Login

वंश

Story
“रुक जाना नही …तू कही हारके”…गाणं वाजायला सुरुवात झाली आणि क्षिप्रा खडबडून जागी झाली…पटकन तिने वाजणारा मोबाईल बंद केला.अलार्म तिनेच सेट केला होता..स्वतःलाच प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न..तिला स्वतःवरच हसू आलं…
क्षिप्रा जिल्हा परिषदेत वरिष्ठ क्लार्क होती..तिचा नवरा सुचित पेशाने वकील..बऱ्यापैकी जम बसलेला.तिच्या सासूबाई वंदना ताई सेवानिवृत्त शिक्षिका होत्या..निवृत्ती नंतर त्यांनी शहराच्या बाहेर हे टुमदार घर बांधलं होतं.आपल्या यजमानांच्या पश्चात दोन लेकी आणि एकुलत्या एका सुचितला त्यांनी कष्टाने वाढवलं होतं.वंदनाताई स्वभावाने करारी…लेकावर जरा जास्तच प्रेम.सुचितही आईवेडा होता.
क्षिप्रा आणि वंदना ताईंमध्ये वाद होत नव्हते पण संवाद ही नव्हता…कागदाला पडलेली घडी कागद उलगडला तरी तशीच राहते …तसंच काहीसं होतं त्यांच नातं..क्षिप्राला माहेरचं म्हणावं असं कुणीच नव्हतं..आई तर तिला आठवतही नव्हती..तरीही वंदना ताईंना आई म्हणायला तिची जीभ कचरायचीच. ती त्यांना सासूबाईच म्हणायची.. ….सासूबाई आपल्या आधी उठतील या भितीने
मोबाईल बंद करुन क्षिप्रा उठली.. तिने स्वयंपाक आणि बारीक सारीक कामं आवरली आणि ती लेकीला उठवायला गेली.तिची लेक वरदा पाच वर्षांची होती.एकदम गोडुली…सिनिअर केजीत होती.तिला उठवलं ..तिचं आवरुन तिला शाळेत रवाना केलं आणि ती आपल्या तयारी ला लागली.वंदना ताई सुद्धा तिच्या मागोमागच उठल्या होत्या.तिला थोडीफार मदत करायच्या पण क्षिप्रा त्यांना काही करू देत नसे..सुचितला आवडायचं नाही आपल्या आई ने काम केलेलं..पण आज वंदना ताईंचा नूर वेगळाच होता..त्यांनी दोन कपात चहा ओतला …बरोबर चटपटीत चकली घेतली आणि क्षिप्राला बळेबळेच बसवलं स्वतःबरोबर..”काय झालंय सासूबाई ”? काही बोलायचंय का तुम्हाला? वंदनाताईनी चहाचा घोट घेत म्हटलं हो..खूप महत्वाचं आहे.
क्षिप्रा थोडी घाबरलीच..बोला ना सासूबाई …क्षिप्रा थोडं स्पष्टच बोलते ..दुसऱ्या बाळासंबंधी तुम्ही काय ठरवलयं?वरदा झाली की पाच वर्षाची..क्षिप्रा गप्पच राहिली..तिचं आणि सुचितचं ठरलं होतं एकच बाळ होऊ द्यायचं ..मग ते काहीही असो…सासूबाई आपण संध्याकाळी बोलू सविस्तर असं म्हणून तिने वेळ मारून नेली.ॲाफिसमध्ये तिचं मन लागेना तिने अर्धा दिवस रजा घेतली आणि तडक सुचितच ॲाफिस गाठलं..सुचितशी बोलल्यावर तिला थोडं बरं वाटलं.सुचित आईवेडा असला तरी क्षिप्रावर त्याचं मनापासून प्रेम होतं तिच्या कष्टांची त्याला जाणीव होती…संध्याकाळी सुचितच आई शी बोलला ..आई आमचा निर्णय आधीच ठरलाय एकाच मुलावर थांबायचं.. तो बदलणार नाही….वंदना ताईंनी मान डोलावली आणि त्या आपल्या खोलीत गेल्या..
त्यानंतर बराच काळ गेला…आणि एका सकाळी क्षिप्रा अचानक च आजारी पडली..औषधं..तपासण्या यातून निष्पन्न झालं ..ती आई होणार होती.सुचित आणि तिला धक्काच बसला…पण वंदना ताई मात्र खूश झाल्या…त्यांनी छान गोडाचं जेवण स्वतः केलं आणि सगळ्यांना खाऊ घातलं..सुचितने ही हे स्वीकारलं..पण क्षिप्रा मात्र घाबरली…वंदना ताईंच्या दोन्ही लेकींना मुलगे होते..आपल्या लाडक्या लेकालाही मुलगा असावा…आपला वंश पुढे चालावा..असं त्यांना वाटत असावं असचं तिला वाटलं..खरं तर तिची लेक वरदा वंदना ताईंच्या अंगाखांद्यावर वाढली होती..आजीचं आणि नातीचं गूळपीठ छान जमायचं..तिची काळजी क्षिप्राला कधीच वाटली नव्हती..पण आता वंदना ताईंना नातूच हवाय असं तिला मनोमन वाटू लागलं..पण मनातलं बोलणार कुणाशी ..माहेर तर नव्हतचं तिला ..मग बोलायची ती ॲाफिस मधल्या मैत्रिणींशी….त्या सगळ्या..सासू नेहमी खाष्टच असते हा विचारप्रवाह असणाऱ्या संघटनेच्या सदस्या…त्यांनी क्षिप्राच्या काळजीत भरच घातली..मात्र
वंदना ताई तिची खूप काळजी घेत होत्या …अगदी तिच्या आईने घेतली असती तशीच ..पण क्षिप्राची तब्येत काही फारशी सुधारत नव्हती..तिच्या डॅाक्टरनांही तिच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली.. आणि एक दिवस तिने मनातलं सारं सांगितलं त्यांना …बाहेर बसलेल्या वंदना ताईंनी ते ऐकलं..आणि त्या आत गेल्या .सोनोग्राफी मशीन च्या पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या लेकाच्या अंशाला पाहून त्यांना भरुन आलं.क्षिप्राचा हात हातात घेत त्या म्हणाल्या…
..”इवल्याशा पावलांनी…
लेकच येऊदे पोटी…
आभाळ भरून करेल माया
होईल म्हातारपणची काठी…
अगं…क्षिप्रा मला नातवापेक्षा नातवंड हवं होतं..वरदाला एकटीच स्वतःशी खेळताना बघितलं की वाटायचं तिला भावंड हवं ..म्हणून मी बोलले तुझ्याशी त्या दिवशी…आई…मला क्षमा करा ..तुमच्या मनापर्यंत मला कधी पोचता आलचं नाही..म्हणून हा गैरसमज झाला..पण आजपासून माझ्या मनाचं आकाश निरभ्र झालंय..अगदी स्वच्छ..तुम्ही माझी आईच आहात..आणि आता मलाही लेकचं हवीय दुसरी अगदी तुमच्यासारखी…जिचे विचार तुमच्या सारखे असतील… . वंश वाढवणारी वेल कणखर हवी मनाने.. आणि विचारांनी हवी सुंदर.. आणि तिने वंदना ताईंना घट्ट मिठी मारली …





0