Login

वहिनीचा आदर भाग-१

वहिनीचा आदर तिला देणे गरजेचे असते.
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: वहिनीचा आदर भाग-१

" आपण आज बाहेर जेवायला जाऊया." तो म्हणाला.

" असे आपण दोघेच बाहेर जेवायला गेलेले चालणार आहे का?"  तिने विचारले.

गावी राहत असलेली विभा लग्न झाल्यावर ती शहरामध्ये आली होती. थोडीशी लाजाळू अन् संस्कारी मुलगी आणि त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली. त्यामुळे विकासच्या आईने सून म्हणून तिला पसंत केली होती.

" वहिनी, तुम्ही काय बाहेर फिरायला जात आहात का?" विकासच्या बहिणीने विचारले.

" हो, म्हणजे हे बोलत होते."  ती हळुवारपणे म्हणाली.

" मला सुद्धा आज कंटाळा आला आहे. मी पण येऊ का?"  विकासची बहीण सुनंदा विचारत होती.

विकासला आता बहिणीने विचारले, त्यामुळे त्याने सुद्धा तिच्यासोबत पूर्ण कुटुंबाला सोबत नेण्याचे ठरवले.

थोडेफार विभाला ड्रेस वगैरे घेतलेले होते, कारण तिच्याकडे सर्व साड्या होत्या, हे त्याने बघितलेले होते. आपल्या बहिणीला तिला मदत करण्यासाठी त्याने सांगितले होते.

बहिणीला मदत करत असताना सुद्धा वहिनीला ड्रेस घ्यायला मदत करत असताना सुनंदाने स्वतःसाठी सुद्धा ड्रेस घेतले होते.

अधून मधून सुनंदा माहेरी येत असायची.

एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचा लाड फार व्हायचा. तिचे मन दुखवू नये, म्हणून सर्वजण काळजी सुद्धा घ्यायचे.

तिथून पुढे जेवायला गेल्यावर सगळेजण आपल्याला पाहिजे, तसे जेवणाची ऑर्डर देत होते.

सर्व स्त्रिया एका बाजूला बसलेल्या होत्या आणि पुरुष मंडळी एका बाजूला बसले होते.

त्याप्रमाणे विकासची आई, बायको आणि बहीण एका बाजूला, तर विकास, त्याचे वडील, तसेच सुनंदाचा नवरा एका बाजूला असे बसले होते.

" विभा, तू काय खाणार आहेस ?" विकासने आपल्या बायकोला विचारले.

"तुम्ही सर्वजण जे खाल त्यातलेच मी थोडफार खाईन." ती शांतपणे म्हणाली.

असं कधी प्रत्येकाला वेगळं पाहिजे, असं तिच्या घरामध्ये तिने बघितले नव्हते. तसेच तिच्या घरी सर्वांनी मिळून एकत्र कुठे बाहेर ढाब्यावर गेल्यावर एकच जेवणाचा पदार्थ घेऊन तेच सर्वजण खात होते, त्यामुळे तिला पटकन आपण काय बोलावे समजत नव्हते.

तिने असं बोलल्यावर, सुनंदा हसायला लागली.

विकासला तर रागच आला होता. ठीक आहे, ती साधी आहे ; पण म्हणून याच्यावर हसण्यासारखं काय होतं. बाहेर जेवायला आल्याने तो शांत राहिला.

थोड्या वेळाने सर्वजण आपल्याकडे बघत आहेत, असे बघून सुनंदा शांत बसली.

स्टार्टरला सुनंदाला आवडतात म्हणून ड्राय मंचुरियन मागवले होते. तसेच पनीर क्रिस्पी सुद्धा मागवली होती. सगळेजण काट्याच्या चमच्याने खात होते. त्या सर्वांना बघून विभाला थोडेसे टेन्शनच आले होते. कारण तिला हे असं चमच्याने खाणे जमत नसायचे.

सगळ्यांना भूक लागली होती, म्हणून सगळेजण खाण्याच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत होते, परंतु तिला नजरेने तो कसा खातो आहे, ते त्याच्या हाताकडे बघून काट्याच्या चमच्याने हळू कसे तोडून खायचे आहे; हे तो दाखवत होता.

तिने सुद्धा प्रयत्न केला, परंतु थोडासा मध्ये मंचुरियन कापताना बाजूला गेला आणि ते बघून सुनंदा पुन्हा हसायला लागली.

" ठीक आहे, तुला खाता येत नसेल तर तू हाताने सुद्धा खाऊ शकतेस."  विकासचे बाबा म्हणाले.

मग तिने कसेतरी मान खाली घालून जेवण जेवायला सुरुवात केली.

" कठीणच आहे बाबा, हिला तर सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागणार." जेवण झाल्यावर विकासच्या आईने विभाला टोमणा मारला.

ते ऐकून हळव्या मनाच्या विभाच्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते, परंतु कोणी ते बघू नये आणि रडल्यावरून अजून कोणी काही बोलायला नको; म्हणून तिने पटकन आपल्या रुमालाने डोळे पुसले.

पुढे आईस्क्रीम खाण्याचा बेत ठरला होता. प्रत्येकाला फ्लेवर विचारून ते ऑर्डर करत होते. सर्दीचे कारण सांगून विभाने आपल्यासाठी आईस्क्रीम घेतले नव्हते.

सुनंदा आपल्या नवऱ्यासोबत आपल्या घरी निघून गेली, तर विकास, त्याचे आई-वडील आणि विभासोबत आपल्या घरी निघून आला.

" तुला आईस्क्रीम आवडत नाही का?"  त्याने विचारले.

" नाही, असे काही नाही. ते सर्दी होईल ना; म्हणून मी त्यासाठी नाही म्हणाले." ती शांतपणे म्हणाली.

आपल्याबद्दल त्याने विचार केला, म्हणून तिला बरे वाटले.

क्रमशः

विभाचे पुढे काय होईल?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all