Login

वांझोटी...भाग:१

A Husband Wife Story
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - वांझोटी...
भाग :१


डॉ. रवी यांना नुकताच वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल एक मोठा सन्मान दिला गेला होता. भव्य सोहळ्यात पुरस्कार स्विकारल्यानंतर ते दोन दिवसांनी आपल्या 'फर्टिलिटी' क्लिनिकमध्ये परतले.

क्लिनिकच्या पुर्ण स्टाफने मोठ्या उत्साहाने तो सोहळा टीव्हीवर पाहिला होता.

डॉक्टर येताच सगळे आनंदाने त्यांचे पुष्पगुच्छ वगैरे देऊन अभिनंदन करू लागले, पण डॉक्टर मात्र निर्भाव चेहऱ्याने काहीही न बोलता थेट आपल्या कॅबिनमध्ये गेले.

कॅबिनमध्ये जाऊन त्यांनी रिसेप्शनिस्टला फोन लावला.
“बाहेर काय चालले आहे मेघना? काम सोडून टाइमपास कशाला करत आहात? काहीच काम नाही का?”
असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.

तेवढ्यात त्यांचा ड्रायव्हर हार, तुरे आणि ट्रॉफी घेऊन आत आला.
“हे सगळे इथे कशाला आणले आहे?” डॉक्टरांनी चिडत विचारले.
डॉक्टरांच्या अशा वागण्याने ड्रायव्हर जरा गोंधळला.

“साहेब, घरी ठेवायचे म्हटले होते, पण इथे ठेवले तर रोज तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आणि त्याने तुम्हाला अजून कामाची प्रेरणा मिळेल.”

"बुलशिट! मला माझ्या डोळ्यांसमोर हे अडथळे नकोत. हे बघ, हे सन्मान, अवॉर्ड्स, गौरव वगैरे सगळ्या फालतू गोष्टी असतात. मेघनाला सांग, ती दाखवेल यांची जागा.” डॉक्टरांचा आवाज जास्त चढला.

“पण साहेब, केवढे कौतुक होते तुमचे... लोक पाया पडतात तुम्हाला. ” ड्रायव्हर जरा धाडस करून म्हणाला.

“ओहह प्लीज, जस्ट शट अप! तुला एकदा सांगितलेले कळत नाही का ? मला या गोष्टींत अजिबात रस नाही." डॉक्टरांचा पारा चढत होता.

“पण साहेब, एवढा मोठा राज्यस्तरीय सन्मान आणि तुम्ही...” ड्रायव्हरने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

आता मात्र डॉक्टरांचा संयम सुटला.
“ तुला माझी भाषा समजते की नाही? गेट आऊट!”

हे ऐकताच ड्रायव्हर मान खाली घालून बाहेर पडला. त्याच्या मनात मात्र एक प्रश्न थैमान घालत होता.
“साहेब आज एवढे का चिडले आहेत? नक्की काय झाले आहे तेच कळत नाही.”

डॉक्टर रवी आपल्या खुर्चीला डोके टेकवून, डोळे बंद करून काहीतरी विचार करत होते.

तेवढ्यात एक माणूस आत आला. त्यांने सरळ येऊन डॉक्टरांचे पाय धरले.

“डॉक्टर, खूप खूप अभिनंदन. तुम्ही आम्हाला जीवनदान दिले. नाही, नाही... तुम्ही फक्त डॉक्टर नाही, तुम्ही देव आहात. साक्षात देवमाणूसच.” त्या माणसाचे डोळे अश्रुंनी भरले होते.

डॉक्टर क्षणभर दचकले.

“असे काय करत आहात? उठा आधी. शांत व्हा. मी कोणावर उपकार करत नाही. मी माझे काम करतो, त्याचे पैसे घेतो. ही देवत्वाची गोष्ट वगैरे काही नाही, हा फक्त व्यवहार आहे.” डॉक्टर थोडे कठोर स्वरात म्हणाले.

“डॉक्टर, तुम्ही काहीही म्हणा. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. तुम्हाला तो गूढ मंत्र मिळाला आहे. दैवी देणगी आहे ती. तिचा आदर करा, ती जतन करा आणि आमच्यासारख्या निराशांना नवजीवन द्या.” तो माणूस नम्रतेने म्हणाला.

यावर डॉक्टर थोडे नरमले, पण त्यांच्या मनातली अस्वस्था मात्र बदलली नाही.

“थॅंक्यू. पण हा माझ्या कन्सल्टन्सीचा वेळ आहे. प्लीज… तुम्ही जाऊ शकता.”

डॉक्टरने असे म्हणताच तो माणूस लगेच उठला.

“सॉरी डॉक्टर. पण राहवले नाही हो, म्हणून आलो. खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा अभिनंदन.” असे म्हणत तो निघून गेला.


तो माणूस बाहेर जाताच डॉक्टरांनी चिडून पुन्हा फोन लावला.

“मेघना, हे काय चालले आहे? अपॉइंटमेंट नसताना कुणीही आत कसा येतो? मला आज कोणताही डिस्टर्बन्स नको. प्लीज. आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. मला माहीत आहे, हे असे पहिल्यांदाच होत आहे. पण मी सांगतो म्हणून कर. मला जरा एकांतात राहू द्या. कोणालाही आत सोडू नको.” असे म्हणत डॉक्टरने फोन ठेवला.

त्यांच्या डोळ्यांत विचित्र बेचैनी दिसत होती. आपल्या दोन्ही डोळे बंद करुन ते तसेच राहिले.

अचानक कॅबिनचे दार उघडले गेले आणि एक स्त्री आत आली.

“एक्सक्यूज मी, डॉक्टर...”

“कोणी सोडले आत? मी आज कुठल्याही पेशंटला अटेंड करणार नाही.” डॉक्टरने दाराकडे न बघता म्हटले.

“सॉरी डॉक्टर. पण खूप अर्जंट आहे. आधीच खूप उशीर झाला आहे. आणखी थांबले तर अजून उशीर होणार.”

“मी सांगितले ना, आज मी पेशंट अटेंड करणार नाही.” असे म्हणत त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि ते दचकले.

“तू...? तू इथे? इथे काय करतेस?”

डॉक्टरांच्या या प्रश्नावर ती हलकेच हसली.

“का आलीस म्हणजे? डॉक्टर, पेशंटला कधी असे विचारतो का? कित्येक दिवस, महिने... नाही कदाचित वर्ष झाली तुमची अपॉइंटमेंट हवी होती. पण कधीच मिळाली नाही. म्हणून आले.”

“कसली अपॉइंटमेंट? कसली ट्रिटमेंट पाहिजे तुला?” डॉक्टरांचा चिडका स्वर अजूनही बदललेला नव्हता.

डॉक्टर अजूनही बेचैन होते. समोर ती अनोळखी, पण ओळखीची स्त्री मात्र हसऱ्या चेहऱ्याने उभी होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती.

“कसली ट्रिटमेंट? हे काय विचारणे झाले, मी नक्कीच ताप, खोकला घेऊन इथे आलेले नाही. बाळ... बाळ हवं आहे मला. म्हणूनच आले आहे इथे. आफ्टर ऑल, यू आर द बेस्ट गायनॅकॉलॉजिस्ट हू हॅज गिव्हन बर्थ टु मेनी लाईव्ज.” ती पुन्हा हसली.

“स्टॉप धिस, राईट नाऊ!” डॉक्टरांचा राग शांत झाला नव्हता.

“डॉक्टर, तुम्ही प्रोफेशनल आहात. तुम्ही तुमच्या पेशंटशी असे वागणं योग्य नाही." ती मात्र डॉक्टरांचे बोलणे मनाला लावून घेत नव्हती.

“मला माझ्या प्रोफेशनचे धडे शिकवू नकोस."

“मी शिकवत नाही, फक्त आठवण करून देते.” ती स्त्री शांतपणे, पण चिडवत म्हणाली.

क्षणभर खोलीत शांतता पसरली. ती डॉक्टरांनी न सांगता समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने हातातली फाईल डॉक्टरांकडे पुढे केली.

“मी माझे सगळे रिपोर्ट्स आणले आहेत. डॉक्टर, प्लीज... फक्त एक पेशंट अटेंड करा. फार वेळ लागणार नाही. प्लीज, नाही म्हणू नका."

डॉक्टर तिच्याकडे एकटक पाहू लागले. तिच्या डोळ्यांतली विनवणी, तळमळ, यातना सगळे त्याला स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे त्यांच्या मनातला कठोर आव आणखी टिकला नाही.

“हं... बोल, काय प्रॉब्लेम आहे?” ते शांत स्वरात म्हणाले.

हे ऐकताच त्या स्त्रीच्या डोळ्यांत खूप मोठा दिलासा उमटला.

“थॅंक यू, डॉक्टर, पण मला आधी एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही एखादा नवीन पेशंट अटेंड करायला साधारण किती वेळ घेता?”

“तुम्हाला घाई असेल, तर तुम्ही आत्ताच निघू शकता.” डॉक्टर चेहरा कठोर करत म्हणाले.

" प्लीज, सांगा ना."

“इट डिपेंड्स. केस हिस्ट्री जाणून घेण्यासाठी, पेशंटला कम्फर्टेबल करण्यात कमीत कमी अर्धा तास सहज जातो.” डॉक्टरनी तिच्याकडे न बघता उत्तर दिले.

“आणि त्यासाठी तुमची फी किती असते?”

“आय चार्ज १००० रुपीज फॉर माय कन्सल्टन्सी.” डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले.

“अर्थात तुमची विद्वत्ता ही फक्त लक्ष्मीची कृपा असलेल्यांना प्राप्त होते, नाही का?”

“तू इथे माझा इंटरव्यू घेण्यासाठी आली आहेस की ट्रिटमेंटसाठी?” डॉक्टरनी चिडून विचारले.

तिने दोन हजाराची नोट त्यांच्यासमोर धरली.

“सॉरी. व्हेरी सॉरी. ही घ्या तुमची फी.”
“मी कन्सल्ट करण्याआधी फी घेत नाही.”
“छे छे! ही कन्सल्टन्सी फी नाही, तुमच्या किमती ६० मिनिटांसाठी मोजलेली किंमत आहे ही.” त्या स्त्रीच्या मनात नक्की काय आहे हे डॉक्टरांना समजत नव्हते.

“हे बघ, मला संताप आणू नकोस. मी आधीच सांगितले आहे की…”
“बी पेशन्स डॉक्टर, कूल डाऊन. शांत व्हा. माझ्यासाठी तुमची वेळ खूप महत्त्वाची आहे. टू स्टार्ट विथ ट्रीटमेंट, हे घ्या माझे रिपोर्ट्स.”

डॉ. रवींनी फाईल घेतली आणि तिचे रिपोर्ट्स चाळले.

“गेल्या पाच वर्षांपासून, तू हे करत आहेस?” डॉक्टरांनी विचारले.
“हो. माझ्या लग्नाला सात वर्ष झालीत, लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे रूटीन सुरू झाले. दर सहा- सात महिन्यांनी मी ब्लड, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, हिमोग्लोबीन अशा टेस्ट्स करत राहते. आतापर्यंत हिस्टेरोग्राफी, एंडोस्कोपी, सोनोग्राफी, मेमोग्राफी सगळ्या टेस्ट्स केल्या आहेत. आता तर मला याची सवयच झाली आहे.” स्त्रीने शांतपणे पण हसत सांगितले.

“हो, मी पाहतो आहे रिपोर्ट्स. वेगवेगळे डॉक्टर्स, वेगवेगळे लॅब्स...”

“डॉक्टर, स्त्री आणि पुरुष यांचे मिलन नैसर्गिक आहे. पण माझ्या बाबतीत ते का घडत नाही, याचे उत्तर मी गेली सहा वर्ष शोधत आहे. मला उत्तर मिळाले नाही, पण माझ्या मनात प्रश्न मात्र असंख्य उभे राहिले आहेत.”

क्रमश:
0

🎭 Series Post

View all