चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
वाईटातुन चांगलं _भाग ३
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना मनाली खूप भडकलेलीच होती. दिवसभरात फक्त एकदा सुहास मनालीच्या समोर आला पण तो सज्जन माणसासारखा गुपचूप निघून गेला. मनालीने ठरवलं की संध्याकाळी तो निघाल्यावरच आपण त्याच्या पाठीमागे जाऊन त्याची चांगलीच कानउघाडणी करायची. त्याप्रमाणे संध्याकाळी सुहास निघाल्यावर मनालीने ताबडतोब आपली पर्स उचलून त्याच्या मागे निघाली. थोड्या अंतरावर तिने त्याला गाठले आणि जोरातच आवाज दिला,
"ए पळपुट्या आता कुठे पळतोस थांब." सुहास थांबल्यावर ती त्याच्या जवळ जाऊन जोरातच म्हणाली,
"नालायक माणसा तुला काही नीतिमत्ता वगैरे आहे की नाही?तुझं लग्न झालंय हे तू मला आधीच सांगितलं का नाहीस? जरा देवाने बरं रूप दिले तर तू मुलींना असं फसवतोस. तिथे घरी बायकोची फसवणूकच चालली आहे ना?" छद्मीपणे हसत सुहास म्हणाला,
"तू मला कधी विचारलंस का. नैतिकतेच्या गोष्टी कोणाला सांगतेस? मी काय आरतीचं ताट घेऊन तुला बोलावलं नव्हतं माझ्याशी बोलायला ये. तू स्वतःहूनच माझ्याशी बोलायला आलीस. मी काही प्रेमाच्या आणाभाका घेतल्यात का की तुला लग्नाचं वचन दिलयं? तू जास्त शहाणपणा करू नकोस. चल चालू लाग."
"आता दुसऱ्या मुली बरोबर असं काही करशील ना तर तुझ्यासमोर येऊन मी तिला सावध करेन."
मनाली तिथून त्वेषाने निघून चालू लागली. तिने स्वतःच माती खाल्ली होती. सुहास सारख्या लोकांना बोलून काहीच फायदा होणार नव्हता. तिच्या मनात आलं आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला कोणीतरी आवडला आणि तो असा निघावा. एकतर आपल्या घरी आपल्या लग्नाचं बघत आहेत. त्यांना आपण सुहास बद्दल सांगणार होतो. नशीब काही बोलण्याअगोदर सर्व कळलं. नंतर मनालीला शांत करत प्रियाने मनालीची समजूत घातली,
"तू आता त्याचा विषय सोडून दे. अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुझी मैत्रीण रश्मी अगदी वेळेवर तुझ्या मदतीला आली म्हणून बरं. खरं तर तुला एक सांगायचं आहे. पण तू ह्या सुहास मध्ये गुंतली होतीस म्हणून काही बोलले नाही."
"काही गंभीर आहे का?"
"म्हटलं तर हो. मी आत्ताच अशासाठी सांगते की तुझ्या घरचे पण तुझ्या लग्नाचं बघत आहेत. आपला सुजय आहे ना त्याला पण तू खूप आवडतेस. खरंतर तो तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय. त्याने मला तुला विचारायला सांगितलं होतं पण या सुहास मुळे मी काही बोलले नाही."
"अग पण सुजय मला डायरेक्ट विचारू शकत होता. आपण एकत्र काम करतो." तिला मध्येच थांबवत प्रिया म्हणाली,
"आपण एकत्र काम करतो म्हणूनच तो तुला डायरेक्ट काही बोलला नाही. एकमेकांच्या कामात मदत करतो मध्येच आपले हास्यविनोद चाललेले असतात. तुझा उगाच गैरसमज होऊ नये म्हणून त्याने तुला काही विचारलं नाही. त्याने तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू त्याला आवडली होतीस."
"हे बघ प्रिया मला आत्ताच मानसिक धक्का बसला आहे मी तुला एवढ्यात काही सांगू शकणार नाही."
"मनाली थोडे दिवस जाऊ दे सारं काही नीट होईल काळजी करू नकोस."
कधी कधी सुख आपल्या अवतीभोवतीच असतं तरी आपण सुखाचा शोध घेत दूरवर जातो.
(मनालीच्या जीवनात आलेलं वादळ दूर होईल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा