#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५
विषय:- ननंदबाई येती घरा
शीर्षक:- वहिनीचे माहेर
भाग:-२
आस्थाने विचारताच रूपलला दाटून आलं. ती लगेच हात सोडवत काही नाही म्हणत लगबगीने तिथून निघून गेली.
त्यावरून आस्थाच्या लक्षात आले की तिचं काही तरी बिनसले आहे. तिने मंगलला विचारले,"आई, तू काही म्हणालीस का वहिनीला? "
"नाही बाई, मी कशाला काय बोलू? मीही तिचा पडका चेहरा पाहून सकाळीच विचारले तर तिने मलाही काहीच नाही असे म्हणाली. दोघा नवरा-बायकोमध्ये काही तरी झालं असेल. जे तिला सांगायला नसेल. म्हणून मी तिला जास्त खोदून विचारले नाही." मंगलने स्पष्टीकरण दिले.
"असं कसं म्हणतेस, आई? तिच्या जागी मी असते तरी तू असंच स्पष्टीकरण दिले असतेस का? " आस्थाला मंगलचे स्पष्टीकरण पटले नाही म्हणून ती तिला जाब विचारल्यागत म्हणाली.
"ए बाई, तुला सांगितले ना, मी विचारले होते म्हणून. तिने सांगितले नाही त्याला मी काय करू? जा तूच जाऊन विचार मग. बघ तुला तरी सांगते का?" मंगलला तिचा राग आल्याने तिला रागात म्हणाली आणि उठून गेली.
"ही आई पण ना.." आस्था नकारार्थी मान डोलावलत रूपलच्या रूमकडे जायला निघाली.
आस्था आणि रूपल दोघी जरी ननंद भावजय असल्या तरी एकमेकांशी चांगल्या मैत्रिणी सारख्या वागत होत्या. आस्था आल्यावर नेहमी ती तिचं आनंदाने, उत्साहाने स्वागत आणि पाहुणचार करायची. पण ह्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर तिला तो उत्साह आणि आनंद दिसत नव्हता. उलट तिचा कोमेजलेला चेहरा पाहून तिला नक्कीच काहीतरी झालं हे लक्षात आले होते. सासूसवास करेल अशी सासू तर मंगल नव्हती हे याची खात्री आस्थाला आई मंगलबद्दल होती. म्हणजे नक्कीच आयुष आणि रूपल मध्येच काही तरी झाले असेल. पण काय हे जाणून घेऊन त्यावर तोडगा काढायचे तिने ठरवले.
ती रूपलच्या रूमचा दरवाजा ठोटावत म्हणाली,"वहिनी, आत येऊ का?"
रडणाऱ्या रूपलने पटकन डोळे पुसत होकारार्थी मान हालवत तिला येण्याचा इशारा केला.
तिच्या ओलावल्या पापण्या आस्थाच्या नजरेतून सुटले नाही.
"वहिनी, तू रडत का होतीस?" आस्थाने काळजीने तिला विचारले.
"नाही ओ वन्स. ते जरा डोळ्यांत कचरा गेला होता." ती नाक ओढत म्हणाली.
"नाही वहिनी, तू खोटे बोलतेस. मी ननंद म्हणून नाही मैत्रीण म्हणून विचारतेय. खरं खरं सांग. तुला माझी शपथ आहे." आस्थाने तिचा हात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणाली.
"अहो, वन्स काय हा वेडेपणा ! सांगते मी आता शपथ सुटली बोला." रूपल तिचा हात काढून घेत म्हणाली.
आस्थाने डोळे मिटून श्वास घेत पुन्हा उघडले आणि तिने सांगायला सुरुवात केली. ती जसं सांगत होती तिचा राग वाढत गेला.
क्रमशः
रूपलने असे काय सांगितले की आस्थाला राग आला?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा