Login

वाड्यात येऊन जा.. भाग ७३

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ७३


"भभभभूत... भीमरूपी महारूद्रा.." राजवर्धन पुटपुटू लागला. ते बघून चंद्रसेन आणि महादेव हसू लागले. बघता बघता चंद्रसेन आणि राजवर्धनची मैत्री झाली. ती मैत्री नात्यात बदलली.

"बाईसाहेब.."

"भाऊजी.. परत बाईसाहेब म्हणालात तर बोलणारही नाही मी." सईचं चिडणं ऐकून राजवर्धनला हसू आले. त्यानंतर सुरू झाली राघवची शिकवणी. त्याला शिकवलेले अनेक मंत्र.. आणि या वाड्यातल्या पिशाचशक्तीशी लढताना राहून गेलेलं गृहसौख्य. आधीच्या जन्मातही नाईलाजाने यमुनाने दिलेली सोबत. आणि त्याआधी? आधीचा जन्मही होता का?

"आचार्य, तुम्ही मोहिमेवर येणार?" महाराजांनी आश्चर्याने विचारले.

"महाराज, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावीच लागतात." आचार्य तलवार हाती घेत म्हणाले.

"राजपुरोहितही मीच आणि चंद्रसेन महाराजांचा पुरोहितही मीच.. मीच होतो हा सगळा इतिहास लिहिणारा." अभिमानाने विराजचा चेहरा फुलला होता.

"महाराज, आज्ञा द्या.."

"चंद्रमुखी, आम्ही हे नाही करू शकत.."

"महाराज, एका नर्तकीला तुम्ही एवढा बहुमान देताय हे बघून कोणालाही माझा हेवा वाटेल. पण आपल्या राज्यातल्या इतर स्त्रियांसाठी मला हे करू देत." ती हात जोडून बोलत होती. महाराजांनी नाईलाजाने तिला आज्ञा दिली. त्यानंतर निघाले ते फक्त शीलाचे धिंडवडे. त्याही परिस्थितीत तिने बिलावलचे मन जिंकून आपली कामगिरी पार पाडली. तिला स्वतःलाही त्या आगीत समर्पित व्हायचे होते. पण नाही.. महाराजांना ती कल्पना असल्यामुळेच त्यांनी तिची बाहेर येण्याची तजवीज केली. त्यानंतर त्या फैजलशी झालेला संघर्ष आणि दिलेली प्राणांची आहुती..

"तुम्ही हिला सुखरूप तिच्या माहेरी पोहोचवाल का?"

"ही पोटुशी आहे का?" इंद्राने गर्भारशी गोदाकडे बघितले. तिच्या मनात एक कळ उठली. आपण कधीच हे असं आयुष्य जगू नाही का शकणार? हे असं गर्भार मिरवणं, आपल्या नशीबात नाहीच का? तिने आपल्या विचारांना पाठी सारले. आणि गोदाला घेऊन बाहेर पडली. बाहेर काही तांत्रिक तिचा पाठलाग करत आले. गोदाला बैलगाडीत बसवून तिने त्या तांत्रिकांशी दोन हात करायला सुरुवात केली. तोच एकाने पाठून वार केला.

"एवढं काय मी पाप केलं होतं की कोणत्याच जन्मात मला प्रेम मिळू शकलं नाही. आई होण्याचं भाग्य तर दूरच.." स्पृहाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.

"त्याग कधीच वाया जात नाही.." पार्थ म्हणाला.

"कोणास ठाऊक. तीन जन्म तर असेच संपले."

"हा कुठे संपला आहे अजून?"

"नकोच त्या खोट्या आशा.."

"विश्वास ठेव माझ्यावर.."

"या अल्ला.. इन काफिरोंने काफी बडा जख्म दे दिया।" फैजल त्याच्या महालात जखमेवर औषध लावून घेत होता.

"हुजूर जख्म भर नही रहां है। लगता है चाकू में जहर लगा था।" हकीमाने सांगताच फैजल रागाने पिसाळला.

