वैर भाग ९

सख्खा भाऊ पक्का वैरी
वैर भाग ९


टीव्ही वरची बातमी ऐकताच ऋषी धाडकन जमिनीवर कोसळले. त्यांच्या लाडक्या लेकीच्या विमानाचा अपघात झाला होता.तिच वेळ होती. मुंबई विमानतळावर अनन्याला घेऊन येणाऱ्या विमानाची आणि तेच विमान अपघाताने पेट घेत घेत समुद्रात पडल्याच न्यूजचैनेल वर दाखवत होते. वर्षा देखील चक्कर येऊन पडल्या.आणि नोकराने अमरला हाक मारली.

“अमर दादाss मॅडम आणि सर चक्कर येऊन पडलेत लवकर या .” शामू हे ऋषीचे विश्वासू आणि जुने नोकर होते. साऱ्या घराची देखभाल तेच करायचे.त्याच्याव्यातिरिक्त अजूनही काम करणारे नोकर होते.पण ते आपापल्या कामाशी प्रामाणिक असायचे.कधीच कोणताही नोकर कामाशी खाडाखोड करायचे नाहीत. एवढे प्रेमळ मालक आणि मालकीण असताना त्यांना कसलीच कसर नव्हती. प्रेतेक नोकराला भरमसाठ पगार दिला जायचा.कधी नोकरांच्या घरातल्या व्यक्तीला अडचण असली की ऋषी त्यांना नेहमी मदत करायचे. त्यामुळे घरातले सगळे नोकर अतिशय प्रामाणिक राहायचे.

शामु काकाच्या ओरडण्याने अमर सहित सर्वच स्टाफ गोळा झाला.सर्वांनी मिळून त्यांना बेडरूम मध्ये नेऊन झोपवले. अमरने लागलीच फॅमिली डॉक्टरना फोन करून बोलाऊन घेतले.

डॉक्टरनी दोघानाही चेक केलं.आणि धक्क्याने त्यांना चक्कर आली असल्याचं सांगून इंजेक्शन देऊन ते लवकरच शुद्धीवर येतील अस सांगून निघून गेले.


“शामु काका!आई बाबा कशामुळे चक्कर येऊन पडले?” अमर आपल्या रूम मध्ये असल्याने त्याला काहीच समजल नव्हत.त्यामुळे अचानक दोघानाही चक्कर कशी काय आली असावी हा प्रश्न त्याला पडला.

“अमर दादा,साहेब अनन्या दिदीला आणण्यासाठी जात होते.अन् टीव्ही वर एका विमान अपघाताची बातमी झळकली आणि ती बातमी बघून दोघेही क्षणात खाली कोसळले.”

अमरने लागलीच टीव्ही ऑन केली आणि त्यालाही धक्का बसला.समोर पुन्हा तिचं बातमी झळकत होती.आणि त्यालाही रडू फुटलं.आपल्या लाडक्या बहिणीचा अपघात झाला आहे ही गोष्ट त्याला खरी वाटतं नव्हती. रात्रीच अनन्या सोबत तो भरभरून बोलला होता.

“दादू फक्त दहा तास बस्स मी माझ्या लाडक्या दादूच्या मिठीत असणार..अन् दादू मला गरमगरम तुपाचा शिरा बनवून खाऊ घालणार”

“लाडक्या बहिणीसाठी तुझा दादू कायम हजर असणार.. बच्चा! आता तुला मी कुठेच जाऊ देणार नाही.”

“मीही तुला सोडून कुठेच जाणार नाही.” अनन्या गहिवरून बोलली.

“ हो का? वेडू अग उद्या सासरी तर जावं लागणारच ना?”

“दादू! मला नाही लग्न करायचं इतक्यात.”

“बाबांना सांगतो तू आल्या आल्या लग्नाची स्थळ बघायला..” अमर तिची गंमत करत होता.

“दादू तुला इतकी ओझी झाली का रे मी?” तिकडं अनन्याच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागलेल्या.
आधीच घरापासून पाच वर्ष दूरच्या देशात राहून वैतागलेली त्यातच उद्या घरी जाणार या आनंदात असणाऱ्या तिला भाऊ दूर करायचं बोलत होता. पण तिचा लाडका दादू तिची थट्टा करतोय हे समजलच नाही बिचारीला.

“बच्चा ss” अमर तिला हाक देत होता.पण मॅडमनी रागात कॉल कट केलेला. तिच्या रागात कॉल कट करण्याने अमरने डोक्यावर हात मारून घेतला.तो तिची मस्करी करत होता आणि वेडी खरच समजून रुसली होती.उद्या ती आल्या आल्या तुपाचा शिरा बनवून तिला मनवू असा विचार करून तोही कामात बिझी झाला.


आता तर तो त्या शिर्याची तयारी करणार होता.म्हणून तर त्याने विमानतळावर आई बाबांना जायला सांगितलं होतं.कारण त्याला आपल्या बहिणीला आपण शेपच्या वेशात दाखवायचं होत.तेही हातात तिच्यासाठी गरमागरम शिऱ्याची प्लेट घेऊन.

“अमर दादा!”

शामुच्या हाकेने तो भानावर आला. तोच ऋषींच्या ओरडण्याचा आवाज आला अन् सर्वजण तिकडे पळाले.

“बाबा! तुम्हाला काय होतंय..?” अमर त्याच्याजवळ बसत बोलला.

“अमर ss आ प लीअ नन्या”
एक एक शब्द ते महतप्रयासाने बोलत होते.खूप धक्का बसला होता ऋषींना. शेवटी लाडाची लेक अशी अपघातात निघून जावी हेच त्याच्या पचनी पडत नव्हतं.

“बाबा तुम्ही नका इतका त्रास करून घेऊ. मी जाऊन बघतो नक्की ही खबर खरी आहे की खोटी आहे ती.आपल्या बच्चाला काहीही झालं नाही बाबा.”
अमर जितकं समजावता येईल तेवढं समजावत होता. एकीकडे आई अजूनही बेशुद्ध होती. दुसरीकडे सदम्यात असलेले त्याचे वडील आक्रोश करीत होते. सर्व स्टाफ डोळ्यात पाणी आणून उभा होता.

“अमर चल,मला काहीही करून तिकडे जायला हवं..”ऋषी उठून बेडरूम बाहेर आलेही.


“बाबा! प्लीज मी बघतो ना!तुम्ही नका काळजी करू
बसा इथे.”

“नाही अमर नाही..मला जायलाच हवं.” ऋषी दरवाजासमोर गेलेही असतील तोच एक मोठा आवाज झाला.

“बाबा sssss! मी आले.” अनन्या ओरडतच आत आली.

आपल्या लेकीला सुखरूप बघून ऋषी तर पार आनंदून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. अमर तर तिला बघून थक्क झाला होता. इकडे तिच्या अपघाताची बातमी कानावर आलेली असताना ती सुखरूप कशी काय आली या प्रश्नाने तिच्याकडे आ वासून पाहत होता.

“अनि! माझं बाळ ,माझा लाडोबा. तू सुखरूप आली आहेस बाळा?” तिला मिठीत घेत ऋषी बडबड करत होते.


“हो, बाबा मी सुखरूप आहे. बघ मला काहीच झालं नाही पण तू तू का घाबरलास इतका?” अनन्याने आश्चर्याने विचारले.

“बच्चा तुझ्या विमानाचा तर अपघात झाला होता ना?” अमर बोलला.

“ दादू, हो त्या विमानाचा अपघात झाला आहे ही गोष्ट खरी आहे. पण मी त्या विमानात नव्हते.”

“अग तू तर रात्रीच सांगितल होत त्याच विमानात बसले आहे म्हणून मग ??”

“अरे दादू..माझा पासपोर्ट नेमका चेकिंग वेळीच गायब झाला.मग माझी शोधाशोध सुरू झाली. तोवर हे विमान आकाशी झेपावले. पण एका मित्राच्या मदतीने मला इथे दुसऱ्या विमानाने सुखरूप पोहचता आलं.”


“कोण कोण आहेत अनि ते..आताच त्याचा फोन नंबर नाहीतर ऍड्रेस दे.” ऋषींना त्याचं आभार मानायचं होत आज त्यांच्यामुळे त्यांची लेक सुखरूप आली होती.


“बाबा धीर धरा.ते माझ्यासोबत इथे आले आहेत थांबा मी बोलावते त्यांना..” अनन्या बाहेर गेली. आणि एक अंदाजे पंचवीस वर्षांच्या तरुणाला सोबत घेऊन आली.दिसायला तर तो एकदम सुंदर होता.अंगावर लाल शर्ट त्यावर काळा कोट, डोळ्यावर गॉगल, बारीक जेल ने सेट केलेले केस, हातात महागडे वॉच, अगदी एक बिजनेसमन वाटतं होता तो.

“विक्रांत सर! हे माझे बाबा आणि हा माझा मोठा भाऊ”

“ नमस्कार!” चेहऱ्यावर स्मित ठेवून त्याने अभिवादन केलं.

“नमस्कार सर!” ऋषी बोलले .

“ अंकल तुम्ही मला वडीलासमान आहात.आणि सर तर अजिबात बोलू नका.”

“नमस्कार मिस्टर विक्रांत!” अमर हातात हात देत बोलला.

“नमस्कार मिस्टर अमर !” स्वतः च नाव त्याच्या तोंडून बाहेर पडताच अमर चपापला.

“ सॉरी ते तुमच्या बहिणी कडून समजल तुमचं नाव ” अमरच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून विक्रांत बोलला.

“बाबा !आई??”

“चल बच्चा आई अजूनही बेशुद्ध आहे..”

“काय sss” अनन्या किंचाळत वर्षांच्या बेडरूम कडे धावली.

क्या बात है वाटलं ही नव्हत एवढं जोरदार आपलं या घरात स्वागत होईल..तो मनातच पुटपुटला.

क्रमशः…