विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
पूर्वांध : भाग-१९ पर्यंत आपण बघीतलत की, वसंत व सुहित दोन मित्र अमेरिकेला एका कंपनीत जॉब करत आहेत . भारतात डीग्री होताच वैखरीचे लग्न लावून देण्याची तयारी सुरु आहे. वैखरीच्या मनात मात्र वसंत बहरलेला आहे . वैखरीच्या मनाची कल्पना वसंतला नाही . वसंत वैखरीवर प्रेम करतो हे वैखरीलाही ठाऊक नाही . वसंत व सुहित ज्या कंपनीत जॉब करतात त्या कंपनीत त्यांचे बॉस प्रेम पवार म्हणजे प्रतिक्षा आतूचा नवरा आहे. प्रेम पवार वसंतला बघीतलं की अस्वस्थ होतात . त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो…..
नको राहू दे…. त्याच्या आईचा फोटो त्याच्या मोबाईल मध्ये असेलच . एखादवेळी त्याच्या नकळत त्याचा मोबाईल चेक केला तर….
असा विचार मनामनातल्या मनात प्रेम पवार करत असतांना केबिनच्या डोअरवर कुणीतरी नॉक करतं… अन् प्रेम पवार भूतकाळातून वर्तमानात येतात….
" एस कम इन ", : प्रेम पवार
प्रेम पवार साईन करतांना वसंत बाबत सुहित कडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात…..
सुहित : हो सर . वसंत माझा जीवलग मित्र आहे. त्यांच्यामुळेंच मी IIIT ला प्रवेश घेवून डीग्री प्राविण्य श्रेणीत पास झालो .
प्रेम पवार : " ते कसं काय ?".
सुहित : " सर मी बुद्धीनी हुशार असलो तरी मेहनती नव्हतो . वसंत माझा अभ्यास घ्यायचा . त्याच्यासोबत मी अभ्यास करणं शिकलो . मेहनतीला पर्याय नाही हे मी वसंतकडून शिकलो ."
प्रेम पवार : " अरे वा ! Mr. वसंतच्या घरचे वातावरण तसे असावे . त्यांचे आईवडील काय करतात ?"
सुहित : "सर वसंत अनाथालयात लहानाचा मोठा झाला . बारावीनंतर बाबां त्याला आमच्या घरी घेवून आले . वसंत माझा मित्रच नव्हे तर भावासारखा आहे. आमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे."
प्रेम पवार : माय गॉड ! mr.वसंत अनाथ आहेत .वाईट वाटले एकूण . ok . Mr. सुहित आपण जावू शकता.
सुहित : ok. सर .
वसंत अगदीच प्रतिक्षा सारखा दिसतो . तसेच हावभाव तसेच डोळे . अगदीच प्रतिक्षाची झेरॉक्स प्रत असल्याचा भास होतो…
वसंत प्रतिक्षाचा मुलगा असेल का? या प्रश्नाच्या शोधात प्रेम पवार पुन्हा भूतकाळात प्रतिक्षा सोबत घालवलेल्या क्षणांत हरवतात .
प्रतिक्षा : "अरे प्रेम , घरातून निघतांना काहीतर कारण हवं ना . घरच्यांना सांगून निघावं लागतं आम्हा
मुलींना . तुम्ही मुलं काय फिरतच असता . कधिही घराबाहेर पडता . माझ्या बाबांच्या कडक स्वभावाची कल्पना आहे ना तुला . मनात सतत भितीही असते आपण लग्न केलय बाबांना कळणार तर नाही ना ? आपण भेटतोय हे घरी कळालं तर फार मोठं संकट येईल आपल्यावर ."
प्रेम : " ते संकट येईल तेव्हा येईल . आताच एक मोठं संकट आलय आपल्यासमोर ."
प्रतिक्षा :" संकट ? कोणतं संकट ? तुझ्या बाबांना कळलं की काय आपल्या लग्नाबाबत ?"
प्रेम : " ते माहीती नाही. तसे बाबांच्या वागण्यातून जाणवले नाही आज मला त्यांनी अचानक काही दिवस कंपनिच्या कामानिमीत्त अमेरिकेला जाण्याची आज्ञा केली . त्यामुळे मी पटकन तुला भेटायला
आलो ."
प्रतिक्षा : " बापरे ! अमेरिकेला ? कधी जाणार ? परत कधी येणार ?"
प्रेम : " अगं , किती प्रश्न विचारशील ? एवढी अस्वस्थ नको होवूस . मी लवकरच परत येतो . अमेरिकेहून परत आल्यावर आपल्या लग्नाबाबत घरी सांगेल घरच्यांनी नाही म्हटलं तर आपण दोघं दूर जावून आपला छोटासा संसार थाटू . तू काळजी नको करूस. मी परत येईपर्यंत स्वतःची काळजी घे ."
प्रतिक्षा : " तू अमेरिकेला गेल्यावर जर चुकून घरच्यांना इकडून तिकडून आपल्या लग्नाबाबत माहित झाले तर मी काय करू ?"
