वैर भाग १३

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग १३


एकीकडे हट्टाला पेटलेला भाऊ दुसरीकडे भावाच्या आडमुठ्या वागण्याने दुःखी झालेले आईवडील यांच्या मध्ये सापडलेली अनन्या नेमकी कुणाची बाजू सावरू? या कोड्यात सापडलेली.

भावाची तिला चूक वाटतं नव्हती कारण, त्यानेही योग्य निर्णय घेतला होता. नवऱ्याने टाकलेल्या एका बाईला त्याने सन्मानाने आपली पत्नीचा दर्जा देऊ केला होता.आणि त्यामुळे तिचं कोलमडून गेलेलं आयुष्य मार्गस्थ लागलं होतं. अस अनन्याला वाटून गेलं.


आपल्या आईवडिलांनी काय थोडे त्रास आजपर्यंत सहन केलेत. दुसऱ्याच्या कारखान्यात दिवसरात्र काम करून आपल्या बाबांनी आपल्या भविष्याचा विचार करून ह्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. एक काळ असा होता की, मिसेस कारखानीस तर दुसऱ्याच्या घरी रोजंदारीवर काम करत होत्या. आपल्या दोन लेकरांना उद्या सुखाचे दिवस दिसावेत इतकीच त्या माऊलीची इच्छा होती. या नवराबायकोची एकमेकांना भक्कम साथ होती. आणि म्हणूनच त्यांनी असंख्य वेदना सोसून इतका मोठा कंपनीचां डोलारा उभा केला.आज मुलं मोठी झाली, उच्चशिक्षित झाली, स्वतच्या मनाने भरारी घेऊ लागली.आता फक्त त्या मायबापाला आपल्या दोन्ही मुलांची लग्ने आपल्या उघड्या डोळ्यांनी पहायची होती. पण, मध्येच कुठे माशी शिंकली अन् आईवडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाची आपल्याच लाडक्या मुलाने आपल्या मंनमर्जिने राख करावी.हे कसं सहन करू शकणार होते ते मायबाप? काय चूक झाली त्या बिचार्यांची की स्वतः च्या मुलाने आपण एका मुलीच्या प्रेमात पडलोय हेही सांगू नये..

प्रेमात पडायचं किशोरवयीन वय आहे. प्रेमात पडायला कुणाची भीती नव्हती की मायबापाचा नकारही नव्हता. मग इतकी घाई काय होती? की कोणालाही काहीही कल्पना न देताच एका स्त्री शी लग्न करून दारासमोर उभ राहायची? जर आईवडिलांना सांगितलं असतं तर ते समजून घेतही असतेच की, मोठ्याने लग्न लाऊन लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सुनेचे त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केलं असतं.

मुले लहान आहेत म्हणून नेहमी आई वडील समजून घेत असतात.पण आज इतके मोठे होऊनही त्यांच्या मनाला मुलाच्या लेखी काहीच किंमत का असू नये?

ऋषी आणि वर्षा चिंताग्रस्त चेहऱ्याने हॉल मध्ये बसले होते.तर अमर आणि कृतिका अजूनही बाहेरच होते. जोवर वर्षा त्यांना आत घेणार नव्हत्या तोवर त्यांना आत येता येणार नव्हतेच!

“आई बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” अनन्या घाबरत म्हणाली.

“बोल बेटा,काय बोलायचं आहे?” ऋषी अनन्याला आपल्या जवळ बसवत बोलले.

“आई बाबा मला माहित नाही मी बोलतेय ते तुम्हाला पटेल की नाही. पण आज आपल्या घरात जे काही घडलं आहे ते खरच वेदनादायी आहे.तरीही मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की, दादूला एकवेळ माफ करा..आणि घरच्या लक्ष्मीला घरात घ्या.”

“अनि, तुला कोणी काही बोललं का?” ऋषी काळजीत बोलले.

