Login

वाड्यात येऊन जा... भाग ७९

रहस्य एका वाड्याचे
वाड्यात येऊन जा.. भाग ७९


तो खूप खुश झाला होता. शेवटी समोर सगळेजण होते. त्याचे सर्व जुने शत्रू. फक्त दोन दरवाजे उघडायचे बाकी. आणि मग या सगळ्यांना गिळंकृत करून शतकांची भूक भागवायची. पिंजर्‍याच्या आतून तो बघत होता. पण तो समोरचा काय करतो आहे? तो परत होमकुंड ठेवतो आहे. अच्छा.. याला आपल्याला परत बंद करायचे आहे. पण आता हे होणार नाही. मागच्या वेळेस गाफील राहिलो म्हणून त्याने या पिंजर्‍यात कोंडले. आता नाही. हे दोन दरवाजे उघडताच मी यांच्यावर झडप घालणार.

"जा.. उघड दरवाजा." कालकेयाने विराजला हुकूम सोडला.

"तो दरवाजा त्याच्याकडून नाही उघडणार. आधी मी उघडू का?" पार्थ मध्येच बोलला.

"तुला काय माहित?" कालकेयाने संशयाने विचारले.

"लिहिलेलं होतं माझ्या घरी." पार्थने थाप मारली.

"मालक, काय फरक पडतो कोणीही दरवाजा उघडला तरी?" कालमुख म्हणाला.

"बरं.. उघड तू." कालकेय म्हणाला. "काही चलाखी करायचा प्रयत्न करू नकोस. परत एकदा सांगतो आहे." पार्थ पुढे झाला. खिशातली किल्ली काढायला म्हणून त्याने खिशात हात घातला. त्याने खिशातलं चूर्ण सगळीकडे उधळले. तिथे अंधार झाला. संधीचा फायदा घेऊन आर्यनने कालकेयाच्या हातावर लाथ मारली. त्याच्या हातातले पिस्तुल खाली पडले. आर्यनने ते उचलून खिशात ठेवले. त्याने आधी जुईचे हात सोडवले. हातांवर वळ उठले होते. त्याने तिचे हात चोळले.

"ओके आहेस का तू?" आर्यनने विचारले.

"हो.." जुई अजून काही बोलणार तोच त्यांचा आवाज ऐकून कालमुख त्यांच्या दिशेने पळत येताना दिसला.

"अहो.." नकळत जुईच्या तोंडून शब्द बाहेर पडले. आर्यन हसला. त्याने येणाऱ्या कालमुखाच्या रस्त्यात पाय टाकला. तो स्वतःला सांभाळू शकला नाही आणि जोरात पडला. तोवर पार्थ यांच्याजवळ आला.

"आर्यन, या सगळ्यांना वर घेऊन जाशील?"

"नाही.. याचा तर मला बदला घ्यायचाच आहे. तू राजला सांग."

"कोणीही जा.. पण निघा इथून. आता काही काळ इथे काय होईल सांगता येत नाही." पार्थ घाईत म्हणाला.

"काहीही होईल म्हणजे?" जुईने विचारले.

"ते मी कसं सांगू? पण लवकर आटपा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे." पार्थ घाई करत म्हणाला.

"मी यांना सोडून कुठेही जाणार नाहीये." जुई म्हणाली.

"कोणाला कुठे जायचं आहे?" तेवढ्यात स्पृहा देखील कशीतरी वाट काढत आली.

"या सगळ्यांना घेऊन बाहेर जायचे आहे मॅम."

"मग?"

"मी यांना सोडून कुठेही जाणार नाही."

"पार्थ, काय चालू आहे नक्की?"

"थोड्या वेळात ही जागा धोकादायक होणार आहे. तुम्ही बाकीच्यांचा जीव वाचवा."

"असं असेल तर मी ही इथेच थांबते."

"जे करायचं आहे ते करा. मी जातो. माझ्याकडे वेळ कमी आहे." पार्थ घाईत तिथून निघाला. त्याच्या पाठोपाठ स्पृहाही गेली. आर्यन मनाशीच चरफडला.

"म्हादबाकाका कुठे गेले आहेत?"

"आलो बाबा.." म्हादबा कुठूनतरी तिथे आला.

"काका, तुम्ही या सर्वांना घेऊन बाहेर जाता का?" जुईने विचारले.

"मी कुठेही जाणार नाही. माझी चूक मी आता निस्तरणार आहे." विनायकराव ठामपणे म्हणाले. ते एका कोपर्‍यात जाऊन बसले. कालकेयाकडून भानू जे मंत्र शिकला होता, ते मंत्रोच्चार करताच त्या पिशाचशक्तीचे रूप अजून ठळक झाले. हातातला डाव निसटतो आहे हे बघून कालकेय पिसाळला. आपल्या बाहेर उभ्या असलेल्या फौजेला बोलावण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले. तो आवाज ऐकून म्हादबा घाईघाईत बाहेर पडला.

"मी आलोच त्यांचा समाचार घेऊन."

