चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
वाईटातून चांगलं _ भाग १
मनालीला बीकॉम झाल्यावर तीन वर्षांनी सरकारी कार्यालयात नोकरी मिळाली त्यामुळे ती मनोमन खुश झाली. एकतर खऱ्या अर्थाने आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिल्याचं समाधान तिला मिळालं आणि घरच्या सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीत तिचाही थोडा हातभार लागणार होता त्यामुळे घरचे पण खूश होते. त्याआधी तिने खाजगी कंपनीत छोटी मोठी नोकरी केली होती. आता मनाली रोज सकाळी लवकर उठून आईला कामात थोडीफार मदत करून ऑफिसला जात होती आणि संध्याकाळी परत येत होती. नवीन ऑफिस चांगलं होतं. जुन्या काळची चार मजली इमारत असल्यामुळे लिफ्टची सोय नव्हती. एकाच इमारतीत वेगवेगळे विभाग होते. मनालीची पहिल्या मजल्यावरच्या अकाउंट्स विभागात नेमणूक झाली होती. तिच्या सारखीच नवीन चार-पाच डोकी सोडली तर इतर सर्वजण तिला सीनियर होते.
हळूहळू ती तिथे रुळत होती. तिच्या बरोबर नवीन नेमणूक झालेल्या प्रियाशी तिची मैत्री झाली. दोघी एकत्रच डबा खायला जायच्या संध्याकाळी एकत्रच निघायच्या त्यामुळे त्यांच्यात काही काळानंतर मैत्रीयुक्त जिव्हाळा निर्माण झाला होता. एकदा ती आणि प्रिया डबा खायला कॅन्टीनमध्ये जात होत्या तेव्हा तिच्या समोरून एक रुबाबदार तरुण आला. मनाली त्याच्याकडे पाहत असतानाच तोही नजर रोखून तिच्याकडे पाहत होता. तो जवळ आल्यावर मनालीच्या लक्षात आलं की हा खूपच देखणा आहे. पावणेसहा फूट उंची, सावळा वर्ण, नागमोडी वळणाचे केस, भेदक नजर असे त्याचे व्यक्तिमत्व पाहून मनाली भारावून गेली. ती जास्त देखणी नसली तरी चारचौघींत उठून दिसणारी होती. तिला कळलं की तो तरुण दुसऱ्या मजल्यावरील विभागात कार्यरत आहे.
आता ते बऱ्याच वेळा एकमेकांसमोर येत होते आणि एकमेकांशी त्यांची नजरानजर होत होती. ती बाजूने जायला लागली की तो काहीतरी सूचक बोलायचा. मनालीला त्याच्या बोलण्याचा कधी राग आला नाही उलट मनातून आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. असं असलं तरी तो तरुण स्वतःहून मनालीशी कधी बोलायला आला नाही. मनालीला तो खूपच आवडला होता. तिने प्रियाला एकदा आपल्या मनातलं बोलून दाखवलं,
"प्रिया तो मला खूपच आवडला आहे पण तो स्वतःहून आपल्याशी बोलायला येत नाही. मला त्याच्याशी बोलायचंय."
"अगं तुला तो आवडतोय, तुला त्याच्याशी बोलायचंय मग तू तो बोलायला येण्याची वाट का बघतेस. उद्या शनिवार आहे आपला हाफ डे आहे की नाही. आपण सगळेच शनिवारी कॅन्टीनमध्ये काहीतरी खातो. उद्या आपण तो कॅन्टीनमध्ये गेल्यावरच जाऊया. तेव्हा तू त्याच्याशी बोल."
"ही चांगली आयडिया आहे."
दुसऱ्या दिवशी मनाली आणि प्रिया तो तरुण कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर त्याच्यासमोर जाऊनच बसल्या. एरवी कधीही परक्या मुलांशी न बोललेल्या मनालीमध्ये कुठून हिम्मत आली कोण जाणे, तिने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली,
"हाय मी मनाली. इथे पहिल्या मजल्यावरील अकाउंटस डिपार्टमेंट मध्ये आहे. आपण एकमेकांना रोज बघतो म्हणून म्हटलं ओळख करून घ्यावी."
"अच्छा. मी सुहास. मी म्हटलं तुम्हाला बोललेलं आवडेल की नाही म्हणून मी स्वतःहून बोलायचा प्रयत्न केला नाही. आता आपण रोजच एकमेकांशी बोलू शकतो."
अशी मनाली आणि सुहासची ओळख झाल्यावर दोघे रोजच बोलू लागले. हळूहळू ते बाहेर हॉटेलमध्ये भेटू लागले. असंच एकदा ते दोघं बाहेर भेटले असताना अचानक त्यांच्यासमोर मनालीची मैत्रीण रश्मी आली.
"हाय मनु कशी आहेस." तिचं लक्ष तिच्या बरोबर असलेल्या सुहासकडे गेलं,
"अरे सुहास तू हिच्याबरोबर कसा. तुम्ही एकमेकांना ओळखता!"
"अगं हो ही आमच्याच ऑफिसमध्ये आहे. जरा काम होतं म्हणून मी तिच्याबरोबर आलोय."
रश्मीने पाहिलं तर दोघांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. सुहासचे भाव तर एखादी चोरी पकडली गेल्यासारखे झाले होते. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर रश्मी मनालीला म्हणाली,
"मनु उद्या मला जरा शॉपिंगला जायचं आहे. आपण जिथे नेहमी भेटतो ना तिथे भेटूया. शॉपिंग करून जरा फिरू. तू घरी सांगून ये रश्मी बरोबर जाते उशीर होईल. खूप काही बोलायचं आहे."
"हो हो उद्या नक्की भेटूया. मी निघते आता बाय."
रश्मी बोलत असताना सुहासच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मनालीला कळेच ना की हा एवढा घाबरला का.
(सुहास का घाबरला असावा आणि रश्मी मनालीशी इतकं काय बोलणार आहे पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा