Login

वाड्यात येऊन जा... भाग ७८

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ७८


"आजी, खूप मोठा वाडा होता का?"

"हो रे.. खूप मोठा."

"आपल्या घरापेक्षा किती मोठा?"

"आपली दहा घरे होतील एवढा मोठा."

"एवढे श्रीमंत आहेत ते."

"खूप.."

"मग आपण तिथे कधी जायचं?" हे वाक्य ऐकताच आजीचे आविर्भाव बदलले.

"त्या वाड्याचे नाव काढू नकोस. तो वाडा नाही नरक आहे." आजीने विषय बदलला तरी नातवाच्या मनातून तो विषय गेला नाही. त्याने कसेतरी आजीकडून त्या गावाची माहिती मिळवली. पण वाड्याची किर्ती ऐकून कोणामध्येच त्या वाड्यात जाण्याची हिंमत नव्हती. आजीने सांगितलेली माहिती एका पिढीकडून दुसरीकडे ही माहिती जातच गेली.
राघवनंतर जसजशा पिढ्या पुढे जाऊ लागल्या तसतश्या या शाखेशी त्यांचा संबंध कमी कमी होऊ लागला. त्यातूनच त्यांना पाठवली जाणारी रक्कम पण रोडावली. तसे ते खाऊन पिऊन सुखी होते पण गोदाच्या गोष्टी ऐकून ती शाखा अधिक श्रीमंत आहे हा समज मनात मूळ धरत गेला. त्यांनी आपला हक्क हिरावून घेतला आहे. त्याची पुरेपूर भरपाई करून घ्यायलाच हवी. हा विचार आधी मनात आला विनायकरावांच्या वडिलांच्या. त्यांना जे जमलं नाही ते आपल्या मुलाकडून पूर्ण करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विनायकनेही मग त्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले. त्याने वाड्याविषयी सगळी माहिती मिळवली. त्यात भर दिला वाड्याच्या विखुरलेल्या वंशजांवर. माहिती मिळवताना वाड्यात झालेल्या बैराग्यांच्या हल्ल्याबद्दल त्याला समजले. हळूहळू त्याच्या मनात एक योजना आकार घेऊ लागली. त्याने कालकेय या पंथाचा शोध घेतला. त्या पंथातही हल्ल्यात वाचलेल्या लाखनने सांगितलेल्या कथा माहिती होत्याच. ते सुद्धा इनामदारांवर डूख धरून होते. याचा योग्य तो बदला कसा घ्यायचा याची संधी शोधत होते. त्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांच्या दुर्दैवाने एकही यशस्वी झाला नाही.
त्याचवेळेस त्यांना एक अज्ञात फोन आला आणि इतकी वर्ष बघितलेली वाट सार्थकी लागली. ती व्यक्ती फोन करून काय आणि कसं करायचं ते सांगत होती. हे त्याप्रमाणे आपलं जाळं टाकत होते. त्याचसुमारास जेव्हा माधवरावांकडून तो पिंजर्‍याचा दरवाजा उघडला गेला आहे हे कालकेयाला समजले, तसा यांचा उत्साह अजूनच वाढला. यावेळेस आपणच जिंकणार ही भावना त्यांच्या मनात प्रबळ होऊ लागली. एकेक मोहरे त्यांच्या गळाला लागले. कालकेयाचे ध्येय होते वाड्यातील पिशाचांना आपल्या अंकित करून घ्यायचे. हे करताना ज्यांच्यामुळे त्यांच्या पंथाची हानी झाली आहे त्याच इनामदारांना बळी द्यायचे. तर विनायकरावांना हवी होती इकडची सर्व संपत्ती.. ती ही स्वतःवर कसलेच किटाळ न येता. ते स्वतः कधीच वाड्यात आले नसल्याने इकडच्या भूताखेतांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना फक्त जे वारसदार आहेत त्यांना संपवून सगळं आपल्या नावावर करून हवं होतं. त्यासाठीच जेव्हा इतरांना छळायची परमावधी झाली त्याचसुमारास त्यांनी आजारी पडण्याचे नाटक केले. त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांच्यावर नजर ठेवणार्‍या व्यक्तीने माधवरावांना ती बातमी दिली. आणि विनायकराव विनासायास वाड्यात आले.

इथे आल्यावर मात्र त्यांच्या समजुतीला तडे गेले. वाडा खरंच झपाटलेला आहे याची त्यांना खात्री पटली. कालकेयाशी संपर्क साधून ही योजना बारगळायला सांगायचे अनेकदा त्यांच्या मनात आले पण तेवढा वेळच मिळाला नाही. वाड्यात आल्यापासून मोबाईल दिसलाच नव्हता. आणि लगेचच दुसर्‍याच दिवशी हा कालकेय इथे येऊन उभा राहिला होता. सकाळी पार्थने इतरांना दिलेल्या सूचनेप्रमाणे जेव्हा त्यांनी ध्यान केले तेव्हा विनायकरावांना आपला आधीचा जन्म आठवला होता. आपल्या आधीच्या जन्मातल्या मारेकऱ्याशीच आपण युती केली आहे हा धक्का अजूनही त्यांना पचवता आला नव्हता. जुईकडे बघताना त्यांना जी आपुलकीची जाणीव होत होती त्याचे कारण आत्ता कुठे त्यांना उमजत होते.
आधीच्या जन्मात सईने केलेल्या प्रेमाची जाणीव आता तटस्थ भूमिकेतून तिच्याकडे बघताना त्यांना झाली होती. आपल्यामुळे कुटुंबावर एवढी वाईट वेळ आली तरी आपल्याला वाचवणाऱ्या वडिलांबद्दल त्यांच्या मनात आदर दाटून आला. मागच्या जन्मात केलेल्या चुकांची भरपाई आता करायची असं त्यांनी स्वतःशीच ठरवलं.

