वैर भाग १०

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग १०

क्या बात है वाटलं ही नव्हत या घरात आपलं एवढं जोरदार स्वागत होईल..

अनन्या वर्षांच्या बेडरूम मधे धावतच आली.आपल्या लाडक्या आईला बेडवर बेशुद्धावस्थेत पाहून तिला हुंदका फुटला. ती आपल्या आईचे हात हातात घेऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होती.

“ अनि बाळा, शांत हो तुझी आई लवकरच शुद्धीवर येईल.”

“ पण बाबा किती वेळ अजून? मी आलीय ना सुखरूप आईने इतका स्ट्रेस का घ्यायचा आधीच ती सतत आजारी असते. ”


“ सध्या तिला काहीच त्रास नव्हता बच्चा! तू येणार म्हणून खूप खुश होती ती. अचानक ती न्यूज तिने पहिली आणि तिची शुद्धी हरपली.बस थोड्या वेळात ती येईल शुद्धीवर.” अमर अनन्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलला.

शेवटी लेकच ती तिचे अश्रू कसे थांबणार होते.ती वर्षा यांचा हात हातात घेऊन त्याचे चुंबन घेऊ लागली होती. तिच्या डोळ्यातला अश्रूंचा थेंब त्यांच्या हातावर पडला.अन् त्यांच्या हाताची हालचाल जाणवू लागली.

“बाबा!आईचा हात हलतोय, आई शुद्धीवर आली आहे..” अनन्या खुश होत बोलली.

जड झालेल्या पापण्या बाजूला सारण्याचा निष्फळ प्रयत्न करीत वर्षांनी डोळे उघडले. डोळे उघडताक्षणी समोर आपल्या लेकीला सुखरूप पाहून त्यांनी अनन्याला आपल्या प्रेमळ मिठीत घेतलं.किती जीव ओवाळून टाकत होते ते मायबाप आपल्या लेकीवर.आईबाप ,भाऊ, नातेवाईक यांच्यात अतिशय लाडकी लेक होती ती.

“अनि! बाळा तू सुखरूप आलीस. मी खूप खूप खुश आहे .”

सर्वजण आनंदून गेले होते. चौघांनीही एकमेकांना आनंदाने मिठी मारली.एक सुखी आणि आनंदी कुटुंब आज सर्व नोकर आपल्या डोळ्यांनी पाहत होते.आणि या सुखी कुटुंबाला कसं तोडायचं याचा विचार त्यांच्या पाठीमागे उभे राहून तो करू लागलेला.

“फक्त थोडे दिवस असेच आनंदी रहा..लवकरच तुम्हा सगळ्यांची ताटातूट झालेली असेल.”तो मनातच गूढ हसत पुटपुटला.


काही वेळाने वर्षांची नजर विक्रांत वर पडली.आणि त्या प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहु लागल्या.


“ अनि ! हे कोण आहेत?” वर्षाच्या बोलण्यावर साऱ्यांनी पाठीमागे पाहिलं आतापर्यंत वर्षाची काळजी करण्यात सर्वजण व्यस्त झाले होते त्यामुळे विक्रांत कडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते.

“अग,आई हे विक्रांत सर यांच्यामुळेच माझा पासपोर्ट सापडला.आणि या अपघातातून मी बचावले.” विक्रांत यांच्याजवळ जात अनन्या बोलली.


“ खूप खूप उपकार आहेत आपले..” वर्षा विक्रांत समोर हात जोडून बोलल्या.

“आंटी अस काही नाही. त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. देव बलवत्तर म्हणून मिस अनन्या माझ्यासोबत राहिल्या. नाहीतर त्या विमानातून त्या इकडे येणार होत्याच.एका चोरट्याला मी मिस अनन्या यांच्या बॅगेतून पासपोर्ट चोरताना पाहीला आणि त्याच्या मागे धावलो.तो थोडा दूर गेलाच होता.की त्याला गाठून मी तो पासपोर्ट घेऊन पुन्हा विमानतळावर आलो.पण त्यापूर्वीच मिस अनन्या यांच्या विमानाने उड्डाण घेतले होते. मग लागलीच दुसऱ्या विमानाच्या तिकीटाची बुक्किंग केली आणि मग दोघेही सुखरूप इकडे आलो.” त्याने एक सिनेमाची स्टोरी सांगावी तशी स्टोरी कथन केली.


“ फक्त आणि फक्त बाळा तुझ्यामुळे आमची मुलगी आम्हाला सुखरूप भेटली. तुझे ऋण या जन्मात फेडणे शक्य नाही.” वर्षां विक्रांत चे गुणगान गात बोलल्या.

“ आंटी, बस् ना अजून किती आभार प्रदर्शन करणार आहात.आताच मला वाटू लागलं आहे की जणू मी हरबऱ्याच्या झाडावरून खाली पडतो की काय..” विक्रांत बोलला अन् सर्वजण हसू लागले.


