Login

वाड्यात येऊन जा.. भाग ७६

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ७६


"आत्या, ही खोली कोणती?" विराजने स्वयंपाकघराशेजारच्या खोलीकडे बोट दाखवत विचारले.

"अंदाज नाही काही. पण आम्ही जादाची भांडी इथेच ठेवायचो. तिथे चूल वगैरे सगळं आहे बघ. मला तर असं वाटतं आधीच्या काळातला हा मुदपाकखाना असावा." नीताताई म्हणाल्या.

"मुदपाकखाना.. ऐकायला पण कसं वाटतं ना?" हसतच विराज म्हणाला.

"हसतोस काय रे? आधीच्या काळात तेच म्हणायचे ना. जागा बघ किती प्रशस्त आहे. मला इथेच आवडायचे. पण आई जास्त थांबू द्यायची नाही मला."

"एवढी मोठी जागा का?"

"अरे, शेकडो लोकांचा स्वयंपाक होत असेल. मग तो काय एवढ्याश्या खोलीत करत असतील. मला आठवतंय तेव्हापासून इनमीन चारजण असायचो आम्ही. मग हे छोटंसं स्वयंपाकघर बरं पडायचं." नीताताई जुन्या आठवणीत रमल्या होत्या.

"आत्या, समजलं का तुला? म्हणजे आधीच्या जन्मात तू इथे काम करत असावीस. चल आत जाऊयात." नीताताईंना ओढतच विराजने त्या खोलीत नेले. खोली खरंच खूप मोठी होती. मोठमोठे हंडे रचून ठेवले होते. एका बाजूला धान्याच्या छोट्या कणगी दिसत होत्या.

"खरंच इथे जुन्या काळात आल्यासारखं वाटतंय गं." विराज ते सगळं वैभव डोळ्यात साठवून घेत होता. नीताताई तिकडच्या एका कोपर्‍यात गेल्या.

"मैना, मला ना भानूची भिती वाटते गं." सई बोलत होती.

"बाईसाहेब, आपल्याच लेकाची कधी भिती वाटते का? नका, नको ते विचार करू." मैना बोलत होती. पण तिचा तिच्या शब्दांवर विश्वास नव्हता.

"बघितलं नाहीस का, त्याचं रात्री अपरात्री बाहेर जाणं. जीवाचा ठोकाच चुकतो गं." सई भावविवश झाली होती. तेवढ्यात बाहेर कसला तरी आवाज झाला. दोघींनी बाहेर बघितलं. भानू उडी टाकून बाहेर जाताना दिसत होता.

"कधीच हाताला लागत नाही बघ.." सई खिडकीतून बाहेर बघताना तिचा धक्का लागून भांडी खाली पडली.

"खण्ण..." आवाज घुमला.

"आत्या, काय पाडते आहेस? घाबरलो ना मी." विराज जवळ येत म्हणाला.

"ती कळशी पडली.." नीताताई घाईघाईत उचलायला गेल्या. कळशीखाली दडलेली किल्ली त्यांना मिळाली.

"विराज, मलाही सापडली रे किल्ली." किल्ली सापडली म्हणून आनंदी व्हायचे की पुढच्या संकटाला सामोरे जायचे म्हणून वाटणार्‍या भितीला.. तेच त्यांना समजत नव्हते.

"सही.. म्हणजे आठपैकी दोन तरी किल्ल्या सापडल्या. चल पटकन दिवाणखान्यात जाऊन त्यांना दाखवू." विराज घाई करत म्हणाला.

"विराज, अचानक अंधार कसा रे झाला?" नीताताई म्हणाल्या.