"आजोबा.. माझा तर या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही या कालकेयासोबत राहून आम्हाला संपवायची योजना बनवलीत?" राजने दुःखी स्वरात विचारले.

"मी तेव्हा तुम्हाला ओळखत नव्हतो." विनायकराव अपराधी स्वरात म्हणाले.

"ओळखत नसताना योजना बनवणे योग्य आणि ओळखत असताना अयोग्य.. असं काही असतं का?" स्पृहाने विचारले.

"माझी चूक झाली.." विनायकराव म्हणाले.

"त्या चुकीची शिक्षा म्हणूनच तुमच्याकडे किल्ली कधीच येणं शक्य नव्हते." पार्थ म्हणाला.

"पण मग यांना आणलं का इथे?"

"वाड्याचे वंशज बेवारस मरू नये म्हणून." माधवराव म्हणाले.

"तुमचा कौटुंबिक सोहळा संपला असेल तर ही कुलुपे उघडायला सुरुवात करूयात. नाहीतर.." कालकेय चिडला होता.

"कालकेय, मी खरंच सांगतो.. तिला सोड. हवा तेवढा पैसा मी देतो." विनायकराव म्हणाला.

"नाही.. तिच तर या सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ती एकटीच तर इथे कुमारिका आहे." 'कुमारिका' या शब्दावर जोर देत कालकेय म्हणाला.

"आई..." बाळाचा पिंजर्‍यातून आवाज आला. पालवीने पिंजर्‍याकडे बघितलं. एक छोटं बाळ तिथे अडकलं होतं. ते जोरजोरात रडत होतं. त्याला बघून पालवीचा जीव कळवळला.

"माझं बाळ.." मालूला तिचं बाळ बोलावत होतं. क्षणार्धात ती त्या पिंजर्‍याजवळ पोहोचली. तिने हातातली किल्ली त्या पिंजर्‍याला लावली. अजून एक कुलूप निघालं. ते निघताच कालकेय जोरात हसला. आतल्या पिशाचाने पालवीचा हात घट्ट धरला.

"पालवी ऽऽ" राजला समजले तिने काय घोटाळा केला ते. राज पिंजर्‍याजवळ गेला. त्याने पालवीला खेचायला सुरूवात केली. पण त्याची पकड घट्ट होती.

"दरवाजा उघड.. मगच हिला सोडेन." आतून एक विचित्र आवाज आला. राजने पार्थकडे बघितले. त्याने मानेने होकार दिला. नाईलाज झाल्यासारखे दाखवत राजने जवळची किल्ली त्या पिंजर्‍याला लावली. तिसरा दरवाजाही उघडला. जसजसे दरवाजे उघडत होते तसतसे आतील धुरकट आकृती ठळक होत होती. तिचे ते भेसूर रूप इच्छा नसली तरी सतत दिसत होते.

"नीता ऽऽ किती वेळा बोलावले तुला. इथे आली असतीस तर सुखाने राहिलो असतो." पिंजर्‍यातून राकेशचा आवाज येऊ लागताच नीताताईंनी कानावर हात ठेवून घेतले.

"नीता, उघडाल का दरवाजा?" नाटकीपणे कालकेयाने विचारले. त्यांनी नकारार्थी मान हलवताच त्याने जुईच्या गळ्यावरची पकड घट्ट केली. नीताताई पुढे झाल्या. त्यांनी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. त्या पाठी झाल्यावर कोणीच न सांगता स्पृहा पुढे झाली.

"अरे व्वा.. फार लाडकी दिसते आहे ही तुझी? कालमुख, त्या पोरीला माझ्याकडे दे. आणि ए मजनू, तू हो पुढे." कालकेय आर्यनला उद्देशून म्हणाला. जुईच्या गळ्यावर दिसणारा रक्ताचा थेंब बघतच आर्यन पुढे झाला. आर्यन बाजूला येऊन थांबताच पार्थ आणि विराज बाजूला थांबले.

"कालमुख, तयारीला लाग.." कालकेय म्हणाला. त्याने हातातली सुरी ठेवून पिस्तुल घेतली होती. "कोणीही थोडी जरी हालचाल केली तरी एकेकाला उडवेन."

"मी उघडू का दरवाजा?" विराजने विचारले.

"थांब जरा.. माझे विधी पूर्ण होऊ देत." कालमुख विधीची तयारी करू लागला. कालकेयाचे अर्धे लक्ष यांच्याकडे तर अर्धे लक्ष तयारीकडे होते. त्याचे लक्ष नाही हे बघून विराज पार्थच्या बाजूला सरकला.

"पार्थ, मला शाळिग्राम मिळाला आहे." विराज पुटपुटला.

"शाळिग्राम?" पार्थ म्हणाला.

"हो."

"मग मी आधी दरवाजा उघडतो. तू तयारीत रहा."

"मालक, बलीवेदी?" कालमुखाने विचारले.

"ती तर हवीच.." कालकेय खुश झाला होता. आर्यनचा संताप संताप होत होता. त्याला जुईच्या जीवाची काळजी होती. हे सगळं सुरू असताना म्हादबा कुठे गेला आहे, हे त्याला समजत नव्हते. पार्थकडे जर गोविंद भटांची साधने असतील तर तो का वापरत नाहीये, हे त्याला समजत नव्हते. आता त्याला एकदाच संधी मिळणार होती. बलीसाठी जेव्हा तो कालमुख जुईला बाजूला करेल तेव्हा.. तेव्हाच फक्त तो तिला वाचवू शकणार होता.

आर्यन वाचवू शकेल का जुईला? बघू पुढील भागात. तोपर्यंत... मी काहीच बोलणार नाही.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all