वाड्यात येऊन जा.. भाग ७१
"पार्थ, काय लिहिलंय माझ्या हातात? मला कधीच बाळ होणार नाही का?" पालवीने तिचा हात बघत असलेल्या पार्थला विचारले.
"असा का विचार करताय ताई? तुमचं बाळ तुम्हाला नक्की भेटेल."
"एवढे मिसकॅरेज झाले आहेत ना.. आणि तुला सांगू, प्रत्येक वेळेस हा वाडा आणि ती आकृती यायची. म्हणे इथे ये आणि बाळाला घेऊन जा." बोलता बोलता पालवीला हुंदका फुटला.
"अजिबात रडू नका. लवकरच तुमचं बाळ आणि तुम्ही तुमच्या घरात असाल." पार्थ समजूत घालत म्हणाला.
"माझा हात पण बघशील का रे.. अजून किती काळ हे सगळं सहन करायचं आहे ते." नीताताई म्हणाल्या.
"काय काकू तुम्ही पण? हात बघतो मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हं.. कोणताही ज्योतिषी फक्त चांगलेच भविष्य सांगतो. आणि कधीच कोणाचे मरण सांगत नाही."
"तू म्हणशील तसं." साडीला हात पुसत नीताताई पुढे झाल्या. पार्थने त्यांचा हात नीट बघितला.
"तुमच्याकडे दोन मौल्यवान वस्तू होत्या सांभाळायला. पण तुम्हाला त्या नीट सांभाळता आल्या नाहीत."
"माझ्याकडे.. मौल्यवान वस्तू? नाही रे.. कधीच नाही. वाटल्यास बाबांना विचार." नीताताई म्हणाल्या.
"आता तरी मला कोणालाच काही विचारायचे नाही. जे हवे होते ते सर्व समजले."
"काय समजले तुला?" माधवरावांनी आत येत विचारले.
"थोडंसं भूत.. थोडंसं भविष्य. मी तुमचा हात बघू का?"
"माझं भूतही हा वाडाच आहे आणि भविष्यदेखील. तू विसरलास वाटते, मी पण देवदयेने भविष्यात डोकवू शकतो."
"मी कसं विसरेन आजोबा. पण तरीही एकदा हात बघू देत की तुमचा." पार्थ म्हणाला.
"अरे व्वा.. आज सकाळी सकाळी स्वयंपाकघरात भविष्यकथनाचा तास?" आर्यन म्हणाला.
"आर्यन, तू एकटाच आलास?" माधवरावांच्या आवाजात काळजी होती.
"म्हादबाकाका खोलीबाहेर होते. त्यांच्यासोबत आलो." आर्यनने स्पष्टीकरण दिले.
"आणि ते राज, विराज कुठे राहिले? तुम्ही काय घेणार चहा की कॉफी?" नीताताईंनी विचारले.
"विराजदादा कॉफी आणि राज चहा. मी पण चहाच." आर्यनने सांगितले.
"आणि त्या दोन मुली? त्या काय खाणार विचारून येशील का?"
"कशाला? त्या कोण महाराण्या लागून गेल्या आहेत? येतील तेव्हा बघतील?" आर्यन म्हणाला.
"असं नाही रे. रात्री बहुतेक कोणीतरी रडत होतं. माझ्या खोलीत येत होता आवाज. पण म्हटलं दोघी बोलत आहेत तर बोलू देत. आपण नको मध्ये पडायला." नीताताई म्हणाल्या.
"कोण रडत होतं?" आर्यनने पटकन विचारले.
"भिंतीपलीकडे कोण रडतं, हे कसं रे समजणार मला? तू विचारतोस की पालवीला पाठवू?"
"मी जातो.." आर्यन म्हणाला.
"एकटा जाऊ नकोस रे.." माधवरावांनी सांगितले.