प्रेम : "कसं माहित होईल ? असं काही होणार नाही काळजी करू नकोस ."
प्रतिक्षा : " खूप भिती वाटतेय रे मला ."
प्रेम : " ये वेडाबाई . असं भिवून कसं
चालेल . लग्न हे आपलं दोघांचं डिसीजन होतं ना . ते आपण दोघमिळूनच सांभाळू . मी आहे ना तुझ्यासोबत . माझ्यावर विश्वास आहे ना तुझा ."
प्रतिक्षा : "तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर लग्न करण्याचं धाडस केलय . तू अमेरिकेला जाणार म्हटल्यांवर मन घाबरतं रे . त्यात ग्रेज्युएशन झालं तसंच घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्यात . त्याला मी कसं टाळू ? "
प्रेम :" मी अमेरिकेला काही दिवसांसाठी
चाललोय . कायमचा नाही ."
प्रतिक्षा : हो रे , कळतय मला . तू येईपर्यंत मी घरच्यांना कसं थोपवून धरू . त्यांनी माझं लग्न ठरवलं तर ? बाबांनी आधीच कितीतरी स्थळं बघून
ठेवलीत .त्यातून त्यांना एक निवडायचे आहे . मलाही मुलांचे बायोडाटा दाखवत होते . मी म्हटलं, मी पाहून काय करू ? तुम्हीच ठरवा काय ते . त्यावर बाबा विश्वासानी म्हणाले , मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बेटा .तू आमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीस . आजवरचे संस्कार आहेत आपल्या घराण्याचे . त्यांचा माझ्यावरील विश्वास पाहून मला अपराध्या सारखं वाटलं रे प्रेम ."
प्रेम :" खूप विचार नको करूस . तुला तर लहानपणापासून माझे बाबा सूनबाई म्हणायचे आणि तुझे बाबा मला जावईबाप्पू . आता यांच्यात पूर्वीचे संबंध नाही राहिले म्हणून आपला बळी देत आहेत कितपत योग्य आहे त्यांचं वागणं ? "
प्रतिक्षा : "तुझंही बरोबर आहे . जावू दे एक सांग , अमेरिकेहून तू किती दिवसात परत येणार ?"
प्रेम : "अगं काम आटोपलं की लगेच परत येतो . बाबांचं मन जिंकण्यासाठी चांगलं काम करावं लागेल . बाबा खुश झाले की योग्य वेळ पाहून आपल्या लग्नाबाबत बोलेल."
प्रतिक्षा : हो रे ,तू म्हणतोच ते सर्व बरोबर आहे. पण मी तुझ्याशिवाय कशी जगू इतके दिवस . नाही करमणार रे मला . तुझी ,माझी ही दोन मिनिटाची भेट पूरी असते केवळ एक दिवस जगायला . पुन्हा हया चोरून भेटीची आस असते जीवाला . हे सारं नित्याचं झालं रे प्रेम .तू राहू शकशील न भेटता ? कामात मन लागेल तुझं ?
प्रेम : "नाही गं .मलाही नाही करमणार . तुझ्यासारखीच माझी मनस्थिती . असं दोन मिनिटाच्या चोरट्या भेटीवर किती दिवस जगणार . कायमचं सोबत राहण्यासाठी मला बाबांचं मन जिंकावं लागणार . त्यासाठी दोघांनाही विरह सहन करावा लागणार .विरहानंतर होणाऱ्या भेटीत वेळलीच धुंदी असणार….".
प्रतिक्षा : "आताही तुला गम्मत सुचतेय . विरहानंतरची भेट म्हणे.."
प्रेम : "अगं हो .आठवतो तुला आपण चोरुन लग्न
केलं . तू घाबरलेली . घरच्यांना माहीत झाले तर ह्या भितीने घाबरून दोन दिवस भेटायलाच नाही आली . तिसऱ्या दिवशी येताच माझ्या कुशीत शिरली…. दोन दिवसाच्या विरहाची धुंदी दोघांनाही चढली… वरून तो मेघराज बरसला…. तुझ्या ओठांवरिल थांबलेले पावसाचे थेंब माझ्या ओठांनी हळूच टिपले…
तू शहारली….. बावरली… मी तुला अलगद कवेत घेतलं…. तूही माझ्या बाहुपाशात विसावली…. मीही तुला घट्ट मिठी मारली….
तू माझ्या पकडेतून स्वतःला सोडवायचा लटका प्रयत्न केला…. तुलाही ते सारं हवं होतं….".
तिही त्याच्या कुशीत शिरली… दोन मनांचे पुन्हा त्याच आवेशानी मिलन झाले…. गुलाबी प्रेमाची धुंदी उतरताच… एकमेकांचा निरोप घेवून आपआपल्या वाटेने निघाले…
वैखरी एक प्रेमकथा भाग -२१
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टिम - अमरावती .