"आत्या, समजत नाहीये. तू माझा हात धर." विराजचा आवाज ऐकून नीताताई त्याचा हात धरायला गेल्या. नुसती हाडं लागलेली बघून त्यांनी परत एकदा हात चाचपला. विराज एवढा बारीक नाही, हे त्यांना माहित होते. धीर करून त्यांनी हात थोडा वर केला. कपड्यांच्याऐवजी लागलेली हाडं बघून त्यांचा धीर सुटला. त्या जोरात किंचाळल्या. त्यांचा आवाज ऐकून विराजच्या हातून पार्थने दिलेली गोळी खाली पडली. अंधार नाहीसा होऊन परत सूर्यप्रकाश पसरला. नीताताईंनी बाजूला बघितले. एक हाडांचा सांगाडा तिथे दात विचकत होता. वाढत्या सूर्यप्रकाशात तो अदृश्य होत गेला. ते दृश्य पाहून नीताताई बेशुद्ध पडणार होत्या. विराजने त्यांना धरले.

"आत्या, सांभाळ स्वतःला. चल बाहेर जाऊ आपण." विराजला धरून नीताताई बाहेर आल्या. बाहेर सोफ्यावर सई आणि चंद्रसेन बसले होते. बाजूला मालू आणि रामा उभे होते. इंद्रा डोक्यावरचा पदर नीट करत होती. तिच्या शेजारी गोविंद भट आहेत का? नाही.. पण त्यांच्यासारखंच दिसणारं कोणीतरी आहे. आणि तो कोपर्‍यात कोण उभा आहे? भानू? मैनेचं काळीज भयाने परत खालीवर झालं. तिने शेजारी आधार घेतला.

"आत्या.. आत्या.." करत सगळे तिच्याजवळ जमा झाले.

"हिला काय झालं अचानक?" माधवरावांनी विचारले.

"ते आम्ही त्या खोलीतून बाहेर पडताना तिला कोणाचातरी स्पर्श जाणवला. तेव्हाच थोडी घाबरली होती." विराज म्हणाला.

"तुम्ही जरा बाजूला व्हा. थोडी मोकळी हवा येऊ देत." पार्थ पुढे येत म्हणाला. त्याने खिशातली एक गोळी नीताताईंच्या तोंडात ठेवली. त्याने त्यांना थोडी हुशारी आली. त्यांनी डोळे उघडले. आजूबाजूला सगळे होते.

"मिळाल्या का किल्ल्या?" त्यांनी विचारले.

"हो.." सगळ्यांनी होकार दिला.

"म्हणजे सहा किल्ल्या सापडल्या. उरलेल्या दोन?" आर्यनने विचारले.

"दोन नाही एकच.." पार्थ म्हणाला.

"म्हणजे?" सगळ्यांना आश्चर्य वाटलं.

"एक दरवाजा आधीच उघडला आहे. बरोबर ना आजोबा?" पार्थ माधवरावांकडे बघत म्हणाला.

"काय??"

"हो.. त्या उघडलेल्या दरवाजामुळेच तर ती शक्ती वेगवेगळे प्रक्षेप करून तुम्हाला घाबरवत होती." पार्थ बोलत होता.

"म्हणजे आम्हाला चालता चालता काहीतरी स्वप्न पडणं वगैरे? ते सगळं?"

"हो.. ती शक्ती बंद व्हायच्या आधीच मिळालेल्या बळींनी शक्तीशाली झाली होती. ती आत एका पिंजर्‍यात कोंडलेल्या वाघासारखी झाली होती. त्या पिंजर्‍याचे एक दार मोकळे आणि त्या शक्तीने तिचे प्रताप दाखवायला सुरुवात केली."

"समजेल असं सांगा.." आर्यनचा आवाज बदलला होता.

"गोविंद भटांची जी शेवटची चकमक झाली. त्या वेळेस शेवटचा दरवाजा नीट लावायच्या आतच त्या लाखनने गोंधळ घातला. आणि तो दरवाजा अर्धवट उघडा राहिला. त्या दालनात मूर्खपणाने प्रवेश करून आत जाणाऱ्यांचा बळी मिळवून ते पिशाच स्वतःची शक्ती वर्धित करत राहिले. त्यात राखणदाराने केलेली चूक."

"हो.. झाली माझ्याकडून एक चूक. आलो होतो मी पण त्या संमोहनाखाली. उघडायला गेलो होतो मी दरवाजा." माधवराव रागाने होते.

