Login

वांग्याचे भरीत आणि भरीत पार्टी

This is a delicacy mostly prepared during winters at Maharashtrian households.

हिवाळा ऋतू सुरू झाला की विविध पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळू लागतात वांगी, पावटा, वाल, तुरीच्या शेंगा, गाजर, कोथिंबीर, चाकवत, कांदापात अशा विविध भाज्या शेतात पिकतात. एकंदरीत हिवाळ्यात भाज्यांची चंगळ असते.
मग पोपटी पार्टी, हुरडा पार्टी चे आयोजन केले जाते.

या दिवसात हिरवी, जांभळी वांगी भरपूर प्रमाणात मिळतात,भरीताची वांगी ही उपलब्ध असतात. त्यामुळे भरीत पार्टी ही केली जाते.
घरातील सगळेजण किंवा मित्र मैत्रिणींसोबत शेतात जाऊन मस्त भरीत पार्टी करता येते त्यासाठी काय करायचं. घरातूनच भाकरी बनवून घ्यायच्या. भरीताची वांगी, आणि इतर लागणार साहित्य घ्यायचे आणि शेतात, नदीकाठावर जायचे.

शेतात गेल्यावर आजुबाजूची लाकडे, काटक्या गोळा करून त्या पेटवून विस्तव तयार करायचा आणि त्या विस्तवावर भरीताचे मोठे वांगे भाजायचे. भाजून झाल्यावर त्यात बारीक कापलेला भरपूर कांदा, कापलेली हिरवी मिरची किंवा तिखट , मीठ, कोथिंबीर घालायची. सगळे चांगले मिसळून एकजीव करून घ्यायचे आणि सगळ्यांनी गोल बसून गप्पा मारत ताव मारायचा. शेतात, झाडाखाली थंड आल्हाददायक हवेत दोन घास जरा जास्तच जातात. हल्लीच मागच्या रविवारी आम्ही अशी भरीत पार्टी केली. निसर्गाच्या सानिध्यात खूप मजा आली.

आज चंपाषष्ठी , खंडोबाच्या नैवेद्यासाठी चंपाषष्ठीला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतात. म्हणून आज नैवेद्यासाठी भरीत आणि भाकरी बनवली.
त्याची रेसीपी देते.

* साहित्य
  • एक मोठे भरीतचे वांगे
  • एक मोठा टोमॅटो
  • दोन मोठे कांदे
  • हिरव्या मिरच्या चार
  • लाल तिखट
  • जीरे अर्धा चमचा
  • हळद पावडर चमचा
  • कोथिंबीर अर्धी वाटी
  • कडीपत्ता
  • फोडणी साठी तेल
  • मीठ आवश्यकतेनुसार

कृती
कांदा, मिरच्या, कोथिंबीर,लसूण बारीक कापून घ्यावे.

प्रथम मोठ्या वांग्याला सर्व बाजूंनी तेल लावावे आणि वांगे गॅसवर किंवा विस्तवावर सर्व बाजूंनी भाजून घ्यावे, भाजून झाल्यावर थंड होऊ द्यावे मग वरची करपलेली साले काढून टाकावी, आतील गर चांगला मॅश करून घ्यावा.

कढई गॅसवर ठेवावी त्यात चार ते पाच छोटे चमचे तेल घालावे तेल गरम झाल्यावर फोडणी करावी. जीरे, बारीक केलेले लसूण, कांदा, मिरची ,टोमॅटो घालावा.दोन तीन मिनिटे चांगले परतून झाल्यावर त्यात बारीक मॅश केलेले वांगे घालावे वरून मीठ टाकावे हे सर्व चांगले तयार मिनिटे परतून घ्यावे नंतर वरून कोथिंबीर घालून परतावे आणि झाकण ठेवून गॅस बंद करावा. वांग्याचे भरीत तयार
चपाती, भाकरी बरोबर खावे. भाकरी बरोबर खूप छान लागते.

वांग्याच्या दोन कृती आहेत एक मी वर दिलेली आहे. तेलाची फोडणी न करता सगळे साहित्य भाजून मॅश केलेल्या वांग्यात घालायचे . अशा पद्धतीने केलेले भरीत ही खूप छान लागते.
भरीतासाठी वांगी मोठी आणि त्यात बिया तयार झालेली असावी तर भरीत खूप छान लागते.
तुम्ही ही करत असालच, पण शेतात जाऊन भरीत पार्टी करण्याची मजा काही न्यारीच असते.
आता भरीत पार्टीचे नियोजन नक्की करा आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंद मिळवा.
©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
७/१२/२४