"काफीरोंने छुपकर वार किया। हम भी ऐसा वार करेंगे की कमिने कभी भूल नही पायेंगे।" फैजलने तडफडत जीव सोडताना मनाशी प्रण केला.

"भानू.. किती राग राग करशील सगळ्यांचा? आणि का?" चंद्रसेन विचारत होता. काहीच उत्तर नसल्याने भानू मान खाली घालून उभा होता.

"भानू, राग आवर.. आणि उगाचच इतरांना छळून तुला काही मिळणार नाही, हे ध्यानात ठेव."

"आम्हाला तो बिचवा आवडला होता."

"हो.. पण तो त्याचा होता. आपण कधीच दुसर्‍यांच्या वस्तूवर हक्क दाखवू नये." चंद्रसेन समजावत होता.

"मला खरंतर तुझ्या बापाचा बळी द्यायचा होता.. पण तू माझा बेत उधळलास. आता तुझी पाळी." कालकेय रागाने वेडा झाला होता. भानूने अपेक्षेने बिलावलकडे बघितले. तो स्तब्ध होता. नंतर चंद्रसेनने त्याला सोडवले.. पण बिलावलने तलवारीने त्याचा बळी घेतलाच.

"मी याच्यासाठी माझं आयुष्य पणाला लावले. या जन्मात माझ्या आईचा बळी गेला.. तरी हा.. माझ्याशी पण.." मरण्यापूर्वी भानूच्या मनात हे विचार होते. विनायकरावांनी कपाळावरचा घाम पुसला. त्यांनी डोळे उघडून बघितले. कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष नव्हते.

"सई, आम्हाला सोडून कुठेच जाऊ नकोस." सईला मिठीत घेत चंद्रसेन म्हणाला.

"कुठे जाणार मी? जिथे तुम्ही तिथे मी. अगदी मृत्युपण मला तुमच्यापासून दूर करू शकणार नाही." सई मिठी घट्ट करत म्हणाली.

"वचन देतेस मला?"

"ते तर सात फेरे घेतानाच दिले. जगातली कोणतीच शक्ती आपल्याला वेगळं करू शकणार नाही." जुईने खाडकन डोळे उघडले. समोरच आर्यन बसला होता. क्षणभर त्याच्या जागी तिला चंद्रसेन दिसला. तिने परत डोळे बंद केले.

"हे मला का दिसलं? मी तर या कोणाला ओळखतही नव्हते."

"ओळखत नसलीस तरी काही नाती जन्मोजन्मीची असतात." पार्थ म्हणाला. "तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही ध्यान करू शकता. हवं तर मी मंत्र बंद करतो."

"मी नाही बसू शकत अजून." विनायकराव म्हणाले.

"मी पण.." म्हणत सगळ्यांनीच डोळे उघडले.

"मग जाणवला का आपला आधीचा जन्म?" पार्थने विचारताच सगळ्यांनी माना डोलावल्या, विनायकराव आणि जुई सोडून.

"पार्थ, आता लवकरात लवकर हे सगळं संपवू. खूप झाली या बिलावलची दादागिरी." विराज शर्टच्या बाह्या मागे करत म्हणाला.

"हो.. अजून किती जन्म हे ओझं डोक्यावर घेऊन फिरायचं?" आर्यन म्हणाला.

"मग लागा किल्ल्या शोधायला.." पार्थने सुचवले.

"आजोबा, तुम्ही काय सुचवाल?" आर्यनने पटकन विचारले.

"काय सांगू?"

"त्या किल्ल्या कुठे सापडतील?"

"मला माहित असतं तर आधीच सांगितलं नसतं का?" माधवराव मान खाली घालत म्हणाले.

"तुम्हाला तुमचा आधीचा जन्म आठवला आहे. मग तिथे एक अशी जागा आठवा जिथे तुमची खास आठवण आहे."

"या नादात तुम्ही खायचं विसरलात." म्हादबा खायला घेऊन येत म्हणाला.

"अरे.. मी आले असते ना." नीताताई उठत म्हणाल्या.