"थांब.. हे घे आणि मग जा." पार्थने आर्यनच्या हातात एक दोरा बांधला. "आता बघू काय होते ते." आर्यन त्या दोऱ्याचा विचार करत स्पृहाच्या खोलीबाहेर आला. त्याने दरवाजा वाजवला. जुईने दरवाजा उघडला आणि आर्यन बघतच राहिला. तिने साडी नेसली होती. साडीमध्ये ती वेगळीच दिसत होती.
"काय झालं? काही काम होतं का?" जुईने विचारले.
"हो.. चहाने विचारले.. आत्या पिणार का?" आर्यन म्हणाला.
"काय?" जुईला हसू आवरत नव्हतं.
"कोण आहे गं जुई?" स्पृहाने आतून विचारले.
"मॅम, आर्यनसर आहेत.. चहाने आत्या पिणार का म्हणून विचारत आहेत." जुई हसत म्हणाली.
"काय??" स्पृहा पण आतून बाहेर आली. तिनेही साडी नेसली होती.
"काही नाही.." आर्यन पटकन म्हणाला. "ताई, आज अचानक साडी?"
"अरे, कपाटात दिसल्या.. म्हणून मग टॉपवर नेसून बघितल्या. जुना पॅटर्न आहे ना? मोह आवरला नाही." स्पृहा म्हणाली. "बरं, तू कशासाठी आला होतास?"
"ते आत्याने बोलावले होते." आर्यन एकेक शब्द जपून बोलू लागला. जुईने हसू येऊ नये म्हणून तोंडावर हात ठेवला होता.
"चल, मग जाऊयात. आम्ही तयारच आहोत." स्पृहा पुढे चालू लागली. आर्यन आणि जुई तिच्यापाठी चालणार तोच त्या दोघांची नजर एकमेकांत गुंतली, आणि दोघांनाही चंद्रसेन आणि सईचा प्रसंग आठवला. जुईने स्वतःशीच कसं शक्य आहे, म्हणत नकारार्थी मान हलवली आणि पुढे चालू लागली.
"पार्थ, तू काय खाणार?" नीताताईंनी विचारले.
"काकू, मला काहीच नको. पण सगळे इथे आले आहेत तर मला एक सुचवायचे होते."
"काय?"
"तुम्ही सगळ्यांनी या वाड्याचा इतिहास तर ऐकलात. त्या गोष्टी तुमच्या कोणाशी जुळतात का, हे बघा. म्हणजे आपल्याला किल्ल्या शोधणं सोपं जाईल. मी परत येईपर्यंत तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकाल ना?"
"परत येईन म्हणजे?" जुईने विचारले.
"मी आता माझ्या घरी जाऊन येणार आहे."
"का?"
"माझ्या पोटापाण्याची सोय नको का बघायला?"
"इथे आहे की.."
"मी इथे काहीच खाऊपिऊ शकत नाही." पार्थ माधवरावांकडे बघत म्हणाला. "मी येतोच."
"विचित्रच आहे ना हा?" पार्थ जाताच विराज म्हणाला.
"थोडा.. आणि जाताना काय सांगून गेला? म्हणे कालच्या कथेतल्या गोष्टी आपल्याशी रिलेट होतात का बघा? शक्य तरी आहे का?" राज म्हणाला.
"हो ना.. " बोलता बोलता विराजची नजर आर्यनवर पडली. आणि तो गंभीर झाला. "आजोबा, तुम्ही आर्यनला बघितलेत?"
"त्यात काय बघायचे? समोरच तर आहे हा.."
"नाही.. नीट बघा ना." विराजने आग्रह केला. विराज असं म्हणतो आहे म्हटल्यावर सगळ्यांनीच आर्यनकडे बघायला सुरुवात केली. आर्यनला मात्र ते विचित्र वाटलं.
"काय झालं नक्की?" त्याने विचारले.
"याचा चेहरा त्या चंद्रसेन महाराजांशी नाही का जुळत?" आर्यनकडे दुर्लक्ष करत विराजने विचारले.
