चॅम्पियन ट्रॉफी २०२५
वाईटातून चांगलं _भाग २
दुसऱ्या दिवशी मनाली आणि रश्मी ठरलेल्या ठिकाणी भेटल्या. त्या दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या आणि अधून मधून कुठेतरी बाहेर भेटून गप्पा मारायच्या, खरेदी करायच्या. रश्मीने काल सुहासला मनाली बरोबर पाहिल्यापासून तिच्या मनात एक शंका डोकावत होती. सुहासने मनालीला स्वतःची खरी ओळख दिली असेल की असाच तिला भुलवत असेल. मनाली खरंतर साधी सरळ आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होती. तिला काही छक्के पंजे माहीत नव्हते. दोघी भेटल्यावर अशाच त्यांच्या गप्पा सुरू असताना रश्मी तिला म्हणाली,
"मनु तू त्या सुहासला कधीपासून ओळखते? तुला नोकरीला लागून आता फक्त सहाच महिने झालेत ना? "
"हो मी त्यानंतरच त्याला ओळखायला लागले आहे पण आता आमच्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आहे. रश्मी तू कशी काय त्याला ओळखतेस? "
"हे बघ मनु सुहास माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि त्याने तुला सांगितलं आहे की नाही माहित नाही पण त्याचं लग्न झालं आहे." मनाली जवळजवळ किंचाळलीच,
"काsssय! अगं कायं बोलतेस तू. एवढ्या दिवसात तो मला कधीच याबद्दल काही बोलला नाही." मनाली किंचाळल्या मुळे आजूबाजूच्या लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं.
"मनु शांत हो. अगं हा सुहास स्वतः दिसायला देखणा आहे म्हणून मुली त्याच्यावर भाळतात. त्याचा तो नवीन मुलींशी मैत्री करून गैरफायदा घेतो."
"अगं रश्मी मी तर त्याच्यावर मनातल्या मनात प्रेम करायला लागले होते. बरं झालं तू काल भेटलीस आणि मला आता सावध केलंस."
"आता तुझ्याच ऑफिसमधला मुलगा तू थोडी चौकशी करायला हवी ना."
"खरंच रश्मी हे माझ्या काही लक्षातच आलं नाही. थांब आता उद्या तो मला भेटल्यावर मी त्याची बरोबर चंपी काढते. दिसायला चांगला आहे म्हणून असं वागायचं. मुली काय रस्त्यावर पडल्या आहेत का?"
"आता त्रागा करून काही फायदा नाही. आता तू त्याच्याशी न बोललेलच बरं. अगं तो पक्का बेरका आहे."
"रश्मी म्हणूनच तुला बघून त्याच्या तोंडावरचा रंग उडला होता. तो घाबरला असेल तू त्याच्या बायकोला काही सांगशील."
"त्याला काहीच फरक पडत नाही. हे असे लोक फार पोचलेले असतात."
मनालीचा मूड पार बिघडून गेला होता. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर दोघी आपापल्या घरी गेल्या. घरी गेल्यावर मनाली जास्त कोणाशी न बोलता जेवून झोपायला गेली. तिच्या मनात असंख्य विचार घोंगावत होते. ती स्वतःलाच दोष देत होती आपण त्याच्याशी का स्वतःहून बोलायला गेलो. आपण साधे त्याच्या घरी कोण कोण असतं हे देखील विचारलं नाही. आपल्या कॉलेजमध्ये पण खूप मुलं होती पण आपल्या ग्रूपचं ध्येय होतं प्रेम वगैरे नंतर आधी अभ्यास आणि अभ्यासेतर स्पर्धा. त्या निमित्ताने किती मुलांच्या संपर्कात आलो पण निखळ मैत्रीच्या भावनेने. इथे हा सुहास लग्न झालेला असून सुद्धा आपल्याला पाहून कोणी मित्र बरोबर असला की सूचक काहीतरी बोलायचा. एकटाच असला की हिंदी सिनेमातील गाणे गुणगुणायचा. आपल्याला ते सर्व आवडत होते. आपण किती मोहरुन जायचो. अगदी सिनेमातील नायिकेचा फील यायचा. त्याला पक्क ठाऊक होतं की मुली त्याला पाहून फिदा होतात.
(दुसऱ्या दिवशी मनाली सुहासला कसा फैलावर घेते की आणखी काय घडतं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा