वाड्यात येऊन जा.. भाग ७४
"तुम्ही जरा हळू चालाल का?" पुढे चालत असलेल्या आर्यनला जुईने विचारले. तो मात्र स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत चालत होता. तो काही ऐकत नाही म्हटल्यावर पुढे होत जुईने त्याचा हात पकडला.
"काय झालं?" हात काढून घेत आर्यनने विचारले.
"मला भिती वाटते.. जरा हळू चाला ना." जुई म्हणाली.
"लक्षात ठेवतो." आर्यन पुढे जात म्हणाला.
"आपल्याला ग्रुप म्हणून काम करायचे आहे. एकेकटे नाही." जुई परत म्हणाली.
"आहे ना मी.."
"फक्त राहू नका.. सोबत रहा." बोलता बोलता दोघेही वरच्या मजल्यावर पोहोचले होते. वर अनेक बंद दालनं होती. खेचल्यासारखा आर्यन एका दरवाजाजवळ गेला. त्याने तो दरवाजा उघडला. आत पाऊल ठेवताच एक ओळखीची जाणीव त्याला झाली. जुईसुद्धा त्याच्या पाठोपाठ आली. इकडे तिकडे घाबरून बघत चालताना तिला तो उंबरठा दिसलाच नाही. ती त्याला अडखळून पडणार तोच आर्यन पाठी वळला.
"सई.." ओरडतच त्याने तिला घट्ट धरले.
"सई नाही जुई.." जुई धपापत्या उराने म्हणाली.
"सॉरी.. ते तुम्ही पडत होता म्हणून.." आर्यन म्हणाला.
"इट्स ओके.." जुई कसबसं हसत म्हणाली. "एक विचारू का?"
"विचारा ना.."
"इथे नक्की आपण काय करायचे आहे? कोणाच्या तरी खोलीत आपण लुडबुडतो आहोत हा विचार जरा खटकतोच." जुई म्हणाली.
"तसा विचार नका करू. विचार करा की त्या लुडबुडण्याने इकडची एक अडचण कमी होईल."
"ह्म्म.."
"आता मी एक विचारू?"
"हो.."
"मगाशी डोळे बंद केल्यावर तुम्हाला काय दिसले?" आर्यनच्या प्रश्नावर जुई कावरीबावरी झाली. तिने घाईघाईत तिकडचं कपाट उघडले. ते उघडताच त्यातलं एक गाठोडं तिच्या अंगावर पडलं. आर्यन लगेच तिच्या मदतीला गेला. गाठोडं धरताना परत एकदा त्याचा स्पर्श तिला झाला. गाठोडं बाजूला करून दोघेही बाजूला झाले.
"हे उघडू का?" जुईने विचारले.
"बघा उघडून.." जुईने हलक्या हाताने गाठ सोडली. खूप जुनी साडी होती म्हणून कदाचित ती साडी बर्यापैकी विरलेली होती. नकळत जुईने त्यावरून परत हात फिरवला. एक विचित्रशी हुरहुर तिला जाणवू लागली. तिने परत ती साडी बघितली.
"ही आमच्याकडून तुम्हांस भेट.." मोहिमेवरून परत आलेल्या चंद्रसेनने सईच्या हातात साडी ठेवली.
"हे काय? लुगडं? आणि माझ्यासाठी?"
"आवडलं का?"
"कसलं सुरेख आहे. कोणी दिलं?"
"कोणी द्यायला कशाला हवे? आम्ही घेऊ शकत नाही का?" उतरलेल्या चेहर्याने चंद्रसेनने विचारले.
"इश्श्य.. खरंच? तुम्ही बाजारपेठेत जाऊन घेतले की काय?" तोंडावर हात ठेवत जुईने विचारले.
"आम्हाला बाजारपेठेत जायची गरज नाही. एक व्यापारी घेऊन आला होता छावणीत. आम्हाला आवडलं आम्ही घेतलं."
"सणाला नक्की घडी मोडू आम्ही याची." सई घडी करत म्हणाली.
"नाही.. सणासुदीसाठी वेगळी खरेदी करा. आज, आत्ता हे तुमच्या अंगावर कसे दिसते ते आम्हाला बघायचे आहे."
"काहीही हट्ट असतो तुमचा." सई गोरीमोरी होत म्हणाली.
"राजहट्ट डावलू नये." चंद्रसेनचा हट्ट बघून सई साडी बदलून आली.
"या वस्त्राला तुमच्यामुळे शोभा आली." चंद्रसेन सईला जवळ घेत म्हणाला.
"सई..." आर्यनने हाक मारली.
"ऐकते आहे.." जुई पटकन म्हणाली.
"आम्ही मोहिमेवरून येताना खास तुमच्यासाठी आणलेले हे लुगडं."
"जे तुम्ही मला हट्टाने नेसायला लावले होते." जुई म्हणाली.
"सई.." आर्यनने जुईचा हात धरला. जुई भानावर आली.
"सर.." आर्यनने जुईचा हात सोडला.
"परत एकदा सॉरी. पण तूच आहेस ना चंद्रसेनाची सई? मगाशी हेच दिसलं होतं ना तुला?"
"हो.." जुई ओठ घट्ट मिटत म्हणाली.
"मग का लपवलंस?"
"सांगून तरी काय फायदा?"
"फायदा म्हणजे? चंद्रसेन आणि सई नवराबायको होते."
