वैदेही भाग ३
" आई, राघव आला होता का? गाडीचा आवाज ऐकू आला मला.." वैदेहीने विचारले..
त्यावर काय बोलावे ते राघवच्या आईला, कौसल्याबाईंना सुचेना..
" हो.. पण तो गेस्टरूममध्ये जाऊन झोपला आहे.. त्याला बरे वाटत नव्हते. तुला इन्फेक्शन व्हायला नको असे म्हणाला.." त्या कसेबसे म्हणाल्या.
"मी बघते.." वैदेहीने मनाशी ठरवले आणि ती गेस्टरूमच्या दिशेने गेली..
" वैदेही.." कौसल्याबाईंनी हाक मारली.. " तू समजूतदार आहेसच.. खरेतर मी तुला जास्त काही सांगायला नकोच.. पण तरिही.. राघवचा मूड आज चांगला नाहीये. थोडे समजून घे.." वैदेहीने मान हलवली आणि पुढे गेली.. दरवाजा आतून बंद केला होता.
" राघव, दरवाजा उघड.."
" मला आता बरे वाटत नाही.. आपण नंतर बोलू.."
" तुला जेव्हा बोलावेसे वाटेल तेव्हा सांग. मी इथेच उभी आहे.."
" काय हा हट्टीपणा?" राघवने दरवाजा उघडला.. त्याने कपडेही बदलले नव्हते.. विस्कटलेले केस.. रडून लाल झालेले डोळे.. त्याला तसे बघून वैदेहीच्या पोटात तुटले..
" काय झाले? नाही का सांगणार मला?" तिने त्याला जवळ घेतले..
" तू थोडे दिवस जाशील का सौमित्रकडे रहायला?" तो तिच्या कुशीत रडत म्हणाला..
" काय?"
" तू थोडे दिवस तुझ्या आईकडे रहा. मग ये ना परत?"
" का? कशासाठी?"
राघव आता बराच सावरला होता..
" त्या रजतने ऑफिसमध्ये स्टाफला तुझ्याविरूद्ध काही सांगितले आहे. त्याने त्यादिवशीचे काही फोटोही काढले आहेत. लोक तुझ्याबद्दल काही बोललेले मी नाही ऐकू शकत.. माझी उगाचच चिडचिड होणार.. त्यापेक्षा तू तिथे जा. हे सगळे शांत झाले कि परत ये.."
" आणि परत असे एखादे प्रकरण झाले कि परत पळून जा.. आणि प्रकरण शांत नाही झाले तर येऊच नकोस.. बरोबर?" वैदेहीचा बदललेला सुर राघवसाठी नवीन होता.
" मला असे नव्हते म्हणायचे. थोडे समजून घे ना मला. तुझ्यावर कोणी शिंतोडे उडवलेले नाही चालणार मला."
" समजून घे ना.. फक्त मीच समजून घ्यायचे? तू दोन वर्ष इथे नव्हतास, मी तुझ्या आईवडिलांची इथे सेवा करत होते तेव्हाही मीच समजून घेतले.. हट्ट करू शकले असते कि मी ही येते तुझ्यासोबत.. पण नाही त्यांची काळजी घेणे हे कर्तव्य समजून मी राहिले इथे.. मी नाही विचार केला कि तू तिथे मी नसताना काय करतो आहेस.."
" वैदेही प्लीज.. मी तुझ्याशिवाय दुसर्या कोणाचाच विचारही करू शकत नाही.."
" मग तुला काय म्हणायचे आहे, मी करते? त्या दिवशी टेन्शन आणि पावसात भिजल्यामुळे मला चक्कर येत होती.. म्हणून त्या ड्रायव्हरने मला फक्त आधार दिला तर त्या दिवसापासून तुझे वागणे लगेच बदलले.. तुला काय वाटले मला कळत नाही. पण माझे प्रेम वरचढ ठरले.. आणि तुझे?"
" वैदेही.. माझेही प्रेम आहेच.. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे कि तू काही दिवस तिथे जा. वातावरण शांत झाले कि परत ये.."
" हा तुझा शेवटचा निर्णय आहे?"
" निर्णय असे का म्हणतेस?"
" मला फक्त हो कि नाही उत्तर हवे आहे.."
" तू थोडे दिवस इथून लांब जावेस, असे मला खरेच वाटते.."
" बरे.. मी निघाले.."
" आता? "
" जिला बाहेरच पडायचे आहे, तिच्यासाठी दिवस काय आणि रात्र काय? सारखेच.."
"वैदेही आता कुठे जाणार तू?"
" बघितलेस? कुठे जाणार हे शब्द आले तुझ्या तोंडून.. ठिक आहे.. कसे , कुठे जायचे हे मी बघते.. तू नको काळजी करूस.. "
" वैदेही.."
