वैर भाग ११

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग ११


“मला इथून पुढे राजेश नाही तर विक्रांत बोलायचं.” (आता राजेश बोलण्याऐवजी मी विक्रांत असाच उल्लेख करत आहे.)

“बर, पण तू येणार म्हणून मला का सांगितलं नाहीस?” कृतिका विक्रांतच्या मिठीत शिरत बोलली.

“ सरप्राइज द्यायचं होत तुला.जर मी आधीच आज येणार अस सांगितलं असत तर, ते सरप्राइज राहील असतं का? आणि या चेहऱ्यावर असलेली खुशी मला पहायची होती.कारण माझीच राणी आता दुसऱ्याची होणार आहे. त्यामुळे दुसऱ्याची होण्या आधीच मला ती विसरली असेल का ? हे मला पहायचं होतं.” विक्रांत जेलसी होत बोलला.

“ राजे.. ” ती पुढे बोलणारच होती की, विक्रांतच्या उंचावलेल्या भुवया तिने पहिल्या आणि पुढे बोलणारी ती तिथेच थबकली.

“अम्..ते विक्.. रांत”

ती नवीन नावाचा शब्द जुळवू लागली.

“अगदी बरोबर माझं नाव विक्रांत” तो चेहऱ्यावर खुशी आणत तिचे गाल ओढू लागला.


“ बस् कर ना, दुखत आहेत गाल ” कृतिका विक्रांतला आर्जाव करत बोलली.

“ठीक आहे इतक्या दिवसाचा विरह सहन केला आहे आता तरी तुझ्या मिठीत शांत पडू दे थोडा वेळ” डोळा मारत विक्रांतने तिला उचलून घेतलं अन् बेडरूम कडे निघाला.


असेच दिवसामागून दिवस जात राहिले. विक्रांत आणि अनन्याचे फोन ,चॅटिंग वर बोलणे वाढू लागले. अनन्याला तो बघताक्षणी आवडला होता.तर विक्रांत च्या जाळ्यात अलगद मांजर सापडलं होतं. तिच्याशी बोलताना तो अगदी खुलून बोलायचा. कधी कधी कृतिका बाहुपाशात असतानाही तो अनन्याशी रोमँटिक मूडमध्ये बोलत असे.आणि कृतिका त्याच्याशी अबोला धरत असायची.पण आपला प्लॅन आहे तो अंमलात आणण्यासाठी आपण फक्त नाटक करतोय हे तो तिला मनवून समजावून द्यायचा.

बघता बघता सहा महिने लोटले होते. कृतिकाची काडीमोड झाली होती.खोटी घटस्फोटाची कागद पत्रे तयार करून तिने अमरला ती दाखवली होती.तसेही अमर याच क्षणाची कितीतरी दिवसापासून वाट पाहत होता. एकदा का तिचा घटस्फोट झाला की तिला आपण प्रपोज करायचंय आणि मग आई बाबाच्या कानावर घालून मग तिच्याशी लग्न करायचं अस त्याने मनोमन ठरवल होतं.


सकाळी सकाळी अनन्या किचन मध्ये काहीतरी बनवत होती.पण ते बनवत असताना तिचा हात भाजला.अन् ती चटका बसल्याने रडू लागली. खरतर तिची किचनमध्ये मधे काम करायची ही पहिलीच वेळ होती. आजपर्यंत तिच्यासाठी शेप अरेंज केलेले असायचे. जे आपल्याला हवं ते ती त्यांना सांगायची अन् ते तिला बनवून देत असत त्यामुळे जेवण बनवताना होणाऱ्या छोट्या छोट्या जखमाशी तिचा दूर दूर संबंध नव्हता.


“ बच्चा काय करते आहेस? कोणी सांगितलं तुला किचनमध्ये यायला. शामु काकांना सांगता येत नव्हतं का तुला काय हवे आहे ते ते बनवून दिलं असते ना त्यांनी?” तिला इतकुस् भाजलं होतं पण लाडक्या बहिणीला जखम झाली म्हणून या भावाने अख्ख घर डोक्यावर घेतलं होतं.

“दादू!किती हायपर होतोय,अरे मीच कोणाला काहीही करू दिलं नव्हतं.सगळे बनवून देतो बोलत असतानाही मी ऐकलं नाही.” ती खाली मान घालून बोलली.

“काय बनवत होतीस?”

“पोहे बनवत होते..माझ्या लाडक्या दादूसाठी.” ती अमरकडे नजर चोरून बघत बोलली.

“बच्चा तुला काहीही झालेले मला अजिबात सहन होत नाही. तुझ्या हाताला झालेली एवढीशी जखम कधीतरी माझा जीव घेईल राजा” अमर अनन्याला मिठी मारत बोलला.

“तुझ्या लाडक्या बच्चाला काहीही होणार नाही दादू..कधीच माझ्या डोळ्यात तुला एक थेंबही दिसणार नाही.मला माहित आहे.माझा दादू मला किती जीवापाड जपतो ते..” अनन्या ही अमरला बिलगली.

तिथे उपस्थित असलेले सर्वजण या बहीण भावाच गोड नातं बघून आनंदून गेले.काही जणांना या दोघा बहीण भावाचा हेवा वाटला.आणि हे दोघे होतेच तसे अतिशय प्रेमळ..पण या प्रेमाला लवकरच दृष्ट लागणार होती आणि हे विधिलिखित होतं..


“ मिस् कृतिका! मी जेंव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेंव्हाच तुम्ही मला आवडल्या होत्या.पण तेंव्हा तुमचं लग्न झालं होतं.पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्या आहात.कारण तुम्ही आता कायमचे पहिल्या पतीपासून विभक्त झालात.आता तुमच्या एकटेपणा दूर करण्यासाठी मी तुमचा हात मागतोय.. खरं सांगू? खूप मनापासून प्रेम करतोय मी तुमच्यावर..माझ्या प्रेमाचा स्वीकार करून माझ्या आयुष्यात यायला तुम्हाला आवडेल का? तुम्ही भावी मिसेस कारखानीस व्हाल का??” अमर कृतिकाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घालत होता.

“ सर, मी अशी घटस्फोटित मला तुमचे आई बाबा ,बहीण स्वीकारतील का?” कृतिका नाराज होण्याचं नाटक वटवत बोलली.

“का नाही मिसेस कृतिका ? मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतोय मग माझ्या घरचे माझ्या आड का बरं येतील?”


“तरीही ते मला नाही स्वीकारणार.” डोळे पुसत कृतिका बोलली.

“ काळजी करू नका मी आहे सर्व काही ठीक करेल..फक्त तुम्ही माझ्या सोबत रहा”

“हो ..” एका अर्थी तिला आनंदही झाला होता.कारण अमरसोबत लग्न करून ती कारखानीस घराची मालकीण होणार होती. अनन्याचे लग्न विक्रांत सोबत लाऊन देऊन ती दोघा बहीण भावाला आयुष्यातून उठवणार होती.

“सर..”

“आता आपण लग्न करणार आहोत कृतिका मला अमर म्हटली तरी चालेल..”

“हो अमर पण, मला भीती वाटतेय..तुझ्या आई वडिलांची.”

“अग वेडे माझ्या आई बाबांचा माझ्यावर खूप जीव आहे माझ्यासाठी काहीही करू शकतात ते..नको एवढं टेन्शन घेऊ.” तिच्या हातावर हात ठेऊन धीर देत अमर बोलला.

हे दोघे आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होते आणि तिकडे मिस्टर शहा आपल्या मुलीचा अमर सोबतच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी बोलणी करत होते.