“नाही बाबा! ”

“मग, तू नको पडू यात बाळा तुझा दादू असा वागेल अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला. किती स्वप्न पहिली होती त्याच्या लग्नाची.धूमधडाक्यात लग्न लावायच होत त्याचं पण काय झालं ? करून घेऊन आला आपल्या मर्जिची बायको..म्हणून त्याला माफ करू मी? अग आपलं एक ठीक पण आपल्या नातेवाईकांचे काय? अग त्यांच्या कोणत्या कोणत्या प्रश्नांना आम्ही उत्तर द्यायचं? भलेही तो चुकला असेल पण हे अस कोर्ट मॅरेज करून आल्यावर तिला आम्ही आमच्या सुनेचा दर्जा देऊन तिला सहज स्वीकारायचं का? नाही अनि..खूप चुकला आहे तुझा भाऊ अगदी हे आमच्या सहनशीलते पलीकडे गेलं आहे..कसा माफ करू याला मी??” कधी नव्हे ते आज मिस्टर ऋषी रडत होते. त्यांना खरच खूप खूप दुःख झालं होतं.

वर्षां तर बोलायच्या मनःस्थितीत नव्हत्याच. मुलाने खूप मोठा धोका दिलाय अस त्यांना वाटत होतं.

“आई ! तू तरी माफ कर ना ग दादुला.”


“नाही अनि, मी अजिबात माफ करणार नाहीय त्याला.” वर्षांनी देखील साफ नकार दिला.

बिचाऱ्या अनन्याने अखेर हार मानली अन् ती आपल्या खोलीत जाऊन ढसा ढसा रडू लागली.कारण तिच्या आईवडिलांच्या काळजाला झालेली जखम तिला पाहवत नव्हती.


सायंकाळचे पाच वाजले होते. अजूनही अमर आणि कृतिका घराबाहेरच बसले होते.अमर हट्टी होता पण त्याच्याबरोबर कृतिकाला देखील बाहेर बसावं लागलं होतं.आणि हेच तिला पटत नव्हतं. सगळ्यांचा याक्षणी तिला राग आलेला.पण आपल्या समोर चालून आलेली सोन्यासारखी संधी ती दवडू इच्छित नव्हती.


आता मात्र ऋषी आणि वर्षां यांना या दोघांचं वाईट वाटू लागलेले.कारण दुपारी बारा वाजल्यापासून बिचारे दोघेही बाहेरच होते. त्यामुळे कितीही हा विषय ताणला तरी काही उपयोग होणार नव्हता.

“अनि बाळा!”

“बोला बाबा तुम्हाला काही देऊ का?”

“ अनि आरतीच ताट तयार कर आणि नवीन आलेल्या सुनेचं औक्षण करून तिचा गृहप्रवेश करून घे..” अनन्या ला खरतर खूप आनंद झालेला पण हे ऋषी तिला सांगत होते म्हणून थोडी गोंधळली होती ती.कारण नव्या सुनेचा गृहप्रवेश सासूने करायचा असतो. मग मी का करू? हा प्रश्न पडलेला तिला.

“ बाबा वहिनीचा गरहप्रवेश आई करेल ना!”

“अनि, तुझ्या आईची इच्छा नाहीय..त्यामुळे हा सगळा कार्यक्रम तू आटोपून घे..कस कस करायचं ते मालू (शामु ची बायको )काकी सांगतील तुला.”

मालू ने सगळी तयारी केली आणि अनन्याला नव्या जोडीचा गृहप्रवेश करायला सांगितलं मालू जसजसे सांगेल तसतसे अनन्या सर्व सोपस्कार पार पाडत होती. यावेळी मात्र तिला तिच्या आईच खूप वाईट वाटत होतं. स्वतः च्या हातांनी आपल्या होणाऱ्या सुनेचं स्वागत करण्याचं तिच्या आईचं स्वप्न आज मातीमोल झालं होतं..!