बाहेर कौसल्याताई हे सगळे ऐकत होत्या.. " वैदेही शांत हो.. तो चुकीचे वागतो आहे म्हणून तू वागू नकोस.. तू आराम कर आता.. मी बोलते त्याच्याशी उद्या.." वैदेही तिच्या खोलीत निघून गेली.. खूप रडायला येत होते तिला.. \"मी हे नाही सहन करू शकत.. कोणीतरी काहीतरी बोलणार म्हणून हा माझा नवरा मला दूर जाण्याचा सल्ला देणार.. नाही.. \" तिने आपली बॅग भरायला घेतली.. तिचे स्त्रीधन फक्त सोबत घेतले.. राघवसाठी तिला एक चिठ्ठी लिहून ठेवावीशी वाटली.. पण तिने टाळले.. तशीच खुर्चीत बसून तिने पहाट होण्याची वाट पाहिली.. तिला माहित होते कि राघवही तिथे जागा असेल.. पण त्याचा उपयोग तर काहीच नाही ना.. पुढे काय करायचे हाच विचार ती करत होती.. परदेशी तर तिला या अवस्थेत जायचे नव्हते.. तिने घड्याळ पाहिले.. पाच वाजले होते.. ती हळूच बॅग घेऊन बाहेर पडली.. राघवच्या खोलीचा दिवा अजूनही चालूच होता.. बाहेर येऊन तिने गाडी सुरू केली.. गाडीचा आवाज ऐकताच राघव ताडकन उठला.. तसाच बाहेर आला.. पण तोपर्यंत वैदेही निघून गेली होती.. त्याने ताबडतोब तिला फोन केला.. तिने पहिल्या रिंगमध्येच उचलला.. त्याला बोलायची संधी न देता समोरून आवाज आला..
" मी आजचा दिवस गाडी घेऊन जाते आहे.. रात्री लोकेशन सांगेन तिथून तू ती कलेक्ट करू शकतोस.. आणि तू रूम चेक करू शकतोस मी फक्त माझे स्त्रीधन घेऊन निघाले आहे.. अजून एक आता प्लीज मला परत फोन करू नकोस.." वैदेहीने फोन ठेवून दिला..
तिने ओठ घट्ट मिटून घेतले होते.. राघव तिथे वेड्यासारखा वैदेही वैदेही करून ओरडत होता.. त्याचे ओरडणे ऐकून कौसल्याताई बाहेर आल्या.. काहीतरी अशुभ घडल्याचे त्यांना जाणवले होते.. त्यांनी राघवला हात धरून घरात नेले.. दोघेही हॉलमध्ये सुन्नपणे बसून होते.. राघवचा फोन वाजला.. सौमित्र होता..
" बोल.."
" दादा तू फेसबुक पाहिले?"
" नाही. का?"
" त्यावर वहिनीचे फोटो व्हायरल झाले आहेत.. बहुतेक त्या दिवशीचे.." सौमित्रचा स्वर अपराधी होता.. "वहिनी आहे का तिथे? मी बोलतो.."
" ती गेली निघून.." राघवने फोन कट केला.. त्याने फेसबुक उघडले.. वैदेहीचे ड्रायव्हरसोबतचे चारपाच फोटो होते.. त्याखाली खूप कमेंट्स येत होत्या.. राघवने फोन फेकला आणि तो निघून गेला तिथून..
कौसल्याताईंनी सौमित्रला फोन लावला.. " सौमित्र, तू येऊ शकशील इथे लवकरात लवकर?"
"आई मला थोडा वेळ दे.. मी इकडची व्यवस्था करून येतो.."
वैदेहीने उर्मिलाला फोन केला..
" उर्मी , मला तुझी मदत हवी आहे.."
" बोल.. मी तुला आज फोन करणारच होते. "
" मला वचन देऊन. तू हे सौमित्रला सांगणार नाहीस.."
" ताई तो माझा नवरा नंतर आहे.. आधी तू माझी बहिण आहेस.."
" ऐक, मी एक घर शोधणार आहे.. त्याचे तुला पैसे भरावे लागणार आहेत.. सध्यातरी माझ्याकडे फक्त माझे दागिनेच आहेत.. ते कॅश करून घ्यायला थोडा वेळ लागेल.. तू फक्त मी सांगेन तिथे पैसे पाठवशील का? मला राघवचे पैसे नाही वापरायचे.."
" ताई.. अशी का बोलते आहेस? माझे आणि तुझे पैसे वेगळे आहेत का? आणि तू जर विसरली असशील तर तुझे लग्नाआधीचे एक अकाउंट आहे आणि ज्यात मी तुझा जो काही बिझनेसचा शेअर आहे तो जमा करते आहे.. सो तुझ्याकडे पैसे नाहीत असे नाहीये. "
" मी खरेच विसरले होते. राघव इथे परत आल्यापासून मी पैशाचे व्यवहार करतच नव्हते ना.. अजून एक हे सगळे आईबाबांना कळू देऊ नकोस.. मी हा नंबर पण बदलणार आहे. मी नवीन फोन घेतल्यावर त्याचे पैसे पण तुलाच भरावे लागतील.."
" ओके ताई.."
" थॅंक यू उर्मी.."
" कशासाठी?"
" एका शब्दानेही तू हे का करते आहेस हे न विचारण्यासाठी.."
" ताई , मला माहित आहे तू कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीस.. आणि काल रात्री जिजूंचा फोन आला होता आम्हाला.. तुला त्रास व्हायला नको म्हणून लगेच फोन केला नाही.. आणि एक गोष्ट लक्षात ठेव काहिही अगदी काहिही झाले तरी मी आणि आईबाबा तुझ्या सोबत आहोत.. "
" तोच आधार आहे मला आता.. चल आधी मी फोन घेते.. मग बोलते.."
" उर्मिला, मी भारतात परत चाललो आहे.. तू येणार माझ्यासोबत?"
" काही झाले आहे का?" न बोलता सौमित्रने फक्त मोबाईलमधले फोटो दाखवले.. " वहिनी घर सोडून गेली आहे.. आणि दादा कोणाशीही बोलत नाहीये.."
" मी येते तुझ्यासोबत.."
उर्मिला आणि सौमित्र येण्याने काही फरक पडेल का? पाहू पुढील भागात..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा