Login

वाईटातून चांगलं _ भाग ४ (अंतिम)

एका मुलीच्या आयुष्यात फसगत झाल्यानंतर कसं चांगलं घडतं
चॅम्पियन ट्रॉफी २०२५

वाईटातून चांगलं _ भाग ४ (अंतिम)

मनाली आधीसारखी हसत खेळत घरात वागत नव्हती. तिच्या आईने तिला काळजीने विचारलं,

"मनु तुला काही होतंय का तू हल्ली गप्प गप्प का असतेस?"

"नाही आई हल्ली ऑफिसमध्ये जरा कामाचं प्रेशर जास्त आहे."

"तुझ्याकडे रजा असतील ना रजा घेऊन दोन दिवस आराम कर बाळा." मनालीला आईची काळजी कळत होती.

ऑफिसमध्ये सुद्धा मनालीला असं उदास पाहून सुजयला वाईट वाटत होतं. ऑफिसमध्ये नव्याने आली तेव्हा मनाली जरा लाजरी बुजरी होती. पण आता आपल्या तिघांचं खूपच छान जमतं. मी, प्रिया आणि मनाली एकमेकांशी सगळं शेअर करतो. सुहासबद्दल पण एक दोन वेळा मनाली आपल्याशी बोलली तेव्हा आपल्या मनात खूप असूया निर्माण झाली होती, परंतु आता प्रियाने त्याला सारा प्रसंग सांगितल्यानंतर एका बाजूने त्याला खूप आनंद झाला होता. तो आणि प्रिया दोघं मिळून ऑफिसमध्ये मनालीला बोलतं करायचा, हसवायचा प्रयत्न करत होते. मनाली विचार करत होती हा सुजय आपल्यावर प्रेम करतोय तरी आपल्याला कधी कळलं सुद्धा नाही. खरं प्रेम असंच शांत असतं का. सुजय खूप नम्र आणि सर्वांना सांभाळून घेणारा आहे. पण आता एकदा ठेच लागली आहे तर कोणताही निर्णय घ्यायची घाई करायची नाही. सारं काही विचार करूनच करायला हवं.

हळूहळू मनाली पूर्वपदावर येत होती. सुजयने काम करता करता मनालीला आपल्याबद्दल आणि आपल्या घरच्यांबद्दल सारं काही सांगितलं होतं. हळूहळू मनालीच्या मनांत त्याच्याबद्दल हळुवार भावना निर्माण होत होत्या. काही दिवसांनी सुजय मनालीला म्हणाला,

"मनाली तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटूया का. पाहिजे तर तू सोबत प्रियाला पण बोलाव." मनालीला वाटलं सुजय आपलं मन किती जपतोय.

"सुजय त्याची काही गरज नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे."

नंतर दोघेच एक दिवस बाहेर भेटले तेव्हा सुजय तिला आश्वासक स्वरात म्हणाला,

"मनाली मी तुझ्यावर कधी प्रेम करायला लागलो मला कळलं सुद्धा नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मी तुला कायम सुखात ठेवेन. माझ्याशी लग्न केल्याचा तुला कधीच पश्चाताप होणार नाही. तुला कायं वाटतं."

"मला आधी माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल. घरच्यांनी माझ्यासाठी एखादा मुलगा बघण्याआधीच मला त्यांना सांगावं लागेल. तू तुझ्या आई बाबांशी बोलला आहेस ना."

"हो मी त्यांना तुझ्याबद्दल बोललो आहे. तुझी सुहासची मैत्री होती हे मी तुला पुढील आयुष्यात कधी जाणवू देणार नाही, कधीच उल्लेख करणार नाही कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे."

"खरंच सुजय मी सुद्धा "वरलीया रंगा" कशी भुलले तेच कळत नाही. कधीकधी वाईटातून चांगलं होतं म्हणतात ते हेच नाही का! माझ्या आयुष्यात अजून काही वाईट घडण्याआधीच मला सर्व कळलं ते खूप चांगलं झालं. माझ्याजवळ परीस असताना मी दगडाच्या मागे लागले."

"मनाली ते सर्व विसर आता. आता आपण दोघे मिळून असंच म्हणायला हवं,

"झाले गेले विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे"