जलदलेखन स्पर्धा - ऑक्टोंबर 2025
विषय - पदरी पडते अन् पवित्र झाले
शीर्षक - वांझोटी
विषय - पदरी पडते अन् पवित्र झाले
शीर्षक - वांझोटी
"सखु, झालं का? पाहुणे आलेत बाहेर... पोरीच आवरलं नव्हं?" डोक्यावरची पांढरी टोपी सावरत तात्याबानं विचारलं.
"झालंय... बाहेर पाहुण्यांच्या बैठकीसाठी तेवढी चादर टाका. मी आलेच."
"रमा... काय राहिलंय बघ अजून हिच... मी चहा टाकून पोहे बनवायला घेते." धाकट्या लेकीला सांगून सखु स्वयंपाक घरात गेल्या.
आज उमाला म्हणजेच सखु आणि तात्याबाच्या मोठ्या मुलीला पाहुणे बघायला येणारं होते. घरात त्याचीच लगबग चालू होती. उमाने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं तर रमा अजून महाविद्यालयीन शिक्षण घेतं होती. दोघींचा मोठा भाऊ सुधीर तात्याबाच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होता. घराण तसं प्रतिष्ठित. गावात प्रसिद्ध... तात्याबाचा व्यवसाय जोरावर चालत होता. आता तर सुधीरदेखील जोडीला आला होता. शेती भाती, गायी गुरे आणि धन धांन्याने हे कुटुंब संपन्न होते. उमाच लग्न झालं की सुधीरचे पण हात पिवळे करायला मोकळे...
"किती सुंदर दिसतेय माझी ताई... नजर नको लागायला... बघ येणारे पाहुणे पहिल्याच नजरेत तुला पसंत करणार." रमा, उमाच्या कानामागे काजळाचा टिका लावत म्हणाली.
"काहीही हा रमा... एवढी काही मी सुंदर नाहीये... पण रमा यावेळी तरी कोणी पसंत करेल ना मला?" उमाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. गेल्या वेळीचा प्रसंग तिला आठवला... ('अहो आधीच फोनवर कळवायचं ना आम्हाला... आम्ही इथवर आलोच कशाला असतो. ही असली मुलगी आम्ही आमच्या पदरात पाडून घ्यायची का? नुसतं सौंदर्य महत्वाचं नसतं...) उमाच्या कानात आवाज घुमत होते. रमाच्या आवाजाने ती भानावर आली.
"ताई नको... आता नको प्लीज... जे होईल ते पाहता येईल. तसही आपणं काहीच नाही ना लपवत कोणापासून. जे काय खरं आहे ते सांगतोच ना आपणं." रमा तिला धीर देत म्हणाली.
तोवर बाहेर पाहुणे आले होते. सखुने स्वयंपाक घरातूनच दोघींना खुणावले. तश्या दोघी उठून तिच्याकडे गेल्या.
"आई... आपणं आधीच कळवायला हवं होतं का त्यांना?" उमा म्हणाली.
"आई... आपणं आधीच कळवायला हवं होतं का त्यांना?" उमा म्हणाली.
"उमा... जास्त विचार नको करुस... समोरासमोर बोललेल कसं असतं... "
"पण आई..." उमाला मधेच अडवत आईने तिच्या हातात चहाचा ट्रे दिला.
"जे होईल ते पाहता येईल... जा" आईने तिला बाहेर धाडले पण उमा उंबऱ्यातच घुटमळली. तोवर रमा पाण्याचे ग्लास घेऊनही गेली होती. सामोरं सोफ्यावर बसलेला देखणा उंच बांध्याचा तरुण आणि इतर लोक तिच्याकडे पाहतच राहिले. त्या तरुणाची तर रमा वरुन नजरच हटत नव्हती. हे पाहता रमाने घसा खाकरला.
"जे होईल ते पाहता येईल... जा" आईने तिला बाहेर धाडले पण उमा उंबऱ्यातच घुटमळली. तोवर रमा पाण्याचे ग्लास घेऊनही गेली होती. सामोरं सोफ्यावर बसलेला देखणा उंच बांध्याचा तरुण आणि इतर लोक तिच्याकडे पाहतच राहिले. त्या तरुणाची तर रमा वरुन नजरच हटत नव्हती. हे पाहता रमाने घसा खाकरला.
"अहम... एहेमsss... नवरी मी नाही... मी नवरीची बहिण बरं..." रमाने सांगताच ओशाळल्या नजरेने त्या तरुणाने मान खाली घातली. सगळ्यांच्यात एकच हशा पिकला.
उमा चहा घेऊन बाहेर आली. गुलाबी रंगाच्या काठापदराच्या साडीत तिची गौर कांती खुलून दिसत होती. कमरेपर्यंत रुळणारे केस, रेखीव नाक आणि भुवया, दाट पापण्या, काळेभोर डोळे, दोन्ही भुवयांच्या मधोमध लावलेली टिकली म्हणजे तिच्या संस्कारच प्रतीक... हातात किणकिण करणाऱ्या बांगड्या... नाजूक ओठांवरची फिक्कट गुलाबी लाली मोहक दिसतं होती. गळ्यात नाजूक सोनसाखळी आणि कानातली एवलिशी डुलं... तिच्यातला साधेपणा तितक्या शृंगारात पुरेपूर उठून दिसत होता. समोरचा तरुण अजूनही मान खालीच घालून बसला होता. त्याच्या जवळ बसलेल्या रमाच्या वयाच्याच मुलीने त्याला हळूच हाताने डिवचले. न समजून त्याने मान वर केली.
"वेद... ही आहे मुलगी. पाहून घे... पसंत असेल तर लगेच सांग." त्या तरुणाच्या म्हणजेच वेदच्या आईने हसत सांगितले. उमाने थरथरत्या हाताने सर्वांना चहा दिला पण तिने एकदाही नजर वर करून पाहिलं नाही. त्या एकाच गोष्टीची तिला भीती वाटत होती.
चहा पाणी, कांदे पोहेचा अर्थातच मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलाच्या मंडळीत आपापसात बोलणी झाली.
"मुलगी आम्हाला पसंत आहे. वेदचा सुद्धा होकार आहे... सुशिक्षित आहे, सुंदर आहे , घरकामात पण हुशार असेलच... आता फक्तं तुमचा होकार कळवला की झालं... हवं तर वेळ घ्या..." वेदच्या आईने सांगितले.
"पण त्याआधी मला काहितरी सांगायचं आहे..." उमा म्हणाली... तात्याबा आणि सखुनं मान खाली घातली.
क्रमशः....