वैर भाग २

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग २


अमरचे विक्षिप्त वागणे मिस्टर कारखानीस यांना पुढे डोईजड होणार होतेच, त्याचबरोबर तो असाच वागत राहिला तर, कंपनीचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नव्हते.

पार्टी रंगात आली.अन् इकडे मिस्टर कारखानीस यांचा फोन वाजला.

“बाबा, आहात कुठे?” एक मधुर गोड आवाज कानी पडला.

“कुठे असणार बाळा ऑफिस मधे आहोत सगळीच. आज पार्टी दिली आहे तुझ्या दादाने .ऑफिस जॉईन केलं आहे म्हणून.” मिस्टर कारखानीस बोलले.

“अच्छा, म्हणजे दादूने तुमचे म्हणणे ऐकले?”

“मग, का बर ऐकणार नाही.सगळी पॉकेट मनी बंद केल्यावर कोनीही शरण येणारच ना?” मिस्टर कारखानीस हसत बोलत होते.

“हो ,बाबा मला ना खूप खूप आनंद झाला आहे. दादाने आपले ऑफिस सांभाळावे इतकीच आपल्या सगळ्यांची इच्छा होती.ती आज पूर्ण झालीय.मी किनई बाबा बाप्पाला नवस बोललाय.” ती खुश होऊन सांगत होती

“नवस? अनी तू कधी पासून नवस करायला लागलीस?” मिस्टर कारखानीस आश्चर्याने विचारत होते.

अनी म्हणजे अनन्या मिस्टर कारखानीस यांची लहान मुलगी.आणि अमर कारखानीसची लाडकी बहीण.
सध्या ही शिकण्याकरिता परदेशात आहे.लवकरच तिचं शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतणार आहे.

“बाबा, दादुला आपण सर्वांनी फोर्स करूनही तो आपले काहीच ऐकत नव्हता. आणि तुम्हीही रोज नाराज होत होतात. आई तुमची अवस्था मला रोज कळवायची. खूप खूप वाईट वाटायचं ऐकून.मग केली बाप्पाजवळ प्रार्थना आणि बोलला नवस.”

“अनी , बाळा नवस काय बोलला आहेस?”

“ते ते बाबा एकवीस संकष्टी मी निर्जळी उपवास करणार आहे.”

“बाळा ,काय मागून बसलीस हे! तुला नाही जमणार निर्जळी उपवास करायला.तू तुझा शब्द मागे घे.आपण वाटल्यास हवी तेवढी दान देऊ.”

“अजिबात नाही बाबा, मी उपवास करणार म्हणजे करणार माझ्या दादू साठी मी मरायला पण तयार आहे बाबा.”

“अनी, बाळा काय बोलतेस ? तुझा दादा सुधारावा म्हणून तुझा चाललेला खटाटोप बघून तुमच्या सारख्या दोन्ही गुणी लेकरांचा मला अभिमान वाटतो.” मिस्टर कारखानीस याचे डोळे भरले होते. कंठ दाटून आला होता.

“बाबा रडतोएस तू?”

“नाही ग, आनंदाचे अश्रू आहेत ते.”

“बाबा, नको ना रडू तू रडलास की मलाही रडायला येतं.”

“नाही गं येडू बाई नाही रडणार मी.”

“नक्की,ना बाबा.?”

“हो,”

“माझा बाबा ना जगातला सगळ्यात प्रेमळ बाबा आहे.तुला माहितेय बाबा?” लेकीच्या कौतुकाने त्या पित्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

“बोल.”

“बाबा, आपल्या दादूच लग्न झालं ना,की आपण मस्त फॅमिली ट्रीप काढुया.आणि सर्वजण अगदी धम्माल करूयात..”

अनन्या आपली एकदम खुशीत सांगत होती. आणि इकडे हा बाप लेकीच्या प्रत्येक शब्दावर हसत होता.रडत होता.कारण त्यालाच माहीत होते आपल्या लेकाचे पराक्रम!

“बाबा sss”

अनन्याचा आवाज आला अन् मिस्टर कारखानीस एकदम भानावर आले.तिकडे त्यांची लेक उद्याची सुखी स्वप्न रंगवत होती.अन् इकडे लेकामुळे तो बाप टेन्शन मध्ये आला होता.

“अनी, बाळा आपण नंतर बोलूया का? आता गेस्ट आहेत समोर. आणि मी असा फोनवर बोलत बसलो तर ते रागावून निघून जातील.”

“हो रे बाबा, कळतं मला तू जा पार्टी एन्जॉय कर.मी घरी गेल्यावर बोलते तुझ्याशी.”

“हो बाळा बाय” तो बाप जड अंत: करणाने बोलून गेला. तिच्याशी खरं तर खूप काही बोलायचं होतं.पण तीच तिच्या भावावरचे प्रेम पाहता.त्यांनीच तिच्या खुशीला आवर घातला.

“हो ,बाबा बाय काळजी घे.” अनन्या काळजीने बोलली.

अन् मिस्टर कारखानीस यांना आपले अश्रू आवरता आलेच नाहीत.ते आपल्या खासगी खोलीत जाऊन ढसा ढसा रडू लागले. लेक एवढ्या दूर असूनही त्यांची खूप काळजी करायची.अन् मुलगा इतक्या जवळ असूनही आपल्या आईवडिलांना त्यांचे दुःख विचारतही नव्हता.
खरचं! ज्यांच्या पोटी मुलगी आहे ते मायबाप कधीच एकटे पडणार नाहीत.कारण लेकासारखं परकं प्रेम तरी ती कधीच आपल्या माय बापावर करणार नाही. आज अभिमान वाटतो मला एक मुलगी असल्याचा.

“ चिमुकल्या पावलांनी
आली लक्ष्मी घराला
आधार भेटला ग पोरी
माझ्या दुष्काळी बनाला”

मिस्टर कारखानीस यांनी भरलेल्या डोळ्यांनी चार ओळी गायल्या. लहानपणापासून त्यांना कविता करायची आवड होती. कितीही मोठा कामाचा व्याप असू दे.ते आपल्या काव्य प्रतिभेला अजिबात दूर करत नसत.

बघता बघता कंपनी मधले सगळे एक एक करून निघून गेले. पण अजूनही नुकतीच रुजू झालेली ती सुंदर दिसणारी कृतिका आणि अमर दोघेही तिथेच होते.

अमरने तिला कंपनीचे काम सांगून थांबवले होते. खरतर काम अस काहीच नव्हतं. तिच्यापुढे मैत्रीचा हात त्याला पुढे करायचा होता. आणि यासाठी कितीतरी बहाणे करायला तो तयार होता. त्याला बोलणारे तर तिथे कोणीच नव्हते.कारण त्या साम्राज्याचा तोच एकमेव वारस अन् बादशहा होता.अखेर तो क्षण आलाच..!

“सर,आपण मला का थांबवलं? काही काम होतं का?”

“हो मिसेस कृतीका. ”

“बोला सर काय काम होतं.?”

“मिसेस कृतिका, मला कळत नाहीय की कोठून सुरुवात करू?”

“बोला सर,जे असेल ते.”

“मिसेस कृतिका मला तुम्ही आवडता..” अमरचे बोलणे पूर्ण न ऐकताच तिने अमरला हाताने इशारा करून थांबवले.अन् ती तिची पर्स घेऊन जाऊ लागली.

“मिसेस कृतिका .. माझं ऐकून घ्या.”

पण ती त्याचं असं ऐकून घ्यायला तिथे थांबलीच नाही.

क्रमशः…


©® सविता पाटील रेडेकर.