वैर भाग १४

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग १४


कारखानीस बंगल्यात काम करणारे सर्व कामगार आणि अनन्या यांच्या उपस्थितीत कृतिकाचा गृहप्रवेश झाला. ऋषी आणि वर्षां गृहप्रवेश करण्यासाठी आले नाहीत याचा तिला खरतर विलक्षण राग आला होता.

ती दिवसभर बाहेर बसून कंटाळली होती. विक्रांतला मिनिटा मिनिटांची अपटेड देणं एकीकडे चालू होतंच.

अमरच्या आग्रहाखातर ती आता मिस्टर ऋषी आणि वर्षां यांच्या बेडरूम मध्ये आली होती.

“आई, बाबा माझी खूप मोठी चूक झाली.मी कृतिकावर मनापासून प्रेम करत होतो. पण तुम्ही अचानक मिस्टर शहा याच्याशी सोयरिक जुळवणार होता.आणि हे मला अजिबात आवडले नव्हते. त्यांची मुलगी मयुरी तशीही आवडली नव्हतीच. त्यामुळे फक्त बिझनेस साठी माझ्या मनाविरुद्ध मी लग्न का करू? मला नाही माहित मिस्टर शहा आमच्याशी सोयरिक जुळवून कोणती खेळी खेळत होते. पण आज मी माझ्या आवडत्या मुलीशी लग्न केलं आहे.मान्य आहे कृतिकाचं पहिलं लग्न झालं होतं.तिच्या पहिल्या नवऱ्याने तिचा छळ करून तिला वाऱ्यावर टाकलं.यात बिचारीचा काय दोष? मान्य आहे ती घटस्फोटित आहे.पण तरीही तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आई बाबा ती मला कधीही अंतर देणार नाही. झालं गेलं विसरून आम्हाला आमच्या भावी आयुष्यासाठी तुमचा आशीर्वाद दया.” एका दमात अमर न थांबता बोलून मोकळा झाला.

अमरच्या बोलण्यावर ऋषी काही अंशी नमले पण वर्षां मात्र अजूनही रागातच होत्या.कारण त्यांना कृतिका अजिबात आवडली नव्हती.आता तर तिने प्रेमाच्या नाटकाने त्यांच्या मुलावर कब्जा केला होता. आणि एका आईला हे कुठेतरी खटकत होतं. त्यामुळे त्यांनी आपली मान फिरवून घेतली. मिस्टर ऋषींनी दोघांना आशिर्वाद दिला पण वर्षांनी मात्र आशिर्वाद देताना आपली मान दुसरीकडे वळवून घेतली.

“ अनन्या!या घरच्या सुनेला सांग सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय अमरच्या रूम मध्ये जायचं नाही. उद्या पूजा अर्चा झाल्यावरच ती अमरच्या रूम मध्ये जाईल.तोवर तिला गेस्ट रूम मध्ये राहायला सांग.” मनात नसतानाही वर्षांनी कृतिकाला अखेर सुनेचा दर्जा दिलाच!ही एक गोष्ट दोघानाही आनंद देवून गेली.

रात्री सगळ्यांची जेवणे झाली.आज कृतिका गेस्ट रूम मध्ये होती. गेस्ट रूम खाली होती.आणि अमर अनन्या यांच्या रूम वरच्या माळ्यावर होत्या.अमर कृतिकाला भेटण्यासाठी उतावीळ झाला होता. पण वर्षांनी साफ बजावले होते पूजा झाल्याशिवाय दोघांनी एकत्र यायचं नाही. त्यामुळे काही ना काही बहाणे काढून तो गेस्ट रूम कडे जात होता. आणि कृतिका ती तर मस्त डोअर लॉक करुन विक्रांत सोबत व्हिडिओ वर गप्पा मारत बसली होती. कित्येक वेळा अमरने दरवाजा हळू आवाजात वाजवला होता. कारण त्या रूमच्या बाजूलाच ऋषी यांची रूम होती. त्यामुळे त्याचा नाईलाज होता.

पहाट उगवली. आज घरी पूजा असल्याने सर्वजण लवकर उठून तयारीला लागले होते.थोड्याच वेळात गुरुजी आले आणि पूजेला सुरुवात झाली. हिरव्यागार पैठणीत कृतिका सुंदर दिसत होती. वर्षांनी सूनेसाठी बनवलेले दागिने आज तिला दिले होते.त्यामुळे गळा दागिन्यांनी भरून गेला होता. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कपाळावर नाजूक टिकली. सुंदर दिसत होती कृतिका. इतकी सुंदर मुलगी आपली सून होतेय याचा ऋषींना गर्व वाटला असता जर का हे लग्न मान पान ,सगळ्या विधीनी परिपूर्ण असते. पण परिस्थिती अगदी उलट होती. त्याच्या मुलाने मनमर्जी लग्न करून एका मुलीला आई बाबांच्या मनाविरुद्ध कोर्ट मॅरेज करून घरी आणलं होतं. त्यामुळे कोणालाही कोणत्याच विधीना बोलावलं गेलं नव्हतं.


पूजा संपन्न झाली.आणि अनन्याने अमरची रूम सजवायला घेतली.कारण आज त्याची पहिली मधुचंद्राची रात्र होती. लग्न मनासारखं नाही निदान पहिली रात्र तरी खास होऊ देत असा विचार करून बिचारी अनन्या त्यांची रूम सजवत होती.


रात्रीची जेवणे होताच सर्वजण आपापल्या खोलीत गेले. अनन्याने आपल्या वहिनीला दादाच्या रूम मध्ये सोडले आणि तीही आपल्या रूम मध्ये गेली. एका राजकुमाराला शोभेल एवढी मोठी रूम होती ती. कृतिका तर रूम बघून थक्कच झाली. पण तिला हरखून चालणार नव्हते. आपला प्लॅन सक्सेस फुल करायचा होता.आणि आज चांगली संधी चालून आली होती.आणि अशी तशी ही संधी तिला वाया घालवायची नव्हती.

काही वेळातच अमर आपल्या रूम मध्ये आला.
कृतिकाला नवरीच्या वेशात पाहिल्यापासून त्याला तिला मिठीत घेण्याची खूप ईच्छा होत होती. घरचं वातावरण पाहता तो आपली प्रबळ ईच्छा नाईलाजाने मारत होता.

फक्त थोडा अवधी होता. कृतिका त्याच्या मिठीत असणार होती. अचानक त्याला एक कॉल आला आणि तो त्या कॉलवर बोलण्यात व्यस्त झाला. इकडे कृतिका आपला प्लॅन तयार करत होती. तिच्या हातात असा प्लॅन तयार होता की त्या प्लॅननेच ती कारखानीस घराची महाराणी होणार होती.


कॉल संपला आणि अमरने घड्याळात पाहिले. बराच वेळ झाला होता.त्याने मनातच त्या कॉल करणाऱ्या इसमाला शिव्या घातल्या. क्षणाचाही वेळ न दवडता तो आपल्या रूममध्ये आला. आधीच सजलेली कृतिका त्याच्या नसानसात भिनली होती. तिला बघताच तो पुन्हा एकदा मोहरुन गेला.तो तिच्या जवळ जाऊ लागला. कृतिकाच्या नजरेत मिश्किल भाव होते.तर अमर तिच्यात सामावून जाण्यासाठी अतुरला होता.


आवेशाने त्याने तिला आपल्या मिठीत ओढले.तीही किंचित शहारली. अलगद त्याचे ओठ तिच्या ओठावर स्थिरावणार तोच त्या ओठांवर कसलासा कागद आड आला अन् प्रणयासाठी अतुरलेल्या अमरच्या चेहऱ्यावर अठ्या पडल्या.

“काय आहे हे कृतिका? अग आपली पाहिली रात्र आहे आणि तू रंगात आलेला रोमान्सची वाट लावलीस.” किंचित रागात अमर बोलला.

“अहो, मला आधी या पेपरवर सही हवीय.”

“हे काय मध्येच? आणि कसले पेपर आहेत हे?”

“मी तुला हवी असेल तर आधी यावर तुझ्या आईवडिलांची स्वाक्षरी करून घेऊन ये..मगच मी सर्वस्वी तुझी.”

“ आई बाबांची सही? आणि ती कशासाठी?”

“ हे बघा मी इथे मानाने सून म्हणून या घरी आली आहे.मला उद्या तुमच्या आई कडून घरातून हकालपट्टी झाली तर मला नाही सहन होणार .त्यापेक्षा हे घर तुम्ही माझ्या नावावर करत आहात अस या पेपर मध्ये लिहिलं आहे.”

“कृतिका राणी हे सगळ तुझच तर आहे..उगीच नसते विचार डोक्यात आणू नकोस.आणि आई तुला कधीच घराबाहेर काढणार नाही विश्वास ठेव माझ्यावर.”

“नाही मला नाही पटत उद्या तुम्हीही आईच्या बाजूने झालात तर मी एकटी पडणार ना” कृतिका रडण्याचे नाटक करू लागली.

“कृतिका ,आपण यावर उद्या बोलू ना यार आता एवढा रोमँटिक मूड अजिबात स्पॉइल करू नको .” अमर तिला हर प्रकारे समजावत होता पण व्यर्थ!

“आधी सही मग मी.” ती जणू हट्टाला पेटलेली.

नाईलाजाने अमरने ते पेपर हातात घेतले अन् रूम बाहेर पडला. कृतिकाचे ते मादक शरीर,तिच्या शरीराचा सुगंध त्याला वेडावत होता.तिला सर्वस्वी स्वतची बनवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला मागे पुढे पाहणार नव्हता.


अमर आई बाबांच्या रूमबाहेर आला.तोच आतून त्याच्या आईचे म्हणजेच वर्षाचे बोलणे त्याच्या कानावर पडले अन् तो पुरता हादरला….


क्रमशः…