“ शामु काका सगळ्यांसाठी नाष्टा तयार करा..”अमरने सांगितलं तसे शामु किचन मध्ये नाष्टा बनवायला निघून गेले.सर्वजण बाहेर हॉल मध्ये बसले होते. इकडचे तिकडचे बोलता बोलता नाष्टा झाला आणि विक्रांत जायला निघाला.


“चला अंकल आंटी मी निघतो.” विक्रांत ऋषी आणि वर्षा यांना नमस्कार करत बोलला.

“ हो बाळा कधी ही ए, आम्ही तुझ्या साठी नेहमीच हजर असू” ऋषी बोलले.

“हो नक्कीच!” विक्रांत अमरच्या हातात हात मिळवत बोलला.

“मिस अनन्या मला तुमच्याशी बोलायचं होतं.जर अंकल आंटी तुमची काही हरकत नसेल तर मिस अनन्याना गाडीपर्यंत नेऊ शकतो का?” विक्रांत अदबीने म्हणाला.


“हो हो का नाही? जा अनि त्यांना काही बोलायचं आहे. ते बोलून घे.” वर्षांनी अनन्याला जायला सांगितलं.

अनन्या आणि विक्रांत बाहेर जाण्यासाठी वळले.तरी मिस्टर ऋषी त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिले. त्याच्या मनात काहीतरी सुरू होतं. विक्रांत जाताच अमर देखील किचन मध्ये निघून गेला.आपल्या लाडक्या बहिणीला तुपाचा शीरा बनवायला.


घराबाहेर येताच विक्रांत अनन्या कडे पाहत बोलला.

“मिस अनन्या! तुमची फॅमिली अगदी तुमच्यासारखी गोड आहे.”

“हो खूप प्रेम करतात माझे आई बाबा आणि माझा भाऊ..”

“हो इतकं प्रेम करणारी फॅमिली मिळायला भाग्य लागतं नाही का?” विक्रांत अगदी कोड्यात बोलत होता.

“ का काय झालं सर? तुमचीही फॅमिली असेल ना?” अनन्या आश्चर्य व्यक्त करत बोलली.

“माझी फॅमिली?? मिस अनन्या मी अनाथ आहे. ना मला आई वडील आहेत ना नातेवाईक..अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालो आहे मी.” डोळ्यात खोटे अश्रू आणत विक्रांत बोलला.

“सर, सावरा स्वतः ला चला आज पासून माझी फॅमिली ती तुमची झाली.” अगदी भोळी असलेली अनन्या कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हती.

“म्हणजे?”

“म्हणजे आज पासून माझ्या आईबाबांना तुम्ही तुमचे आईबाबा समजा.तुम्ही केंव्हाही येत जा.”

“नक्की अंकल आंटी मला आई बाबाचे प्रेम देऊ शकतील?”

“हो नक्कीच!”

“चला, माझ्या बहिणीला भेटायचं आहे. निघतो मी”

“बहीण??”

“मिस अनन्या मी जरी अनाथ असलो तरी एका अनाथ मुलीचा सांभाळ केला आहे.तिला लहानाचं मोठं केलं आहे.”

“खरचं?

“हो”

“मला भेटायचं आहे तुमच्या बहिणीला.”

“हो नक्की भेटवेन “

“थँक्यू “

“वेलकम, निघू मी?” अनन्या च्या चेहऱ्यावरची खुशी पाहून तो काय ते समजून गेला.


विक्रांत निघून गेला.आणि अनन्या घरात आली. घरात येताच तुपाचा खमंग वास तिच्या नाकात शिरला.

“दादू.. एवढा खमंग वास कशाचा येतोय? तू काही बनवत आहेस का?” ती हॉल मधून ओरडली.


“हो गं फक्त एक मिनिट थांब.” अमर आतून ओरडला.अन् मागून येऊन त्याने तिचे डोळे बंद केले.


“मॅडम तुमच्यासाठी खास तुमचा शिरा..” अमर शेप चां हावभाव करून अदबीने बोलला.

“वाह!दादू मी हा तिकडे हेच खूप मिस केलं.” अनन्या तोंडाचा चंबू करून बोलली.


“म्हणजे नेमकं काय मिस केला मॅडम? मला की शिरा?”

“दोघानाही..!”

अमरने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यानी तिला बोलला.

“आम्ही तुला खूप खूप मिस केलं बच्चा” बहीण भावाने एकमेकांना आनंदाने मिठी मारली. जिन्यावरून ऋषी आणि वर्षा आपल्या दोन्ही मुलांना अभिमानाने बघत होते.


दरवाजाची बेल वाजली. कृतिकाने दरवाजा खोलला.समोर त्याला बघून ती शॉक झाली.


“राजेश! तूss ”

“राजेश नाही विक्रांत..!” तो गूढ हसत आत येत बोलला.

“म्हणजे? कृतिका गोंधळून बोलली.

“ इथूनपुढे मला विक्रांत बोलायचं..”

“ए, काहीही काय बरळत आहेस?”

“शू शू ssss”

क्रमशः …