Login

वाड्यात येऊन जा.. भाग ७२

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ७२


"सगळ्यांचेच.. तुम्हाला पटली का ओळख?" पार्थने विचारले.

"तुम्ही आलात पण?" पालवीने विचारले.

"हो.. जवळच राहतो मी."

"काहीजणांची पटली. काहीजणांची नाही पटली आम्हाला ओळख.. तुम्ही पटवून द्याल का?" राज म्हणाला.

"त्यासाठीच तर मी इथे आलो आहे."

"मला एक प्रश्न पडला आहे." जुई विचारात होती.

"कोणता?"

"ती दुष्ट शक्ती तिथे आली कशी? म्हणजे माझा अंदाज आहे की तो यवन सरदार असावा."

"बरोबर.. पण तो एकटाच तिथे नव्हता."

"मग?"

"त्याच्यासोबत त्याच्यासारख्या स्वभावाचे अनेकजण होते. त्या सगळ्यांचाच भीषण मृत्यु एकाचवेळेस झाला. त्या सगळ्यांचेच दुष्ट आत्मे तिथे धुमसत राहिले. आणि परिणामतः त्याचे एका भयानक दुष्ट शक्तीत रूपांतर झाले."

"ते महाराज कोण होते मग?" पालवीने विचारले.

"ते एक छोटंसं संस्थान होतं. न्यायप्रिय, प्रजेची काळजी घेणारा राजा, त्याची सुस्वरूप गुणी राणी. राजकुटुंबावर भरपूर प्रेम करणारी प्रजा असं सगळं आदर्श होतं. खूप श्रीमंत राज्य नव्हतं पण खाऊन पिऊन सुखी होते. आणि अचानक यवनांनी भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. देवगिरीसारखे बलाढ्य राज्य जिथे जिंकू शकले नाही तिथे आपला काय पाड लागणार? याचा अंदाज त्यांना आला होता. स्त्रीची होणारी विटंबना ते बघू शकत नव्हते. म्हणून युद्धाची चाहूल लागताच त्यांनी आपल्या रयतेला सुरक्षित जागी लपवले. आपल्या सैन्याला घेऊन त्यांनी निकराने लढाई केली. पण हजारोंच्या फौजेपुढे शेकडो कसे टिकणार? अपेक्षेप्रमाणे ते हारलेच, शत्रुला जिंकू न देता. कोणताही सैनिक शत्रुच्या हाती लागला नाही. त्या सरदाराने महाराजांच्या गढीतच वास्तव्य केले. याचा बदला म्हणून त्यांनी ही गढीच पेटवून दिली."

"ही गढी?" नीताताईंनी विचारले.

"हो.. ही गढी. आज जिथे वाडा उभा आहे त्याच जागी ही गढी होती. इथेच त्या गढीने पेट घेतला होता." पार्थ बोलत असताना परत एकदा वाड्याचे दरवाजे, खिडक्या जोरजोरात वाजू लागल्या. नकळत जुई आर्यनजवळ सरकली. सगळेच त्या आवाजाने भयभीत झाले. पार्थ मात्र आत्मविश्वासाने पुढे झाला. त्याने काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते मंत्र सुरू होताच जणू त्या दरवाज्यांनीही लढाईला सुरुवात केली. पार्थ मात्र न थांबता अभिमंत्रित जल शिंपडू लागला. हळूहळू दरवाजे आपटण्याचा वेग कमी झाला आणि थांबला. तो आवाज थांबताच पार्थ थकून खाली बसला. ते बघून स्पृहा कसलाच विचार न करता स्वयंपाकघरात धावली. तिने तिथून पाणी आणून पार्थपुढे धरले. त्याने कृतज्ञतेने तिच्याकडे बघितले. हातातले जल त्याने त्या पाण्यात एकत्र केले आणि नंतरच ते पाणी तोंडाला लावले.

"मग त्या महाराजांचे काय झाले?" विचारतानाही जुईच्या डोळ्यात पाणी आले.

