ट न घेताच ती दिग्दर्शकाला हवे तसे काम करत होती. त्यामुळे अख्खी टिम तिच्यावर खुश होती. तिची मात्र भिती दिवसागणिक वाढत होती. प्रोमो दाखवायची तारीख जवळ येत होती. घरात तिने परत हा विषयच काढला नव्हता. त्यामुळे त्यांचं मन वळवणे वगैरे प्रकार शक्यच नव्हते.
"काकू, सांगितलं नाहीत तुम्ही कधी?" चाळीतल्या बायका स्पृहाच्या घरी जमल्या होत्या.
"काय नाही सांगितलं?" बिचार्या आईला काहीच माहित नव्हतं.
"हेच की स्पृहा टिव्हीवर काम करते ते. भरपूर पैसे मिळाले म्हणून की काय?"
"कोणी सांगितलं तुम्हाला ती टिव्हीवर काम करते म्हणून?" आईने चिडून विचारले.
"म्हणजे? तुम्हाला माहितच नाही का? अरे देवा !! सगळ्या शहरभर पोस्टर्स लागले आहेत. मगाशी टिव्हीवर जाहिरात पण आली. आणि तुम्ही म्हणा, कोणी सांगितलं?" एकजण म्हणाली.
"पण ती स्पृहा आहे, हे कशावरून?"
"आता लहानपणापासून बघतो की तिला. आम्ही काय ओळखत नाही की काय?"
"ती आली की सांगा मात्र.. फोटो काढून घेतो तिच्यासोबत." दुसरी म्हणाली.
"ती आली की तुम्हाला सांगतो. मग या हं तुम्ही फोटो काढायला." विराज गोड आवाजात शेजाऱ्यांना म्हणाला. त्याच्या येण्याने आईला सुटल्यासारखे वाटले. नाहीतर लोकांच्या प्रश्नांची तिच्याकडे काहीच उत्तरे नव्हती. सगळे बाहेर जाताच इतका वेळ चेहर्यावर ठेवलेला विराजचा मुखवटा गळून पडला. तो रडू लागला.
"आई, स्पृहाने फसवलं आपल्याला. नाही म्हणालो होतो मी तिला, पण नाही ऐकलं तिने. आज अख्ख्या शहराला माहित आहे तिची सिरियल येते आहे फक्त आपण दोघेच मूर्ख ठरलो गं." विराजने हातात तोंड लपवले होते. आई फक्त विमनस्कपणे इथे तिथे बघत होती. स्पृहा बिल्डिंगपासून थोड्या अंतरावर टॅक्सीने उतरली. कार्तिक तिला सोडायला यायचे म्हणत होता पण तिनेच त्याला नको सांगितले. तिच्या बिल्डिंगजवळच मोठी जाहिरात होती. विराजने नक्कीच हा फोटो बघितला असणार. स्पृहाने दीर्घ श्वास घेतला.
"ताई, आमच्यासोबत फोटो काढ ना." लहान मुलांनी स्पृहाला बघून ओरडायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत फोटो काढून ती घरात आली. विराज रागावलेला दिसत होता आणि आई शून्यात बघत होती.
"आई.." स्पृहाने हाक मारली.
"आई, तिला सांग.. तिला या घरात जागा नाही म्हणून." विराजचा आवाज चढला होता.
"दादा, अरे ऐकून तर घे ना. मला सांगायचं होतं तुला. पण मी घाबरले." स्पृहा बोलत होती.
"घाबरलीस? मला घाबरलीस? इतके वर्ष आमच्यासोबत राहते आहेस, तरी आम्हाला घाबरलीस. आणि त्या अनोळखी माणसांना नाही घाबरलीस? एकदाही तुझ्या मनात विचार आला नाही का, की आईला काय वाटेल? दादाला काय वाटेल?"
"दादा, इथे खूप पैसे मिळणार आहेत."
