वैर भाग १२

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग १२


“काय ssss?आई बाबा मला न विचारताच अस कसं वागू शकतात?”

“दादू प्लीज लवकर घरी ये.

“बच्चा मला हे लग्न मान्य नाही ..तू तिकडे काय बोलणी होते तिकडे लक्ष ठेव मी आलोच.”

“हो दादू.”

मिस्टर शहा आपल्या लाडक्या लेकीचा अमरसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी आले होते. त्यांच्या प्रस्तावावर ऋषी आणि वर्षा दोघेही मनापासून खुश होते. आणि अनन्याला देखील त्यांची मुलगी मयुरी आवडली होती. जेंव्हा ती भारतात आलेल्या दुसऱ्या दिवशीच मिस्टर शहा याच्या घरी पार्टी साठी गेली होती. सगळी कारखानीस फॅमिली या पार्टीसाठी उपस्थित होती. त्यावेळी मिस्टर शहा यांची मुलगी मयुरी देखील उपस्थित होती.

दिसायला ती सुंदर होतीच. अगदी साधेपणा जपणारी सालस मुलगी होती ती.सगळ्यांशी प्रेमाने बोलत तर होतीच.शिवाय सगळ्याच्या मनाचा आदर देखील करत होती.

कारखानीस यांच्या फॅमिली सोबत ओळख करून घेताना जेंव्हा तिने अमरला पाहिलं होतं. तेंव्हाच अमर तिला मनोमन आवडला होता. हे मिस्टर शहा यांच्या नजरेने हेरलं होतं. आणि म्हणूनच आपल्या लेकीसाठी त्यांनी अमरसारख्या हुशार मुलाची निवड केली होती. डील करतेवेळी अमरने दाखवलेल्या हुशारीने मिस्टर शहा त्याच्यावर जबरदस्त खुश होते. आपल्याला आपल्या लेकीसाठी असाच जावई मिळावा अस त्यांना मनोमन वाटत होतं. पण त्यांना कुठे माहित होतं? की तो आधीच आपले हृदय दुसऱ्या स्त्री ला देऊन बसला आहे ते.


आता तास होत आला होता. मिस्टर शहा अमर येण्याची वाट पाहत होते. ऋषी, वर्षा,अनन्या सर्वजण त्याला फोन करत होते.पण तो कोणाचेच फोन उचलत नव्हता. सर्वजण त्याची वाट बघून वैतागले होते. मिस्टर शहा जाण्याच्या तयारीत होतेच की,बाहेर गाडी येऊन थांबली.अन् अमर कारमधून बाहेर पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.पण तो आनंद ज्यास्त काळ टिकला नाही..


ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा लावून अमर दुसऱ्या बाजूच्या दरवाजाकडे गेला. सर्वांना याचं आश्चर्य वाटलं. गाडीत अजून कोणीतरी होतं.ते कोण असेल? ते पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते. अमरने दरवाजा खोलला आणि एक स्त्री पाठमोरी बाहेर पडली.

अमरने तिचा हात आपल्या हातात घट्ट पडला आणि तो माघारी वळला.त्या स्री ला बघून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.कारण ती कृतिका होती.आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू होतं.


ऋषी, वर्षा, अनन्या सर्वजण त्यांच्याकडे डोळे फाडून बघत होते. आपला दादू अस काही करेल याची थोडीही भनक अनन्याला नव्हती. त्यामुळे तिलाही त्याची ही कृती आवडली नव्हती.


“नमस्कार शहा अंकल! माफ करा खूप वेळ तुम्ही वाट पाहिली. पण कसं आहे ना! मी माझ्या प्रेयसी सोबत लग्न करण्यात बिझी होतो. आणि सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत थोडा उशीर झाला.”

“अमर! लाज नाही वाटत. अस लग्न करून कोणत्याही तरुणीला बायको म्हणून घराचा दरवाजा ओलांडायला.” ऋषी रागात कडाडले.

“ बाबा मी माझ्या मनातल्या मुलीशी लग्न केलंय त्यात चूक अशी काही असेल अस मला अजिबात वाटत नाही.”

“अमर या मुलीचं आधीच लग्न झालं असताना हिच्यासोबत तू लग्न करूच कसा शकतोस?” वर्षा झाल्या प्रकाराने खूपच टेन्शन मध्ये आल्या होत्या.अन् त्यांना श्वास जड होऊ लागलेला.

“आई! तिचं लग्न झालं होतं तेही मनाविरुद्ध,आणि त्याचा घटस्फोट देखील झाला आहे.ती तिच्या पहिल्या पतीपासून कायमची विभक्त झाली आहे. त्यामुळे तो विषय पुन्हा नकोय प्लीज.”

“ आम्हाला ही मुलगी पसंत नाही आणि आम्ही तुम्हाला या घरात घेणार नाही.” ऋषी ओरडले.

“बाबा तुम्ही सून म्हणून कृतिकाला स्वीकारणार नसाल तर मी देखील हे घर सोडून निघून जाईन.” त्याला पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या बोलण्याचा राग आला होता.

“ठीक आहे.जा पुन्हा या स्रीला आमच्या समोर आणूही नकोस.” ऋषीही संतापले होते.

अनन्या मात्र सद्म्यात होती. एकीकडे वाट चुकलेल्या भावाला सावरायचं की, रागाने लालबुंद झालेल्या वडिलांना सावरायचं ह्या पेचात बिचारी अडकलेली. आता तिलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता.


“मिस्टर कारखानीस तुमच्याकडून असा धोका पोहचेल अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या एकुलत्या एका मुलीचं तुमच्या मुलाशी लग्न व्हावं आणि बिझनेस पार्टनर एवढेच नव्हे एका नवीन नात्यात बांधलो जावे असे मनोमन वाटत होते. पण सगळे व्यर्थ !” मिस्टर शहा सुस्कारा सोडत बोलले.


“मिस्टर शहा प्लीज आमच्या मुलाने आपल्या नात्याबद्दल आम्हाला काहीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे आम्हीही आपल्याशी सोयरिक बांधायला तयार झालो.या गोष्टीचा आपल्या बिझनेस वर परिणाम नको व्हायला. ” ऋषी हात जोडून विनवणी करू लागले.


मिस्टर शहा यांच्याशी सोयरिक नाही झाली तर, त्यांना खूप मोठा फटका बसणार होता.कारण दोन्ही कंपनी मध्ये झालेली डील कोणत्याही प्रसंगी मिस्टर शहा कॅन्सल करू शकणार हे पक्कं होतं.म्हणूनच ऋषी देखील त्यांना मनापासून विनवणी करत होते.


अखेर व्हायचं तेच झालं. मिस्टर शहा यांनी कारखानीस कंपनी सोबत असलेले सगळेच संबंध तोडून टाकले अन् ते निघून गेले. काडी काडी जमा करून उभारलेल्या ह्या कंपनीचे असे आपल्या लेकराकडून दिवाळे निघावे हे ऋषींना बघवत नव्हत.

“झालं गेलं सगळ विसरून बाबा दादुला माफ करा. त्याच्याकडून खूप मोठी चूक झालीय पण घरच्या लक्ष्मीला अस उंबऱ्या बाहेर उभे ठेवणे मला योग्य वाटत नाही.” मनात नसतानाही बिचाऱ्या अनन्याला मध्यस्थी करावी लागत होती.