"ते महाराज आणि त्यांचे चार साथीदार शत्रूच्या हाती सापडले. पण त्यांनी त्यांची विटंबना करण्याआधीच त्यांनी मृत्यूला कवटाळले."

"त्याच महाराजांचा चंद्रसेन पुनर्जन्म होता का?" विराजने विचारले.

"हो.." पार्थने मान हलवली.

"हे सगळं तुम्हाला कसे समजले?" पालवीने विचारले.

"त्यासाठीच तर गोविंद भट बाहेर गेले होते ना.. कोणतीही शक्ती फक्त मंत्र म्हणून नष्ट होत असती तर काय हवे होते? या वास्तूत प्रवेश करताच त्यांना इकडचा विखारीपणा जाणवला होता. त्यांचे हे क्षेत्र नसतानासुद्धा त्यांनी इथे उडी घेतली होती. मग ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आधी त्यांनी या जागेचा इतिहास शोधला. त्यानंतर ते आपल्या गुरूंना भेटले. तिथे कठोर साधना करून ते इथे परत येण्यास निघाले खरे. पण तेव्हाच त्यांच्या गुरूंची तब्येत बिघडली. एक ना दोन अनेक अडचणी येत गेल्या. आणि शेवटी जेव्हा ते इथे आले तेव्हा अगदीच निकराची वेळ आली होती. त्यांनी सर्व लिखित साहित्य घरात सुखरूप ठेवले.. बाकीचं तर सगळं मी तुम्हाला सांगितलं आहेच."

"हे त्यांनी चंद्रसेनला का नाही सांगितले? त्याला जर माहिती पडले असते तर तो वाडा सोडून गेला नसता.." विराज म्हणाला.

"तुम्हाला काय वाटलं, त्याला विसाजीने सांगितलं नसेल? पण ज्या वाड्यात त्याच्या बायकोचा, मुलाचा, जिवलग मित्राचा भीषण मृत्यु झाला तिथे तो शांतपणे राहणे शक्यच नव्हते. म्हणून तो त्या वाड्यातून बाहेर पडला." पार्थने दिलेलं उत्तर काहीजणांना पटलं नाही.

"मग आता पुढे काय करायचे?" राजने विचारले. पार्थचं बोलणं पूर्ण झाल्यावर एक प्रकारची शांतता तिथे पसरली होती. पार्थ तिथे आल्यापासून सर्व सूत्रे त्याने हातात घेतली होती. माधवराव थोडे बाजूला पडले होते. तरीही ते शांतपणे सर्व घडामोडी बघत होते.

"स्वतःला ओळखायचे."

"कसे?"

"जसे भानूने ओळखले तसे.."

"ध्यान लावून?" विनायकरावांनी विचारले.

"हो.. तुम्ही ध्यान लावा. तुम्हाला मन एकाग्र करायला मी मदत करतोच."

"मी ही करते तुम्हाला मदत." जुई म्हणाली.

"तुम्हालासुद्धा ध्यान करायचे आहे."

"माझा काय संबंध?"

"तुम्ही इथे आलात तेव्हाच तुमचा या सगळ्याशी संबंध जुळला. आता फक्त तो काय आहे ते बघूयात." पार्थ असं म्हणताच जुईने तिच्याही नकळत आर्यनकडे बघितले. त्याची तिच्याकडे खिळलेली नजर बघून तिने मान झुकवली.