"ते मागच्या जन्मात. तो संपला. या जन्मात मी जुई आहे. एक साधी मेकअप आर्टिस्ट. आणि तुम्ही इनामदार. कशाला मागच्या जन्माची आणि या जन्माची गल्लत करायची? आपण इथे किल्ली मिळते का बघू? पण ती अदृश्य किल्ली सापडेल का?" जुईच्या बोलण्यावर काहीच न बोलता आर्यनने गाठोडं उघडलं. सईच्या अनेक वस्तू त्यात होत्या. प्रत्येक वस्तूची काही ना काही आठवण होती. जुईने ते गाठोडं परत बांधलं आणि ती ठेवायला गेली. तिला ते ठेवायला जमत नव्हतं म्हणून आर्यन तिच्या मदतीला गेला. दोघांनी एकत्र ते गाठोडं वर ठेवताच दोघांच्या डोक्यात एक छोटीशी किल्ली पडली.
"सई.." आर्यन म्हणाला.
"सई नाही जुई.." जुईने परत चूक सुधारली.
"बघितलंस.. आपल्याला आपला जन्म आठवला आणि किल्ली सापडली." आर्यन आनंदाने म्हणाला.
"आता निघायचे इथून?" जुईला अचानक अस्वस्थ वाटू लागले.
"हो.." आर्यनने किल्ली हातात ठेवली. जुई बाहेर जाताच त्याने दरवाजा ओढून घेतला. दोघे खाली जायला निघाले. दोघांनी पाऊल पुढे टाकले आणि एका दालनात पोहोचले. भितीने जुईने आर्यनचा हात धरला. त्या दालनाच्या मधोमध तो पिंजरा होता. गोविंद भटांनी ठेवलेला. त्याच्या आठ दरवाजांपैकी एक दरवाजा उघडा होता.
"उघड... दरवाजा.." पिंजर्यातून आवाज आला. जुईने आर्यनला घट्ट धरले.
"दरवाजे उघडणारच.. पण सगळे एकत्र." आर्यन म्हणाला. आर्यनचे उत्तर ऐकून ते पिशाच रागाने ओरडले. जुईचा गळा अचानक आवळल्यासारखा झाला. काय करायचे ते न सुचून आर्यन गोंधळला. त्याच्या कपाळावरून घामाचा ओघळ वाहू लागला. त्याने तो हाताने झटकला. तो खाली पडून चमकू लागला. आर्यनला पार्थने दिलेल्या गोळ्याची आठवण झाली. त्याने पटकन तो गोळा काढून खाली फेकला. तो खाली पडून फुटताच क्षणभरासाठी काळ थबकला.
"तिथून बाहेर पडा.." पार्थचा आवाज कानात घुमला. मगाचा आभासी दरवाजा जाऊन आर्यनला खरा दरवाजा दिसला. जुईला घेऊन तो तिथून बाहेर पडला.
"तू बरी आहेस?" खाली आल्यावर त्याने तिला विचारले. जुईने मानेनेच होकार दिला. दोघे दिवाणखान्यात बसले. मगाशी गजबजलेला दिवाणखाना आता शांत होता. मगाशी पार्थसाठी आणलेले पाणी आर्यनने जुईला दिले.
"बाकीच्यांना पण तोच अनुभव येईल, जो आपल्याला आला?" जुईने विचारले.
"ते आल्यावरच समजेल ना.. आपण फक्त वाट बघायची आता."
"आत्या, हे काय आहे?" विराजने नीताताईंना विचारले.
"हे तर आपलं देवघर आहे. हे बंद? देवघर तर कधीच बंद नसायचं." आश्चर्याने नीताताईंनी तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर एक भव्य देवघर होते. ओळीने मांडलेले देव.. त्याच्यापाठी काही तसबिरी. कुलदैवतेचे हाताएवढे मोठे टाक. विराज पुढे झाला. त्याने भक्तिभावाने देवाला नमस्कार केला. समोर शाळिग्राम दिसत होता.
"शास्त्रीबुवा, हा शाळिग्राम घ्या. याचीही पूजाअर्चा नीट होईल याची काळजी घ्या." शाळिग्राम भक्तिभावाने हातात घेत राजवर्धन म्हणाला. चटका बसल्यासारखा विराजने हात मागे घेतला. त्याने नीताताईंकडे बघितले. त्या देवघराचे निरिक्षण करत होत्या. देवाची क्षमा मागून विराजने शाळिग्राम उचलला. त्याच्याखाली काहीतरी चमकत होते. विराजने ती चमकणारी वस्तू हात बाहेर काढली.
"आत्या, हे बघ." नीताताईंनी विराजकडे बघितले. त्याच्या हातात चांदीची किल्ली चमकत होती.
"आपल्याला खरंच किल्ली सापडली." नीताताईंच्या चेहर्यावर आश्चर्य होते.
"हो.. राजवर्धन पूजा करायचा. म्हणून कदाचित मला इथे किल्ली सापडली. आत्या तू पण आठव तू काय करायचीस ते. आपण तिथे जाऊन शोधू." विराज उत्साहाने म्हणाला.
"स्वयंपाकघरात इतके वर्ष काम केलंय मी.. पण मला कधीच काही दिसलं नाही." नीताताई म्हणाल्या.
"आत्या, किती गं विचार करतेस? आता इतकी वर्ष या देवांची पूजा पण होत असेलच ना? मग आत्ताच बरी मला ही किल्ली सापडली? ती ही या शाळिग्राम खाली."
"काही संकेत असेल का रे हा?" नीताताईंनी विचारले.
"बघूयात. घेऊ का हा शाळिग्राम मग?"
"हो.. बाबा काही बोलले तर मी सांगते. पण त्याआधी मीच विचारते त्यांना खूप काही." नीताताई म्हणाल्या. विराजने देवाला परत नमस्कार करून तो शाळिग्राम खिशात ठेवला. शाळिग्राम होता म्हणून की काय कसलीही अडचण न येता दोघे स्वयंपाकघरात पोहोचले.
दोघांना स्वयंपाकघरात मिळेल का काही? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा