वैर भाग ८

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग ८


मिस्टर शहा यांच्या बोलण्यावर ऋषी आणि अमर एकमेकांकडे पाहत राहिले.अनेक प्रश्न मनात घेऊन.

“ बाबा! माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना?”अमर ऋषींचे हात हातात घेत बोलला.

“हो झाला थोडा पण,तुझ्यामुळेच सारं काही मार्गी लागलं.ही डील माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची होती. डील फिक्स करण्यासाठी माझ्यासमोर मिस्टर शहा जेंव्हा एक एक क्षण घड्याळात पाहून मोजत होते.तेंव्हा अस वाटलं आपण आज पूर्णपणे हरलो.पण जेंव्हा तु आलास तेंव्हा ना तुझा खूप म्हणजे खूप राग आलेला. कारण एका मुला मुळे एका बापाला खूप मनस्ताप सहन करावा लागत होता. पण नंतर तू आलास अन् सारं चक्र पालटलं. अमर!तुला सांगू..खूप आनंद झाला रे मला जेंव्हा तू बोललास की, ही माझ्या बाबांच्या कष्टाची कंपनी आहे. खरच त्याक्षणी खूप खूप अभिमान वाटला मला..अमर!तुला एक मंत्र देऊ?”

“हो बाबा!” ऋषीच्या बोलण्याने तोही भाऊक झालेला.

“अमर! तुझ्या वडिलांच्या कष्टाची ही अवाढव्य कंपनी तू पुढे नक्की नेशील रे..पण ही कंपनी पुढे नेण्यासाठी गड्या खूप मेहनत लागते. रात्रंदिवस झटून मेहनत घ्यावी लागते.मग आपल्या हातात त्याच नेत्रदीपक यश पडत. म्हणून सांगतो..तू डोळस वृत्तीने ह्या कंपनीकडे बघावं.अस मनोमन वाटत.” हे सांगताना देखील ऋषी रडत होते.

“बाबा ! तुम्ही फक्त मला साथ दया. या कंपनीचे नाव जगाच्या पाठीवर मी झळकवल्या राहणार नाही.” अमरच बोलणं ऐकून ऋषींना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान वाटला.


“अमर!आता शहा बोलले ते नेमकं काय होतं?”

“मलाही नाही समजलं बाबा पण नक्कीच त्यांना कोणतातरी निर्णय घ्यायचा असेल. उद्या समजेल आपल्याला. त्यांनीच तर बोलावलंय पार्टीसाठी.”

“ ते कोणता निर्णय सांगतात माहित नाही.पण त्यांच्या निर्णयाचा आपल्याला नक्की विचार करावा लागेल अमर.”

“हो बाबा!”

“चल मी निघतो घरी, तू इथलं काम आवरले की ये.”

“हो ..”


फोनच्या रिंगवर रिंग वाजत होत्या.पण ती काही फोन उचलण्याचे कष्ट घेत नव्हती. इतकी गाढ झोपेत होती की, आता उठून तो फोन रिसिव्ह करायचं तिच्या जीवावर आलं होतं. पण फोन इतका वाजत होता की,अखेर तिला घेणं भाग पडले. कदाचित अमर फोन करत असेल असा विचार करून ती फोन घेणं आतापर्यंत टाळत होती. पण जेंव्हा तिने फोन मधले नाव वाचले तेंव्हा डोळ्यावरची झोप कुठल्या कुठे पळून गेली.

“सर, इतके फोन का करत आहात? अहो आपले काम अगदी मी चोख बजावलं आहे.नका काळजी करू.” समोरची व्यक्ती कदाचित आपल्या खबरेने खुश होईल या विचाराने ती बोलतच सुटली होती.

“शट अप..एक शब्द जरी पुढे बोललीस ना,जीभ कापेल तुझी मी.” समोरील व्यक्ती अतिशय रागात बोलत होती.

“हम्म.” कृतिका ने फक्त हुंकार भरला.

“खूप विश्वासाने तुझ्या हाती हे काम दिलं होतं मी,पण तू काय केलंस अजून थोडा वेळ त्याला थांबवून घेता आले नाही का तुला? किती महत्वाची डील माझ्या हाती येता येता निसटली. फक्त तुझ्यामुळे.”

“म्हणजे ?”

“ येडे, ती डील कारखानीस कंपनीला मिळाली.”

“काय sss?” कृतिका जवळ जवळ किंचाळलीच.

“ए, बाई हळू माझे कान फाटतील एवढ्या मोठ्या आवाजात किंचाळत आहेस.”

“ मी इथे त्याला थांबवायचे किती प्रयत्न केल तरीही त्याने डील सक्सेसफुल कशी काय केली?”


“ तुझ्या मेंदू डोक्यात नसून गुढग्यात आहे का ग?”

“का बरं!”

“अग तुला अजून थोडा वेळ थांबवून घेता आले नसते का? इतकी काय घाई होती त्याला हकलन्याची? “

“ खरं तर मी त्याला खूप वेळ अडकवून ठेवलं होतं.पण शेवटी डील साठी ठरलेली वेळ निघून गेल्यावर त्याचा मला खूप कंटाळा येऊ लागला होता. एकतर किती महत्प्रयासाने मी खोटं नाटक वटवत होते.आणि तो माझ्या खूप जवळ यायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी सुद्धा कंटाळले होते.”

“ठीक आहे बघतो पुढे काय करता येईल? तोवर त्याच्या सतत संपर्कात रहात जा.जेणेकरून तो तुझ्यापासून दूर जाणार नाही.”

“सर, मला वाटतं तुम्ही भारतात परत यावं.”

“ हो, येणार आहे उद्याची फ्लाईट आहे.”

“वाह!” ती आनंदाने बोलली.

“माझ्या येण्याने तुला इतका आनंद होतोय?”

“मग, होणार ना..” ती थोडी भाऊक होत बोलली.

“ मलाही इथे खूप बोर होतंय.” तो सगळा राग शांत झाल्यावर बोलला.

“बास आता मलाही नाही दूर राहायचं तुझ्यापासून.. इतके दिवस फक्त तुझ्या प्रेमाखातर सहन करतेय.”

“हो, ग अजून थोडा धीर धर परवा तू माझ्या मिठीत असशील.”

“आता पुढे काय करायचं?”

“आता मिस्टर कारखानीस यांची लहान मुलगी भारतात येतेय.ती आली की मग अमरच तुझ्याकडे दुर्लक्ष होणार.पण तरीही तू तुझे प्रयत्न सोडू नकोस.त्या ऋषी कारखानीसच आपल्या मुलीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो मुलीत जास्त गुंतून जाईल.आणि याचा फायदा आपल्याला होईल.”

“बरं”

“पण आता तुझ्या हातून डील गेली त्याच काय.?”

“एक डील जरी गेली तरी कारखानीसची सगळी प्रॉपर्टी आपलीच तर आहे..” अस बोलून तो गूढ हसू लागला.आणि त्याच्या हास्यात तीही सामील झाली.


आज कारखानीस यांच्या बंगल्यात घाई गडबड सुरू होती. नोकरचाकर इकडून तिकडे करत होते. ऋषी सगळ्यांना ताळ्यावर घेत होते.कुठे एवढीशी चूक त्यांना नको होती.शेवटी आपली लेक आज येणार म्हणून तेही खूप खुश होते.

“वर्षा ! किती उशीर?” ऋषींना अजिबात धीर धरवत नव्हता.

“ काय हे ऋषी आलेच ना..किती घाई तुझी लेक इथे पोहचायला अजून दोन तास आहेत तरीही तुझी विमानतळावर जायची नुसती घाईच घाई!”

“ अगं आज माझी लाडकी लेक येतीय तुला नाही कळणार ..बाबा साठी लेक काय आहे ते.” ऋषी आनंदी होत बोलले

“हो,हो चल तुझ्या मनासारखं होऊ दे. निघूया आपण”

“हो ग पण हा अमर कुठे राहिला?”

“ येईल तो फ्रेश होऊन नुकताच आलाय बाहेरून.मी म्हणत होते सर्वजण एकत्र जाऊ.पण तुलाच खूप घाई आहे.”

“ठीक आहे चल केंव्हा यायचं तेंव्हा येईल तो..”

ऋषींच्या बोलण्यावर याचं काहीही होणार नाही या अविर्तभावात वर्षांनी मान हलवली.

तोच समोरच्या टीव्ही वर बातमी झळकली..

“ युएस वरून भारतात परतणाऱ्या विमानाचा भीषण अपघात”

ऋषीं ती बातमी ऐकताच जा कोसळले.

क्रमशः..


©® सविता पाटील रेडेकर.