"सगळ्यांनी एका ओळीत बसा. मी इथे काही मंत्र लावणार आहे. तुम्हीसुद्धा तो मंत्र ऐकून म्हणायचा प्रयत्न करा. हे सगळं करताना आपल्या भुकुटीकडे बघत रहा." पार्थ सांगत होता. माधवराव, म्हादबा सोडून सगळे खाली बसले. पार्थने मंद आवाजात मंत्र सुरू केले. आधी ते मंत्र ऐकून समजून घ्यायला सगळ्यांना त्रास झाला. पण नंतर मात्र सगळे एकसुरात तो मंत्र म्हणू लागले. आर्यनने डोळे बंद करताच त्याच्या डोळ्यासमोर त्याचं सुखी संपन्न राज्य आले. तिथे गुण्यागोविंदाने राहणारे त्याचे प्रजाजन. राणीसोबत सुखी असलेले वैवाहिक जीवन. त्या जीवनात राहू बनून आलेला बिलावल आणि फैजल. त्या दोघांना मारताना बिलावलने केलेली प्रतिज्ञा. नंतर चंद्रसेन म्हणून झालेला जन्म. सईची झालेली भेट. भानू, राघवचा जन्म. त्यानंतर झालेला भीषण संहार. संसारापासून अलिप्त झालेला चंद्रसेन एक दिवस वाड्यातून निघाला. आपल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी तो एका आश्रमात राहिला. तिथेच त्याचा मृत्यु झाला. आणि नंतर डोळ्यासमोर आला तो जुईचा चेहरा. आर्यनने पटकन डोळे उघडले. 'चार दिवसही झाले नाहीत मयुरीने नकार देऊन. आणि तिच्याजागी मी जुईला बघू लागलो.' त्याचे मन त्याला खाऊ लागलं.

"यात तुझा दोष नाही. ती तुझी कधी नव्हतीच." पार्थचा आवाज आर्यनच्या कानात येताच आर्यन दचकला. त्याने पार्थकडे बघितले. तो डोळे मिटून ध्यानात बसला होता.

'तुम्हाला कसं??' आर्यनने मनात प्रश्न विचारला.

"विश्वास ठेव माझ्यावर. तुझं जन्मोजन्मीचं प्रेम इथेच आहे."

"कोण?"

"सई.. जिला तू कधीच वेगळं होणार नाहीस असं वचन दिलं होतंस."

"पण तिने तर.."

"ती सुद्धा तिच्या वचनाला जागून परत आली आहे.. तुझी अर्धांगिनी होण्यासाठी."

"काय मग.. कशी गेली रात्र?" मालीचं हसणं पालवीच्या मनात उमटलं. गोदाशी केलेली थट्टामस्करी, सई, यमुना यांची प्रेमाची बोलणी आठवून तिच्या काळजात तुटलं. भानूचा रागीट चेहरा आठवून तिच्या अंगाचा संताप संताप झाला. तिचं गोजीरवाणं बाळ.. 'मी माझ्या बाळाला कसं परत आणणार?' पालवी रडू लागली.

"ताई, रडू नकोस." डोळे उघडायचे भानही पालवीला राहिले नाही.

"त्यांनी तेव्हा पण माझे बाळ हिसकावले आणि आत्तासुद्धा तेच सुरू आहे."

"तुझ्या आधीच्या बाळाचे विधी झाले की तुझं बाळ तुझ्याकडे परत येईल."

"महाराज, तुम्ही नका येऊ. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही त्या यवनाला धडा शिकवतो."

"सेनापती, तुम्ही तिथे लढणार आणि आम्ही इथे बसून राहणार? शक्यच नाही." महाराजांनी सेनापतींच्या खांद्यावर हात ठेवताच सेनापतींना कृतार्थ झाल्यासारखे वाटले.

"रामा.. खूपच पराक्रम गाजवलास तू.." मरताना रामाच्या डोळ्यात उमटलेले शेवटचे दृश्य म्हणजे चंद्रसेनाच्या डोळ्यात आपल्यासाठी आलेले अश्रू.. तेच अश्रू राजला आपल्या डोळ्यात जाणवले. त्याने पटकन डोळे पुसले.

"मैना, तुला दासी कोण म्हणेल? तू तर सखी आहेस माझी. आणि माझ्या लेकरांची दुसरी मावशी." सईचे शब्द नीताताईंना ऐकू आले आणि त्यांनी डोळे उघडले. 'सई बाईसाहेब आणि गोदा.. या दोन मौल्यवान वस्तू मला सांभाळता आल्या नाहीत का?' त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला.


वाचकांच्या खास आग्रहास्तव आज दुसरा भाग पोस्ट करते आहे. वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all