"मी त्याच्या मदतीला जातो." राज त्याच्या पाठोपाठ निघाला. त्याच्या हातात पार्थने दिलेला गोळा होता. तो छोटासा गोळा मेणबत्तीसारखे काम करत होता. राजच्या पाठोपाठ पालवी आणि नीताताई सुद्धा गेल्या. हे सगळे बाहेर गेल्यानंतर थोड्याच वेळात बाहेरून लोकांचे ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काय चालू आहे हे बघायला आर्यन धावतच बाहेर गेला. कालमुख आणि कालकेय हे दोघेच आत आले होते. त्यांची माणसे बाहेरच थांबली आहेत हे बघून म्हादबाने मगाशीच सगळी तयारी केली होती. त्याने वाड्याच्या दरवाजातून तेल बाहेर सोडले होते. धावत येणारे सर्वजण त्या तेलावरून घसरून पडत होते. त्यानंतरही जे पुढे येण्यात यशस्वी होत होते त्यांना दगड वर्षावाला तोंड द्यावे लागत होते. राज, पालवी त्याला मदत करत होते.
बाहेरची आघाडी बरोबर चालू आहे हे बघून आर्यन परत आत आला. मगाशी झालेला अंधार आता नाहीसा झाला होता. त्याला दिसले ते, पार्थने अभिचाराची मांडणी केली होती. राजवर्धन त्याला मदत करण्यासाठी उभा होता. कालमुख, जो खाली पडला होता त्याला स्पृहा आणि जुईने बांधले होते. आपली कुमक आत येऊ शकली नाही यामुळे कालकेय चिडला होता. माधवराव अजूनही तसेच बसले होते. विनायकरावांच्या मंत्राने ती शक्ती मात्र विस्तारत चालली होती. कालकेय चिडला. मगाशी खिशात ठेवलेला सुरा त्याने काढला. तो सुरा घेऊन तो विनायकरावांच्या दिशेने निघाला. आर्यनने ते बघितले. त्याला आठवला भानूचा झालेला वध. आर्यन कालकेयाच्या दिशेने पळाला. कालकेय सुरा विनायकरावांना मारणार त्याआधी आर्यनने कालकेयाला लाथ मारली. त्या अनपेक्षित लाथेने कालकेय धडपडला. थेट पिंजर्‍याच्या इथे जाऊन पडला. आधीचे सहा दरवाजे उघडल्याने आतल्या पिशाचावरील बरीचशी बंधने कमी झाली होती. त्याने कालकेयाला आत ओढले. कालकेय जोरात ओरडू लागला. त्या शक्तीने आपले तोंड उघडले. आणि कालकेयाचा घास घेतला. ते भयानक दृश्य बघून जुई आणि स्पृहाने डोळे मिटून घेतले. पार्थदेखील त्याने शहारला. पण या सगळ्याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याने अभिचाराची तयारी सुरू केली. त्याला राजवर्धन मदत करत होता. आर्यन हे सगळं बघत होता. आधी झालेलं हे सगळं त्याला आठवत होतं. त्यावेळेस आल्या तश्या अडचणी परत येऊ नये याची त्याला काळजी घ्यायची होती. पिंजरा आता आतून जोरजोरात खडखडत होता. काही सावल्या इथून तिथून फिरू लागल्या होत्या. पार्थने होमकुंड पेटवले. त्याआधी विराजने ती जागा पार्थने दिलेल्या गोमूत्राने शिंपडून घेतली होती. पार्थ येईपर्यंत त्याने तिथे अष्टगंधाने मंडल रेखाटले होते. होमकुंड पेटवताच मगाशी फिरत असणाऱ्या सावल्या त्या होमकुंडात जाऊन नष्ट होऊ लागल्या. एकेक सावली त्यात नष्ट होताच पिंजर्‍यातली आकृती जोरात किंचाळत होती. पार्थचे विधी पूर्ण होताच विराजने त्याची जागा घेतली. विराजचे मंत्रपठण सुरू होताच पार्थने आपल्या किल्लीने अजून एक दरवाजा उघडला.

आतली शक्ती त्याचा घास घ्यायला टपली होती. तेवढ्यात तो पाठी झाला. आता फक्त शेवटचा दरवाजा बाकी राहिला होता. सगळे श्वास रोखून विराजकडे बघत होते. त्याने शेवटची समिधा होमकुंडात टाकली. होमकुंडाला नमस्कार करून तो तिथून उठला. थरथरत्या हाताने त्याने तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडला जाताच त्या शक्तीने विराजवर झेप घेतली. विराजने डोळे घट्ट मिटले. स्पृहा जोरात ओरडली.
पण ती आकृती विराजवर पडताच परत एक भीषण किंकाळी ऐकू आली. विराजने डोळे उघडले. त्याला काहीच झाले नव्हते. पण त्याच्या खिशातून निळसर प्रकाश बाहेर येत होता. त्याने खिशात हात घातला. शाळिग्राम निळ्या प्रकाशाने उजळून निघाला होता. ते दुखावलेले पिशाच जुईच्या दिशेने वळले. पार्थने लगेचच आर्यनला आवाज दिला. आपल्याकडची चांदीची तलवार त्याने आर्यनकडे फेकली. ते पिशाच पुढे येताच आर्यनने ती तलवार त्याच्यावर चालवली. इतके बळी घेऊन मिळवलेली सर्व शक्ती जाताच ते पिशाच शक्तीहीन झालं होतं. आर्यन काय करतो आहे हे बघण्यात गुंग असलेल्या विराजला स्पृहाचा धक्का लागला आणि त्याच्या हातातला शाळिग्राम तसेच स्पृहाच्या हातातील गोलक एकदम खाली पडले. आणि त्याने वाडा थरारला. एखादा स्फोट व्हावा तशी जमीन थरथरली आणि मोठी भेग पडली.
काय होते आहे हे समजायला सगळ्यांनाच वेळ लागला. काय झालं आहे हे समजताच पार्थने आर्यनला परत खुणावले. तलवारीचा उपयोग करत आर्यनने ते पिशाच त्या भेगेत ढकलले. ते त्या भेगेत पडताच ती भेग आश्चर्यजनक पद्धतीने परत बंद झाली. आणि इतका वेळ घुसमटलेले वातावरण एकदम मोकळे झाले.


काय वाटतं, काय असेल कथेचा शेवट?अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all