वाळलेली ताक भेंडी

वाळलेली ताक भेंडी (रेसिपी इन मराठी)
वाळवणीचे पदार्थ
वाळलेली ताक भेंडी

साहित्य

अर्धा किलो भेंडी, दोन वाट्या आंबट ताक, चवीनुसार मीठ, हळद. (भेंडीचे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता)

कृती

भेंडी स्वच्छ धुवून पुसून लांबट चिरून घ्या. त्या चिरलेल्या भेंड्या कडक उन्हात वाळवा. नंतर या वाळलेल्या भेंड्या ताकात मीठ व हळद घालून दोन दिवस ताकातच भिजत ठेवा. हे भेंड्या घातलेले ताक फ्रिजमध्ये ठेवा म्हणजे खराब होणार नाही. दोन दिवसानंतर ताकातून काढलेल्या या भेंड्या परत कडक उन्हात वाळवा व हवाबंद डब्यात भरून ठेवा. या ताकातल्या भेंड्या तळून छान लागतात. शिवाय पौष्टिक असतात.

२)गव्हाचा चीक

उन्हाळ्यात गव्हाच्या चीकापासून पळी पापड, कुरडया आपण नेहमीच करत असतो. परंतु हा चीक वाळवून ठेवला तर त्याचे अनेक फायदे आहेत.

साहित्य
अर्धा किलो गहू, मीठ. गहू आपण आपल्या प्रमाणाानुसार कमी जास्त घेऊ शकतो.

कृती

प्रथम गहू स्वच्छ धुवून तीन दिवस पाण्यात भिजत घाला. गव्हाचं पाणी रोज बदला. आता हे भिजलेले गहू मिक्सरमधून काढून घ्या. गव्हातला चीक दोन-तीन वेळा पाणी घालून हाताने पिळून घ्या. व गाळणीने गाळून घ्या. हा चीक रात्रभर झाकून ठेवा.वर आलेले पाणी फेकून द्या. हा चीक खोल ताटामध्ये उन्हात चांगला वाळवून घ्या. वाळल्यावर तयार होणारी ही पावडर म्हणजेच गव्हाचा चीक किंवा गव्हाचं सत्व. ही वाळलेली गव्हाची पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवा. जेव्हा लागेल तेव्हा यातील थोडीशी पावडर पाण्यात मिसळून त्यात चवीपुरते मीठ, साखर घालून प्या. शरीराला त्यापासून थंडावा मिळतो. यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्माघाता पासून आपण आपला बचाव करू शकतो. तसेच यापासून गरमागरम गव्हाचा चीकही आपण करू शकतो. तो असाही खाण्यासाठी चांगला लागतो व पौष्टिक असतो.

मस्त खा
स्वस्थ रहा. व्यस्त रहा.

सौ. रेखा देशमुख