"पैसे कोणीही कमवतं गं.. कसे कमावले जातात ते महत्वाचे आहे."
"तुला काय म्हणायचे आहे, मी चुकीच्या मार्गाने पैसे कमावले? आई, बघतेस का.. हा काय बोलतो आहे ते?"
"आई, कशाला काय बोलेल? माझ्याशी बोल ना. त्या दिवशी तर डोळ्यात पाणी आणून म्हणाली होतीस, तू जे म्हणशील ते मी करेन. मग काय झालं? पैशाची भुरळ पडली? बरोबर ना आई?"
"आई, बघ ना हा कसं टोचून बोलतो आहे. आपल्यासाठीच काम करते आहे ना?" स्पृहा आईजवळ गेली. आईच्या खांद्यावर हात ठेवताच आई खाली पडली. दोघेही ओरडत आईजवळ गेले. या दोघांची भांडणं ऐकतानाच कधीतरी त्यांच्या आईचे प्राण निघून गेले होते. स्पृहा स्फुंदत रडू लागली. बिल्डिंगमधले सगळे यांचं भांडण ऐकत बाहेर उभे होतेच. आई गेली हे ऐकून ते आत आले. त्यांनी अंतिम तयारीला सुरुवात केली. कार्तिकला कुठून तरी ही बातमी समजली. तो ही अंत्यसंस्कारासाठी आला होता. त्याला बघून विराजचे डोके अजूनच फिरले. तो घरात आला. रडत असलेल्या स्पृहाकडे गेला.
"तुझ्यामुळे माझी आई गेली. तुला जर तुझा हट्ट सोडायचा नसेल तर आल्यावर आईच्या आणि तुझ्या दोघींच्या नावाने अंघोळ करेन." विराजचे बोलणे ऐकून स्पृहा शहारली. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच तिने विराजला एवढं चिडलेले बघितले होते. विराज स्मशानातून घरी आला. रिकामं घर त्याची वाट बघत होतं. स्पृहा घर सोडून गेली होती.
"त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातील दोन नाती एकदम गमावली. आई आणि बहिण." विराजच्या डोळ्यात पाणी होतं. "त्या दिवसानंतर मी स्पृहाशी संबंध तोडला. तिचं नाव जरी घेतलं तरी मला आईचा मृत्यु आठवतो आणि तिचा राग येतो."
"तुमच्या आईच्या मृत्यूला फक्त स्पृहाच जबाबदार आहे? तुम्ही नाही?" पार्थच्या अचानक आलेल्या प्रश्नाने विराज गोंधळला.
"काय म्हणायचं आहे तुला?"
"हेच.. तुम्ही जर त्यावेळेस थोडं संयमाने घेतलं असतं तर परिस्थिती वेगळी असती असं नाही का वाटत?"
"पार्थ, स्पष्ट बोल ना.." आर्यन म्हणाला.
"स्पृहा चुकली होती. पण आपलं माणूस म्हणून तुम्ही समजून घ्यायला हवं होतं."
"आपलं माणूस म्हणून समजून घेऊनही आयुष्यात दुःखच येत रे.." आर्यन हताशपणे म्हणाला.
"हो ना. आता इथे स्पृहा टिव्हीवर गेली म्हणून त्यांची नाती बिघडली. पण आमचं काय? माझ्या पालवीने असं काय केलं होतं की तिचा सतत गर्भपात होतो आहे. का हे दुःख तिच्या नशीबात?" यांचं बोलणं ऐकून उठलेला राज म्हणाला.
"यालाच तर पूर्वसंचित म्हणतात. तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्ही पार पाडली नाही म्हणून दैवाने दिलेली शिक्षा समजा हवं तर याला." पार्थ गंभीरपणे म्हणाला.
पार्थ पुनर्जन्माबद्दल बोलतो आहे. कोण कोणाचा पुनर्जन्म असेल, येईल का सांगता?
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा