Login

वैदेही अंतिम भाग

कथा आधुनिक सीतेची

वैदेही भाग ५



" वैदेही, बोलणार नाही का माझ्याशी? प्लीज बघ ना माझ्याकडे.." राघव तिला विनवत होता..

" तू जा इथून.. मला नाही बोलायचे तुझ्याशी.." वैदेही चिडली होती..

" नको बोलूस.. पण मी नाही जाणार.. इथेच थांबणार.." वैदेही अजून काही बोलणार तेवढ्यात नर्स बाळांना घेऊन आली.. " तुमची बाळे.. घेणार का हातात?"

" हो.. " वैदेही उठायचा प्रयत्न करत होती.. पण तिला जमत नव्हते.. राघव तिच्या मदतीला गेला.. वैदेहीला नको म्हणायचे होते पण नर्ससमोर नको म्हणून ती शांत बसली.. तो आश्वासक स्पर्श.. असा आत भरून घ्यावासा वाटला.. तिच्या डोळ्यात पाणी आले.. नर्सला वाटले तिला दुखते आहे म्हणून तिला रडू येते आहे.. "तुम्हाला जमत नसेल तर नका उठू.. मी यांना तुमच्या बाजूला ठेवते.." नर्सने हळूच एका बाळाला राघवकडे दिले.. राघवने हलकेच त्या बाळाच्या अंगाचा वास घेतला.. आणि वैदेहीकडे बघून तिला " थॅंक यू" म्हणाला.. नर्सने दोन्ही बाळांना वैदेहीच्या बाजूला झोपवले.. आणि ती निघून गेली.. 

" तू गेलास तरी चालेल आता.."

" ते मी ठरवेन.."

" तू खूप हट्टी आहेस.."

" तू सुद्धा.."

" तुम्ही दोघे जरा हळू भांडाल का? बाळे उठतील तुमच्या आवाजाने नाहीतर.." कौसल्याताई आत येत म्हणाल्या.. त्यांना बघून वैदेही उठत होती..

 "तू उठू नकोस. बरे वाटतय का आता?" वैदेहीने मान हलवली.. सगळ्यांचे डोळे पाणावले होते.. 

" थकली असशील तू.. ते झोपले आहेत तोपर्यंत झोपून घे.. मी खायला घेऊन येते काहीतरी.." त्या प्रेमळ बोलण्याने वैदेहीला रडू फुटले..

" अजिबात रडायचे नाही आता. त्या दोघांचे पोट भरायचे आहे तुला.. रडून दूध कमी होईल.. कुठे गेली होतीस तू? किती शोधले तुला आम्ही?" कौसल्याताई वैदेहीला कुशीत थोपटत म्हणत होत्या..

" उर्मिला कुठे आहे?" वैदेहीने विचारले..

" मी पाठवले तिला घरी.. खूप दमली होती ती पण.. मानले त्या पोरीला.. काल एकटी तुला इथे घेऊन आली.. तुमचे ते डॉक्टर पण काल नव्हते म्हणे.. खूप रडली तुझी अवस्था बघून. म्हटले घरी जाऊन फ्रेश होऊन ये.. तुझ्यापण पोटात अन्न नाही ना. मी छानसे काहीतरी आणते पटकन.. तू झोप.." त्या गेल्यावर खरेच वैदेही लगेच झोपली.. खूप दिवसांनी तिला अशी शांत झोप लागली होती.. राघव तिच्याकडे बघत होता..तिचा चेहरा सुकला होता.. डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळे, कमी झालेले वजन. राघव स्वतःला दोष देत होता.. एका चुकीचे पडसाद एवढे भीषण होते.. सहा महिन्यांचा विरह.. आणि हरवलेले सगळे परत न येणारे क्षण हातातून निसटले होते.. आता हे सगळे कसे परत मिळवायचे? हाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता.. विचार करता करता त्यालासुद्धा डुलकी लागली.. एका बाळाने रडायला सुरुवात केली.. त्याचे रडणे ऐकून वैदेहीला जाग आली.. तिला शांत करता करता वैदेहीने समोर पाहिले.. राघवचा निवांत झोपलेला चेहरा.. जणू कितीतरी दिवसांनी झोपला असावा.. ती वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे.. राघव आणि असा? तो तर टापटीप पणाचा नमुना होता.. आणि असा? त्याला तर शर्टला सुरकुती पडलेलीही चालायची नाही.. लगेच शर्ट बदलायचा.. तोच आहे का हा? वैदेहीचे विचार चालू असतानाच दुसराही उठला.. एकाच वेळेस हातात एक आणि रडणारे बाळ खाली.. तिची तारांबळ उडाली..

 "राघव.. राघव.."

राघव ताडकन उठला..

" तू खरंच आहेस ना इथे? हि आपलीच बाळे आहेत ना? मी स्वप्नात तर नाही ना?" राघव तिला विचारत होता.. वैदेहीने त्याला जोरात चिमटा काढला.. " ओय.. किती जोरात चिमटा काढलास? दुखले ना.."

" तुला स्वप्नातून बाहेर काढत होते.. हिला घे जरा.. हिला शांत केले आहे.. आता याला बघते.."

" बघ, तू दोघांना माझ्या मदतीशिवाय नाही सांभाळू शकत.."

वैदेही यावर काहीच बोलली नाही..

" वैदेही येशील ना आता घरी?"

" बघू.."

" त्यात काय बघायचे?"

" राघव माझी एकच डिलिव्हरी झाली आहे.. काहीच विचार करायची माझी मनस्थिती नाही.."

" विचार करूच नकोस ना.."

"बघू....." 



" ताई.. मी बघ काय आणले? " उर्मिला , सौमित्र आणि कौसल्याताई परत आले होते.. उर्मिलाने खूप सारे कपडे ,मिठाई आणली होती.

 "एवढे कपडे?" वैदेहीने आश्चर्याने विचारले..

" हो.. आणि हि मिठाई वाटायला.."

"मिठाई वाट.. पण एवढे कपडे?" 

" हो.. माझ्या भाच्यांसाठी आहे.. मी तर दोन पाळणे पण आणले आहेत.."

" वैदेही आधी तू हे खाऊन घे.. आणि हे उठले होते का?" कौसल्याताईंनी विचारले..

"हो, आत्ताच झोपवले आहे.."

" ताई, आईबाबांना बोलायचे आहे तुझ्याशी.." आपल्या मुलीला परत आपल्या माणसांमध्ये बघून तिच्या आईबाबांना खूप आनंद झाला.. 

" आम्ही येतो लवकरच.. आता नाही थांबू शकत.."

सौमित्र आणि उर्मिला दोघेही बाळांची नावे काय ठेवायची यावरून भांडत होते.. राघव फक्त वैदेहीच्या जवळ बसून होता.. कौसल्याताई हे सगळे समाधानाने बघत होत्या..

" भेटायची वेळ संपली आहे. फक्त कोणीतरी एकाने थांबा.." नर्सने सांगितले. 

" मी थांबते.." उर्मिला म्हणाली..

" नको.. मी आहे.. मी थांबतो.." राघव म्हणाला..

" पण तू कसे करणार? " कौसल्याताई म्हणाल्या..

" मी करेन.." राघव ठामपणे म्हणाला..

" तू जा घरी.." वैदेहीने आग्रह केला.. पण कुठेतरी तो सोबत असावा असेच वाटत होते.. तिला स्वतःचेच आश्चर्य वाटले.. "तू अंघोळही केली नाहीस.. तुझी झोप झालेली नाही.. इथे नर्स आहेत मदतीला.. आणि मला सवय आहे एकटीला मॅनेज करायची.." ती थोडे कडवटपणे बोलली..

" सौमित्र उद्या येताना माझे कपडे घेऊन ये.. मी इथेच आहे.." राघव म्हणाला.. खरंच रात्रभर जेव्हा बाळे उठली राघवही वैदेहीसोबत उठला.. त्यांची दुपटी बदलायला मदत केली.. कितीतरी दिवसांनी मिळत असलेला वैदेहीचा सहवास त्याला गमवायचा नव्हता.. वैदेही हे सगळे पहात होती.. तिला राघवचे प्रेम समजत होते.. पण अजूनही तिचा निर्णय होत नव्हता.. शेवटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.. सगळे वैदेहीच्या निर्णयाची वाट पहात होते.. "वैदेही जायचे ना घरी? " कौसल्याताईंनी विचारले..

" नाही आई. मला परत त्या सगळ्यात नाही गुंतायचे.." तिचा हा निर्णय ऐकून सगळेच अवाक झाले.. राघव शांत होता.. 

"तुझा निर्णय मान्य.."

" राघव.." दुखावलेल्या स्वरात कौसल्याताई म्हणाल्या..

" हो आई.. तिला घरी नाही ना यायचे.. मग मी जातो तिच्यासोबत. मी माझ्या मुलांशिवाय नाही राहू शकत.." राघव म्हणाला..

" राघव.. मग मी कशी राहू शकेन ? मी पण येते तुमच्यासोबत.." कौसल्याताई म्हणाल्या.

" मी तर माझ्या भाच्यांसोबतच राहणार.. मी त्यासाठीच आले आहे.." उर्मिला म्हणाली..

" मी तर माझ्या बायकोला सोडून नाही राहू शकत," सौमित्र म्हणाला..

" आता एवढ्या सगळ्यांना तुझ्या घरात ॲडजस्ट करायचे कि आपल्या घरी जायचे हे तू ठरव.." राघव म्हणाला. " बाळा, नवराबायकोच्या भांडणाचे बळी मुलांना नको करूस.." वैदेहीच्या बाबांचा आवाज आला.. वैदेही आणि उर्मिला दोघीही त्यांच्याकडे धावत गेल्या.. ते चौघेही गळ्यात पडून रडत होते..

" तुम्ही दोघी बाजूला व्हा, मला आधी माझ्या नातवंडांना पहायचे आहे.. " वैदेहीची आई म्हणाली..

" आता आमच्यापेक्षा ते दोघे महत्त्वाचे?" उर्मिला डोळे पुसत म्हणाली..

 " हो.. कारण ती दुधावरची साय आहे म्हणून.. आणि तुमच्यासाठी अजून एक बातमी आहे.. आम्ही आता इथेच रहायचे ठरवले आहे.. तिकडचा कारभार बघायचा कि नाही हे उर्मिला आणि सौमित्रने ठरवायचे.." वैदेहीचे बाबा म्हणाले..

" तुम्ही सगळे इथे राहणार आणि आम्ही तिथे? अजिबात नाही.. आम्ही पण इथेच येणार. तिकडचे सगळे आवरून.." उर्मिला म्हणाली..

" जिथे माझी बायको तिथेच मी.." सौमित्रने पुस्ती जोडली..

"पण माझी एक अट आहे?" वैदेही म्हणाली..

" मला सगळे मान्य आहे.." राघव म्हणाला.

" मागे जे झाले तसे जर परत झाले तर तुला माझे नखही परत दिसणार नाही. माझे नाव जरी वैदेही असले तरी मी अग्निपरीक्षा देणार नाही.."

" हि वेळच मी येऊ देणार नाही.."

" हो आणि जर हे जिजू असं वागले ना तर मी त्यांचा कान पिळीन.. चालेल ना जिजू?" उर्मिला म्हणाली..


सगळे हसत घरी गेले........







कशी वाटली कथा? आवडली असावी असे धरून चालते.. कथेला सुरूवात केली तेव्हा बर्‍याच जणांचे मॅसेज आले कि या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावू नका म्हणून.. हि कथा खरेच आधुनिक रामायण याच अर्थाने लिहिली होती.. राम हा मर्यादा पुरूषोत्तम जरी असला तरी त्याने गर्भवती सीतेचा केलेला त्याग हा बहुतेकांना पटत नाही.. पंचकन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीतेचीही एक गोष्ट मला पटली नाही.. दोघेही स्वतःच्याच कोशात इतके मग्न होते कि स्वतःच्या मुलांचाही विचार दोघांनाही करावासा वाटला नाही असे मला वाटत राहिले.. \"हम कथा सुनाते रामशक्ल गुणधामकी , ये रामायण है पुण्यकथा श्रीरामकी \" असे म्हणणारे लवकुश डोळ्यात पाणी आणतात.. राजपुत्र असलेल्या या दोघांना सुरुवातीला वडिलांचे प्रेम मिळाले नाही आणि नंतर आई सोडून गेली.. त्या दोघांना कधी वाटले नसेल दोघांचे प्रेम मिळावे? हा विचार करूनच या कथेचा शेवट बदलला.. 

रामायण म्हटले कि आपल्याला आठवते फक्त सीतेची अग्निपरीक्षा.. पण ते दोन बालक मात्र दुर्लक्षितच राहतात.. असो.. हि कथा त्या दोन बालकांसाठी.. हे दोन शब्द इथेच आवरते घेते.. जय श्रीराम..

0

🎭 Series Post

View all