"काहीही." बोलताना आर्यनची नजर जुईवर होती. त्याला त्याचेच शब्द पोकळ वाटले. तिच्यात आणि सईच्या चेहर्यात त्याला साम्य जाणवलं होतंच की. आणि आज झालेला तो प्रसंग.. खरंच सगळ्यांचा पुनर्जन्म झाला आहे का? आणि ही सई चंद्रसेनला दिलेले वचन निभावण्यासाठी परत आली आहे?
"हा चंद्रसेन.. मग सई कोण? आणि सगळ्यांचाच पुनर्जन्म झाला असेल तर आपण फक्त सहाजण आहोत. बाकीच्यांचे काय?" राजने मुद्दा मांडला.
"ते आपल्याला पार्थच सांगू शकेल. पण मग आपल्यामध्ये कोणी भानूही असेल का?" पालवीने घाबरतच विचारले.
"हा पार्थ ना डोक्याला भुंगा लावून गेला. आजोबा, तुम्हीच सांगा ना.. पुनर्जन्म असेल का?" स्पृहाने माधवरावांना विचारले.
"असू शकतो. पार्थला पण कदाचित तिच खात्री करून घ्यायची होती. म्हणून त्याने तुमच्या सगळ्यांचे हात बघितले असतील." माधवराव म्हणाले.
"हे तुम्हाला कसं समजलं?" आश्चर्याने जुईने विचारले. माधवराव त्यावर फक्त हसले. "म्हादबा, ते काका अजून आले नाहीत बघ. घेऊन ये त्यांना." खाणंपिणं आवरून झाल्यावर कोणालाच स्वस्थ बसवेना. सगळे आपण कोणाचा पुनर्जन्म असू याच विचारात होते. भानू हा आधीच्या जन्मातला फैजल असेल आणि चंद्रसेन तो महाराज.. म्हणजे हा त्यांचा तिसरा जन्म. मग आपलाही हा तिसरा जन्म का? आणि असेल तर त्यामागचे कारण काय असेल?
"आपण वर जाऊयात? जिथे खूप चित्र आहेत?" जुईने विचारले. तिचे सांगणे सगळ्यांना पटले. माधवराव आणि म्हादबा सोडून बाकी सगळे वर गेले. तिथेच काही चित्रे लावली होती. सईच्या चित्राच्या बाजूलाच एका जोडप्याचे चित्र होते.
"हा तर राजवर्धन.." राज पटकन म्हणाला.
"कशावरून?"
"स्थूल शरीर, गोल चेहरा, कपाळावर गंध आणि त्याहीपेक्षा महत्वाचे.. यमुना आणि राजवर्धन हेच एक जोडपे चंद्रसेनला खूपच जवळचे होते. मग त्यांच्याशिवाय इतर कोणाचे चित्र ते का काढून घेतील?" राजने स्पष्टीकरण दिले.
"आता, स्थूल शरीर आणि गोल चेहरा. कोण आहे बरं आपल्याकडे?" पालवीने विचारले.
"मी अजिबात नाही हां राजवर्धन.." विराज हात वर करत म्हणाला.
"ओके. तू तो नाहीस. ही बाई कोण असेल?" स्पृहाने अजून एक चित्र बघत विचारले. त्या बाईच्या चेहर्यावर एक प्रकारचे अवघडलेपण दिसून येत होते. कपडे आणि दागिन्यांवरून ती साध्या घरातली असावी असं वाटत होती.
"मैना??" नीताताई एकटक तिच्याकडे बघत होत्या.
"हा असावा भानू आणि हा राघव.." तिथे अजून काही चित्रे होती.
"आणि ही दुर्दैवी गोदा.."
"बापरे.. म्हणजे कितीजणांचे कार्य अपुरे राहिले आहे.." पालवी म्हणालीच.
तुम्हाला येईल का सांगता, कोण कोणाचा पुनर्जन्म आहे ते? पार्थ परत आल्यावर किल्ल्या सापडतील का? बघू पुढील भागात.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा