Login

वांझोटी (भाग ३)

ललिताचे प्लॅनिंग काय असेल?...
भाग ३

उमा आणि वेदचे लग्न धूमधडाक्यात झाले. दोघांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेत आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. उमाला निरोप देताना सगळ्यांचे अश्रू अनावर झाले होते. रमा तर तिला सोडायलाच तयार नव्हती. शेवटी दोघी सोबतच लहानाच्या मोठ्या झालेल्या. बहिणी पेक्षा मैत्रिणीच नातं निभावत इथपर्यंत आलेल्या दोघीत कायमची फूट जी पडणार होती... सखुची पण वेगळी अवस्था नव्हती. वेदने आश्र्वस्त केले आणि उमाने त्या भावनिक वातावरणात भरल्या डोळ्यांनी माहेरचा निरोप घेतला.

वेद एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. साहजिकच घरची परिस्थिती चांगली होती. गाडी, बंगला, नोकर- चाकर, बँक बॅलन्स... अजून काय हवं! नाही का?... उमा हळुहळु नवीन जागेत रुळत होती. तिच्या गोड स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं... जेवण बनवण्यासाठी नोकर असताना ती स्वतः आपल्या हाताने सगळ्यांसाठी रुचकर जेवण बनवायची. वेदही तिचे भरभरून लाड, प्रेम करायचा. वेद ऑफिसला, धाकटी नणंद ही कॉलेजला जायची, सासू सासरे इतके फ्रेंडली नसायचे तिच्याशी... त्यामुळे निव्वळ करमणूक म्हणून नोकरी करण्याची ईच्छा तिने वेदला बोलून दाखवली होती. सगळ्यांचा होकार कळताच ती नोकरीवर रुजू झाली...

थोड्याच दिवसात धाकट्या नणंदेचे म्हणजेच श्रेयाचे लग्न झाले. एव्हाना वेद आणि उमाच्या लग्नाला दोन अडीच वर्ष होत आली होती. राहून राहून सगळ्यांना एकच खंत वाटतं होती. ती म्हणजे या घरात कधीचं पाळणा हलणार नाही.

"वेद... तुम्हाला तर माहित आहे ना? मला बाळ होणार नाही... तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलंत?" बाल्कनीत कॉफीचे झुरके घेत उभ्या वेदला उमाने प्रश्न केला.
"हो... कारण तू पाहताक्षणी आवडली होतीस. तुला कदाचित विश्वास बसणार नाही पण तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस आणि प्रेमात अपेक्षा नसतात..." तिचा हात हाती घेतं वेद म्हणाला. उमाचे डोळे भरुन आले.

"पण... प्रत्येक वैवाहिक जोडप्याला; आपल्याला मुलं व्हावं असं वाटतच ना? शेवटी तोच तर एकमेव दुवा असतो दोघांमधला..."

"अगं वेडू... आपणं एखादं अनाथ मुलं दत्तक पण घेऊ शकतो."

"सरोगसी पण करु शकतो ना..." खरंतर तिने हा प्रश्न मुद्दामच टाकला होता.

"नाही... मला सरोगसी हा पर्याय नाही वापरायचा. आपणं मुलं दत्तक घेऊ... त्या अनाथ बाळाला पण आई बाबा भेटतील आणि आपल्याला बाळ..." त्याच्या उत्तराने ती मनोमन सुखावली... एकीकडे हे दोघे दत्तक बाळासोबत भविष्य रंगवण्याच्या स्वप्नात हरवले होते तर दुसरीकडे ललिताचे वेगळेच प्लॅनिंग चालु होते... शेवटी कितीही झालं तरी घराण्याला आपल्याच रक्ताचा वारिस हवा होता...

क्रमशः...
0

🎭 Series Post

View all