"चालतंय की ताईसाहेब. तुम्ही पण घ्या की.." म्हादबा पार्थसमोर बशी पुढे करत म्हणाला.

"नको.. मला भूक नाहीये. तुम्हीच खा." पार्थ म्हणाला.

"थोडंसं तरी?" स्पृहाने विचारले.

"तुमच्या चार मुलांसाठी तरी?" जुई मध्येच म्हणाली.

"त्यांची काळजी नका करू. ते मजेत असतात." पार्थ उलट बोलताच जुई गप्प बसली. तिचा पडलेला चेहरा आर्यनला बघवला नाही. पण सध्या त्याला करण्यासारखे काहीच नव्हते.

"खाऊन झालं असेल तर आपण ग्रुप करू." पार्थने जाहीर केले.

"ग्रुप? ते कशासाठी?" राजला प्रश्न पडला.

"ग्रुपने फिरताना कोणाची भिती राहणार नाही. आणि काही गोष्टी तरी आठवतील. बरोबर ना पार्थ?" माधवराव म्हणाले.

"एकदम बरोबर.. चला मग. विराज.. नावाने हाक मारली तर चालेल ना?" पार्थने विचारले.

"पळेल.. कसलीही औपचारिकता नकोच." विराज म्हणाला.

"मग.. तू आणि नीताताई, आर्यन आणि जुई, राज आणि पालवी. स्पृहा आणि.."

"मला काहीही आठवले नाही. मग मी कशाला कुठे जाऊ?" विनायकराव म्हणाले.

"मी एकटीच फिरते." खिन्नपणे स्पृहा म्हणाली.

"स्पृहा आणि मी जातो. ठिक?" पार्थ म्हणाला.

"जायचे कुठे पण?" राजने विचारले.

"वाड्याचे चार भाग पाडू. वरचा मजला, खालचा मजला, मागचे परसदार आणि पुढचं अंगण. पहिल्याच फेरीत तुम्हाला काही दिसेल असं म्हणत नाही. पण काही ना काही नक्की मिळेल."

"आम्ही परसदारी जातो." राज म्हणाला.

"मी खालीच फिरेन म्हणते." नीताताई म्हणाल्या.

"आपण अंगणात जाऊ.. म्हणजे जाऊयात का?" स्पृहाने विचारले.

"मग यांना वाड्याच्या वरच्या भागात जावे लागेल." विराज आर्यनकडे बघत म्हणाला.

"मी यामध्ये आलंच पाहिजे का?" जुईने परत विचारले.

"हो.. आणि जाण्याआधी हे घ्या." पार्थने खिशातून काही छोटे गोल बाहेर काढले.

"हे काय आहे?" राजने आश्चर्याने विचारले.

"हे गोविंद भटांनी आणलेल्या उपकरणांपैकी एक. तुमच्यासमोर काहीही अडथळा आला तर हा गोल खाली फेकायचा. आम्ही लगोलग तिथे येऊ." पार्थने सांगितले.

"हे करून दाखव जरा." विनायकराव उत्सुकतेने म्हणाले.

"आजोबा, ही खेळण्याची गोष्ट नाहीये. परत एकदा सांगतो. गरज असेल तरच याचा उपयोग करा. नाहीतर नाही." पार्थने निक्षून सांगितले.

"एकाच दिवसात आपलं आयुष्य कसलं बदललं आहे ना दादा?" पालवी आणि राज पाठच्या अंगणात आले होते.

"ह्म्म.. मला तर समजतच नाहीये. काय खरं आणि काय खोटे. मध्येच वाटते आपण पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात आहोत महाराजांसोबत.. कधी वाटते अडीचशे वर्षांपूर्वीच्या काळात चंद्रसेनासोबत.. आणि मग बघतो तर परत याच काळात. समजतच नाहीये.. काय खरं, काय खोटं ते." राज चालता चालता म्हणाला. बोलता बोलता ते दोघेही विहीरीपाशी आले. तिथेच थबकले.


किल्ल्या मिळायला होईल का सुरूवात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all