"आजोबा.. शांत व्हा. तुम्हाला कोणी दोष देत नाही." आर्यन माधवरावांना शांत करत होता.

"हो बाबा.. नका जीवाला त्रास करुन घेऊ. पण काय झालं ते तर सांगाल का?" नीताताई म्हणाल्या.

"मला काही नाही सांगायचे." माधवराव म्हणाले.

"मग मी सांगतो." पार्थ पुढे झाला. "सांगू ना आजोबा?"

"हो.." माधवराव धुसफुसत म्हणाले.

"या सगळ्याची सुरुवात झाली साधारण दहा वर्षांपूर्वी. म्हणजे हे पिशाच इथे शतकानुशतके आहेतच पण बाकी सगळं सुरू झालं तेव्हाच. आता तुम्हाला समजलं तसं आजोबा इकडचे राखणदार आहेत."

"राखणदार म्हणजे?" स्पृहाने विचारले.

"भानूने नको तो प्रताप केल्यानंतर चंद्रसेनने राघववर आपल्या धाकट्या मुलावर एक जबाबदारी टाकली. सर्व वंशजांची चाचणी घ्यायची. त्यात जर कोणी ही किल्ली शोधण्यालायक आहे का ते बघायचे. पहिल्यांदाच सहा जणांकडे किल्ली शोधण्याची क्षमता आहे हे सिद्ध झाले. ते होताच आजोबांनी सातवी आणि आठवी किल्ली कुठे आहे याचा शोध सुरू केला. बरोबर ना?" पार्थने माधवरावांना विचारले. त्यांनी अस्वस्थपणे मान हलवली.

"कुठे सापडली ती किल्ली मग?" पालवीने विचारले.

"तिथेच.. जिथे ती असायला हवी होती. चंद्रसेनाच्या तैलचित्राच्यापाठी. सहाजण किल्ली शोधणारे जन्माला आले आहेत म्हटल्यावर राखणदाराची जबाबदारी म्हणून लगेचच ती किल्ली प्रकट झाली होती."

"कसं शक्य आहे?" राज म्हणाला.

"माझे आजोबा जी गूढ विद्या शिकून आले होते त्याचा हा सर्वश्रेष्ठ आविष्कार होता. जे जे जा वाड्याशी इमानदारीने बांधले गेले आहेत फक्त आणि फक्त त्यांनाच त्या किल्ल्या योग्य वेळी सापडतील. तसेच राखणदाराकडे एक असणार कारण इतर कोणी चुकले तरी तो चुकणार नाही असा त्यांना विश्वास होता."

"हो.. पण राखणदारानेच घोळ घातला. मला वाटत होतं की मी एकटाच त्यांना हरवू शकेन. राजवर्धनने राघवला शिकवलेले सगळे मंत्र मला मुखोद्गत होते. पण नाही जमलं. ती शक्ती मला वरताण होऊ लागली. मला माघार घ्यावी लागली." माधवराव हताशपणे म्हणाले.

"तोच एक तुमचा योग्य निर्णय होता. आणि दुसरा अयोग्य." पार्थ म्हणाला.

"अयोग्य निर्णय कोणता?"

"भटांना इथे येऊ न द्यायचा. गेले दहा वर्ष तुम्ही एकटेच या सगळ्याला तोंड देत आहात. इच्छा असली तरी आम्ही येऊ शकत नव्हतो." पार्थ म्हणाला.

"आता आलात ना? मग सोडा तो विषय. आणि पुढे काय करता येईल ते ही सांगा." जुई बोलून गेली. सगळे तिच्याकडे बघू लागताच तिने जीभ चावली.

"पुढे कसं काय करणार? कारण शेवटची किल्ली कुठे आहे?" विराजने मुद्दा मांडला.

"ती माझ्याकडे आहे." पार्थ उत्तरला.

"आता तिच किल्ली घेऊन तुम्ही ते दरवाजे उघडणार आहात." एक आवाज येताच सगळे तिथे बघू लागले.

कोण असेल ती व्यक्ती? अंदाज तर तुम्हाला असेलच. बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all