#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५
विषय:- ननंदबाई येती घरा
शीर्षक:- वहिनीचे माहेर
भाग:-३ (अंतिम)
आस्थाने डोळे मिटून श्वास घेत पुन्हा उघडले आणि तिने सांगायला सुरुवात केली. ती जसं सांगत होती तिचा राग वाढत गेला.
तिने मनोमन काय बोलायचे ते ठरवले. ती तिला म्हणाली,"वहिनी तू काही काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल."
थोड्यावेळाने आयुष घरी आला. समोर आस्थाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. तिच्याजवळ येत तो म्हणाला,"कधी आली? कशी आहेस? "
"मी ठीक आहे. चल लवकर फ्रेश होऊन ये. तुला ओवाळले की पटकन निघायचे आहे मला." ती चेहरा पाडत कोरड्या स्वरात म्हणाली.
"अगं, एवढी घाई काय आहे? आता तर आलो ना मी. थोडा वेळ बोलू मग ओवाळून घे की." तो हसत म्हणाला.
"नाही जमणार मला थांबायला. तिकडे वाट पाहत असतील. असं ही इकडे यायचं म्हटलं की माझ्या सासरच्यांच आणि नवऱ्याच तोंड वाकडं होतं." ती उदास चेहरा करत म्हणाली.
"काय ! पण का गं? " त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहत आश्चर्याने विचारले.
"त्यांच म्हणणं आहे की शे-पाचशे नाही तर एका साडीसाठी दोन हजार रूपये खर्च करून कशाला जातेस? त्या पेक्षा न गेलेलं बरं. भांडण करून आले मी यावेळीही." ती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.
"असे कसे म्हणतात ते? पैसे किंवा साडीचा प्रश्न कुठे येतो? आपल्या भाऊ बहिणीचे प्रेम असे कसे ते पैशात तोलतात? इतक्या दिवसात तू एका शब्दानेही सांगितले नाहीस हे. थांब, आताच भाऊजींना फोन करून विचारतो." रागात खिशातील मोबाईल काढून नंबर डायल करत म्हणाला.
"थांब दादा, फोन लावून नकोस त्यांना." ती त्याच्या हातातील मोबाईल काढून घेत म्हणाली," बघ दादा, तुला मी फक्त सांगितलेत तर तुला इइतका राग आला आणि वाईट वाटलं. मग तेच जेव्हा तू वहिनीला बोललास तेव्हा तिला किती वाईट वाटले असेल."
आयुष खाली मान घालून ऐकत होता. त्याच्या नजरेसमोर तिचा सकाळचा रडका चेहरा तरळून गेला.
"काय झालं, दादा? गप्प का आहेस? तू ही वहिनी आणि तिच्या भावाचे प्रेम पैशात तोललेस ना रे?" आस्था त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देत म्हणाली.
ओशाळून मान खाली घालून तो म्हणाला,"हो गं, खरंच चुकलंच माझं. मी तिला असं बोलायला नको होतं."
"ते मला नको म्हणूस तिला म्हण. दादा, जसं तुझ्या बहिणीचं माहेर असतं, तसंच तुझ्या बायकोचं म्हणजे माझ्या वहिनीचेही माहेर आहे विसरू नकोस. भलेही तिचं माहेर गरीब असेल. पण त्यात प्रेमाची, मायेची श्रीमंती आहे रे, जे पैशांत तोलता येत नाही. जा आधी तिला मनवं. मी वाट पाहते." आस्था त्याला मायेने समजावत म्हणाली.
तो डोळ्यातले पाणी पुसत तिच्या गळ्यात पडत म्हणाला,"माझी छोटी आस्था किती मोठी झाली! किती छान समजावून सांगितले गं. थॅंक्यू."
त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले व रूपलला मनवायला गेला.
रूपलने आस्थाला आयुषचे वागणे, बोलणे सांगितले होते. तेव्हा तिने ठरवले होते की त्याला चुकीची जाणीव करून द्यायची ते तिने केले.
थोड्यावेळाने तो आणि रूपल बाहेर आले. आता तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिने डोळ्यांनेच तिचे आभार मानले. तिचा आनंद पाहून आस्थाच्या चेहऱ्यावरही समाधान पसरले.
नंतर आस्थाने आयुषला ओवाळले. त्याने ओवाळणी देवू केली तर ते घेण्यास नकार देत ती म्हणाली,"मला ओवाळणी मिळाली, दादा. वहिनीच्या चेहऱ्यावरील आनंद लाख मोलाची ओवाळणी आहे. आणि हो दादा, मगाशी मी जे माझ्या सासर आणि नवऱ्याबद्दल बोलले ते मी तुला कळावं म्हणून बोलले. ते खूप चांगले आहेत."
ती डोळे मिचकावत हसू लागली. सगळेच हसू लागले. आपल्या लेकीचे मंगलला कौतुक वाटले.
समाप्त-
प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ असते. तिच्या माहेरची तुलना पैशात करू नका. आस्थासारखी ननंद असावी जी वहिनीच मन समजू शकेल.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा