Login

वजाबाकी जीवनाची- आयुष्याचं गणितच चुकलं भाग 3 अंतिम

Ayushyach ganitach chukl

वजाबाकी जीवनाची...

आयुष्याचं गणितच चुकलं... भाग 3 अंतिम

आयुष्याच्या संध्याकाळी मनोजला गिरीजाची खुप आठवण आली. 

नकळत पस्तीस वर्षानी त्यांची भेट झाली. गिरीजाने मनोज आणि आर्यनला  भेटण्या पासून अडवले नाही. मुलगा आणि बाप म्हणून दोघांचं रक्ताच नातं होतं, ती त्या नात्याच्या आड कधीच आली नव्हती.

आर्यनच्या लग्नात गिरीजाने मनोजला पुजेचा मान दिला होता. तिला हे अजिबात करायची इच्छा नव्हती, पण आर्यन एकुलता एक मुलगा असल्यामुळे तिने तो अधिकार त्याच्यापासून हिरावून घेतला नव्हता.

गिरीजाने जास्त जवळीकता दाखवली नव्हती. मनोज एक दोन दिवसाआड आर्यनला भेटायला येऊ लागला.

आर्यनला आईचे कष्ट माहीत होते, म्हणून त्यालाही मनोजविषयी लगाव  नव्हताच.

गिरीजाने मनोजचे दूर राहणे पचवले होते. 

मनोज आणि गिरीजाचे सुर कधी जुळलेच नव्हते. 

आर्यनला वडिलांचा स्वभाव माहित होता. अधुन-मधून भेटून सुद्धा मनोजचा एकाकीपणा कायम राहिला.


असेच एक दिवस गिरीजाच्या घरून परतताना उदासवाणा मनोज गाडीची वाट पाहत बसला होता. 

त्याला मग मागील काही वर्षाचा प्रवास आठवला. गिरीजा प्रेग्नेंट होती त्या वेळेस सुद्धा मनोजने काहीच जबाबदारी घेतली नव्हती, आठव्या महिन्या पर्यंत ती काम करत राहिली. गिरीजाच्या मैत्रिणी  तिची काळजी घेत. 

सासरच्या लोकांनी तिच्या कडे ढुंकून सुद्धा पाहीले नव्हते. तिचा नवराच तिची देखभाल घेत नसेल तर कोण लक्ष देणार. गिरीजाच्या चांगल्या वागणुकी मुळे एक-दोन जणांनी थोडी मदत केली. 


मुलगा जन्माला आला त्या वेळेस मनोज आणि त्यांच्या घरच्यांनी कोड कौतुक तर सोडा चेहरा सुद्धा बघितला नव्हता. त्यामुळे गिरीजा खुपच दुखावली होती. तिने याच वेळी निर्णय घेतला वेगळे राहण्याचा. या वेळेस मात्र मनोज साफ चुकला. तो आपल्याच धुंदीत होता. 

आपल्या स्थितीला कोण जबाबदार आहे याची उजळणी मनात करत होता. विचित्र स्वभाव, जबाबदारी टाळणे, नाकरतेपणा, पत्नी बद्दल असणारा द्वेषपूर्ण राग आणि मुलाबद्दल नसलेले प्रेम यामुळे मनोजची अशी परिस्थिती झाली. मनोजला जीवनात काय मिळवायचे होते आणि काय मिळवले याचा काही जमाखर्चात मेळ बसत नव्हता. 


बऱ्याच लोकांनी मनोजला उदास, विचार मग्न आणि शून्य दृष्टीत हरवलेला बघितला. मनोजच्या विचित्र स्वभावामुळे सहसा त्यांचे कोणा सोबत पटत नसे. त्यांचे साध्या कामगारा पासून ते गावाच्या प्रधान पर्यंत सगळ्या सोबत भांडण व्हायचे. 

चिडखोर वृत्ती आणि एकाकीपणा यांचे मिश्रण होऊन विचित्र स्वभाव आकाराला आला होता. सुख दु:ख वाटण्यासाठी कुणी मित्र नव्हते. होते पण ते फक्त कामपूरते मामा असे होते, स्वार्थी होते. सख्खा मित्र असा कुणीच नव्हता. मनोजने कधी तसा प्रयत्नही केला नव्हता.


मनोजला उतारवयात कोणीच उरले नव्हते. जो पर्यंत पैसा आणि ताकद होती तो पर्यंत आईने आणि भावाने साथ दिली. पण मनाची साथ करायला कोणीच उरले नव्हते. त्यामुळे चिडचिडही वाढली आणि एकटेपणा छळू लागला.


उतार वयात कोणाचीच मैत्री, साथ नसल्यामुळे एकाकीपणा खाऊ लागला. आयुष्याच्या जमाखर्चातून फक्त एकटेपणाची वजाबाकी शिल्लक राहिली. नंतर त्याच्या लक्षात आलं आयुष्याचं गणितच चुकलं.

समाप्त:

0

🎭 Series Post

View all