Login

वहिनीचे माहेर (भाग:-१)

वहिनीचे मन जाणून घेऊन तिला माहेर असतं हे याची जाणीव करून देणारी कथा

#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५

विषय:- ननंदबाई येती घरा

शीर्षक:- वहिनीचे माहेर

भाग:- १

'टींग टाॅंग' दारावरची बेल वाजली. किचनमध्ये काम करणारी रूपल पदराला हात पुसत बाहेर आली. तिने दार उघडले तर तिची ननंद आस्था हसत मुखाने दारात उभी होती.

"वन्स, तुम्ही तर उद्या येणार होतात ना? " रूपल नाराज चेहरा करत म्हणाली.

"हो वहिनी, पण म्हटलं सरप्राइज द्यावे तुम्हाला? पण मी आलेले आवडले नाही वाटतं तुम्हांला ?" आस्था थोडी रागावल्यासारखी तोंड फुगवत तिला म्हणाली.

"छे हो, वन्स ! असं काहीचं नाही." रूपल कसंनुस हसत म्हणाली.

"तुमच्याकडे बघून तर तसं तसंच वाटतं आहे. काही झालं आहे का? " आस्था तिचा चेहरा न्याहाळत म्हणाली.

"नाही ओ, तसं खरंच काही नाही." सावरासावर करत रूपल म्हणाली.

"कोण आलंय गं, रूपल?" तिची सासू मंगलने तिच्या रूममधून बाहेर येत तिला विचारले.

"वन्स आलेत, आत्या." तिने पाठीमागे वळून तिला सांगितले.

"अगं बाई, आस्था आली का? अगं मग तिला दारातच उभे ठेवणार का? तिला आत तर घे.‌" मंगल तिला रागवत म्हणाल्या.

"अरे देवा! मी पण किती मूर्ख आहे ना! कधीपासून तुम्हाला दारातच थांबवून बोलतेय. साॅरी हं, वन्स ! या ना, आत या." रूपल स्वतःच्या कपाळावर हात मारत जीभ चावत तिला म्हणाली.

"हरकत नाही, वहिनी.‌" आस्था हसत तिला म्हणाली आणि आत आली.

"तुम्ही आत्यांशी बोला, मी आलेच." असे म्हणत रूपल किचनमध्ये निघून गेली.

ती जाताच आस्थाने खुणेनेच मंगलला काही झाले का म्हणून विचारले. तर तिने मला माहिती नाही या अर्थाने खांदे उडवले.

रूपल पाणी घेऊन आली आणि तिला देऊन जात होती तर आस्था तिला थांबवत म्हणाली, "वहिनी, बसा ना, थोडा वेळ."

"नाही नको, तुमच्या चहाचं बघते ना मी. आत्या आहेतच की, तुम्ही बोला त्यांच्याशी." रूपल बसण्यास नकार देत म्हणाली.

"अगं, नंतर घेईन मी चहा, आता इच्छा नाही माझी चहा घेण्याची. बसं बरं. दादा, कुठे आहे? " ती तिला हाताला धरून बसवत म्हणाली.

"बरं बसते. ते घरात नाहीत. त्यांची महत्त्वाची मिटिंग आहे म्हणून ते सकाळीच लवकर गेलेत." रूपलने आयुषबद्दल तिला सांगितले.

"अच्छा, पण आता तर दिवाळीच्या सुट्ट्या असतील ना. तरीही तो ऑफिसला गेलाय ! आता काय तो लवकर येत नसतो." आस्था विचार करत म्हणाली.

"हो, सुट्ट्याच आहेत. पण महत्त्वाची मीटिंग आहे. झालो की येतो म्हणालेत." रूपल म्हणाली.

"बरं. वहिनी, तुला काय झालंय गं? तब्येत बरी नाही का तुझी? " रूपल तिचा हात हातात घेत मनापासून विचारले.

क्रमशः

काय झालं असेल ते रूपल सांगेल का आस्थाला?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all